“हुंड्यातुन महिला मुक्त झाली आहे का ?”: काही लेख
नमस्कार, मंडळी.
जागतिक महिला दिनानिमित्त “हुंड्यातुन महिला मुक्त झाली आहे का ?” या विषयावर मतं, विचार, अनुभव मागविण्यात आले होते. मिळालेला प्रतिसाद पाहून आपल्याला हुंडा पद्धतीचं निर्मूलन होण्यासाठी किती लांबचा पल्ला गाठायचा आहे, हे दिसून येते.
काल आपण भारतातील हुंडा प्रतिबंधक कायदा व सद्यस्थिती, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर मधील परिस्थिती या वर लेख प्रसिद्ध केले.
इतर लेख आज पुढे देत आहोत…..
१) हुंडा : ज्वलंत आग
हुंड्यातुन महिला मुक्त झाली आहे काय ॽ हा प्रश्न म्हणजे जणु इथल्या समाजव्यवस्थेला, शासनव्यवस्थेला आणि मानसिकतेला लागलेली एक ज्वलंत आग आहे आणि आता ही आग कधी विझणार हा प्रश्न प्रत्येक आई बापाच्या समोर आहे जे आपल्या हृद्ययाचा एक तुकडा दान करतात, तरी समाज त्यांना विचारतो की मुलीच्या हुंड्यात काय दिले ? आणि आता ही आग ग्रामीण, निरक्षित लोकांमध्येच नाही तर याची ठिणगी मोठमोठ्या शहरांमध्ये आणि शिक्षित वर्गात सुद्धा पोहचली आहे.
या प्रथेला आळा घालण्याकरिता साठ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. अनेक संघटनांची स्थापना झाली आहे, यावर कायदा तयार करण्यात आला आहे, तरी आज महिलांच्या समस्यांमध्ये हुंडाप्रथेने आपले स्थान कायम राखले आहे.
आज विज्ञानाच्या युगात आमच्या समोर स्री हुंड्यातुन मुक्त झाली काय असा खणखणीत प्रश्न येतो आहे ॽ मग वाटते कि, भारतासारख्या पवित्र देशात स्री अजुनही अंधारातच आहे..
तिच्या अस्मितेची जाणीव नाही या समाजाला. ती अजुनही कुणाची तरी गुलामच आहे. हुंड्यासाठी दुशासनासारखे पापी अजुनही मोकाट फिरतच आहे.
द्रोपदीस आजही सासुरवाडीतील पांडव जुगारात धरतच आहे…
हक्कासाठी झटत, हुंड्यासाठी जळत आहे..
माझ्या या भारतासारख्या पवित्र देशात स्री अजुनही अंधारातच आहे…..
हुंडा प्रतिबंधक कायदा, 1961 या अधिनियमातील कलम 2 अन्वये हुंडा या शब्दाची व्याख्या विवाहातील एका पक्षाने विवाहातील अन्य पक्षास किंवा विवाहातील कोणत्याही पक्षाच्या आई – वडिलांना अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीने किंवा तत्पूर्वी किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा द्यायाचे कबुल केलेली कोणतीही संपती अथवा मुल्यवान रोख असा आहे.
पंडित नेहरूंच्या काळात हुंडा विरोधी कायदा संसदेत मंजूर झाला. मात्र, कडक असूनही हा कायदा सहा दशकांनीही निष्प्रभ ठरतो आहे. तथापि आज हुंड्याची प्रथा अबाधित आहे. एवढंच नव्हे तर तिची पाळेमुळे एखाद्या विषवेलीसारखी अधिक घट्ट आणि अधिक विस्तृत झालेली दिसत आहेत. आज आपण २१ व्या शतकात प्रवेश केला आहे. कसा आहे आपला आजचा भारत ? इथं उच्चभ्रू मंडळी एकाच वेळी प्राचीन परंपरांचे आणि आधुनिक औद्योगीकरणाचे ढोल बडवतात. शॉपिंग मॉल्स मधून चैनीच्या वस्तू ओसंडून वाहत आहेत. इथल्या कुटुंबातल्या माता ‘त्यागी’ आणि मुली ‘आज्ञाधारक’ आहेत. इथल्या लग्नात मॉडेल्सच्या धर्तीवर अत्याधुनिक पेहेरावांचे प्रदर्शन मांडले जात आहे. असा आपला आजचा भारत..
हुंडा प्रथा आजही प्रचलित असुन तिचे स्वरूप बदलत आहे. हुंडा केवळ लग्नापुरता मर्यादित राहिलेला नाही. आज हुंड्याचा परीघही प्रचंड आहे. केवळ विवाहाच्या वेळीच ‘देणे – घेणे’ होत नाही. तर वधूवरांची पत्रिका जमली की तिथपासून सुरुवात होते. पत्रिका जमली, जोडी ठरली, मग साखरपुड्यापासून प्रत्यक्ष विवाहापर्यंत, त्यानंतर बाळाचा जन्म, बारसं, त्यांची लग्नं या साऱ्या प्रसंगी आहेर अपेक्षित असतात. याशिवाय दोन्हीपैकी कोणत्याही कुटुंबात होणारे कार्य, धार्मिक विधी अशा सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रसंगीही मुलाकडच्यांना मानपान केले जाते. या साऱ्याचा समावेश हुंड्यातच होतो. ‘हुंडा’ केवळ लग्नापुरताच मर्यादित राहिलेला नाही. मुलीच्या माहेरच्या माणसांना तिच्या सासऱ्यांबरोबर जुळून आलेले संबंध पुनःपुन्हा दृढ करावे लागतात. लग्नाला बरीच वर्षे होऊन गेली तरीही लेकीच्या संसाराला हातभार लावावा लागतो. वा भेटवस्तू, आहेर देऊन त्यांची मर्जी राखावी लागते. पूर्वी हुंड्याची प्रथा सवर्ण हिंदूंमध्येच प्रचलित होती.आता सर्वच या प्रथेचे अनुकरण करत आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये दररोज 19 महिलांच्या जीवनात हुंडा संबंधित बाबींचा समावेश आहे. क्राइम ब्युरोच्या अहवालात असे म्हटले आहे की, हुंडाबळी मृत्यूची एकूण 6,966 प्रकरणे, ज्यात 7,045 बळी गेले होते. देशात हुंडाविरोधी कायदा 1961पासून अस्तित्वात असूनही 95% लग्नांमध्ये अजूनही हुंडा स्वीकारला जातो आणि दिला जातो. हा धक्कादायक अहवाल जागतिक बँकेनं दिला आहे. यावरून समजते की खरंच स्री हुंड्यातून मुक्त झाली की आणखी त्या जिवघेण्या हिंसक जाळ्यात गुरफटली. 27 वर्षांच्या तरुण पीएचडी स्कॉलरने आत्महत्या केली कारण तिच्या सासरच्या लोकांना तिचा अभ्यास सुरू ठेवण्यास हरकत होती. तिच्या पालकांचे म्हणणे आहे की, हुंड्यासाठी भावनिक छळ करण्यात आला. भारतामध्ये एक चिंताजनक प्रवृत्ती आहे ज्यामध्ये दररोज 20 महिलांचा हुंड्यासाठी छळ झाल्यामुळे मृत्यू होतो – एकतर खून केला जातो किंवा आत्महत्या करण्यास भाग पाडले जाते.
