Wednesday, July 2, 2025
Homeलेखहितगुज

हितगुज

१० सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसाच्या निमित्ताने लोकमान्य सेवा संघ, पारले, मुंबई या सामाजिक संस्थेच्या कै. शरद विनायक साठ्ये वैद्यकीय केंद्राने “हितगुज” हा परिसंवाद आयोजित केला होता. अत्यंत महत्वाच्या, संवेदनशील विषयावरील विविध तज्ज्ञांची मते, अनुभव, मार्गदर्शन सविस्तर समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी ते आज पासून भाग देत आहे.
– संपादक

शुभारंभ
“हितगुज” या परिसंवादाचा शुभारंभ मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि गर्भ संस्कार व बालरोगतज्ञ डॉ. स्नेहलता देशमुख यांनी द्वीपप्रज्वलनाने केले.आत्महत्या एक गंभीर विषय, गंभीर अशासाठी की WHO च्या अहवालानुसार जागतिक स्तरावर दरवर्षी अंदाजे सात लाखाहून अधिक व्यक्ती आत्महत्येचा मार्ग निवडून जीवन संपवतात. म्हणजेच ४० सेकंदाला एक आत्महत्या होत असेल तर ही एक गंभीर सामाजिक समस्याच म्हणावी लागेल. या वर्षीच्या आत्महत्या प्रतिबंध दिवसाचे ब्रीदवाक्य आहे Creating Hope Through Action. हिंदीत “कार्य करके उम्मीद जगाना” आणि मराठी मध्ये “कृतिशील राहूया – आशा फुलवुया”

आत्महत्या ही मानवी जीवनाला स्पर्श करणारी गंभीर सामाजिक समस्या आहे. या विषयावर झालेल्या परिसंवादात चार दिग्गज मानसोपचार तज्ञानी विविध पैलूंवर विवेचन केले. जाणून घेउया त्यांनी दिलेले मोलाचे संदेश चार भागात.

तर वाचू या आजचा पहिला भाग…
भाग 1.
परिचय : डॉ. आशिष देशपांडे :

दूरदर्शनवरील “सत्यमेव जयते” या कार्यक्रमातून व्यसनमुक्तीचा संदेश अतिशय प्रभावीपणे जगभर पोचवणारे डॉ. आशिष देशपांडे. अल्कोहोलिक ऍनॉनिमस या जागतिक पातळीवरील संस्थेचे भारतातील वरिष्ठ विश्वस्त या नात्याने अगदी पूर्वोत्तर राज्यांपासून दक्षिणेकडील राज्यांपर्यंत आणि विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील व्यसनमुक्तीच्या उपक्रमांचे मुख्य मार्गदर्शक व प्रशिक्षक. विशेष म्हणजे आत्महत्या आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच पिडीतांना मदत करण्यासाठी राज्यस्तरावर जी मानसिक आरोग्य हेल्पलाईन कार्यरत आहे. ती विकसित करण्यासाठी तज्ञ म्हणून शासनातर्फे नियुक्ती. अनेक पुरस्कारांचे व शिष्यवृत्यांचे मानकरी. २५ वर्षांहून अधिक काळ मानसोपचार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान.

डॉ देशपांडे यांच्या संवादाचे सार पुढे देत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने २००४ पासून १० सप्टेंबर हा दिवस आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अहवालानुसार जागतिक स्तरावर दर वर्षी अंदाजे सात लाखाहून अधिक व्यक्ती आत्महत्येचा मार्ग निवडून जीवन संपवतात. ही एक गंभीर सामाजिक समस्याच आहे. एखादी व्यक्ती आत्महत्येचा विचार करते तेंव्हा तिच्या मनात चाललेल्या विचारांचे गांभीर्य ओळखून त्या विचारांपासून त्या व्यक्तीला परावृत्त करता आलं पाहिजे.

सर्वसाधारण ३०% लोकांमध्ये स्वतःला संपवण्याचा विचार येतो. पण तो क्षणिक असतो, तो जसा येतो तसा जातोही. प्रत्येक वेळेला लगेच कृती होत नाही.

डॉ. देशपांडे पुढे ते सांगतात, एखादी व्यक्ती बेचैनी, नैराश्य, पराकोटीचा राग यातून बिकट परिस्थितीशी खूप झगडते, तरी मनासारखे होत नाही तेंव्हा परिस्थितीला शरण जाते आणि आत्महत्येचे विचार तिच्या मनांत पक्के होतात दृढ होतात. प्रत्येक निराश दिसणारा माणूस आत्महत्या करत नाही. परंतु आत्महत्येचे विचार पक्के होतात तेंव्हा त्याचे नैराश्य गायब होते. आणि तो काहीतरी शोध लागल्यासारखा, उत्तर सापडल्यासारखा रिलॅक्स होतो. नॉर्मल होतो. अचानक जवळच्या आवडीच्या वस्तू मित्रांना – नातेवाईकांना द्यायला लागतो.

सहसा कोणाला फोन न करणारा फोन करून बोलतो, तेंव्हा वाटते की हे चांगले बदल आहेत. पण अचानक त्यानी आत्महत्या केल्याचे समजते. इथे त्याच्या बदलाचे गांभीर्य ओळखले पाहिजे. काहींच्या बाबतीत सामाजिक नाती तयार होत नाहीत, त्यामुळे जगण्याची प्रबळ इच्छा उरत नाही. आत्महत्येचा असफल प्रयत्न एकदा केल्यानंतर एका वर्षात ती व्यक्ती परत तोच प्रयत्न पुन्हा करण्याची ८०% शक्यता असते. त्यामुळे फसलेल्या प्रयत्नाची गंभीर दाखल घेतली पाहिजे. आणि त्या व्यक्तीला या विचारांपासून परावृत्त करण्याचे कसोशीने प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे असते.

पोलीस कस्टडीतील आत्महत्या, तुरुंगातील “अंडर ट्रायल” असणाऱ्याच्या, इतकच काय पण प्रत्यक्ष
‘सद रक्षणाय’ म्हणणाऱ्या पोलिसांच्या सुद्धा आत्महत्या ही सुद्धा एक अत्यंत गंभीर बाब आहे. परंतु या आत्महत्यांना प्रतिबंध करणे केवळ सरकारच्या हातात आहे. मी एका तरुणाला आर्थर रोड जेलमध्ये भेटलो. तो तरुण पांच वर्षांहून अधिक काळ अंडर ट्रायल तुरुंगात खितपत पडला आहे.

पुढे डॉ. आशिष देशपांडे सांगतात की भारतात दर आठवड्याला आत्महत्यांचे १८०० प्रयत्न होतात. दृक-श्राव्य माध्यमातून आत्महत्या करण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. तसेच आत्महत्या करण्यासाठी ज्या गोष्टी किंवा सामान लागतं ते सहजरित्या उपलब्ध असतं. जसं उंदीर मारण्याचं औषध, ओ.पी.सी.पॉयझन आपल्याकडे कोणत्याही केमिस्ट कडे सहज विकत मिळतं. यावर उपाय म्हणून शासनाने अश्या वस्तूंची खुली विक्री जर थांबवली तर होणाऱ्या आत्महत्यांना प्रतिबंध करू शकतो.

कॉर्पोरेट सेक्टर मधील व्यावसायिक आणि सेलिब्रिटींच्या आत्महत्यांबद्दल डॉ. देशपांडे सांगतात की, अशा घटनांच्या ठळक मथळ्याच्या बातम्या होतात आणि त्यावर उलट सुलट चर्च्याही होतात, त्याचे उदात्तीकरणही होते. आणि मीडियातील अश्या प्रसिद्धीमुळे काही जण त्याच प्रकाराने आत्महत्या करून जीवन संपवतात. सेलिब्रिटी ज्यांच्या जवळ प्रसिद्धी – मन सन्मान – पैसा-संपत्ती, ऐषोआराम सगळं काही असतं त्यांच्या आत्महत्यांचा आकडा नगण्य आहे परंतु व्यावसायिकांमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, फायनान्सर्स यांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. या घटना रोखण्यासाठी आपल्या प्रयत्नात सुसूत्रता नाही, तसेच मानसशास्त्राबद्दल उदासीनता आहे, आत्मीयता नाही. खरं म्हणजे अगदी सोप्या प्रयत्नांनी आपण अनेक आत्महत्या रोखू शकतो.
क्रमशः

आशा कुलकर्णी

– लेखन : आशा कुलकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ.☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४