Wednesday, July 2, 2025

हादगा

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात बाप्पाचे विसर्जन झाले की चाहूल लागते हादग्याची.

हादगा म्हटले की माझ्या बालपणीच्या आठवणीत माझे मन रमून जाते. परतीचा पाऊस तो पण जोरजोरात विजा कडाडून पडणारा म्हणण्यापेक्षा कोसळणारा पाऊस यांचे नक्षत्र हत्ती. आजी आजोबा म्हणायचे हत्तीचा पाऊस पडतो आहे. हा जोरात पडणारच हत्तीसारखा दणादण. या परतीच्या पावसात येणारा हा सण हादग्याचा म्हणजे आम्हा मुलींना एक पर्वणीच होती. आणि त्यात आम्ही कोल्हापूरकर.

आम्ही कोल्हापूरकर म्हणजे सर्व धर्म समभाव असणारे. सगळे सण एकत्र येऊन साजरे करणारे आम्ही कोल्हापुरी. मग ती ईद असो किंवा दिवाळी. यामध्ये आम्हा मुलींचा आवडता खेळ म्हणजे हादगा.

हादगा जवळ आला की आमच्या शाळेत प्रत्येक वर्गात एक हत्तीचे चित्र पुठ्ठ्यावर चिटकवून भिंतीवर लावायचो. त्या चित्रावर चिरमुऱ्याचे, फुलांचे हार करून लावायचो.

हादगा हा सोळा दिवसांचा सोहळा असायचा आमच्यासाठी. संध्याकाळी शाळा सुटल्यावर आम्ही मुली आणि आमच्या शिक्षिका हादग्याचे चित्र म्हणजे हत्तीचे चित्र पुठ्ठ्यावर काढून मधोमध ठेवून त्याच्या भोवती एक मोठे रिंगण आम्हा मुलींचे हातात हात घालून एक गाणे हादग्याचे म्हणायचो. रोज एक एक वाढवून सोळा दिवसांत सोळा गाणी म्हणायचो. आमच्या मध्ये आमच्या शिक्षिका पण आनंदाने सहभागी व्हायच्या.

गाणे म्हणून झाले की मग यायची वेळ खिरापतीची. जो तो आपापले खिरापतचे डबे हातात घेऊन वाजवून विचारायचो “ओळखा आज काय आहे खिरापत माझी” मग सगळ्या सख्या एकेक पदार्थाचे नाव सांगायच्या. ओळखले तर ओळखले नाही तर नाही असा गमतीदार खेळ.

सगळ्यांना खिरापत वाटली की घरी आल्यावर शेजारच्या घरात हादग्यासाठी आमंत्रण आलेले असायचेच. तेव्हा आमचे आजोबा त्यांना आम्ही बाबा म्हणायचो, ते पण अगदीच उत्साही बरे का. ते पण आम्हाला जा लवकर ग वेळ होईल असे म्हणायचे. आणि विशेष म्हणजे त्यांना पण ही गाणी तोंडपाठ होती. मग सगळ्या मैत्रिणी गोळा होऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन हादगा खेळून यायचो.

हादग्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची वेगवेगळी गाणी. आणि ती गाणी व्यवस्थीत चाल लावून लयीत म्हटले जाते. “एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू”, “ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा.”, “कारल्याचे बी पेरले की ओ सासुबाई आता तरी जाते माहेरा माहेरा” हे गाणे तेव्हा काही कळायचे नाही पण आता यामध्ये सून माहेरी जाण्यासाठी किती आतुर असते आणि आपल्या सासूला, जाते माहेरी मी म्हणून विनवणी करत असते पण सासू कारल्याचे बी पेरुन ते कारले उगवून आल्यानंतर त्याची भाजी करेपर्यंत तिला जाऊ देत नाही असा आशय असणारे हे गाणे याचा अर्थ आता कळला.

यानंतर अजून एक गाणे “श्री कांता कमलाकांता असं कसं झालं. असं कसं येडं माझ्या कप्पाळी आलं. येडयाची बायको झोपली होती पलंगावर. तिकडून आला वेडा त्याने पाहिले. मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले”, “शिवाजी आमुचा राजा त्याचा तो तोरणा किल्ला” अशी ही गाणी आम्ही खूप आनंदाने तालासुरात गायचो.

एक आगळावेगळा सोहळाच होता आम्हा मैत्रिणींचा तो. गाणी म्हणण्यासाठी चढाओढ सुरू व्हायची. ए ते गाणे म्हणू आज नको ग ते म्हणू. आणि गंमत म्हणजे घरातील मोठ्या स्त्रिया समोर बसून आमचा खेळ बघायच्या तेव्हा त्यांना आम्ही त्यांच्या हातातील बांगड्या चढवून गाणे किती म्हटली ते मोजायला सांगायचो. मग त्या सांगायच्या आजची दहा गाणी झाली. उद्या अकरा गाणे म्हणायचे हो पोरींनों. मग काय आम्हा पोरींची काॅलर ताठ.

यानंतर सोळाव्या दिवशी म्हणजेच हादग्याचा शेवटचा दिवस. त्यादिवशी अर्धा दिवस शाळा दुपारी मुलांना सुट्टी आणि आम्ही मुली सगळ्या आमच्या शिक्षिका बरोबर जवळच्या बागेत जाऊन हादगा सोडायचो म्हणजेच तिथे जाऊन सोळा गाणी म्हणून ते हत्तीचे चित्र पाण्यात सोडून द्यायचे. त्याचबरोबर त्याला लावलेल्या फुलाफळांच्या माळा आणि चिरमुऱ्यांचे हार सगळे पाण्यात सोडायचो.

या सोळा दिवसांत आमच्या बरोबर आमच्या आई पण आमच्या बरोबर सहभागी व्हायची म्हणजे कसे तर त्या रोजरोज वेगवेगळे पदार्थ बनवून आमच्या डब्यात खिरापत भरून द्यायची. आणि आम्ही पण आईला हेच सांगायचो की “अम्मी ऐसा कुछ बना के किसी को पहचानने न आये” आणि आई आमची सुगरण ती रोज वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून द्यायची.

गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी. ‌आता खरंच असं वाटतं की पुन्हा एकदा लहान व्हावे आणि आईबाबांच्या कुशीत डोके ठेवून बसावे. आज हादग्याच्या आठवणीने डोळे पाणावले. पुन्हा एकदा बालपण आठवले. ते दिवस खरंच खुप छान होते. आणि म्हणतात न लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा मेवा हे खरंच आहे.

परवीन कौसर

– लेखन : परवीन कौसर, बेंगलोर
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४