आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त लोकमान्य सेवा संघ, पारले, मुंबई या सामाजिक संस्थेच्या कै. शरद विनायक साठ्ये वैद्यकीय केंद्राने “हितगुज” परिसंवाद आयोजित केला होता.
या परिसंवादावर आधारित ३ भाग आपण वाचले आहेत. आज वाचू या चौथा आणि अंतिम भाग…..
– संपादक
आत्महत्या एक गंभीर समस्या आहे. गंभीर अशासाठी की WHO च्या अहवालानुसार जागतिक स्तरावर दरवर्षी अंदाजे सात लाखाहून अधिक व्यक्ती आत्महत्येचा मार्ग निवडून जीवन संपवतात. म्हणजेच ४० सेकंदाला एक आत्महत्या होत असेल तर ही एक गंभीर सामाजिक समस्याच म्हणावी लागेल. १० सप्टेंबर या आत्महत्या प्रतिबंध दिवसाचे यंदाचे ब्रीदवाक्य आहे Creating Hope Through Action. हिंदीत “कार्य करके उम्मीद जगाना” आणि मराठी मध्ये “कृतिशील राहूया – आशा फुलवुया” आत्महत्या विषय महत्वाचा आणि मानवी जीवनाला स्पर्श करणारी गंभीर सामाजिक समस्या आहे.
आजच्या चौथ्या भागात प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ् डॉ. विनिता पवार यांचे विचार जाणून घेण्यापूर्वी त्यांचा परिचय करून घेऊ या…
डॉ. विनिता पवार यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस चे सेठ जी एस मेडीकल कॉलेज मधून एम डी चे शिक्षण घेतले आहे. डॉ विनिता यांना न्युरोसायकॅट्रीक डिसऑर्डर म्हणजेच फिल्मी भाषेत सांगायचं तर “दिमागमे केमिकल लोचा” या विषयात रुची आहे. लहानमुलांमधील मुड डिसऑर्डर, पौगंडावस्थेतील इटिंग डिसऑर्डर या विषयाचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. सध्या सायन हॉस्पिटल मध्ये त्या सिनिअर रेसिडेंट या पदावर कार्यरत आहेत.. तसेच जीवन विकास केंद्रात सल्लागार आहेत.

आपल्या संवादात डॉ. विनिता पवार म्हणाल्या, भारतात २०२१ साली १,६४,०३३ आत्महत्यांची नोंद झाली. त्यात ६७% आत्महत्या १८ ते ४५ वयोगटातील तरुणांच्या आहेत. प्रत्येक तासाला एक तरुण विद्यार्थी आत्महत्या करतो. आत्महत्या हा आजार नसून एक लक्षण आहे. जसे ताप येणे, डोके दुखणे ही लक्षणे आहेत. म्हणून नैराश्याची लक्षणे ओळखणे गरजेचे असते.
एकदा एक महिला वारंवार उपचारांसाठी येते आहे असे दिसले. तेव्हा तिला ताबडतोब समुपदेशनाची गरज आहे असे ओळखून त्या दिशेने पावले उचलली. हिंसामुक्त आणि आनंदी आयुष्य जगणे हा सर्व महिलांचा जन्मसिद्ध हक्क आहे. हिंसाचार सहन करू नका, आम्हाला आपल्या सर्व समस्या मनमोकळे पणे सांगा, त्यातून मार्ग काढण्यासाठीच हा विशेष वॉर्ड सुरू केला आहे असे समजावल्यावर पीडित महिलांना बोलते करता आले. सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि समुपदेशकांनी तसेच प्रशिक्षित कर्मच्यार्यानीही चांगले काम केले. या अनुभवातून आता मुंबई महापालिकेच्या १२ हॉस्पिटल्स मधून दिलासा हेल्पलाईन व कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस साठी वेगळा वॉर्ड सुरु करण्यात आला आहे.

अश्याच एका घटनेचा किस्सा सांगताना डॉ. सुलभा चिरमुले म्हणाल्या, एकदा आमच्या सोशल वर्कर ने एका सात आठ महिन्यांच्या गरोदर महिलेला रेल्वेच्या पुलावर विमनस्क अवस्थेत पाहिले. त्याने फोन करून इंचार्ज डॉक्टर ची परवानगी घेऊन तिला हॉस्पिटलमध्ये आणले. अश्या पीडित महिलांना दाखल करून घेण्याचे व त्यांचे योग्य ते उपचार समुपदेशनातून करण्यासाठी आम्ही येथील डॉक्टरांना विशेष अधिकार दिले आहेत. त्यामुळे त्या गरोदर महिलेला आम्ही आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करू शकलो आणि त्या महिलेचा जीव आम्ही वाचवू शकलो. आपणा सर्वांच्या प्रयत्नातून आपण एक जरी जीव वाचवू शकलो तरी आपल्या प्रयत्नांना यश मिळाले असे म्हणता येईल.

परिसंवादाच्या शेवटी सूत्र संचालक आशा कुलकर्णी म्हणाल्या पीडित महिलांना वैद्यकीय, कायदेविषयक, तसेच पोलिसांचे संरक्षण एकाच छताखाली मिळावे यासाठी आपल्या देशातील सर्व राज्यांत प्रत्येक जिल्ह्यात “वन स्टॉप सेंटर” या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईचे दोन जिल्हे असून मुंबई शहर जिल्ह्याचे वन स्टॉप सेंटर सध्या के.इ.एम. हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून तेथील संपर्क दूरध्वनी क्रमांक आहे : ०२२-२४१००५११ असा आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे सेंटर बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर मध्ये असून तेथील संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक आहे ७०४५३९४७६६. दिवसाचे २४ तास येथे पीडित महिलांना सर्व सेवा मिळू शकतात.
जिज्ञासू वाचक “हितगूज” परिसंवादाचे प्रत्यक्ष व्हिडिओ पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकतील.
हितगुज Part 1
https://youtu.be/62rJXrgkoG4
हितगुज Part 2
https://youtu.be/r1IgDJTDQHk
हितगुज Part 3
https://youtu.be/CaP-kmAR1N4
आपल्याला हितगुज परिसंवाद कसा वाटला, आपल्या सूचना, अनुभव हे जरूर कळवा.

– लेखन : आशा कुलकर्णी.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अतिशय उपयुक्त असा लेख आहे…