Thursday, November 21, 2024
Homeसाहित्यहवा हवाई : १३

हवा हवाई : १३

२ जवळचे मित्र

अनेक वेळा अशा मित्रांचा सहवास लाभतो की त्यांच्या आठवणीने अनेक इतर आठवणी जागृत होतात. काही अशा मित्रांच्या पैकी जे. बी. हा माझा जवळचा मित्र झाला.

खरे पाहिले तर जे बी माझ्यापेक्षा जवळजवळ १३ वर्षांनी मोठा होता. कारण तो रँक्स मधून कमिशन मिळवून आमच्याबरोबर पास आऊट झाला. सहा फूट उंची, बळकट शरीर, जाट लोकांचा चेहऱ्यावर प्रभाव. तो माझ्या संदर्भात वडीलधारा मित्र होता. जेव्हा माझ्या युरीन मध्ये अल्ब्युमिन सापडले म्हणून तुला ऐन फायनल परीक्षेच्या काळात हॉस्पिटलमध्ये वेलिंग्टनला जावे लागेल असे सांगितले गेले, तेव्हा मी फारच चिंतेत होतो. कारण जर असे काही प्रश्न निर्माण झाले तर माझ्या कमिशनिंग मध्ये सुद्धा बाधा येणे सहज शक्य होते. आमच्या कॅडेट मेसच्या जवळच्या बिलेटमध्ये माझ्या शेजारच्या रूममध्ये राहणारा हा जेबी मला म्हणाला, ‘ओक चल, आपण बाहेर जाऊन तुझ्या युरिन ची टेस्ट करून घेऊ’. त्याप्रमाणे माझी टेस्ट केली तर रिझल्ट मध्ये ती अगदीच नॉर्मल होती. तसे जरी असले तरीसुद्धा आमच्या मेडिकलच्या रेकॉर्डमध्ये तसे असल्याशिवाय माझी सुटका होणार नव्हती. शेवटी मला जावेच लागले. हॉस्पिटलमध्ये सात-आठ दिवस राहून तिथल्या लॅब मधील ऑल क्लिअर असे सर्टिफिकेट मिळाले आणि मला हायसे वाटले. तेव्हा जे बी चा हवाई दलातील पूर्व अनुभव माझ्या मदतीला आला.

पुढे १९७३ मधे श्रीनगरला त्याची आणि माझी गाठ पडली. तेव्हा आम्ही रूम मेट होतो. त्यानंतर आमची भेट पुन्हा कानपूरला झाली. त्यावेळची एक आठवण सांगतो. एक दिवशी तो मला त्याच्या ऑफिसच्या मागच्या बाजूला घेऊन गेला आणि मला म्हणाला, ‘देख मै तुम्हे ऐसी गिफ्ट देने वाला हू, जो तुझे जिंदगीभर याद रहेगी और काम आयेगी’. त्यांनी रशियन वूडचे लांब लांब फळ्यांचे सात-आठ फट्टे एका रॅकच्या खालून काढले आणि मला म्हणाला, ‘हे मी तुझ्यासाठी ठेवलेले आहेत. याचे चार बॉक्स होतील. हे रशियन वुडचे असल्याने ते कधीच खराब होणार नाहीत, ना त्याला वाळवी लागेल’. मला त्या वेळेला लग्नाची भेट म्हणून असे लाकडी बॉक्स देणे हे जरा विचित्र वाटले. ते फट्टे त्यानेच सेक्शन मधल्या सुताराकडे दिले. त्या सुताराने एका सायकल रिक्षावर घालून ते माझ्या रूमवर पोहोचते केले. त्यावेळेला मला १४ रुपये असा खर्च आल्याचे आठवते. त्याने म्हटल्याप्रमाणे ते बॉक्स माझ्या निवृत्तीपर्यंत प्रत्येक पोस्टिंगला बरोबर होते. अशा रीतीने ती लग्नाची भेट माझ्या संदर्भात फारच उपयोगी होती.

जे बी ला रमी खेळायचा नाद होता. त्या भागात रमीला पपलू असे नाव होते. आमच्या रूममध्येच त्याचे पपलूचे मित्र येऊन दुपार पासून अड्डा बनवून खेळत असत. त्यामुळे माझी फार पंचाइत होई. मला आराम करायला माझ्याच कॉटवर अंग चोरून झोपावे लागायचे. जे बी चा हातखंडा असा की तो दर वेळेला रमीत जिंकायचा. कधी तीन पत्ती खेळायला लागले तर हमखास त्याला अशी काही जबरदस्त पाने यायची की तो जिंकायचा. त्यामुळे त्याचे नाव बाकीच्यांच्या संदर्भात पैसे कमावणारा म्हणून झाले होते. नवा शर्ट दाखवत म्हणायचा, ‘हा रमीच्या पैशातून बनवलेला आहे’. तो म्हणायचा ‘मला आता कंटाळा आलाय. मला काही पैसे मिळवायचे नाहीत’ पण बाकीच्यांच्या आग्रहामुळे त्याला खेळावे लागे.

एक दिवस सर्व असेच बसलेले असताना एकदम भांडाभांडी सुरू झाली आणि त्याच्या खेळाडू मित्रांच्या बायका आल्यामुळे गोंधळ उडाला. जे बी ला जबाबदार धरून, ‘आमच्या नवऱ्याला तू नादी लावले आहेस’ म्हणून ओरडा आरडा करून आपापल्या नवऱ्यांना घेऊन गेल्या. जे बी ला त्यामुळे रमी आणि तीन पत्ती खेळाच्या कचाट्यातून बाहेर पडायला मिळाले.

असा हा जे बी मला नेहमीच मदतीला धावून आला. मी आदमपूरला गेलो असता तिथे त्याची गाठ पडली. ती माझी पहिलीच उत्तर भारतातली कडक थंडी असल्यामुळे त्याने माझ्याकरता बाजारात जाऊन रजई बनवून आणून दिली. जालंधरला आम्ही रविवारच्या सुट्टीत सिनेमा पाहायला एकत्र जायचो. तेव्हा ‘सीता और गीता’ सिनेमा पाहिल्याचे मला आठवते.
माझ्या पुढच्या आयुष्यात जे बी ची भेट झाली नाही. आमच्या कमिशनिंगच्या 50 व्या वर्षी 2022 मध्ये आम्ही कोईमतुरला एअर फोर्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेजच्या भेटीला एकत्र जमलो असताना जे बी चे काय झाले याबद्दल माझ्या इतर मित्रांनाही माहिती नव्हती. असा हा जय भगवान माझा जवळचा मित्र आठवतो.

मराठी नाटक प्रेमी पी के मेनन हा मल्याळी व मी १९७८-८१ ला श्रीनगरला एकत्र राहात होतो. त्याची बायको नागपूरची एम एन एस नर्स होती. मराठी त्याला छान समजायचे. आम्ही अमरनाथ गूफेच्या यात्रेत बरोबर होतो. त्याच्या सावधगिरीमुळे आमच्याबरोबर असलेला एक बंगाली घोड्यावरून तोल जाऊन खाईत जायला लागला. पाय रिकीबीत अडकल्यामुळे सुदैवाने वाचला. बालटालच्या बिकट चिंचोळ्या वाटेने येताना घोड्यावर बसल्या बसल्या पेंग आली होती. मेननच्या साहसामुळे घोडा पकडून त्याला वर काढला. त्या यात्रेच्या आठवणी अनेक वर्षांनी भेटलो तेंव्हा निघाल्या. अमरनाथ गूहेत बर्फाचे शिवलिंग बनते ते पहायला १९९७ साली हेलिकॉप्टरने जायची संधी मला मिळाली. त्यावेळी अदभूत अनुभव आला. तो प्रसंग श्रीनगरच्या तिसऱ्या पोस्टींगच्या वेळी सांगेन.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments