जागतिक महिला दिनानिमित्त ‘हुंड्यातुन महिला मुक्त झाली आहे का ?’ या विषयावर मत, विचार, अनुभव मागण्यात आले होते. या अनुषंगाने लेखिका नीला बर्वे यांचा हा अभ्यास पूर्ण लेख. बर्वे मॅडम, या स्टेट बँक ऑफ इंडिया मधून वरिष्ठ अधिकारी पदावरून निवृत्त झाल्या असून सध्या त्यांचे वास्तव्य सिंगापूर मध्ये आहे)
हिंदू धर्मामध्ये सालंकृत कन्यादान हे मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या दहा महादानांपैकी एक असल्याचे मानले जाते. त्यातूनच हिंदू धर्मातील धर्मशास्त्रांत हुंड्याची प्रथा अंगिकारली गेली. विवाहाच्या वेळेस वधूपक्षाकडून वरपक्षास ठरलेली नगद रोख रक्कम, मौल्यवान वस्तू देणे याचेच नांव हुंडा.
भारतात समाजातील सर्वच स्तरांमध्ये रूढ झालेली हुंडा परंपरा विविध जातीनुसार वेगवेगळी ! पूर्वी हुंडा घेणे ही सामाजिक प्रतिष्ठेची बाब होती. तसेच अनेक सामाजिक संस्थांच्या अभ्यासानुसार, मुलीला सासरी त्रास होऊ नये, धार्मिक रूढी, संसाराला मदत ही प्रमुख कारणे हुंडा पद्धतीची आहेत.
भारतीय समाजामध्ये हुंडा पद्धत इतकी रूढ व गंभीर झाली की त्यामुळे नववधूचा छळ, मारहाण, खून वा आत्महत्येस प्रवृत्त करणे, तिच्या मतांना किंमत न देता स्त्रीभृण हत्या करण्यास भाग पाडणे इ. अनेक घटना समाजातील सर्व थरांवर मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या. अनुसूचित जमातीमध्ये (आदिवासीमध्ये) ‘वधुमूल्य’ किंवा ‘कन्या शुल्क’ देण्याची प्रथा होती.
भारत सरकारने १९६१ मध्ये सर्वप्रथम हुंडा प्रतिबंधक कायदा देशामध्ये लागू केला. व्याख्येमध्ये हुंडा देणे व वधुमूल्य देणे या दोहोंचाही समावेश करण्यात आला आहे. १९८३ पासून २०१८ पर्यंत कायद्यात सुधारणा केल्या गेल्या, गुन्हेगारांना तात्काळ अटकेपर्यंत अनुमती देण्यात आली. त्यामुळे आणि मुलींचे शिक्षण यामुळे प्रत्यक्ष रोख हुंडा रोखला गेला असला तरी त्याचे स्वरूप अधिक भयावह व वधूपक्षाला ताणयुक्त झाले आहे.
आधुनिक लग्न समारंभाला रीतिरिवाज, धर्म संस्कृती या बेगड्या पण अपरिहार्य प्रथांच्या नांवाखाली एका उत्सवाचे रूप दिले गेले आहे. यांत प्री मॅरेज शूटिंग, मेहंदी, हळदी समारंभ …संगीत पार्टीसह, डिझायनर दागिने, डेस्टीनेशन मॅरेज, भव्य लॉन्स, छायाचित्रिकरण, रिटर्न गिफ्ट्स यांचा समावेश असतो. बहुसंख्य लग्नाळू मुलींनाही याची क्रेझ असते कारण नातेवाईक, मैत्रिणींच्या लग्नात त्यांनी मिरवून घेतले असते. या सर्वांची जबाबदारी मुलीच्या पित्याला घ्यावी लागते. तसेच शहरांत घर असावे वा परदेशी उच्च शिक्षण या वराच्या स्वप्नपूर्तीसाठी त्याला हातभार लावावा लागतो. हे हुंड्याचे कायद्याला वळसा घालून पुढे आलेले नवे रूप.
आता तर मुलीला संपत्तीत समान हक्क याचे विपरीत स्वरूप बघायला मिळते. जर वडिलांनी घर घेतले असेल आणि वारस म्हणून मुलाला नाही नेमले तर आई वडिलांच्या वृध्दापकाळांत काडीचीही मदत न करणाऱ्या, उलट त्यांना बघायच्या निमित्ताने माहेरपण उपभोगणाऱ्या मुली त्यांच्या पश्चात घराचे अर्धे पैसे मागायला कमी करत नाहीत व त्या जर निर्मळ मनाच्या असतील, तर तिच्या सासरचे हा हक्क सोडायला तयार नसतात. हा एक्सटेंडेड हुंडा !
गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुलींसाठी ‘लाडली लक्ष्मी’ ही योजना सुरु केली. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर, तिचे लग्न झाले की सरकारतर्फे तिला एक लाख रुपये मिळणार. तोपर्यंत बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये राहणार. लग्नानंतर आर्थिक पाठबळ असावे म्हणून.परिणाम काय ? लग्नाच्या बोलणीतच हे पैसे वराला द्यायचे निश्चित होते. लग्नाच्या मोसमांत लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वधूला घेऊन ही मंडळी यायची आणि पैसे खिशात घालून चालती व्हायची. या मुलींना खरं तर हे पैसे त्यांना द्यायचे नसतात. एकदा एक मुलगी केबिनमधे आली आणि, “मॅडम, प्लीज काहीतरी करा ना. मला हे पैसे बाबांना द्यायचेत, खूप खर्च करायला लागला, कर्ज आहे डोक्यावर. भावाच्या शिक्षणासाठी द्यायचेत. “बँक मॅनेजर कुणाच्या वैयत्तिक बाबतीत काय लक्ष घालणार ? तरीसुद्धा सौम्य शब्दांत बघू या विचारून म्हणून प्रयत्न केला. पण त्यांनी सर्वासमक्ष तिचा पाणउतारा केला नि रागातच तिला घेऊन गेले. डबडबत्या डोळ्यांनी घेतलेला माझा निरोप आजही हृदयांत कालवाकालव करतो.
मुंबईच्या ऑफिसमध्ये यू .पी., बिहारमधून प्रोबेशनवर आलेली ३ मुले ! एकदा मस्करी करत विचारले, “काय मग, कुठे जमले की नाही ?”
“नहीं मॅम, पॉसिबलही नहीं ”
क्यू ? अच्छी नौकरी है. गुड प्रॉस्पेक्ट्स.”..
तिघेही हसले. जे सांगितले, त्याचा मतितार्थ, जितके शिक्षण जास्त, नोकरी मोठ्या पदावरची तेवढा त्यांचा भाव जास्त. (पन्नास लाखापासून..) पर्मनंट झाले की, आई-वडील बोलावून घेणार, मुलगी, पैसे, सगळे ठरवून ! यांनी फक्त बोहल्यावर चढायचे. “आणि एखाद्याने प्रेमविवाह केला तर..?
“घरचे दरवाजे कायमसाठी बंद आणि जातीबाहेर असेल तर कुटुंब वाळीत”
“तुम्हांला, या काळांत हुंडा घ्यायला ठीक वाटते कां ?”
“मॅम, मला दोन बहिणी आहेत, याला तीन. त्यांच्यासाठी कुठून आणणार एव्हढे “….
चक्र फिरत्येय गोंडस नांवाखाली !
आदिवासी आणि कांही जमातींमध्ये वधुमूल्य देण्याची पद्धत आहे. त्यांचे काम कष्टाचे. सर्व कुटुंबच छोटा मोठा हातभार लावणारच. त्यामुळे काम करणारा एक हात कमी होणार म्हणून वराने वधुमूल्य द्यायचे. अजूनही कांही जमातीत ही पद्धत सुरु आहे, त्याचा एक परिणाम असा की स्त्री भ्रूणहत्या येथे होत नाही मात्र दुर्दैवाने शिकलेली मुले स्वतः हुंडा घेऊ लागली आहेत, हे फोफावण्याआधीच थांबविणे आवश्यक आहे.
हुंडा ही एक प्राचीन प्रथा जगाच्या काही भागांमध्ये, प्रामुख्याने आशिया, उत्तर आफ्रिका आणि बाल्कनच्या काही भागांमध्ये लग्नाचा प्रस्ताव स्वीकारण्याची अट म्हणून हुंड्याची अपेक्षा केली जाते आणि मागणी केली जाते. हुंड्याची प्रथा अशा संस्कृतींमध्ये सर्वात सामान्य आहे जी प्रखरपणे पितृवंशीय आहेत आणि ज्या स्त्रियांना त्यांच्या पतीच्या कुटुंबासोबत किंवा जवळ राहण्याची अपेक्षा आहे (पितृस्थान).
युरोप, दक्षिण आशिया, आफ्रिका आणि जगाच्या इतर भागांमध्ये हुंडा प्रदीर्घ इतिहास आहे.केवळ आपल्याच देशांत नव्हे तर इतरही काही आशियाई देशांमध्ये हुंड्याशी संबंधित वादांमुळे कधीकधी हत्या आणि ऍसिड हल्ल्यांसह महिलांविरुद्ध हिंसाचाराच्या घटना घडतात.
मानववंशशास्त्रज्ञ जॅक गुडी यांनी एथनोग्राफिक ऍटलसचा वापर करून जगभरातील हुंडा पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास करून दाखवून दिले की हुंडा हा वारशाचा एक प्रकार आहे जो जपानपासून आयर्लंडपर्यंतच्या युरेशियन समाजात आढळतो ज्यात “विकर्ण देवाण-घेवाण” (“diverging devolution)”
प्रचलित होते, म्हणजेच, मालमत्ता हस्तांतरित करते. (दोन्ही लिंगी)
आफ्रिकन समाजांमध्ये “वधूची किंमत”, वर किंवा त्याच्या कुटुंबाने वधूच्या पालकांना (स्वतः वधूला नाही) पैसा, वस्तू किंवा मालमत्ता रूपाने दिला जाई. ही प्रथा मोठ्या प्रमाणात युरोपमध्ये नाहीशी झाली आहे परंतु, उप-सहारा आफ्रिका, भारतीय उपखंड आणि पूर्व युरोपच्या काही भागांसह जगाच्या अनेक भागांमध्ये ती कोणत्या तरी गोंडस नावाखाली प्रचलित आहे.
दक्षिण आफ्रिकेत, हुंड्याची परंपरा स्त्री-पुरुषाला वैवाहिक जीवनात एकत्र आणण्याचा मुख्य आधारस्तंभ अजूनही आहे. ते याला “लोबोला” असे म्हणतात, ज्या द्वारे वर, वधूच्या कुटुंबाला भेटवस्तू, विशेषत: गुरेढोरे देतो.
मध्य पूर्व, आफ्रिकेच्या काही भागांमध्ये आणि काही पॅसिफिक बेट समाजांमध्ये, विशेषत: मेलेनेशियामध्ये वधूच्या पालकांना रक्कम देण्याची प्रथा आहे.
थायलंडमधील काही विवाहांमध्ये हजारो यूएस डॉलर्सपर्यंत आणि पापुआ (न्यू गिनी) च्या काही भागांमध्ये कधीकधी ही रक्कम $100,000 इतकी असू शकते.
फ्रेंच मानववंशशास्त्रज्ञ फिलिप रोस्पाबे यांच्या म्हणण्यानुसार, विसाव्या शतकाच्या सुरुवातीस, या पद्धतीत स्त्रीची खरेदी करणे ही भावना नसून पत्नीच्या पालकांवर पतीचे कायमचे ऋण कबूल करणारी (परंतु कधीही न फेडणारी) अशी निव्वळ प्रतीकात्मक गोष्ट आहे.
हुंडा आणि वधूच्या किमतीचे उत्क्रांतीवादी मानसशास्त्राचे स्पष्टीकरण असे आहे की वधूची किंमत बहुपत्नी समाजात सामान्य आहे ज्यात स्त्रियांची सापेक्ष कमतरता आहे. एक पत्नी समाजात जेथे स्त्रियांकडे वैयक्तिक संपत्ती कमी असते, तेथे हुंडा सामान्य आहे कारण तेथे श्रीमंत पुरुषांची सापेक्ष कमतरता असते त्यामुळे लग्न करतांना अनेक संभाव्य स्त्रियांमधून निवड करू शकतात.
ज्या समाजात अंग मेहनतीपेक्षा भांडवल अधिक मौल्यवान आहे अशा समाजात हुंडा हा वधू कडून वराला दिला जातो. उदाहरणार्थ, मध्ययुगीन युरोपमध्ये, नववधूच्या कुटुंबाला हुंडा – जमीन, गुरेढोरे आणि पैसा – पती-पत्नीच्या कुटुंबाला देण्यास भाग पाडले जात असे.
ज्या समाजांमध्ये भांडवलापेक्षा अंग मेहनतीला अधिक महत्त्व असते अशा समाजांमध्ये ब्राइडवेल्थ अस्तित्वात आहे. सब-सहारन आफ्रिकेत जिथे जमीन मुबलक होती मात्र पाळीव प्राणी नव्हते, तिथे भांडवलापेक्षा अंग मेहनती अधिक मौल्यवान होती, आणि एक काम करणारे माणूस कमी होणार म्हणून वधूसंपत्तीचे (bridewealth ) वर्चस्व होते.
इलियड आणि ओडिसीमध्ये नमूद केलेल्या काही विवाह सेटलमेंटवरून असे सूचित होते की वधूची किंमत ही होमरिक समाजाची प्रथा होती मात्र “आदिम” वधू किंमत आणि बहुपत्नीत्व यांसारख्या प्रथा यापुढे ग्रीक समाजाचा भाग राहिलेल्या नाहीत. फक्त भेटवस्तूंची देवाणघेवाण ही मूलभूत प्रथा प्रचलित आहे.
इस्लामिक कायदा वराला लग्नाच्या समाप्तीपूर्वी वधूला महर नावाची भेट देण्याविषयी सांगतो. वधू-किंमतीच्या प्रमाणित अर्थापेक्षा महर वेगळे आहे कारण ते वधूच्या कुटुंबासाठी नाही, तर पत्नीने स्वतःसाठी ठेवायचे असते. कुराणमध्ये, अध्याय 4, अन-निसा, श्लोक 4 मध्ये खालीलप्रमाणे उल्लेख आहे:
“आणि ज्या स्त्रियांशी तुम्ही लग्न करता त्यांना त्यांचे महर [लग्नाच्या वेळी पतीने पत्नीला दिलेले अनिवार्य वधूचे पैसे] चांगल्या मनाने द्या; परंतु जर त्यांनी, त्यांच्या स्वतःच्या आनंदाने, त्यातील काही भाग तुम्हाला माफ केला, तर तो घ्या आणि कोणत्याही हानीच्या भीतीशिवाय त्याचा आनंद घ्या (जसे अल्लाहने ते कायदेशीर केले आहे).
उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान अशा मध्य आशियातील विविध ठिकाणी वधूची किंमत बहुतेक प्रतीकात्मक आहे. स्थानिक परंपरा आणि गुंतलेल्या कुटुंबांच्या अपेक्षा, थोड्या पैशांपासून किंवा एखाद दुसऱ्या पशूपासून ते पशुधनाच्या कळपाच्या रकमेपर्यंत असू शकते.
यूकेमध्ये, विशेषतः आशियाई कुटुंबांमध्ये हुंडा पद्धत अजूनही आहे व त्यावरून होणारे विवाद, अगदी घरगुती हिंसाचार करण्यापर्यंत विकोपाला जातात. मात्र रोमन काळापासून प्रचलित असणारी ही पद्धत इंग्लंड आणि वेल्समध्ये “विवाहित महिलांच्या मालमत्ता कायदा १८८२” आल्यापासून जवळजवळ बंद झाली आहे पण पूर्णपणे नाही.
चीन हा जगातील असा देश आहे की जेथे वधूच्या आई-वडिलांना वराकडून वधूची किंमत म्हणून हुंडा द्यावाच लागतो आणि त्याचवेळी ऐच्छिक हुंडा म्हणजे वधूच्या कुटुंबाने दिलेला विवाह खर्च ही सहअस्तित्वात आहे. १९८० ते जानेवारी २०१६ पर्यंत सरकारने एक-मूल धोरण राबविल्यामुळे लिंग गुणोत्तर मोठया प्रमाणात असंतुलित झाले.(घरोघरी मातीच्याच चुली …तेथेही मुलगाच हवा) मुलींचे प्रमाण अतिअल्प झाल्याने वधुमूल्य वाढले.)
सिंगापूरमध्ये याला पिन जिन असे म्हणतात ज्याचा अर्थ “वधूची किंमत” आहे, पण ती बहुधा अल्प प्रमाणात असते. सहमत होऊन वराकडील मंडळी हे वधुमूल्य देते. त्यानंतर वधूचे कुटुंब मग हुई ली म्हणजे भेटवस्तूंचा एक भाग आणि रोख रक्कम वराला परत करते.हे थोडेफार भारतातील घरच्यांचा अहेरसारखे वाटते.
आपला समाज शिक्षित होतो आहे. अनिष्ट चालीरीतींना मूठमाती दिली जात आहे. मात्र अजूनही हुंड्या करिता पत्नीचा छळ करण्याच्या संतापजनक घटना आपल्या सुसंकृत समाजामध्ये सातत्याने घडत आहेत. २०१६ मध्ये व्यवसायाने दोघेही डॉक्टर असलेल्या रुची व मंगेश यांचा विवाह संपन्न झाला. मंगेशने रुचीला माहेरुन पैसे आणण्यासाठी अनेक वेळा भाग पाडले होते. सुरुवातीला छोटी-मोठी नड असल्याचे समजून रुचीच्या आई वडिलांनी त्यांच्या मागण्यापूर्ण केल्या. त्यानंतर रुचीला मुलगा झाल्यानंतर नवऱ्याकडून त्रास होणार नाही, या आशेवर तिने पुन्हा संसाराला सुरुवात केली. मात्र मंगेश मधील लालचीपणा आणखीच वाढला होता. तो रुचीचा माहेरून ५० लाख रुपये आणण्यासाठी सारखा त्रास देत होता. अखेर गळफास घेऊन या डॉक्टर महिलेने स्वत:चे आयुष्य संपवले. अशा अनेक रुची आजही समाजात, बाहेर उत्तम करिअर आणि घरांत छळ असे जीवन जगात आहेत. उच्च शिक्षित समाजाची ही शोकांतिका तर बाकीच्यांच्या व्यथांची कल्पना करवत नाही.
देशोदेशीच्या सर्व अगदी नोकरीपासून, कार, मोबाईल, टी.व्ही., बुटांपासून हेल्मेट पर्यंत साऱ्या गोष्टी हव्या असतात पण दुसऱ्या जातीतील (धर्म तर फार दूर) मुलीशी लग्न केले तर कुटुंबाला वाळीत टाकले जाते. कधी बिचाऱ्या मुलांची हत्या केली जाते.
पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्यास चढाओढ लावणाऱ्यांनी त्यांची या बाबतीतील मते नक्की अनुसरायला हवीत.कोणता जोडीदार निवडायचा हा फक्त त्या दोघांचा निर्णय असतो.
जागतिक स्तरावर मुलीचे मूल्य वा मुलाचे …दोन्ही बंद झाले पाहिजे.
सिंगापूर, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांतून हुंडाबळी अजिबात आढळत नाहीत आणि भारतात ? हर्षिता अत्तलूरी केरळमधील Inspector general of police, घरी मृतावस्थेत सापडली. खून की आत्महत्या अजून सिद्ध होत नाहीये. इन्स्पेक्टर जनरल, पोलिसचीच ही अवस्था तर बाकीच्यांसाठी येथील पोलिसांकडून अपेक्षा करायची कां हा प्रश्न आहे. सोबतच्या फोटोतील विस्मया नायर बघा.

