“अंकल सक्सेना”
‘तुम्हाला काय वाटले ? तुम्ही माझे एकच वडील आहात? मला आणखी पण एक डॅडी आहेत !’ हवाईदलातील दिवस काही आठवणी –
रविवारचा दिवस. पुण्यातल्या हवाईदलाच्या 91/बी बंगल्याच्या पुढच्या बागेमधे पांढऱ्या केन चेअर्स टाकून आम्ही – अलका व मी – आरामात बसलोय. लाल बहराने डवरलेल्या गुलमोहोरांच्या झाडांना पहात पहात सकाळच्या गार झुळुकी बरोबर ती कशी मंदमंद डुलतायत याचा आनंद घेतोय. मे महिन्यातील दुपारच्या घाम फोडणाऱ्या गरमीला न जुमानता ती झाडे कशी ठाम उभी आहेत याचे कौतुक वाटतय. पहिल्या चहाची तलफ भागवून सकाळ पेपरवर नजर टाकतोय. रस्त्यावरून रशियन क्वार्टर्समधे राहणाऱ्या विदेशी पाहुण्यांची लोहगावात भाजीपाला आणायसाठीच्या धांदलीत जाणारी झुंड पहातोय. तेवढ्यात दुसऱ्या वाफाळलेल्या चहाचा ट्रे येतोय.
मी मनात आजच्या बाहेर फिरायला जायच्या बेतांना रंगवत असताना नेहाने आम्हाकडे येऊन एका खुर्चीत एकदम दाणकन बसकण मारली. ‘तुम्हाला काय वाटले ? तुम्ही माझे एकच वडील आहात ? मला आणखी पण एक डॅडी आहेत!’ मी प्रश्नार्थक नजरेने पत्नी अलकाकडे पाहतोय असे पाहून नेहाने सूर धरला, ‘आईकडे नका पाहू. मी माझ्या भैय्याच्या लग्नाला सूरतला जाणार आहे. आता तुम्हीमधे टांग अडवू नका, काहीतरी कारणे काढून’.
उरलेला चहा तसाच टाकून मी भांबाऊन पहात राहिलो. आता काय नवे लचांड? असा चेहरा करून अलका म्हणाली, ‘पण कोण ? कुठे निघालेत ? कोण भैय्या? ते तर सांगशील !‘…
‘माझे एक सक्सेना अंकल आहेत. त्यांनी मला बेटी मानलय. फार प्रेमळ आहेत ते बाबा. ते माझे कन्यादान करीन म्हणतात, जर तुला तुझ्या बाबांनी परवानगी दिली नाही लग्नाला तर, असेही ते म्हणालेत… तुम्हाला त्यांनी भेटायला बोलावलय. त्यांच्या एका मुलाचे लग्न सुरतला आहे त्याला मी बाराती म्हणून जातेय म्हणून सांगतेय.’
खुलासा झाला अन् सक्सेना अंकल हे प्रचंड गौडबंगाल आमच्या घरी घोंघावले…
… ‘आप बीलीव नहीं करोगे’… म्हणत म्हणत सक्सेनांनी व्हिस्कीचा लार्ज पेग ग्लासात भरला. त्याची लेव्हल मनाजोगती होई पर्यंत ते थांबले. मग आईस क्युबच्या बकेट मधील निवडक 3 क्युबनी आपली जागा ग्लासातील सोनेरी रंगात केली. माझ्या व अलकासाठी एक-एक पेप्सीकोला ग्लास भरून तैय्यार केला. एका चकचकीत ट्रेमधे काजू व वेफर्सची गर्दी झालेले बाऊल माझ्या व अलकाच्या पुढ्यात ठेवत अलकाला ते म्हणाले, ‘सच्ची… आप बिलीव नहीं करोगे… नेहा बिटियाने हमारा दिल जीत लिया है। हम कह देते हैं की हमें दो बेटे है, पर बिटिया की कमी हमेशा खलती थी । अब हमारे बच्चे बड़े हो गए है । एक अपनी मैरिज़ कर बंगलोर में सेटल है, तो दुसरे सुरतकी एक गुजू बेन से दिल दे बैठे है। अब, क्या करे… हम तो है कानपुर- इलाहाबाद की तरफ के, हमारी बिरादरीवालोंने तो हमसे, समझो नाता ही तोड दिया … ‘आप बिलीव नही करोगे’… पिछले कितने सालोंसे हम उधर गए भी नहीं।
‘क्यों ठीक कह रहै है जी?’ पत्नीकडे पहात त्यांनी तिची हामी भरली। ‘ऐसे में अब एयर फोर्स से रिटायरमेंट के बाद यहां पुना में खेसे पार्क के एरिये में दुनिया बसा ली है। हम दो और हमारे दो म्हणत त्यांनी खुर्चीच्या दोन्ही बाजूला बसलेल्या स्वीटी व प्रीती नामक श्वानांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला व काजूचा बाऊल पुढे सरकवत मला म्हणाले, ‘सर, आप तो लकी है।‘
… ‘बहनजी आप को बताऊं… दीप्ती बिटिया के साथ नेहा आई तो थी हमारे स्वीटी और प्रिटी के साथ खेलने। तब पता चला की उसे भी कुत्ते पालने का बड़ा षौक है। और सर, ये दुमिये भी देखो, नेहा आते ही ऐसे पूंछ हिला हिलाकर नाच उठते है की मानो हम उनके कोई लगते ही नहीं’….
‘नेहा आती है घर में, तो एक अजीब सी गहेमागहमी होती है… आप बिलीव नहीं करोगे।…
…अब सूरत की पार्टी है । और उन्होंने हमें न्योता दिया है, अच्छा होगा अगर आप उसे हमारे साथ बारात में भेज दे तो। आप चिंता मत करिए। जाने आने, रहने का बढीया इंतजाम कर के कर रखा है। मैं तो कहूं के आप भी नेहा के साथ पधारेंगे तो उससे भला और क्या होगा? क्यों जी हम ठीक कह रहे है नां? असे म्हणून त्यांनी आंटीकडे विचारणा केली … त्यांनी तोपर्यंत चिकन टिक्का व आणि एग फ्राय एका ट्रेत आणत एन्ट्री घेतली. स्वीटी व प्रिटीनी त्या बसल्या त्यांच्या पायाशी घुटमळत जागा घेतली. तोवर नेहा आली,
‘क्यों अंकल कैसे हो? … आओ बिटिया…
साहबसे मैंने आपको आने को मना लिया है…
आमच्या नकळत नेहाने जायचे ठरवले अन सूरतच्या शाही विवाहातून नवनव्या श्रीमंतीच्या, खानपान, वस्त्रप्रावरणाच्या चालीरिती शिकून आली…
दिवस जात होते… आम्ही एयरफोर्यच्या क्वार्टर्स सोडून विमाननगरच्या घरात शिफ्ट झालो. सक्सेना अंकल-आंटी कधी अमेरिका तर कधी बंगलोरच्या मुलाकडे राहयला जात होते…आणि एक दिवशी अंकल गेल्याची बातमी नेहाने सांगितली. हसमुख तबीयतदार व्यक्तिमत्वाला त्यांच्या मानलेल्या मुलीचे कन्यादान न करताच जावे लागल्याची चुटपुट आम्हाला लागली.
कालांतराने नेहा परागचा संसार फुलवायला प्रधान झाली. तिची बिदाई करताना आम्हाला अश्रु आवरेनात तेंव्हा…
‘आप बीलीव नहीं करोगे’….हमें सक्सेना अंकल, आंटी की याद आती रही…!
क्रमशः
— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
यात सक्सेना अंकल ‘दुमिये’ – शेपट्या हालवे कुत्रे – शब्द हिंदीतून वापरतात. तो आजही आठवत राहिला आहे.