काही मजेशीर किस्से
१. आईची झोप उडाली !
साल १९७३ मे महिना… पहिल्यांदा रजा घेऊन माधवनगरला घरी आलो होतो तेही ३ दिवसांकरता… माधवनगरहून तेंव्हा रात्री टॅक्सी, रिक्षा जात नसत. सिटी बसने सांगली कॉलेज स्टॉपवर उतरून चालत मी सांगलीच्या स्टेशनवर अपरात्री महालक्ष्मी एक्सप्रेस पकडून पुढे श्रीनगरला जायला घरून निघालो. रात्रीच्या वेळी सर्व डब्यातून कड्या आतून बंद केल्याने मला शेवटी गार्डच्या डब्यात चढावे लागले. पण त्याने मला जबरदस्ती खाली उतरवल्याने मी पुन्हा आल्या पावली सामानासह माधवनगरच्या घराची कडी वाजवली ! आईने मला परत दरवाज्यात पाहून तिला धक्का बसला…!! मला श्रीनगर पर्यंतचा लांबचा पल्ला गाठायचा आहे याची जाणीव होऊन घरच्यांची उडालेली झोप !
सांगली रेल्वे स्टेशन मात्र मला आठवते. त्या नंतरही मी सकाळची बस पकडून पुण्यात वेळेत पोहोचलो आणि नंतर श्रीनगरला देखील ! अशाच प्रकारे वेळोवेळी इतर प्रवासात सुद्धा हवाईदलातील स्टेशनवर वेळेवर पोहोचत राहिलो…! माझी एकदाही गाडी चुकली नाही किंवा स्टेशन येऊन गेले अन मी झोपलो होतो असे घडले नाही !!
टारगट मुलामुलींचे फाजिल चाळे
एकदा झाशी–कानपूर रात्रीच्या प्रवासात फर्स्ट क्लासच्या कूपेत खालच्या बर्थवर सुरे घेऊन बसलेल्या टारगट पोरापोरींचे फाजिल चाळे पहायचे नशिबी आले, साल १९७४ होते. दादा कोंडकेंच्या सिनेमातील पाचकळ भाषेतील ‘अंधेरी रात में दिया तेरे हाथ में’ वगैरे प्रकार, पूर्वीच्या फर्स्ट क्लासमधील कूपेत खाली चाललेल्या चाळ्यांचे आवाज मला वरच्या बर्थ वरून सहन करावे लागत होते. लोक हौशीने बर्थडे साजरा करतात.
मला ती ‘बर्थ नाईट’ म्हणजे झोप उडवणारी होती. मधेच कुठेतरी ते टोळके काम झाल्यावर उतरले. कानपूरला टीसीला गाठून तक्रार दिली, तर तो म्हणाला, “साब, आप की शामत थी कि आपके पैसे वगैरह नही लूटे. ये लूटपाटी लडकों की चहिती गाडी है. हम रातभर आते ही नहीं चेकिंग को”!
आजकाल जुन्या पद्धतीच्या डब्यांचे फोटोही उपलब्ध होत नाहीत !
क्रमशः
— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800