हुंडाबंदीचा कायदा अस्तित्वात येऊन अनेक दशके लोटली तरी लग्नातली देणी घेणी मात्र वाढताहेत. याचं कारण म्हणजे कायद्याच्या मर्यादा आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे कायद्याला बगल देऊन ‘वरदक्षिणे’ च्या नावाखाली स्वतःच्या मागण्यांची पूर्तता करुन घेण्याची समाजाची मानसिकता. ही लोभी मानसिकता तयार करण्यात मुख्यमंत्र्यांसारखे जबाबदार समजले जाणारे नेतृत्वही मागे नाही. आपल्या मतदारांना खूष करण्यासाठी मंत्री, मुख्यमंत्री सततच चमकदार विधाने ऐकवत असतात. पण याचा काय परिणाम होतो हेही त्यांना समजायला हवे. गुजरातचे मुख्यमंत्री जेव्हा नरेंद्र मोदी होते तेव्हा त्यांनी एका शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना शेतकरीबंधूंना सुचवले की, ‘तुमच्या मुलींच्या लग्नात तुम्ही हुंडामध्ये ठिबक जलसिंचनाची सामुग्री द्या.’ हुंड्यासारख्या कुप्रथेला आळा घालण्याचे उपाय योजायचे की त्यासाठी नवनवीन गोष्टींच्या मागण्या सुचवायच्या. विकासाचा चढता आलेख दाखवणाऱ्या गुजरातेत मुलींचे लोकसंख्येतील प्रमाण दर जनगणनेत धटंताना दिसत आहे. ते हुंड्याच्या वाढत्या खर्चापोटी मुली नकोशा होत असल्यामुळेच. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने या विधानाचा निषेध केला होता.
भारतात 1961 मध्ये हुंडा प्रथा रद्द करण्यात आली. या प्रथा रुढ होण्याचे कारण म्हणजे पुरुषप्रधान समाज हा स्त्रियांपेक्षा पुरुषांना महत्त्व देतो. भारतात अनेक समाजात मुलांकडे रेट कार्ड आहे. मुलाची ही अनधिकृत किंमत आहे. आणि ती किंमत एका मुलाच्या लग्नात किती हुंडा मिळेल त्यावरून मोजली जाते. भारतीय समाजातील स्त्री-पुरुष असमानतेचा गड आहे. वधूच्या कुटुंबाला मुलीची काळजी घेण्यास ‘संमत’ झालेल्या पुरुषाच्या हुंड्याची मागणी पूर्ण करणे बंधनकारक वाटते. दुसरे प्रमुख कारण म्हणजे भारतीय संस्कृतीत हुंडा पद्धत इतकी खोलवर रुजलेली आहे की ती सामान्य आणि अपरिवर्तनीय म्हणून पाहिली जाते. आजही जर लोकांना हुंडा हा गुन्हा आहे याची आठवण करून दिली तर ते एक पर्यायी वास्तव म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात जे जुन्या चालीरीती बदलू शकत नाहीत. अनेक सुशिक्षित कुटुंबे स्वेच्छेने किंवा अनिच्छेने रीतिरिवाजांचे पालन न केल्याबद्दल टीका होऊ नये म्हणून ते पाळतात. शेवटी परंपरा बदलण्याचे धाडस कोण करेल ? तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे विवाहसंस्थेचे वर्चस्व. भारतीय कुटुंबात स्त्रीच्या लग्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर एखाद्या स्त्रीच्या लग्नाला तिच्या सुरक्षित वैवाहिक जीवनाच्या बदल्यात हुंडा द्यावा लागतो, जे जगातील एक आव्हान आहे जे स्त्रियांसाठी असुरक्षित आणि भेदभावपूर्ण आहे, तर तो कधीही गुन्हा म्हणून पाहिला जात नाही.
आजच्या शिक्षित मुली मुलांनी हुंडा विषयी जनजागृती मोठ्या प्रमाणात करावी. आज काही तरुण यात सक्रिय आहेत मात्र या लढ्यात तरुणांची संख्या आणि त्यांची सक्रियता आणखी व्यापक होत जावी आणि ती तरुणांनी करावी.आणि भारतीय संस्कृतीला लागलेला काळा डाग आजच्या या नवपिढीने पुसावा आणि येत्या काळात हुंडाबळी सारख्या जाचक प्रथेला समूळ नष्ट करावे. हुंडामुक्त चा नारा देऊन हुंडा विरोधी जबाबदारी सामाजिक जाणिवेतू प्रत्येक तरुणाने यशस्वीपणे पूर्ण करावी. तरच उद्याचा भारत हा “हुंडामुक्त” भारत होऊ शकतो …..
संसाररूपी रथाचा गाडा चालवण्याकरीता स्री आणि पुरुष हे दोन्ही चाके महत्त्वाचे आहेत. त्यांना समानता असायला हवी तरच देश यशाचे शिखर गाठेल. आणि त्याकरिता आपण या आंतरराष्ट्रीय महिला दिनी संकल्प करुया की या संसाराच्या जननीला वाईट प्रथा परंपरातून मुक्त करुया….
माणुस म्हणून आदर पाहिजे
सामान नको, सन्मान पाहिजे
हुंड्याची मनमानी
म्हणजे बाईची मानहानी
हुंडा प्रथा अपराध आहे
मानवी मुल्यांचा ह्रास आहे.
– लेखन : रितिक अनिल बलविर
2nd year in IT इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
नागपूर
२) समाज काय म्हणेल ?
माझ्या मतानुसार आजच्या घडामोडी पाहता आज ही काही ठिकाणी महिलांवर अत्याचार होतात. मग ते मानसिक असो त्रासदायक किंवा शारीरिक. काही ठिकाणी तिच्या उदरी मुलगी जन्माला आली म्हणून तर …काही ठिकाणी माहेरून पैसे, ऐवज आणला नाही म्हणून. हुंडा देणे अन् घेणे हा गुन्हा आहे हे ठाऊक असूनही काही ठिकाणी हुंडा देणे घेणे हे गैर प्रकार सुरूच आहेत. हुंडा प्रतिबंधक कायदा लागू असला तरी हुंडा देणे घेणे ही दृष्ट प्रथा आजही सुरूच आहे .आणि त्याचा त्रास महिलांना सोसावा लागतो हिच सत्य परिस्थिती आहे. समाज काय म्हणेल ह्या भितीने कुणीही तक्रार करत नाही. सारं काही निमूट पणे सोसत आयुष्य जगत असतात. अथवा मनाचे मानसिक खच्चीकरण होऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. स्वताच अस्तित्व संपवून टाकतात किंवा छळ, कपटाने त्यांचा मृत्यू होतो. म्हणून मला असे वाटते महिला आज ही हुंड्यातून मुक्त झाली नाही.
माझ्या विचारा नुसार प्रत्येक मुलीने शिक्षण घेतले पाहिजे. आणि स्वावलंबी बनले पाहीजे. मी प्रत्येक पालक वर्गाला सांगू इच्छिते मुलींना शिकवून सक्षम बनवले पाहिजे जेणे करून त्यांना हि आपल्या अधिकाराची जाणीव होईल त्यांनाही बोलता येईल, आलेल्या संकटाला प्रतिउत्तर देण्याची उर्जा त्यांच्यात ही जागृत होईल. शिक्षणामुळे तिच्याही विचारांना चालना मिळेल. तिच्या इच्छा ,आकांक्षा तिला ही पूर्ण करता येतील. प्रत्येक स्त्री ला मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे .म्हणून प्रत्येक मुलीला शिकवा अन् शिकू द्या.
माझ्या अनुभवाप्रमाणे आज ही काही ठिकाणी महिला चार भिंतीत तिची इच्छा नसताना ही मन मारून जगते. तीच्या भावनांची घुसमट तीच्या मनात जीवाच्या आकांताने टाहो फोडत असते. माझ्या स्वरचित मुक्तता ह्या कवितेमध्ये मी तीच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
मुक्तता
पिंजर्यात अडकले मी
मुक्त कधी होईन का ?
त्या पक्षासारखे नभात
कधी उडू शकेन का ?
कधी वाटतं मनातलं
सारं काही सांगाव
पण.. या धावपळीच्या जीवनात
कुणीतरी ऐकावं
अश्रुंनी तुडूंब भरले
डोळे माझे …….
ओठांवर हसू
कधी येईल का ?
स्वप्नात पाहिलेलं घरकुल
मला कधी मिळेल का ?
पिंजर्यात अडकले मी
मुक्त कधी होईन का ?
मुक्त कधी होईन का ?
हुंड्यातून तर महिला मुक्त झाली च पाहीजे. शिवाय तिच्यातली प्रतिभा ही समाजापुढे आली पाहीजे तिचा आदर सन्मान तिला मिळायला हवा म्हणून प्रत्येक नागरिकाने ही सुर्वात आपल्या घरातून केली पाहिजे असे मला वाटते 🙏🏻
✍🏻लेखन : सौ निलम सदानंद पाटील वसई, पालघर
३) नव्याचे नऊ दिवस !
“आम्हाला मुलगी पसंत आहे. लाखात एक आहे मुलगी. सुशिक्षित, मनमिळाऊ स्वभावाची, हसरा चेहरा असणारी. जशी हवी होती न तशीच आहे बघा. आमच्या घराला घरपण आणणारी आहे. आमच्या घरात देवाच्या कृपेने सर्व काही आहे. कमी होती ती मुलीचीच. आता ती पण पूर्ण झाली. सूनेच्या रुपात मुलगी मिळाली आम्हाला.”
“बरं आता द्याय घ्यायचे बोला भाऊ. म्हणजे मी स्पष्टच बोलतो. हुंडा किती आणि कसा द्यायचा हे जरा समजले तर बरे होईल.”
“छे…छे….! हुंडा बिंडा आम्ही काही घेणार नाही. नारळ आणि मुलगी बस.”
हा संवाद आजकाल जवळजवळ सर्व लग्न जमलेल्या वधू मुलीच्या घरी ऐकायला मिळतो.
वर पक्षाकडून कशाचीही मागणी नाही झाली म्हणून वधूच्या घरात आनंद होतो. पण तरीदेखील ते आपल्या ऐपतीप्रमाणे लग्नात खर्च करुन दागदागिने घालून मुलांकडच्यांना मानसन्मान देऊन मुलीचे लग्न थाटामाटात करुन देतात.
मुलगी माहेर सोडून सासरचा उंबरठा ओलांडून येते. तिने आधीच आपल्या भावी संसाराची स्वप्ने रंगवलेली असतात. तिला आपल्या मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून ती खूप आनंदात असते. पण म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस. भांड्याला भांडं लागतेच. मग ती लुटुपुटुची भांडणे कधी धगधगत्या आगीमध्ये बदलून जाईल याची शाश्वती नसते.
तेव्हा उध्दार होतो तिच्या माहेरच्यांचा. तुझ्या पेक्षा चांगल्या पैसेवाल्यांची मुलगीचे स्थळ आले होते लेकाला पण त्याला तुझ्यात कोणती अप्सरा दिसली कोणास ठाऊक. काय जादू केलीस तू. आणि तुला इथे घेऊन आलो आम्ही. ही टोचणारी वाक्ये तिला ऐकावी लागतात.
जर ती मुलगी नोकरी करणारी असेल तर वेगळीच तिची दशा होते. घर आणि नोकरी यामध्ये तिची दमणूक होते. तिच्या पगाराची वाटणी. समजा तिने आपल्या पगारातील थोडी रक्कम तिच्या आईबाबांना दिली तर काय होईल. पण ते कोणाला आवडणार नाही. यावरून घरात भांडणे.
माझ्या मते जर मुलगा आपला पगार आपल्या आईबाबांना देतो तसेच लग्न झालेल्या कमावत्या मुलीने आपल्या पगारातील थोडी रक्कम आपल्या आईबाबांना दिली तर काही बिघडत नाही.
हुंड्यातून महिला मुक्ती अजूनही झालेली नाही. हुंडा फक्त पैसाच नाही. आता हुंड्याचे स्वरूप बदललेले आहे. मुलगी शिकलेली असली पाहिजे त्याचबरोबर ती नोकरी करणारी असावी. तिच्या कमाईवर हक्क सासरच्या लोकांचाच असावा. हा ही एकप्रकारे हुंडाच आहे न.
महिला मुक्ती झाली असे मला वाटत नाही. कारण गोड बोलून पाठीवर वार करणारे खूप आहेत. पण ते वार सहन करणारी शक्ती फक्त महिलेला ईश्वराने दिलेली आहे. ती माता, बहिण पत्नी आणि आजी या रुपात सदैव हसऱ्या चेहऱ्याने सर्व मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जात होती, जात आहे आणि जात राहणार.
– लेखन : परवीन कौसर. बेंगलोर
४) हुंड्याची नवंनवीन रूपे
हुंड्यातून आजची स्त्री मुक्त झाली का ? हा प्रश्न अत्यंत विचार करायला लावणारा आहे. कारण आपण वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडिया वर अनेक उदाहरणे पाहत असतो वाचत असतो ; कि माहेरहून अमुक एका कामासाठी पैसे मागावं ! वगैरे वगैरे. आणि त्याची पूर्तता न झाल्यास त्या सुनेचा मानसिक छळ, मारहाण इतकेच नव्हे तर प्राणही घेतला जातो, किंवा ती स्वतः जाचाला कंटाळून स्वतःच आत्महत्या करते.
जी लग्ने योगायोगाने सहज जमतात तिथे वीस तीस तोळे सोने ठराविक रक्कम मानपान देऊन लग्ने होताना दिसतात, ज्यांची ऐपत हौस आहे ते खुशीखुशीने हुंडा देताना दिसतात. मध्यम वर्गीयांची लेक मोठ्या श्रीमंतांच्या घरात आता सून म्हणून सहज जाऊ शकते, कारण मुलींची संख्याच कमी झाल्याने साधन लोक पूर्वी सारखे तोलामोलाचे पाहुणे पाहत नाही.
शिक्षणामुळे, अवती भवतीच्या वातावरणामुळे एखादी मुलगी सासरी “हम भी कुछ कम नही” हे दाखवण्याच्या प्रयत्नांत असते. करोनाचे जसे नवनवीन प्रकार गोंडस नावे अवतरले अवतरत आहेत तसे हुंड्याचेही नवं नवीन रूपे आपल्या समोर येत आहेत. उदाहरणार्थ मुलीचे डोहाळजेवेन बाळंतपण (कि जे सीझर सारखे प्रॉब्लेम आल्यास त्याचा खर्च लाख पर्यंत येऊ शकतो) बाळाचा प्रॉब्लेम काही कारणाने बाळास विशेष ट्रीटमेंट द्यावी लागली त्याचा खर्च अफाट येऊ शकतो. त्या नंतरचे बारसे त्याचे मानपान याचा खर्च किती येईल याचा विचार केला जातो का ? हे सर्व सुनेच्या माहेरच्यांनी करावे हे गृहीत धरले जाते. या वेळी मुलीच्या बापाचा आर्थिक अंदाज कोणी करत नाहि पापं हुंड्याचाच प्रकार नाहि का ?
आणखी एक दुसरी बाजू म्हणजे आता मुली शिकल्या विविध क्षेत्रात त्या चमकतात मिळवत्या आहेत स्वतः च्या पायावर उभ्या आहेत हि आनंदाची गोष्ट आहे . प्रत्येक समाजात मुलीची संख्या कमी झाल्याने लग्न जमवतो वेळी हुंड्याची प्रथा गौण मनाली जाते. हुंड्यासाठी सहसा लग्न मोडली जात नाहीत. पण लग्नानंतरच्या कार्यक्रमांची प्रथा परंपरा, हौसेचे विविध प्रसंगी हा हुंड्याचा नाग काही ठिकाणी फणा काढताना फुत्कारताना दिसतोच !
कोरोनाने आता प्रत्येक आर्थिक क्षेत्र आर्थिक संकटात दिसत आहे. सर्वात जास्त फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. कोरोनाचे लॉक डाउन माल परगावी नेता येत नाही म्हणून शेतमालाची नास धूस योग्य भाव नाही. त्यात निसर्गाची अवकृपा अतिवृष्टी, बर्फवृष्टी, वादळे, खराब हवामानामुळे पिकांवर रोग यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. आर्थिक संकटाच्या दरीत पडल्याने जवळ असेल ती पुंजी वापरावी लागतेय ! छोटया छोट्या व्यापाऱ्यांची हि तीच गत ! हे वरपिते काकुळतीने म्हणताहेत कुणी लेक देत का लेक ! मी तुमच्या लेकीला तळहाताच्या फोडागत संभाळील. मी स्वतः दोन्ही अंगाने खर्च करून लग्न करून घेतो मला हुंडा नको ! हुंडा नको ! हुंडा नको लेक द्या !
तर हुंड्याच्या बाबतीत असे परस्पर विरोधीचीत्र दिसतंय ते बदलले पाहिजे . आपल्या रूढी, मान सन्मान याची अपेक्षा करताना समोरच्याची, वधुपित्याची आर्थिक क्षमता हि लक्षात घेऊन त्याचा माणुसकीने सहानुभूतीपूर्वक विचार केला तर या हुंड्याच्या नवीन रूपास आपोआप आळा बसून प्रत्येक क्षण फुलतील प्रत्येकक्षण हसतील !! आणि संसारात नव्याने पडलेली, आईपणाची सुखद अनुभव घेणारी नववधू, नवमात निश्चितच म्हणेल फुलले रे क्षण माझे फुलले रे !!
हसले रे क्षण माझे हसले !!!
– लेखिका : अलका रामचंद्र मोहोळकर
५) स्त्रिच स्त्रिची शत्रू
हुंडाबळी विषया वर थोड माझं मतं.
श्रीमंत माहेरची सासुबाई म्हणते माझ्या माहेरचं तोलामोलाच माझ्या बाबानी मला कन्यादानात शंभर तोळे सोनं दिल होतं.
शब्दाशब्दात अभिमान डोकवतं असतो.
सुन म्हणते माझ्या बाबाची ऐपत नसताही कर्ज काढून
तुम्ही मागीतल तेव्हढे सोन दिलं अजून बाबा कर्ज फेडत आहेत.
मुलाला किती श्रीमंताची स्थळ सांगून आली होती
पण तु त्याला भूरळ घातली.
मग काय ?
घरातली शांतता संपली.
काळ बदलला. हुंडाबंदी कायदा आला.
किती जणानी तो पाळला ?
जीव मुठीत घेऊन जगणारी सून रणरागिणी बनली
सासू बिचारी नखं काढलेली वाघीन बनली
स्त्रिजन्मा अशी तुझी कहाणी झाली
मनासारखं स्थळ मुलीला मिळालं.
कायद्याने हुंडाबंदी झाली.
मग श्रीमंत बापानं चांदीच्या ताटात सुंदर भरतकाम केलेला रूमाल झाकुन वर दक्षणा दिली.
हुंड्याचं नाव बद्ललं.
परत सासू चारचौघात सांगु लागली खुप हो वरदक्षिणा दिली.
गरिब घरची मुलगी हिरमुसली.
हुंडाबंदी झाली. पण पुनः शांती भंग पावली.
सुन सासरच्यांना कायद्याची भाषा बोलु लागली.
जीव देण्याची भाषा बोलू लागली.
परिणाम काय झाला ?
पुनः शांती भंग पावली.
मुलीची लग्न लाबंली.
मुलं मुलीपळून जाऊ लागली.
आईबाबा मनात झुरू लागली.
शाहाणे असाल तर प्रेम प्रकरण असेल तर तुम्ही मुलामुलींची नीट माहिती मिळवा.
तुम्हला पटले तरं स्वत: पुढाकार घेऊन लग्न लावून द्यावे. योग्य ती हौसमौज करून झेपेल तेवढा खर्च करा. मुलीसाठी तिच्या नावावर तिच्या भविष्याची सोय करा.
परिस्तिती नसेल तर चार नातेवाईक घेऊन लग्न रजिस्टर पध्दतीने करुन द्या. तरंच आत्महतेचं प्रमाण कमी होईल .
जाळपोळ बंद होईल आणि हे दुष्ट चक्र बंद होईल.
जीवन हा एक संघर्ष आहे. थोडसं मिळविण्यासाठी बरचंस सोडावं लागतं.
खोटी प्रतिष्ठा मान, अभिमान म्हणून जावई विकत घेऊ नका.
मुलींनो स्वत:ला कमी लेखू नका. दिसू दे जगाला हमभी कुछ कम नही.
नाकापेक्षा मोती जड घेऊ नका.
शिका, शिकत राहा.
परिस्थिति जशी साथ देईल तसं कोणत्याहि क्षेत्रात पुढे या.
नकळत कोणचं मनं दुखावले गेले असेल तर माफी असावी.
– लेखन : सुरेखा तिवाटणे. पुणे
६) हवा सकारात्मक बदल
यत्र नार्यस्तु पुज्यन्ते
रमन्ते तत्र देवता:
भारतीय संस्कृती आणि शास्त्रांमध्ये स्त्रीला अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे. वरील श्लोक आणि त्याचा अर्थ असा की स्त्रीचं स्थान समाजात पूजनीय आहे. तिचा योग्य तो सन्मान आणि आदर केला पाहिजे. जिथं स्त्रियांचा आदर आणि सन्मान केला जात नाही तिथं तुम्ही केलेली सर्व चांगली कर्मे निष्फळ ठरतात. परंतु आजच्या तारखेत शास्त्र आणि संस्कृती याचा प्रत्यय जोडून पाहण्याचा प्रयत्न केला तर दिसुन येईल की हल्ली त्याचंच हनन होतांना दिसतंय.
सन १९६१ मध्ये भारतीय संविधानाने हुंडा प्रतिबंधक कायदा लागू केला. त्याला “हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१” असंही म्हटलं जातं. जम्मू-काश्मीर वगळता संपूर्ण भारतात तो लागू झाला.
परिस्थिती पाहता कायदा लागू होऊन बरीच वर्षे झाली परंतु त्यात असलेल्या काही त्रुटी आणि त्याची योग्य ती अंमलबजावणी झाली नसल्याचं स्पष्ट दिसून येतं. आजही गावा-गल्लीतून, मोठ-मोठ्या शहरांमध्ये हुंडा ही प्रथा सुरू असल्याचं चित्रं दिसतं. कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित करण्याआधी देशातील नागरिक आणि त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उभा राहतो. उच्च विद्याविभूषित असो वा खेड्या-पाड्यांत राहणारा सामान्य नागरिक दोघंही हुंडा देण्याच्या प्रथेबद्दल तटस्थ भूमिका घेतांना दिसतात. ‘हुंडा’ ही फार पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे आणि ती आपल्याला देणे लागते. अश्या मानसिकतेच्या गर्तेतून आजही देश सावरलेला नाही.
हुंडा म्हणजे “लग्नात एका पक्षाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दुसऱ्या पक्षाला दिली जाणारी किंवा देण्याची कबुली दिलेली कोणतीही मालमत्ता अगर रक्कम ‘हुंडा’ धरली जाते”. लग्न म्हणजे पवित्र बंधन असा उल्लेख केला जातो. आणि त्या पवित्र कार्यासाठी हुंडा देऊन आपला समाज किती पावित्र्य राखतो याचा विचार झाला पाहिजे. शिकून मोठी झालेली मोठ्या पदावर काम करणारी लग्नाला आलेली पोरं काही प्रमाणात विवेकी असली तरी कुटुंब व नातेवाईकांच्या सल्ला मसलतीत बंड करण्याचं शल्य त्यांच्यात आलेलं नाही.
हुंडा प्रथेला आळा बसावा म्हणून शासनाने स्थानिक स्तरावर भरपूर प्रयत्न केल्याचे दिसून येते. काही प्रमाणात प्रयत्नांना यश आलेलं असलं तरी हवा तसा सकारात्मक आकडा अजूनही समोर आलेला नाही. शहरातल्या तथा स्थानिक स्तरावरच्या प्रत्येक पोलीस स्टेशनला हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याची नियुक्ती शासनामार्फत केली जाते. हुंडाबंदी कायद्या अंतर्गत जिल्हा तसेच तालुका स्तरीय समित्यांची स्थापना केली गेली. फिर्यादी आपली कैफियत मांडू शकतो. त्याला योग्य तो न्याय मिळवून देण्याचं काम समिती करत असते. या कायद्याखाली पडणारा कोणताही गुन्हा दखलपात्र नाही, जामिनपात्र आहे. त्यात आरोपी व फिर्यादीला तडजोड करण्याचा अधिकार नाही. कायद्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यास “सहा महिने कैद आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा आहे”.
भारतीय इतिहासात बऱ्याच प्रथांचा उल्लेख आढळतो. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर काही दुष्ट प्रथांवर बंदी घालण्यात आली. प्रथा सामाजिक आणि धार्मिक भावनेतून उदयास येते. कोणत्याही प्रथेचं समाजात ‘डॉमिनन्स’ होणं हे त्या समाजाच्या मानसिक आजारपणाचं लक्षण आहे. समाजाच्या भितीपोटी एक विशिष्ट वर्ग ऐपत नसतांना देखील त्याचं पालन करतांना दिसतो. आधुनिक विज्ञान युगात वावरणाऱ्या माणसांना अजूनही सुपीक विचारांची शेती फुलवता आलेली नाही. एकीकडे महिला सबलीकरण, महिला एकीकरण, महिलांना आरक्षण व योग्य तो सन्मान मिळत असतांना मोठ-मोठ्या पदांवर जाण्याचे अधिकार असतांना, आपल्या कुटुंबाने हुंडा द्यावा ? की नाही. यावर आजही त्यांना ठामपणे उभं राहता येत नाही आणि हीच मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
शिक्षण घेऊन डिग्री मिळवता अली म्हणजे तुम्ही शिक्षित झालात असं नाही. समाजाच्या उत्थानासाठी, देशाच्या कल्याणासाठी योगदान देणं आणि सुरू असलेल्या दुष्ट प्रथा, रूढी परंपरा यांच्यावर प्रश्न उपस्थित करून आवाज उठवता येणं त्याच्या विरोधात जाऊन बोलता येणं म्हणजेचं शिक्षित असल्याचं लक्षण आहे. “हुंडा ही प्रथा नसून मनाने समाजाच्या भितीपोटी घेतलेला दुबळा निर्णय आहे” यावर सगळ्यांनी एकत्र येऊन क्रांती करण्याची गरज नाही. जिथं ह्या प्रथेला खत पाणी घातलं जात असेल तिथंच त्याला जागेवर आळा घालण्याची हिंमत ठेवा. कायदा आपल्यासाठी असला तरी सर्वप्रथम कुकर्माच्या विरोधात जाऊन बोलणं हीच परिवर्तनाची खरी निशाणी आहे. तुमचं एक सकारात्मक पाऊल उद्याला प्रश्न उपस्थित होऊ देणार नाही….
– लेखक : अविनाश पाटील
मु.पो- अमळनेर, जि-जळगांव, ह.मु- पुणे
७) मुलींची संख्या घटतेय !
महिला दिनाच्या निमित्ताने हुंडा मुक्त महिला हा विषय खरोखरच योग्यच निवडला आहे.
मी कोकणातला रायगड मधला आहे. मी अभ्यासलेल्या माहिती प्रमाणे पुर्वी कोकणात आमच्या इकडे नवरदेवाला वधू घरी जावे लागायचे. आपल्या ऐपतीप्रमाणे बैलगाडीतुन अथवा मेण्यातून स्वखर्चाने वधूला वाजत गाजत आणले जायचे. हळूहळू हि पद्धत बदलली व मुलीचे लग्न मुलीच्याच दारात लावण्याची प्रथा प्रचलीत झाली. परंतू एवढे असताना आम्हाला हुंडा हा शब्द मुळात ऐकीवात नव्हता. परंतू काळपरत्वे देशावरती (काही ठिकाणी देश तर काही ठिकाणी घाटावर हा शब्द वापरतात) सोयर संबध जुळले गेले अन् हुंडा पद्धत माहीत झाली. त्या मधील मला कळलेला प्रकार म्हणजे नवऱ्या मुलाच्या मागण्या अगदी अंतःवस्त्र ते गादी बेड पासून गाड्यांपर्यंत. त्यात परत हातात ब्रेसलेट,आंगठी चैन आलीच. यातील एक जरी वस्तु चुकून द्यायची राहिली कि लग्ना अगोदरच पाहूणे मंडळीच्यां व नवरदेवाच्या रुद्र अवताराला सामोरे जावे लागायचे.
मागणी पूर्ण होऊन लग्न झाल्यावर देखील कोणत्याही त्रासाला नवरीला सामोरे जावे लागले हे ऐकिवात नाही. किंबहुना मुलगी घरी बोलत नसावी. असो… परंतू मुलींचा सुखी संसार पाहायला मात्र मिळत होता.
आता हे चित्र पालटलय अस मला तरी वाटतय. कारण ही तसेच आहे. आपल्याला वंशाला मुलगाच हवाय या भावनेमुळे व अट्टाहासामुळे मुलींच्या संख्येत घट झाली. परिणामी वरासाठी वधू मिळणे मुश्कील झाले. त्याचे परिणाम विवाह परंपरेवर होणार हे निश्चित होते.
मागील महिन्यातच घेतलेला अनुभव. येथे कोणाचे नाव घेत नाही.
कोकणातील आमच्या मुलीला पहायला स्थळ आले होते. मुलगा मोठ्या कंपनी मध्ये मॕनेजर पोस्टला मुलगी सुद्धा उच्च शिक्षित होती. देण्याघेण्याचा विषय येताच वधू कडील मंडळीनी आम्ही मुलगी आणि नारळ देऊ. त्या व्यतिरिक्त काहीही मागू नका.आणि आम्ही देणारही नाही हे बोल ऐकवताच देशावरून आलेल्या मंडळींनी ते मान्य सुद्धा केले.
एवढ्यावर हे प्रकरण थांबले नाही. मुलीच्या इच्छेखातर लग्न सुद्धा कोकणातच धरले गेले.
हे सर्व सांगायचे तात्पर्य हेच आहे आता मुलींची संख्या दिवसें दिवस कमी होत असल्याने मुलींच्या आणि तिच्या कुटुंबाच्या विचारांचा आदर करून चालावे लागणार हे निच़्छित. भविष्यात अशीही वेळ येणार आहे की, मुलीच्या माता पित्यांना मुलाकडून हुंडा द्यावा लागेल आणि काही वधू पित्या कढील मंडळी घेतीलही यात नवल नसावे. कारण आत्ता मुली मिळणे मुश्कील झाले आहे . त्यामुळे इतर पालक वर्गाचा हक्क आणि हट्ट म्हणून का होईना वराकडील मंडळी कडून हुंडा आता मागयला सुरूवात करतील. किंबहुना केली असेल….”काळानूरुप बदल हा सृष्टीचा नियम आहे” ….हा
विरोधाभासातील बदल होणार अशी वस्तुस्थिती निर्माण होताना दिसतेय. तसे दिवस बघायला सुद्धा मिळतील यात शंका नसावी.
✍️..गणेश सदाशिव साळवी.
मु.पो. इंदापूर(तळाशेत) ता.माणगांव. जि. रायगड
८) मांडवशोभा
हुंडा म्हणजे काय ? सर्वप्रथम हे जाणून घेऊया. हुंडा म्हणजे वधू पक्षाने वर पक्षास अथवा वर पक्षाकडून वधूपक्षास देण्यात येणारी भेट होय. ही प्रथा फार पूर्वीपासून प्रचलित होती. मग यामध्ये मुली सोबत (वधू सोबत) वर पक्षास रोख रक्कम अथवा वस्तू रुपात भेट दिली जात असे. वधू पक्षाकडील मंडळींनी काय -काय वस्तू दिल्या आहेत त्यावरून त्या मंडळींचा मानसन्मान वराकडील मंडळींकडून केला जाई. काही ठिकाणी तर वधूपक्षास हुंडा देऊन विवाह प्रथा पार पडल्याचे पहावयास मिळते.
हुंडा प्रथा……. पाहायला गेलं तर तशी जाचकचं पूर्वी लग्न कार्यामध्ये पहावयास मिळायचं की कार्यक्रमामध्ये नवरामुलगा एखाद्या महागड्या वस्तू साठी अडून बसायचा. मग वधू पक्षाकडील मंडळी विशेषतः मुलीचे आई-बाबा लोकलज्जेस्तव, भीतीपोटी अथवा आपल्या मुलीस बट्टा लागू नये म्हणून उधार उसनवारी करून वराकडील मंडळींच्या मागण्या पूर्ण करत. परंतु या मागण्या काही शेवटपर्यंत थांबत नसत. आणि आपल्या मुलीला सासरी त्रास होऊ नये, तिचा संसार सुखाने व्हावा म्हणून मुलीचे आई-वडील प्रसंगी ऋण काढून या जाचक गोष्टींना बळी पडत. मुलगीही सतत आईबाबांना त्रास देण्यापेक्षा या जाचकतेला बळी पडून स्वतःचे आयुष्य पणाला लावत असे.
हळूहळू या गोष्टींची अराजकता वाढू लागली. व मुली हुंडाबळी पडून आत्महत्येस प्रवृत्त होऊ लागल्या .अशा घटना सर्रास घडू लागल्याने 1961 साली हुंडा प्रतिबंधक कायदा भारतात लागू करण्यात आला. हुंडा देणाऱ्यास व घेणाऱ्यास दोघांनाही शिक्षा ठोठावण्यात येत असे. परंतु आजही ही प्रथा कमी झाल्याचे दिसून येत नाही .जगभर शिक्षणाचा प्रसार होऊनही प्रथा बंद झाली नाही. शिक्षणामुळे परिवर्तन होते असे म्हणतात. परंतु अजूनही वैचारिक परिवर्तनशीलता दिसून येत नाही.
हुंडा ही प्रथा मात्र समूळ नष्ट झालीच नाही .हुंडा या शब्दाऐवजी “मांडवशोभा” हा शब्द प्रचलित झाला. मुलाकडील मंडळी जर मुलगा उच्चशिक्षित असेल तर वधू पक्षाकडून अशा स्वरूपात मागणी करतात की, आम्हाला हुंडा नको ,आम्ही सुशिक्षित आहोत ,आमच्या काहीही अपेक्षा नाहीत फक्त मुलगा उच्चशिक्षित आहे. परदेशात राहतो .तुमची मुलगी आता त्याच्यासोबत परदेशात राहणार चार लोकांमध्ये हसं होण्यापेक्षा मांडवशोभा म्हणून लग्न कसं एकदम थाटामाटात लावून द्या म्हणजे झालं. म्हणजे अप्रत्यक्षपणे हुंडाचं मागितला जातो. बिचारे मुलीचे आई -बाबा वर पक्षाच्या तोला मोलाने इकडून -तिकडून पैशांची जुळवणी करतात. का, तर मुलीला उच्चशिक्षित, चांगल्या पगाराची नोकरी करणारा मुलगा मिळतोय तर करू काहीतरी तडजोड…
लग्नकार्य हा एक आनंदी सोहळा असतो वर पक्षाकडील मंडळी सगळं काही मनासारखं झालं म्हणून खुश असतात परंतु मुलीचे आई-बाबा चेहऱ्यावर वरवरचाआनंद दाखवत असतात. कारण मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज मुलीची पाठवणी केल्यानंतर त्या बिचाऱ्यांना फेडत बसावं लागतं .नुसतं आम्ही शिकलोय ,सुशिक्षित आहोत असं म्हणण्यात काही अर्थ नाही. तर… ते कृतीतून दाखवायचं असेल तर दोन्हीकडून सामंजस्य असायला हवे आणि ते जर असेल तर समाजात अशा हुंडाबळी सारख्या प्रसंगांना आपण रोखू शकतो. कारण या प्रथा माणसांनीच पाडलेल्या आहेत. त्या माणूसच रोखू शकतो.
आज प्रत्येक स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीनेच कामानिमित्त घराबाहेर पडते. घरातील व घराबाहेरील सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत असते. नाती -गोती सांभाळून ती घरासाठी झटत असते. विचार करा की, ती स्वतःचं गणगोत सोडून परक्या घरी आलेली असते. तेथील माणसांसाठी ती अहोरात्र झटत असते. मग हे सगळं ती आपलं म्हणून करत असेल तर निव्वळ हुंडा दिला नाही म्हणून तिचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याला सुशिक्षित म्हणावं का ?
या सगळ्यास प्रतिबंध करावयाचा असेल तर तरुण वर्गाने पुढाकार घेऊन जनजागृती करून या सर्व प्रथांवर निर्बंध घातले तरच हुंडा ही समस्या समूळ नष्ट होऊ शकते. आजची तरुण पिढी ही उच्चशिक्षित आहे. मग या मुला-मुलींनी पुढाकार घेऊन या जाचक प्रथेविरुद्ध आवाज उठवायला हवा. स्त्रीचे महत्व जाणुन तिला सन्माननीय वागणूक दिली. व पुरुषप्रधान संस्कृतीचे अवडंबर न माजवता स्त्री व पुरुष दोघेही समान आहेत. व ते परस्पर पूरक कसे आहेत याची समाजाला जाणीव झाली. तर आणि तरच हा भारत ‘हुंडा’ मुक्त होऊ शकतो.
चला तर मग…….
करू परिस्थितीशी
चार हात
मिळवू हुंडाबळी वर मात
उखडुनी जुन्या रूढी परंपरा
करू स्त्री सन्मानाचा नारा
करू स्त्री सन्मानाचा नारा…
– लेखन : सौ.वर्षा रूपेश रांगोळे
एम.ए.बी.एड सातारा.
९) हुंडा: महिलांच्या अस्तित्वाला धक्का
हुंडा ही लग्नाच्या वेळी मुलाकडून किंवा मुलींकडून विरुद्ध बाजूच्या कुटुंबाला देण्यात येणारी भेट आहे,ही भेट पैसे, मालमत्ता किंवा वस्तू, सोने स्वरुपात दिली जाते.
भारतात हुंडा घेणे आणि देणे या दोन्ही गोष्टी बेकायदेशीर आहे आणि कायद्याच्या तरतुदीनुसार यात संबंधित व्यक्तीसाठी शिक्षेची तरतूद आहे .हुंडा या शब्दाला उर्दूमध्ये “जहेज” असे म्हणतात. युरोप, आफ्रिका, भारत आणि जगाच्या अन्य भागात हुंडा पद्धतीचा मोठा इतिहास आहे.भारतात याला दहेज, हुंडा, वर दक्षिणा अशी विविध नावे आहेत.आजच्या आधुनिक काळात तर हा हुंडारुपी राक्षस सर्वत्र पसरलेला आहे. मागासलेल्या भारतीय समाजात हुंडा पद्धत आतापर्यंत विक्राळ रुप धारण करून आहे.
हुंडाबळी प्रकरणात दर एका तासाला एक महिला बळी जाते. २००७ते २०११ या काळात हुंडाबळी प्रकरणात अधिक वाढ झाली. राष्ट्रीय अपराध रिकाॅर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार भारतातील वेगवेगळ्या राज्यातून २०१२ ला सुमारे ८,२३३ महिलांना हुंडाबळीमुळे स्वतः चा जीव गमवावा लागला.
हुंडयासारखी सामाजिक समस्या स्वातंत्र्य काळानंतर आजही ज्वलंत आहे.आजही समाजातील काही लोक हुंड्यासाठी नववधूचा छळ, हुंडाबळीच्या घटना आजही घडतात.या पद्धतीचे निर्मूलन म्हणजे प्रचलित रूढी, परंपरा विरोधात जनजागृतीची ही एक प्रकारे लढाई आहे.
आपण नेहमी स्त्री-पुरुष समानतेचा नारा देतो परंतु हुंडा पद्धत ही त्याच्याशी विसंगत आहे, त्यातूनच स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीला समाजात असणारी किंमत याविषयी समाजाची मानसिकता कशाप्रकारे आहे हे समजून येते.हुंडा पद्धतीचे निर्मूलन म्हणजे समाजाची मानसिकता बदलण्याचे मोठे आवाहन सर्वांसमोर आहे, पण ही मानसिकता बदलण्याचे काम तरुण आणि युवा शक्ती नक्कीच करु शकते, त्यासाठी समाजामध्ये हुंडा विरोधीचे चर्चासत्र, चित्रस्पर्धा , व्यंग चित्रस्पर्धा, प्रदर्शने, आत्मकथन, लघुपट, स्लाईड शो, प्रश्नमंजुषा इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती घडवून आणता येईल.