दागिन्यांनी कशी मढली असेल याची कल्पना करताय नां ? मग पुढचे ऐका. एका वर्षात ती सासरच्या बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळली. २४ वर्षांची कोवळी पोर ! या सर्वाला केवळ मुलाकडचे लोक जबाबदार नाहीत, तर तुम्ही, आम्ही … सारा समाज. बातमी वाचतो, कांही क्षण हळहळतो, फार तर whatsapp वर फॉरवर्ड करतो आणि पुढचा मेसेज वाचू लागतो. १०/२० पैसे पेट्रोल वाढीच्या निषेधार्थ रथी-महारथी रस्त्यावर उतरतात, हैदोस घालतात तर अशा कुटुंबाचा साधा निषेध सर्व स्तरांवरून कां केला जात नाही ? कायदा हातात घ्यायची अजिबात आवश्यकता नाही पण या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा, लेखमाला लिहून एव्हढे धगधगते ठेवले पाहिजे की त्यावरून कोणाला हिम्मत नाही झाली पाहिजे आपल्या सुनेला, पत्नीला छळायची ! (पण समाजाची स्मृती कमीच असते. नवीन कांही घटना आली की जुनी विस्मृतीत जाते. हे सर्वच सामाजिक घटनांमध्ये होते. एक भ्रष्टाचार उघडकीस आला की मागचा सपाट!) अर्थात हे मी फक्त लिहीत नाहीये.
सुमारे ३५ वर्षांपूर्वी डोंबिविली जळीत प्रकरणाने सारा महाराष्ट्र हादरला होता. त्याच्या घरावर बायकांनी मोर्चा काढला तेव्हां आमच्या ट्रेन गृपमधील आम्ही मैत्रिणीही त्यांत सामील झालो. तरुण वय, रोज आपल्यासारखी ट्रेनने प्रवास करणारी, खूपजणी सामील झाल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला गेला त्यामुळे आम्हांला वाटले, चला याची काहीतरी दहशत बसली असेल. कसले काय ! सहा महिन्यांनी एकदा वंदना ट्रेनमध्ये येता येता फुणफुणली,
“त्या राक्षसाचे लग्न ठरले.” “काय ? कोण महाभाग आपली मुलगी मारायला निघाला ? आणि मुलगी कशी तयार झाली ? आई सावत्र आहे कां ? …ते कांही मला माहित नाही, पण पुन्हां मोर्च्याचे ठरवाल तर मी कांही येणार नाही. त्यावेळीच माझ्या सासूबाईंना आवडले नव्हते. माझेही नवीनच लग्न आहे “अगं पण …’
‘पण नाही नि बिण नाही. नाहीतर पुढचा मोर्चा माझ्या घरावरच काढायला लागेल’.
आम्ही नाही गेलो पण इतर बायकांनी भेट घेतली त्या मुलीच्या आईची, पण लग्न झालेच. आम्ही हळहळण्याशिवाय काहीच करू शकलो नाही, आणि हेच. आम्ही फक्त हळहळतो.
मुंबईच्या बॉम्बब्लास्टमध्ये शेकडो लोक रांग लावून रक्तदान करीत होते पण इथे इच्छा असून अजून मदत करू शकत नाही ह्याची खंत वाटते. आज तरी एकच ठोस उपाय दिसतो, प्रत्येक स्त्रीने हा वास घ्यायला पाहिजे की मी आत्मसन्मान जपेनच पण माझ्या घरी येणाऱ्या सुनेचाही सन्मान करीन, स्वागत करीन कोणत्याही अपेक्षेशिवाय. आणि मुलालाही आत्मसन्मानाची जाणीव करून देईन की जे कांही करायचे आहे ते स्वप्रयत्ने, स्वकष्टार्जित कमाईने. असे झाले तर पुढच्या पिढ्याही अभिमानें सांगतील की, आमच्याही देशांत हुंडा नाही.
(स्रोत…आंतरजाल, लोकांशी चर्चा, स्वानुभव)

– लेखन : नीला बर्वे. सिंगापूर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप अभ्यासपुर्ण लेख ,समाजउद्बोधक लेख ,अलका भूजबळ व देवेंद्र भूजबळ चांगला विषय हाताळण्यास प्रोत्साहीत केलेत ,खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍👍🙏🙏
अप्रतिम सुंदर!
अभ्यासपूर्ण लेख. खरच प्रत्येकाने ही प्रथा बंद होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.