Wednesday, March 12, 2025
Homeलेखहवा हवाई : 23

हवा हवाई : 23

“नवी दिल्लीतील पार्टी”

“सुब्रतो पार्कमधील कॅमेरो मेसमध्ये स्नेहसंमेलनात असताना वाटले, कमिशनिंग होताना कुणालाच माहीत नव्हतं की प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी जीवनकथा असेल.प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात काय काय केलं, हे ऐकून खूप छान वाटलं आणि अशा अद्भुत मित्रांशी पुन्हा संपर्क साधता आला याचा आनंद आहे.”

गेल्या रविवारी म्हणजे ९ फेब्रुवारीला मी दिल्लीत होतो. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आमच्या अकाउंट्स ब्रँडची रीयुनियन पार्टी. ती दिल्लीतील कॅमेरो ऑफिसर्स मेसमध्ये झाली. अकाउंट्स ब्रँच ही तिन्ही सेनादलातील एक वेगळ्याच तऱ्हेची ब्रांच आहे. ती फक्त हवाई दलातच आहे. जशी भारतात आहे तशीच ती इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया वगैरे कॉमनवेल्थ कंट्रीज मधील सेनादलातल्या हवाई दलातच फक्त आहे. त्यामुळे आमच्या ब्रांचचे वैशिष्ट्य हे एक तर्‍हेने जागतिक आहे! ही पार्टी आमच्या सेंट्रल अकाउंट्स म्हणजे अकाउंट्स ब्रँचच्या हार्ट असलेल्या मेसमध्ये झाली. त्यात दोन एअर व्हाईस मार्शल, जे आमच्या ब्रँचचे सध्याचे बॉस आहेत, ते आपल्या पत्नीसह हजर होते आणि साधारण ३०० पेक्षा जास्त ऑफिसर्स काही त्यांच्या पत्नीसह, देशातील वेगवेगळ्या भागातून आले होते. माझे दोन मित्र बंगलोर होऊन आले होते .तर एक दिल्लीतच होता. असे आम्ही चार जण एकाच नंबर ५० कोर्सचे होतो.

आता आम्हाला विशेष करून मला रिटायर होऊन २२ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे मला ओळखणारे फारच कमी असावेत असा माझा अंदाज होता, पण भेटल्यानंतर अनेक जण गाठ पडले की ‘हॅलो सर, सध्या कुठे आहात? काय करता? आपण आमक्या स्टेशनमध्ये बरोबर होतो असे संदर्भ बरेच वेळा दिले गेले. माझा डेप्युटी म्हणून श्रीनगरला असलेला हसीजा, दिल्लीतील जी सिंग वगैरे ऑफिसर्स मला अजूनही ओळखत होते, आठवत होते याचा मला खूप आनंद झाला.

एका बाजूला स्टेजवरून गाणी म्हटली जात होती. सुरुवातीलाच आता विंग कमांडर शशिकांत एक गाणे म्हणतील असे म्हणून अनाउन्स केले गेले. माझ्याच नावाचा एक दुसरा विंग कमांडर स्टेजवरून म्हणाला, ‘इथे शशिकांत असलेले आणखी दोन जण उपस्थित आहेत. एक म्हणजे विंग कमांडर शशिकांत ओक आणि दुसरे म्हणजे शशिकांत मिश्रा. आम्ही तीन शशिकांत नावाचे अकाउंट ब्रांच मध्ये होतो. त्यानंतर बँडच्या तालावर डान्स चालू झाला. आणि ती मैफिल अशीच चालू राहिली. शेवटी एक निळ्या रंगाचा उंची केक कापला गेला आणि तो समारंभ साजरा झाला.

या आधी मी २०१२ सालच्या रियुनियन पार्टीला गेलो होतो. नंतर आज बारा वर्षानंतर ही पार्टी मला अटेंड करता आली. याशिवाय या पार्टीमधील वैशिष्ठय सांगता येईल की मी ट्रेनमध्ये बसून पुण्याला परत चाललो होतो, तेव्हा मला फोन यायला लागले. एक म्हणाला, ‘सर, मी पद्मनाभ नंबीयार, दुसरा म्हणाला सर मी सिद्दिकी, तिसरा म्हणाला सर मी पी व्ही राव! हे तिघेही जण त्या पार्टीत हजर होते, तरीही आमची भेट झाली नाही. आश्चर्य म्हणजे हे तिघेही माझे वेगवेगळ्या स्टेशनमध्ये डेप्युटी होते. तेही सगळ्यांना भेटत फिरत होते परंतु काही कारणाने आम्ही एकमेकांच्या समोरासमोर आलो नाही ! होत असं कधी कधी !

वेणू गोपाल, सुजोय मुकर्जी, मी, करि-अप्पन्ना

माझा आणखी एक कोर्स मेट ग्रुप कॅप्टन डी व्ही अरोरा सध्या गुरुग्राम मध्ये राहतो. त्याची तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही त्याला भेटायला गेलो. वाटेत मी माझ्या कोर्समेटना विचारत होतो की कमिशनिंग नंतर तुमची कुठे कुठे बदली झाली ? तिथे काय काय मजा मजा झाली ? हे मला जरा सांगा ना ? ग्रुप कॅप्टन वेणूगोपाल, तो माझा कॅडेटशिपचा रूममेट होता, त्याने आपली बोटे पुढे करून म्हटले की ही सगळी माझी बोटे अर्धी कापली गेलेली आहेत, पायाला माझ्या गुडघ्याच्या खाली रॉड आहे. झालेल्या जखमांमुळे २६ वेळा ऑपरेशन करावे लागले. अकाउंट्स ब्रँचचा मी असा एकच ऑफिसर आहे की ज्याने पी जे आय (पॅरा जम्पिंग इन्स्टिट्यूट) चा कमांडिंग ऑफिसर म्हणून नाव मिळवले. मी अकाउंट्स ब्रँचमध्ये पंधरा वर्षांनी परत आलो. तोपर्यंत मी माउंटेनियरिंग करण्याकरता हिमालयातील पंधरा हजार फुटांपेक्षा वरच्या शिखरांवर जात असे. अशाच एका एक्स्पिडिशन मध्ये वादळ आले, रस्ता चुकलो व मी जवळजवळ आठ ते दहा फूट बर्फाच्या खाली गाडला गेलो. वादळ संपल्यानंतर दैवयोगाने मला शोधून बाहेर काढण्यात आले, परंतु मधल्या काही तासांच्या थंडीमुळे माझी काही बोटे कापावी लागली. पडताना झालेल्या धक्क्याने नडगीचे तुकडे झाले. ते एकत्र करण्यासाठी मला हॉस्पिटलच्या चकरा माराव्या लागल्या.

माझा दुसरा एक मित्र म्हणाला, मला अकाउंट्समध्ये काम करायची इच्छा कमी होती. पत्नीने डिवचून म्हटले की स्टाफ कॉलेजचा कोर्स केलास, तर तुला मानीन’. त्या कोर्ससाठी आमच्या ब्रांचला व्हेकन्सी कमी असल्याने सिलेक्ट होणे अवघड असते. त्याने कोर्स पूर्ण केला. त्याने करियरच्या सुरुवातीलाच कॉम्प्युटर कोर्स करून कॉम्प्युटर एक्सपर्ट म्हणून नाव कमावले. या कोर्ससाठी माझे ॲप्लिकेशन बॉसने ‘तुला काय ग्लोरिफाईड टायपिस्ट बनायचे आहे का?’ म्हणून टराटरा फाडून फेकून दिले होते! सध्या आपण जो एक अल्फाबेट आपल्या नंबरला लावतो त्याचा शोध मीच लावला. ही माझी हवाईदलासाठी कॉन्ट्रीब्युशन होय! अशा आमच्या गप्पा बऱ्याच वर्षानंतर झाल्या.

माझा एक डेप्युटी एअर कमोडर चार्ल्स थॉमस एअर कमोडर रँकवर रिटायर झाला. हा १९९३ साली फ्लाईंग ऑफिसर म्हणून पहिल्या पोस्टींगवर आला होता, स्टेशन होते फरीदाबाद. त्यावेळी माझी मुले शाळाकरी होती. आमचा एकत्र फोटो नंतर मी घरच्यांना शेअर केला, तेव्हा माझ्या मुलीने म्हटले, ‘बाबा तू उगीच पाठवलास चार्ल्स बरोबरचा फोटो! तो माझ्या बालपणातला क्रश होता! परंतु त्याचे ते केस गेलेले रूप पाहून ‘क्रश’ एकदम ‘क्रश्ड’ झाला!!

हवाई दलाचे जीवन त्यातील मित्रमंडळी वेगवेगळ्या स्टेशनमध्ये घडलेल्या घटना यातून साहसाने कसे तोंड द्यावे हे शहाणपण देते. ते युद्धाच्या आघाडीवर जाऊनच समजून घ्यायचे नसते तर छोट्या मोठ्या घटनातून शिकायचे असते याचा परिपाठ आम्हाला मिळतो. अशी ही रियुनियन पार्टीची कहाणी !
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम