स्क्वाड्रन लीडर के के मूर्ती
आपल्या गुरुजनांबद्दल आदरभाव असावा असे नेहमीच आपणास सांगण्यात येते. ते चुकीचे नाही हे मान्य परंतु असे काही गुरुजन असतात की ते आपला आपणच आदर गमावून बसतात. त्यातलेच एक माझे गुरुजन स्क्वाड्रन लीडर के के मूर्ती.
एअर फोर्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेजमध्ये कॅडेट असताना स्क्वाड्रन लीडर के के मूर्ती हे आमचे अकाउंट्स विषयाचे इन्स्ट्रक्टर होते. हातात सिगरेट किंवा चिरूट धरून शिकवत असताना सुद्धा त्यांचे धुराडे चालू असे. आमचा परिचय करून घेत असताना त्यांनी आपणहून आमच्या सर्वांना नावे दिली. एकाला ‘पिग’ मिळाले तर दुसऱ्याला आणखीन काही. असे शारीरिक व्यंगांवर बोट ठेवणारे अनुद्गार काढून त्यांनी आमचा सुरुवातीलाच अपमान केला. आमचा कोर्समेट पी एन मिश्रा, जो मला नंतर कानपुरला भेटला होता, हा एक्स-एअरमन असल्यामुळे त्याला अकाउंट मधील प्रोसिजर आणि काम करण्याची माहिती होती बरेच वेळा मूर्ती, ‘मिश’ असे म्हणून त्याला पुढचा लेसन घेण्याकरता बोलवत. इक्विपमेंट अकाउंटिंगचे सर्व धडे आम्हाला पी एन मिश्रा यानेच शिकवले. हाच पी एन मिश्रा नंतर कानपूरला असताना मला भेटला. एकदा पोक्त सल्ला दिला की नेहमी आपण पैशाशी व्यवहार करत असताना दोन वेळा मोजून ते पैसे देऊन जो घेणार आहे त्यांनी मोजून खात्री केल्याशिवाय तू पुढील पेमेंट करत जाऊ नकोस. एकदा पैसे हातातून गेले की ते परत मिळत नाहीत.
के के मूर्ती यांना आणखी एक वाईट सवय होती की आमच्या आठवड्याच्या परीक्षेच्या वेळी आम्ही पेपर लिहीत असताना आमच्या युनिफॉर्मच्या बाहीला ते कागदांना भोक पाडायच्या अडकित्तासारख्या हत्यारानी भोके पाडत असत. कधी त्यांच्या मनात आले तर आमचाच कमरेचा पट्टा काढायला लावून आम्हाला त्या पट्ट्याने मारण्यासही ते मागे पुढे पाहत नसत. अशा गुरुजनाबद्दल मला कधीच आदर वाटला नाही.
कमिशनिंग मिळाल्यानंतर जेव्हा मी श्रीनगरला पोस्टिंगवर होतो ते साल होते १९७७ ते ७९ त्या दरम्यान. तेव्हा मला चंदिगडचे सीनियर अकाउंटंट असल्यामुळे फोनवरून म्हणत की माझी फॅमिली घेऊन मी श्रीनगरला येतोय तेव्हा माझी सोय कर. स्क्वाड्रन लीडर शहा म्हणे की काही झाले तरी त्याला तू श्रीनगरमध्ये येण्याकरता प्रयत्न करू नकोस. मला माहिती आहे तो कसा विक्षिप्त आहे ते. पण शेवटी ते फॅमिलीला घेऊन श्रीनगरला आले. ऑफिसर्स मेसमध्ये त्यावेळी त्यांची सोय होणार नसल्यामुळे आणि नेमके त्याच वेळेला माझी पत्नी अलका ही बाळंतपणासाठी म्हणून जळगावला गेल्यामुळे माझ्या घरातच मी त्यांची सोय करू शकलो. सात-आठ दिवस राहिल्यानंतर त्यांचा मुलगा आणि पत्नी यांच्याशी माझी दोस्ती झाली शेवटी जाताना त्यांच्या पत्नीने मला एक थर्मास भेट म्हणून दिल्याचे आठवते.
के के मूर्ती परतल्यानंतर जणू माझ्यावर उपकार करत आहेत अशा आविर्भावात मला सारखे म्हणायचे की, तुझी पोस्टिंग कुठे करायची ते तू मला सांग. तशी मी तुझी पोस्टिंग करतो. मला त्यांच्या वशिल्याने काहीही काम करायला नको होते. पण भीड चेपेना म्हणून मी त्यांना हो म्हटले. तुझी पोस्टिंग मी आता पुण्यात करतो आहे कारण तू छायाला एक्सिडेंटमध्ये गमावल्यामुळे नंतर तुला श्रीनगरच्या दूरच्या पोस्टिंगमुळे होणारा मानसिक त्रास पाहता तुला तुझ्या जवळच्या नातेवाईकांच्या जवळ राहायला सोयीचे व्हावे म्हणून मी तुझी पोस्टिंग पुण्यात व्हावी असे प्रयत्न करत आहे असे ते वरचेवर म्हणत असत. शेवटी घडले दुसरेच. माझे पोस्टिंग पुण्यात न होता ठाण्याला झाले. याचे एक वेगळे कारण असे होते की छायाचे वडील आणि त्या वेळेला दिल्लीला मंत्रिमंडळात असलेले व्ही एन गाडगीळ हे नातलग होते त्यामुळे मी तुझी पोस्टिंग ठाण्याला व्हावी म्हणून गाडगीळ यांना शब्द टाकला आहे असे ते मला एकदा म्हणाले होते. मी या दोघांनाही म्हणत होतो की मला असे पुणे किंवा ठाणे येथे जायची इच्छा नाही शिवाय छाया गेल्यानंतर अलकाशी माझा विवाह झाला असल्यामुळे मला अशा घराजवळच्या पोस्टिंगची गरज वाटत नाही. असे असूनही एक दिवशी माझी ठाण्याला पोस्टिंग झाली आहे अशी ऑर्डर आली आणि त्याप्रमाणे मी ठाण्याला रुजू झालो.
थोडेसे विषयांतर करून मी इथे लिहीत असलो तरी या संदर्भात मला हे लिहिणे गरजेचे वाटते की छाया गेल्यानंतरही तिच्या आई- वडिलांशी माझे संबंध अत्यंत जवळचे राहिले. पुन्हा विवाह करायला लावण्यात त्यांनी पुढाकार घेतला. नंतर अलकाशी माझा विवाह झाला. छायाच्या भावाच्या विवाह समारंभात अलकाने पुढाकार घेऊन बेहेरे कुटुंबियांचे मन जिंकले होते. त्यामुळे आजही छायाचे वडील नसताना छायाच्या आईशी (वय ९३) आम्ही त्याच मानाने वागतो. ११ जुलैची तारीख आम्हाला छायाची आठवण करून देते. याचे सर्व श्रेय अलकाला जाते. ती आता त्यांची मुलगीच आहे असे त्या मानतात असो.
क्रमशः
— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800