Friday, October 18, 2024
Homeसेवाहवा हवाई : भाग ७

हवा हवाई : भाग ७

“कानपूर पोस्टींग”

एक दिवशी मी श्रीनगर मध्ये असताना मला फोन आला की घाई घाईने तू चंदीगडला जा. फोर झिरो टू (४०२) एअर फोर्स स्टेशन कानपूरला पोस्टिंग झाले आहे, तिथे जा. असे म्हटल्यानंतर पुढच्या हेलिकॉप्टरमध्ये बसवून मला चंदीगडला पाठवण्यात आले. तोपर्यंत १२ विंगच्या अकाउंट्स सेक्शनचे सगळे ऑफिसर्स बदलले होते. त्यामुळे सहाजिकच त्यांनी मला विचारले की, तू कोण ? इथे पोस्टिंगवर आलेला होतास तेही आम्हाला माहीत नाही ! माझे नवे बॉस म्हणाले, ‘हे बघ आता तू ऑफिसर्स मेस मधल्या पार्टीच्या भानगडीत पडू नकोस. तुझे मेमँटो म्हणून जे दिले जाते ते आम्ही तुला नंतर पाठवून देऊ’ ! तुझे सामान पॅक केलेले आहेच म्हणून तू आता आज रात्रीची ट्रेन पकडून कानपूरला जा’ !

मला हे कळेना की एवढी तातडी का झाली ? आणि खरे तर मला सांगण्यात आले होते की माझे पोस्टिंग आता श्रीनगर मध्येच होणार आहे ! कारण मी 90 दिवसाचे असे दोन टेम्पररी ड्युटीचे काळ श्रीनगरमध्ये काढल्यामुळे आता फक्त कागदावरच माझे परमनंट पोस्टिंग होणार, ही गोष्ट मला सारखी सारखी सांगितली जात होती आणि आता एकदम हे कानपूर एअरपोर्ट स्टेशन ही बातमी मला धक्कादायक होती ! असो.

 हवाई दलात सांगितली गेलेली आज्ञा पाळणे हे महत्त्वाचे असते, त्याप्रमाणे मी रातोरात सामान घेऊन आणि त्या वेळेपर्यंत घेतलेली लँब्रेटा नावाची सेकंड हॅन्ड स्कूटर सियालडा एक्सप्रेसच्या लगेज व्हॅनमधे चढवून ट्रेनमध्ये बसलो. कानपूरला आल्यावर तिथला खाक्या एकदम वेगळा होता ! त्याचीच कहाणी आणि मजा मजा काय घडल्या थोडक्यात सांगतो.

 या पोस्टिंग मध्ये दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे मला नाटकात भाग घेण्याची वेळ आली आणि ती सुरसुरी नंतर इतकी वाढली की माझ्या अपरोक्ष लोक मला ‘नाटक्या’ असे म्हणू लागले. दुसरे म्हणजे माझा विवाह. कानपूर या उत्तर प्रदेशमधील ‘नटोरिअस’ म्हणून असलेल्या प्रख्यात असलेल्या हवाई दलाच्या स्टेशनचा हिसका कळला !

तो दिवस होता ३१ जुलै १९७४. माझ्या ऑफिसमध्ये एक सार्जंट भेटायला आले. एक छानसा सॅल्यूट करून मराठीत म्हणाले, ‘मी सोमणी. सर, आम्हाला तुम्ही आमच्या नाटकात काम करायला म्हणून हवे आहात.’ मी थोडा चकित होऊन म्हटलं, ‘पण मी तर कधी नाटकात काम केलेलं नाही.’ ते म्हणाले, ‘तसं जरी असलं तरी रोज प्रॅक्टिस करून ते आपल्याला जमेल. आमच्या नाटकातील नायक, त्याची भाषा, त्याचे दिसणे हे सगळे आपल्याला शोभेल असे असल्यामुळे आम्ही सर्वांनी आपल्याला विनंती करण्याकरता म्हणून आपल्याला भेटायला आलोय. शिवाय तुम्ही एकदा बोलताना म्हणाला होतात की गणेशोत्सवात मला भाग घ्यायला आवडेल. हे नाटक गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाचा भाग आहे. नंतर ते नाटक बृहन महाराष्ट्र नाट्य स्पर्धेत नवी दिल्ली येथे नेण्याचे ही ठरले आहे. म्हणून आता तुम्ही नाही म्हणलात तर आमचे नाटक बंद पडेल’. 
मी म्हणालो, ‘अहो तुम्ही नाटक सुरू करण्याच्या आधीच कोणाला तरी घ्यायचे ठरवलं असेल ना, मग त्याचे काय झालं ? ते जरा चेहरा पाडून म्हणाले, ‘ते बरोबरच आहे परंतु त्यांनी नकार दिला. कारण त्यांची पोस्टिंग आलेली आहे. ते पोस्टिंग कॅन्सल पण करू शकत नाहीत आणि म्हणून त्यांचाही नाईलाज आहे. म्हणून तुम्हाला ही विनंती करायला मी आलेलो आहे’.
 तोंडावर नाही म्हणायचं नाही म्हणून मी म्हटलं, ‘बर बघू काय मला काही करता आलं तर’. ताबडतोब त्यांनी आपल्याजवळ त्या नाटकाचे पुस्तक माझ्या हातात दिले आणि सांगितले, शिवमंदिरा जवळच्या हॉलमधे आम्ही रोज प्रॅक्टिस करतो. तिथे आपण संध्याकाळी साडेसातच्या नंतर यावे. तिथे आपल्याला  बाकीचे लोक भेटतील आणि पुढे काय करायचं ते आपण ठरवू. तुम्ही यात हवे, असं म्हणून ते निघून गेले. मी त्या नाटकाचे पुस्तक उघडून  नाव पाहिले, ‘लहानपण देगा देवा’ – लेखक बाळ कोल्हटकर. 
मला आठवले की माझे आजोबा – बाळकोबा गोखले (कै. विक्रम गोखलेंचे कोणी नातलग नव्हेत) बाळ कोल्हटकरांच्या ‘वेगळं व्हायचंय मला’ या नाटकात काम करत असताना  त्यांच्याबरोबर एकदा मी मिरजेच्या देवल नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग पाहिला होता. त्यामुळे बाळ कोल्हटकर हे दिसतात कसे वगैरे मला आठवत होते.

मी रूमवर आलो आणि नाटक वाचायला सुरुवात केली. त्यावेळी माझ्या लक्षात आले की बाळ कोल्हटकर यांचीच भूमिका मला करायची असल्यामुळे आणि तेच लेखक असल्यामुळे साधारण १०० पेक्षा जास्त पानांमधील ८० टक्के पानावरील लांबचक संवाद हे त्यांचे असल्यामुळे ते आता मला पाठ करून म्हणावे लागणार आहेत! मी कॉलेजमध्ये असताना नाटकात काम करणे वगैरे याकडे नेहमीच दुर्लक्ष करत असे.’ मुलींना गटवण्याकरता मिळणारी एक संधी’ असे माझे त्या वेळचे मत होते. याशिवाय माझी बहीण लता ही सांगली कॉलेजमध्ये हीरोइन म्हणून दरवर्षी त्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये पारितोषक पटकावित असे. माझे आजोबा बालगंधर्वांपासून अनेक प्रथित यश नटसम्राटांबरोबर स्टेजवर रिप्लेसमेंट काम करणारे म्हणून प्रसिद्ध होते. माझ्या आईने (मंगला ओक) कीर्तनकार होण्याआधी कुलवधू, प्रेमा तुझा रंग कसा ? वगैरे नाटकातून अभिनय करून खूप शाबासकी मिळवली होती. माझा मामा, मधुसूदन पर्वते, माधवनगर कॉटन मिलमध्ये गणेशोत्सवातील नाटकात हिरोची भूमिका करत असे. त्यामुळे पाठांतर, रिहर्सल्स करयला त्याला मदत म्हणून करत असे. पण हे झंझट एके दिवशी माझ्या गळ्यात पडेल असे मला अजिबातच वाटले नव्हते ! 

त्या संध्याकाळी मी जेव्हा इतरांच्या समोर उभा राहिलो आणि तोपर्यंत तीन-चार तासात पाठ केलेले १०-१२ पानांचे संवाद खणखणीत आवाजात बोलायला लागलो. तेव्हा सगळ्यांनी टाळ्या पिटल्या. ‘आमची निवड अजिबात चुकीची नव्हती’ असे ते एकमेकांत बोलत होते. पुढच्या दोन-तीन महिन्यात गणेश चतुर्थीत ते नाटक सादर केले गेले. नंतर दसऱ्याच्या दहा दिवसात नव्या दिल्लीत होणाऱ्या नाट्य स्पर्धेत आम्ही भाग घेतला. आमचे नाटक तीन तास आणि वर काही मिनिटे झाले म्हणून टेक्निकल ग्राउंडवर आम्हाला बाद करण्यात आले, असे सांगण्यात आले. आता ही अट ते इतकी कसोशीने पाळतील अशी आमच्या दिग्दर्शकांना कल्पना नव्हती असेच म्हणावे लागेल. नाहीतर दोन अंकातील चहापाणी करत वेळ काढला, तो कमी करून वेळेचे बंधन पाळता आले असते.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on चलो, अमरावती !
वर्षा महेंद्र भाबल on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सौ.मृदुलाराजे on विजयादशमी
सौ.मृदुलाराजे on चलो, अमरावती !
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था , महाराष्ट्र. on गुरूंच्या आठवणी
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” :  १०
डॉ. प्रशांत भुजबळ on अभिनव टपालदिन