“माय क्वीन इज कमिंग”
मी एयरफोर्स स्टेशन ठाणे या ठिकाणी पोस्टिंगवर होतो. साल होते १९८०. एकदा अशी मजेशीर घटना घडली कि ती कायमची आठवणीत राहिली आहे. गोष्ट छोटीशीच पण ती माझ्या आठवणी सांगताना नोंद असावी म्हणून त्याचा उल्लेख करतो.
ठाण्यापासून जवळच असलेल्या कोलशेत या खेड्यापाशी आमचे एअरपोर्ट स्टेशन होते, म्हणजे अजूनही ते आहे. तर तिथे ऑफिसर्स करता चार मजली इमारतीत प्रत्येक मजल्यावर चार फ्लॅट्स होते. सकाळची वेळ सगळ्यांची ऑफिसाला जाण्याची घाई गडबड. कधी पेपरवाला येतोय तर कधी दूधवाला यामुळे दरवाजावरील बेल वाजली की घरची मालकीण तो उघडायला पुढे जात असे. त्या सकाळी एकदा नव्हे दोन वेळा चांगली जोरात बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला गेला आणि पाहता तो काय ? एक व्यक्ती अंगावर कुठलेच कपडे न घातलेल्या अवस्थेत येऊन सकाळसकाळी म्हणायला लागली, ‘माय क्वीन इज कमिंग !’ तो घाई घाईने प्रत्येक मजल्यावरील फ्लॅटची बेल वाजवत जात राहिला. आपली ‘क्वीन’ (पत्नी) आज पासून क्वार्टर मध्ये राहायला येते आहे ही आनंदाची बातमी बेल वाजवत सगळ्यांना खडबडून जागे केले. काही बायकांना मेल्याहून मेल्यासारखे झाले. कोण आहे हा म्हणून आपल्या नवऱ्यांना विचारायला लागल्या, ‘मेल्याला काही लाज लज्जा ?’ असे सगळ्यांचे मत पडले. बऱ्याच ऑफिसर्सना हा कोण तेही माहित नव्हते! फोनाफोनी होऊन या महाशयांना कपडे चढवून मेंटल वॉर्डला नेण्याची बरीच चर्चा सुरू झाली. मग कळले की हा तमिळनाडू मधील विजय किंवा आनंद अमृतराजसारखा एक कन्वर्टेड ख्रिश्चन टेक्निकल ऑफिसर होता. नुकताच पोस्टिंग वर आला होता आणि क्वार्टर मिळाल्यामुळे त्याची पत्नी राहायला येणार होती. ती आनंदाची बातमी सांगायची घाई झाली होती. त्यांनी हे सकाळ वृत्त अशा अवस्थेत सांगितले की मेडिकल ऑफिसरने त्याची रवानगी ताबडतोब आय एन एस अश्विनी या नौसेना हॉस्पिटलमध्ये मेंटल केस म्हणून दाखल करायला पाठवली.
या विचित्र घटनेची चर्चा तर झालीच त्यानंतरची जी घटना माझ्या संदर्भात झाली त्याचा उल्लेख करावासा वाटतो.
मेंटल केस असलेला कोणी ऑफिसर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला असेल तर त्याच्याबरोबर लक्ष ठेवायला एक जूनियर ऑफिसर असावा लागतो. त्याला एस्कॉर्टिंग ऑफिसर म्हणून त्याच्या खोलीत सदैव हजर असावे लागते. आता मी पडलो ज्युनियर त्यामुळे अशा कामाकरिता त्याच्याबरोबर खोलीत राहून लक्ष ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर आली. माझ्या आधीच्या एका मित्राला त्याने चांगलाच इंगा दाखवलेला असल्यामुळे सगळेच त्याला टरकून होते. झाले असे की रात्र झाल्यावर एस्कॉर्ट झोपलेला आहे हे पाहून तो हळूच बाहेर जाऊन फायर सेक्शनमध्ये असलेली घंटा जोरजोरात बडवायला लागला. सगळे पेशंट जमा झाले. कुठे आग लागली म्हणून पाहतात तो हा म्हणाला, ‘अरे माझा एस्कॉर्टिंग ऑफिसर आहे ना, तो घोरत पडला आहे! हा कसला माझ्यावर एस्कॉर्टिंग करणार? म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी घंटा वाजवून सगळ्यांना सावध करत होतो. अशा घटनेनंतर रात्री झोप घेणेही मोठे अवघड होते, कारण हा बाबा काय करेल सांगता येत नसे. तर माझ्या काळात हा मला म्हणे, ‘ओक कम विथ मी, प्ले क्रिकेट विथ मी!, आयएनएस अश्विनी इमारत ही समुद्रकिनाऱ्याला लागून असल्यामुळे काही जण तिथल्या वाळूत क्रिकेट खेळताना याने पाहिले आणि मला बरोबर घेऊन म्हणाला, ‘तू विकेटकीपर हो. खेळणाऱ्यांच्या हातून बॅट घेऊन, ‘टाका रे मला बोलिंग म्हणून दरारा निर्माण केलान! मध्येच आता मी विकेटकीपर आणि तू बॅटिंग कर म्हणून त्यांनी मला आग्रह केलान. मला ते शक्य नव्हते. कारण हा विकेटकीपर बनवून मागच्या मागे कुठे पळून गेला तर माझी पंचाईत होणार होती. पण तसे काही झाले नाही. माझ्यावर तो खुश होऊन म्हणाला की तूच आता माझे एस्कॉर्टिंग कर, आता तू परत जाऊच नकोस घरी. एका दिवसा पुरते कामाला तिथे राहायची सोय असल्यामुळे मला कळेना की याची मर्जी राखावी की ठाण्याला परत जावे ?
आश्चर्य असे की ट्रीटमेंट देणारे मेडिकल ऑफिसर त्याला काही विषयांवर लिहायला सांगत. त्या वेळेला तो जे लिही ते पाहून थक्क व्हायला व्हायचे. इतके सुंदर हस्ताक्षर आणि अत्यंत अस्खलित इंग्रजीमध्ये तो कुठल्याही विषयावर असे धडाधड लिहायचा की हा खरोखरच मेंटल केस आहे, का नाही असा भ्रम निर्माण व्हावा.
काही दिवसानंतर तो बरा झाल्यावर पार्टी वगैरे मध्ये अतिशय सभ्य दिसत असे. त्या दिवशी नेमके काय झाले म्हणून त्याला मेंटल केस म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले याचे गूढ कोणालाच कळले नाही. नंतर त्याचे काय झाले मला माहित नाही. तर अशीही ‘माय क्वीन इज कमिंग’ ची मजेशीर घटना. कितीतरी मजेशीर प्रसंग येत असतात. त्यातलाच हा एक. असो.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
वरील घटनेवर मी हवाईदलातील किस्सा लिहिला आहे असे अलकाला सांगितले तेव्हा ती ही म्हणाली, हो मला आठवतेय अंधुक. तू त्या भित्र्या बंगाली डॉक्टर बद्दल लिही ना. आपल्या घरी शेखर यायचा. तो आला की आपण चिन्मयला घरी ठेवून ठाण्यात सिनेमा पहायला जात असू.