Thursday, July 3, 2025
Homeसाहित्यहास्य दिन

हास्य दिन

मे महिन्यातील पहिला रविवार हा जागतिक हास्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कालच हा दिवस होता. त्या निमित्ताने वाचू या २ कविता. आपणा सर्वांना हास्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

१. हास्यबोध

जन्मा येता बालक रडते,
मरणानंतर जगही रडते !

जगतानाही नकोच रडणे,
हसत रहावे आनंदाने !

हसणे असते अगदी सोपे,
विलग करावे अधर आपले !

लागत नाही दाम तयाला,
शोभा देई सकल वयाला !

निखळ, निरागस, कधी आसुरी,
हास्य रंग हे अनेक असती!

हास्यविनोदे रंगे मैफील,
मिटून जाती भेद मनातील !

बालपणीचे हास्य निरागस,
नितळ मनाचे असते ध्योतक!

तरुणाईचे हास्य गुलाबी,
लाल गाल अन् नयन शराबी !

वार्धक्याचे हास्य अनुभवी;
दाताविन ही दिसे लाघवी !

प्रसन्नतेने मनास नटवुनी,
नैराश्याला क्षणात हटवी !

येता जाता हसत रहावे,
ओळख-परिचय करीत जावे!

पेरीत जाता स्मित मधुर ते,
उगवत राही हास्य चांदणे !

— रचना : सुरेश शेठ. कोथरूड, पुणे

२. हास्य

जगू क्षण क्षण हास्याचे
फवारे उडतील आनंदाचे
रक्त  संक्रमण रोम रोमी
हसत खेळत सुंदर जगणे

हसण्यास नको पैसा
औषध गोळ्या दूर सारु
नको पसारा चेकअपचा
चुकेल फेरा रुग्णालयाचा

बागेत फिरावे सुप्रभाती
भेटतील सख्या नित्यनेमे
स्नेहाचा धागा गुंफूनी
मैत्री जपावी हास्य वदनी

करावे आसने मिळूनी
होई शारीर बंध मोकळे
प्राणायाम सराव करुनी
अनाहत चक्र ताजेतवाने

हास्य निर्मळ दागिना
चेहरा खुलतो भारी
उमटते मनाचे प्रतिबिंब
पाहणारे प्रेमात चिंबचिंब

कधी हसावे स्वतः वरती
नको कुणाच्या व्यंगावरती
हास्य फूले देही सांडती
चित्तवृत्ती खुलून  येती

कधी हसावे गडगडाटी
कधी हसावे खुदूखुदू
कधी मिश्किल हसे हसू
नकोच बिलकुल रुसू

हास्य हा निर्मळ दागिना
मुखडा  खुलतो भारी
उमटते मनाचे प्रतिबिंब
पाहणारे प्रेमात चिंबचिंब

जगात येणे आणि जाणे
कुणा  ही  हाती  नसणे
लिहू या जीवनाचे गाणे
हास्याचे छेडुनिया तराणे…

— रचना : डॉ. प्रभा वाडकर. लातूर

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments