Thursday, July 3, 2025
Homeलेखहितगुज ( २ )

हितगुज ( २ )

आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त लोकमान्य सेवा संघ, पारले, मुंबई या सामाजिक संस्थेच्या कै. शरद विनायक साठ्ये वैद्यकीय केंद्राने “हितगुज” परिसंवाद आयोजित केला होता.
या परिसंवादावर आधारित आजचा हा दुसरा भाग…
– संपादक

नमस्कार मंडळी.
आजच्या दुसऱ्या भागात आपण जेष्ठ मानसतज्ञ
डॉ. शुभांगी पारकर यांनी केलेले मार्गदर्शन पहाणार आहोत.
परिचय
डॉ. शुभांगी पारकर यांनी वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मुंबई आणि स्वित्झर्लंड येथून प्राप्त केले. तसेच मानवाधिकार या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूतपूर्व अधिष्ठाता तसेच अमलीपदार्थ व्यसनमुक्ती केंद्राच्या त्या प्रमुख राहिल्या आहेत.

त्यांना मानसोपचार क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विशेषतः डॉ. बी.सी.मारफतीया पुरस्कार सलग ३ वेळा आणि डॉ. ए.व्ही.शहा पुरस्कार तब्बल पाच वेळा पटकावला आहे . सावित्रीबाई फुले तसेच नवशक्ती पुरस्काराच्या ही त्या मानकरी असून महाराष्ट्र शासनाच्या मेंटल हेल्थ टास्क फोर्सच्या सदस्य आणि महत्वाचे म्हणजे मुंबईतील “हितगुज” या हेल्पलाईन च्या प्रवर्तक आहेत.

पुरस्कार स्वीकारताना

डॉ. शुभांगी पारकर यांनी आपल्या संवादात सांगितले, भारतात २०२० मध्ये १८ वर्षाखालील म्हणजेच पौगंडावस्थेतील ११,३९६ मुलामुलींनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. ही खूपच गंभीर बाब आहे. तरुणाई म्हणजे धड बालही नाही आणि प्रौढही नाही असा पौगंडावस्थेतील काळ म्हणजे जीवनातील त्रिशंकू काळ समजला जातो. प्रगल्भ विचारशक्तीच्या अभावी मानसिक आघात सहन न झाल्याने टोकाचे पाऊल उचलले जाते.

उदाहरणार्थ पाळीव प्राण्याचा मृत्यू, वडिलांनी नोकरी गमावणे, कुटुंबातील वितंडवाद, वडीलांची आईला मारहाण, कुटुंबातील हिंसाचार, कोवळ्या वयातील प्रेमभंग, परीक्षेतील अपयश अशा कारणांनी १४ ते १८ वर्षे वयाच्या मुलांच्या आत्महत्या होतात. याच वयात महत्वाचे मानसिक आजार उद्भवण्याचा धोका असतो. याच वयात व्यसन पटकन लागतं. ते कसं व केंव्हा सुरु झालं कळतही नाही. त्यामुळे हे खूप महत्वाचे वय असते.

आत्महत्येचा प्रयत्न करून वाचलेले तरुण स्क्रिझोफिनियाचे शिकार झालेले असतात, हे निदान त्यांनी जीवन संपवून टाकण्याचा प्रयत्न केल्यावर समजते. या वयात स्पर्धेच्या वेगात सर्वोत्तम यश थोडक्यानी चुकतं आणि आपण आई वडिलांना फसवलं – आता सगळं संपलं – आपण होपलेस, यूजलेस आहोत, आता जीवनात काहीच उरलेले नाही अशा अनेक भावनांनीं कमालीचं नैराश्य येतं. या वयात काल्पनिक विश्व तयार होतं, रोमँटिसिझम इतकं टोकाचं की काही तरुण आपण आत्महत्या केली तर कशी करुं तेही ठरवतात.

डॉ शुभांगी पुढे म्हणाल्या, ब्लू व्हेल गेम सारखे घातक व्हिडीओ गेम्स भारतात आल्यामुळे एक झाले, आपल्याकडील सोशल मीडियाचा रोल स्पष्टपणे उजेडात आला. एका तरुणाने आपल्या फेसबुकवर एका मागोमाग एक अशा काही सात घातक संकेत देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या ज्यातून त्याच्या मनातील पराकोटीचे नैराश्य स्पष्ट दिसत होते, आणि शेवटची त्याची पोस्ट होती विषाच्या बाटलीचे चित्र ! यावरून त्याच्या फेसबुक मित्र परिवाराला त्याने आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. परंतु कोणीच त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. आणि एक उभरते तारुण्य संपुष्टात आले.

आत्महत्या म्हणजे १०० टक्के मरायचं असं नसतं. कुठेतरी दहा वीस टक्के जगण्याची इच्छा असते आणि मला कोणीतरी मदत करायला यावं अशी आशा असते. फेसबुक मित्र परिवाराने जर त्या तरुणाच्या सांकेतिक पोस्टची वेळीच दखल घेतली असती तर त्याला आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करून एका आत्महत्येला प्रतिबंध घालता आला असता.

ज्येष्ठांच्या वाढत्या आत्महत्यांबद्दल डॉ. शुभांगी सांगतात ज्येष्ठांबद्दल आदरभाव, त्यांचा दरारा आज कमी झाला आहे असे दिसते. त्यांचे अस्तित्व समाजात अस्पष्ट आहे. त्यांच्या अनुभवांना तरुण पिढीच्या नजरेत शून्य किंमत आहे. त्यांच्या सल्ल्याला कोण विचारतं ? सगळं तर गुगल प्रोफेसर कडून मिळतं ! म्हणून तरुण पिढीला आपली गरज नाही ही नाकारल्याची भावना, स्मृतिभ्रंश, दुर्धर आजार, आयुष्यात हरल्याची भावना, नैराश्य आदी बाबी ज्येष्ठांच्या आत्महत्यांना कारणीभूत ठरतात. अश्या मानसिक अवस्थेवर आणि एकाकीपणावर वृद्धाश्रम एक चांगला प्रतिबंधात्मक उपाय आहे असे डॉ. शुभांगीचे मत आहे.

२०१४ साली महापालिकेतर्फे के. ई. एम. हॉस्पिटल मध्ये सुरू केलेल्या “हितगुज” या हेल्प लाईनच्या यशाबद्दल सांगताना डॉ. शुभांगी पारकर म्हणतात, सुरुवातीला या उपक्रमाला महिलांपेक्षा पुरुषांकडून अधिक प्रतिसाद मिळाला. परंतु पुढे रात्री दहा वाजल्यानंतर ज्येष्ठांकडून मनमोकळा संवाद साधण्यासाठी फोन येऊ लागले. त्यांच्या मानसिक समस्या, त्यांचा भावनिक कोंडमारा कथन करून नैराश्यावर मात करण्याला या हेल्पलाइनची मदत होते. मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे आणि महापौर सुनील प्रभू यांच्या पुढाकाराने सुरु झालेला हा उपक्रम खूपच लोकोपयोगी ठरला आहे.
क्रमशः

आशा कुलकर्णी

– लेखन : आशा कुलकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. अतिशय महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे। मुद्दलात सहवासात असणार्‍यांना लक्षात येऊनही त्रास असणार्‍या व्यक्तींना “आपण काही वेगळे वागतोय आणि त्यासाठी समुपदेशनाची गरज आहे” हे मान्य केले जात नाही। मान्य करून गेले तर वारंवार बोलण्यासाठी डॉक्टरांजवळ वेळ नाही। मग औषधे दिली जातात आणि त्यांनी गुंगी येते हा खूप मोठा आक्षेप असतो।
    यात समुपदेशनाचे फार पण वेळखाऊ, महत्व आहे। रोजचे जगणेच इतके धकाधकीचे आहे की पालक, मुलांना, आईवडिलांना वेळही देवू शकत नाहीत।
    वाढत्या स्पर्धा मग त्या शिक्षणातल्या, व्यवसायातल्या मनाला ताण आणतात। त्याशिवाय प्रत्येकाला स्वतःच्या स्पेसवर आक्रमण नको असते। समाजासोबत जगण्यापेक्षा आपले आपण जगावे , त्यात कोणी नको ही परदेशातील भावना मोठी, आणि सगळ्यांसोबत। जगताना काही बाबतीत दोन पावले मागे घेण्यात अहंकार आणि काहीही देणं देण्याची गरज असल्याचे नाकारणे, ही तर मोठी कारणं आहेत।
    एकूणच विषयावर चर्चा सुरू झाली हे महत्त्वाचे

  2. धन्यवाद आशाताई..!
    तुम्हांला आणि शुभांगीताईंना
    ..
    हा विषय खूप महत्त्वाचा आहे..
    या गोष्टीला विचारप्रक्रियेतून आळा घालण्यासाठीच तर गुरुकृपा संस्था ‘हिम्मत का तराना’ हा उपक्रम चालवते … प्रशान्त थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
    9921447007

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments