माझा एक आणखीन मित्र कोर्समेट फ्लाईंग ऑफिसर अप्पण्णा याच्या घरात राहिल्याच्या किस्साही तेंव्हा घडला. विन्सेंट, अकौंट्स ब्रांचमधून एकमेव वीरचक्र विजेता एस के सिंग, ए के सिंग, वगैरे आठवतात. बेबोर्ता हा माझा मित्र प्रतिभावान होता. दारूमुळे वाया गेला. त्याची पत्नी हा घरात खर्चायला पैसे देत नाही म्हणून पगार वाटपाच्यावेळी हजर झाली. पैसे तिच्या हातात देणे बरोबर नव्हते म्हणून मी त्याला दिल्यासारखे केले आणि तिला हिसकाव असे डोळ्याच्या खुणेने सांगून वेळ मारून नेली. नंतर तो माझ्यावर असे भडकला ! माझ्या जागी आधी माझा एक कोर्समेट फ्लाईंग ऑफिसर अशोककुमार जेटली होता. विंग कमांडर गांगुली त्याला फार ‘हड हड’ करायचे असे मिश्रा म्हणे. गांगूलींसमोर कोणाची सरळ उभे राहायची शामत नव्हती. या पार्श्वभूमीवर एकदा गांगूलांनी माझ्या खांद्याला प्रेमाने थोपटलेले पाहून मिश्राचा डोळ्यावर विश्वास बसेना. ‘क्या जादू किया तूने बता दे यार ?’ तो म्हणाला.
कॉम्प्युटर शिकायला हवाईदलातर्फे नावे मागवली गेली. भविष्यकाळात प्रमोशन पटकन मिळवायला तो कोर्स करणे गरजेचे होते. मी अर्ज भरून गांगुलांच्या रेकमेंडेशनसाठी भेटलो. तो अर्जाचा कागद उभा घरून त्यांनी टराटरा फाडला. ओरडून म्हणाले, ‘डू यू वॉंट टू बिकम ग्लोरिफाईड क्लार्क ?
यू आर ए कमिशन्ड ऑफिसर. नॉट ए क्लार्क! गो बॅक टू युवर वर्क …!! काही काळाने माझे कोर्समेट ज्यांनी तो कोर्स केला ते केंव्हाच ग्रुप कॅप्टन झाले…!
कानपुरात बेकारी, चोरटेपणा, अरेरावीची बेफिकीरी वृत्ती आणि काही झाले की लगेच भांडायला तयार असे बाहेरचे वातावरण असे. रात्री, अपरात्री स्टेशनवरून येणे म्हणजे लुटायचे निमंत्रण देण्यासारखे होते. त्यामुळे तुम्ही चुकून पैसे जास्त दिले तर ते परत मिळणे अशक्य असे. या पार्श्वभूमीवर ‘पोक्त सल्ला’ प्रसंगाचे गांभिर्य समजते. कानपूरमध्ये सिव्हिलियन लोकांचा भरणा असल्यामुळे तिथे अरेरावी असे. य़ुनियनबाजी, धरणे यामुळे हवाईदलात विस्कळितपणा येई. तिथे मोठ्या प्रमाणात मेडिकल क्लेम टाकून दर महिन्याला पगाराच्या व्यतिरिक्त पैसे मिळवण्याकरता म्हणून प्रत्येक जण युक्ती करत असे. शेकडोच्या संख्येने ते मेडिकल क्लेम आम्हाला पास करावे लागत. प्रत्येकाला माहीत होते की हे क्लेम बोगस आहेत. पण ते बोगस आहेत असे म्हणायचे कोणाची शामत नव्हती. दर शुक्रवारी होणाऱ्या आमच्या विकली पेमेंटमध्ये लाखो रुपये मी माझ्या हाताने देताना मनात विषण्णता येई. काही वर्षानंतर के के दवे म्हणून सिक्युरिटी ऑफिसरांनी ते सगळे बंद केले. ती एक आनंदाची गोष्ट. जीवे मारायच्या धमक्यांना त्यांनी दाद दिली नाही. मिनिस्ट्रीतल्या खासदारांकडून कोहली सारख्या शेफारलेल्या युनियन नेत्याला व त्याच्या चेल्यांची बदली करवून मेडिकल क्लेमचे रॅकेट कसे बंद केले हे त्यांनी नंतर मला सांगितले.
आणखी एक आठवणीची गोष्ट म्हणजे एका (सिव्हिलियन गॅझेटेड ऑफिसर) सीजीओनी आपला लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशनचा त्या काळातील हजारों रुपयांचा क्लेम अकाउंट्स सेक्शन मध्ये दिला. चवथ्या पे कमिशनने नुकतेच ४ वर्षातून एकदा भारतभर कुठेही जायला मुभा दिली होती. त्यामुळे असे क्लेम वरचेवर येत. माझी पत्नी, मुलेबाळे, आई-वडील मिळून ८-१० जण भारत भ्रमण करायला गेलो. इतकेच नव्हे तर मद्रासहून बोटीने अंदमानलाही गेलो. क्लेमच्या बरोबर पिशवी भरून तिकिटे सादर केली होती. दर २-३ दिवसांनी भेटून केंव्हा पैसे देताय असा तगादा ते लावू लागले. माझे एक वरिष्ठ सहकारी फ्लाईट लेफ्टनंट वर्धन यांनी त्यांचा खोटेपणा पकडला. ते तमिळ असल्याने बोटीच्या तिकिटावर तमिळमधे काय लिहिले आहे ते त्यांनी वाचले. ती बोट मालवाहू होती. मिलिटरी पोलिसांनी घरी जाऊन शोधले की मुले शाळेचे दिवस असल्याने व आई-वडील वार्धक्याने घरीच होते. ते पकडले गेले. सिविलियनची इन्क्वायरी होऊन त्याला शिक्षा झाली. त्यामुळे असे खोटे क्लेम किंवा काही गडबड कशी पकडायची आणि नंतर त्याचा योग्य तो निकाल कसा लावायचा हे मला कानपुरच्या पोस्टींगमधून शिकता आले. नंतरच्याही नोकरीत मी काही लोकांना पकडून दिले. असो.
कानपूरला वेगवेगळ्या युनिट्समधे ८ अकौंट्स ऑफिसर असायचो. त्यात एक होते फ्लाईट लेफ्टनंट अनंत काळे आणि दुसरे होते स्क्वाड्रन लीडर सुहास फाटक. आता तेही निवृत्त होऊन पुण्यातच स्थायिक झाले असल्यामुळे आम्ही जेंव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा कानपुरातील आठवणींना उजाळा मिळतो. ‘हरजिंदरनगर’ हे गेटच्याबाहेरील वस्तीला मिळालेले नाव होते. लाल बंगला, चकेरी अशी नावे या भागाला आहेत. एके काळी हरजिंदर सिंह हे मोठे टेक्निकल ब्रांचमधील नावाजलेले अधिकारी होते. बढती मिळून ते अनेकवर्षे कानपुरला होते. त्यांच्या गौरवशाली कामाची पावती म्हणजे त्यांच्या नावाची वसाहत झाली. त्या वसाहतीत एक जोशी कुटुंबीय होते. ते कुटुंब सुसंस्कृत होते. त्यांना तीन मुली होत्या. त्यामुळे नाटकात हीरोइन म्हटले की त्यांना घेण्याचे ठरलेले असे. त्या दिसायला चांगल्या होत्या. नाटकात काम करायला आनंदाने तयार असत. मिरजेत जोशींचे लहानसे मंदिर होते. ते घरात एक मराठी लायब्ररी पण चालवत असत. त्यामुळे काहीजण चेष्टेने लायब्ररी मुलींना उजवण्याचे जाळे आहे म्हणत, पण तसे नसावे. कारण पुढे काही काळानंतर त्यांना हवाई दलात नसलेले जावई मिळाले.
क्रमशः
— लेखन : विंग कमांडर शशिकांत पवार. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800