हुंडा देणे व घेणे ही परंपरेने अस्तित्वात अनिष्ट प्रथा आहे. हुंडयामुळे छळ होऊन अनेक मुलींना वैवाहिक जीवनातून बाहेर पडावे लागत आहे, तसेच समाजात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, यामुळे कुटुंबाची सुद्धा दुर्दशा होणे, मुले मातेच्या प्रेमापासून पारखी होणे व वैवाहिक जीवनातून बाहेर पडलेल्या युवतींचा प्रश्नही निर्माण होतो, या सर्व समस्यांवर वचक बसावा म्हणून सरकारने हुंडा बंदी कायदा तयार केला आहे.
हुंडा मागणे हा कायद्याने गुन्हा आहे यासाठी ६ महिने पर्यतची कैद आणि १०,००० रु दंडाची शिक्षा आहे.जर एखाद्या मुलींच्या लग्नाच्या सात वर्षांच्या आत असामान्य परिस्थितीमध्ये ती मरण पावली तर हे सिद्ध केले जाते की मरणा अगोदर तिला हुंड्यासाठी प्रताडित केले जात होते,यात भारतीय दंड संहिताच्या कलम ३०४-ब च्या अंतर्गत मुलीचा पती आणि नातेवाईक यांना कमीत कमी सात वर्षे ते आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते.भारतीय दंडविधानाच्या ४९८अ कलमानुसार छळाची व्याख्या केली आहे.एखादी विवाहिता छळाला कंटाळून आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली असे सिद्ध झाल्यावर छळ करणाऱ्याला शिक्षा व दंड देण्याची तरतूद आहे,अशा अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी त्यात आहेत.
२५० वर्षांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी हुंडा बंदीचा कायदा केला होता, त्यांनी हुंडा देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला शिक्षा ठोठावल्याची नोंद इतिहासात आहे, याचा अर्थ हुंडा ही दुष्ट रुढी अनेक शतकांपासून जुनी परंपरा आहे.शिक्षणाचा प्रसार होऊन सुद्धा हुंडा पद्धत कमी झाली नाही.
१ जुलै १९६१ साली “हुंडा प्रतिबंधक कायदा” लागू झाला आणि त्या कायद्याअंतर्गत हुंडा घेणे आणि देणे हे कायद्याने गुन्हा आहे हे स्पष्ट मत मांडण्यात आले, तरीही काही ठिकाणी आजही हुंडा पद्धत सुरू आहे आणि विशेष करून सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोक सुद्धा यात सहभागी आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याची नियुक्ती, जिल्हा तसेच तालुकास्तरीय समित्यांची स्थापना या कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे. हुंडा पद्धतीमुळे सामाजिक वातावरणात समस्या निर्माण होत आहे. गरीब पालकांना त्यांच्या मुलीला कोणताही वर लग्नासाठी मिळत नाही, जो पैसे घेतल्याशिवाय आपल्या मुलीशी लग्न करेल, त्यांना आपल्या मुलीचे लग्न लावण्यासाठी कर्ज घ्यावे लागते.
तसेच काही पालकांकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे बालहत्येचे प्रमाण काही अंशी वाढले आहे, मुलगा हवा या हट्टापायी जाणुनबुजून अर्भक मुलींना ठार केले जाते.हुंडा प्रणाली हिंसाचार निर्माण करण्याचे काम करते.हुंडा प्रथा ही स्त्रियांवर अन्याय करणारी एक विनाशक प्रथा आहे,या प्रथेमुळे तिला समाजात समान दर्जा मिळत नाही . काही लोक लग्न करताना छुप्या आणि विविध प्रथेचा आधार घेऊन हुंडा पद्धतीला खतपाणी घालतात.
आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे त्यामुळे हुंडा पद्धतीच्या विळाख्यात तिला अडकवून तिची प्रगती रोखण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे.ही हुंडाप्रथा पूर्ण बंद झाली पाहिजे.आज हुंडा प्रतिबंधक कायदा लागू होऊन ६० वर्षे होऊनही किती तरी स्त्रिया या प्रथेला बळी पडतात हे स्वतः ला आधुनिक समजणाऱ्या देशाचा आणि समाजाचा पराभव आहे त्यामुळे स्त्रियांनी आता स्वतः पुढाकार घेऊन ही प्रथा पूर्णपणे बंद केली तर खऱ्या अर्थाने एकट्या स्त्रीचा नाही तर संपूर्ण समाज आणि राष्ट्राचा विकास होईल.
– लेखिका : अमिता कदम. ठाणे
१०) स्त्री बदलतेय !
जागतिक महिला दिननिमित्त मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.
खरं तर मी महिलांचा आदर करतो. पण कुठल्या ? जिच्याकडे ममता आहे. वात्सल्य आहे. मायेचा भांडार आहे. जिच्याकडे आप पर भाव नाही. कुठलाच स्वार्थ नाही. अशी स्त्री , तिचा मी आदर करतो. पूर्वी काहीही शिक्षण नसले तरी, वरील सर्व अलंकार ल्यालेली स्त्री, माता, भगिनी, पत्नीच्या रुपात बघायला मिळायची. आता ही आहेत पण बोटावर मोजण्या इतक्याच.
जसे शिक्षणाचे भूत सवार झाले महिलांनी एक एक अलंकार गहाण टाकायला सुरुवात केली. अन् महिलांचे कजाग, कुशाग्र व चंचल स्त्री मध्ये रूपांतर होऊ लागले.
शिक्षणा साठी गाव सोडून शहरात जातांना, आईच्या पोटात शिरून रडणारी मुलगी.. जेव्हा डिग्री घेऊन परत गावी येते, तेव्हा तिच्यात कमालीचा बदल झालेला आईला आढळून येतो.
“मी जराशी रागावले की, खाली मान घालून, पायाच्या अंगठ्याने जमिनीवर रेघा मारणारी माझी राणी.. हीच का?”
असा प्रश्न प्रत्येक आईला पडतो. अहो.. नुसते शहाणपणाचे दोन शब्द सांगायला गेले की, बोट वर करून….
“आई ss.. गप बस.. तुला काही कळत नाही .”
(तरीही…)
शिक्षण झाले.. नंतर करिअर.. चांगली नोकरी मिळाली.. आई वडिलांना पोरीच्या लग्नाचे डोहाळे लागले की, आई पोरीला फोनवर बोलते….
“राणी ss. बेटा…. चांगले चांगले स्थळ येता आहेत.. शेती वाडी.. चांगला व्यवसाय.. मोठा वाडा.. बैल गाड्या…..”
“काय? बैल गाड्या..? शेतकरी.. व्यापारी… असल्या…. फालतू पोरा बरोबर लग्न करायला का मी शिक्षण घेतले? महिन्याला लाख रूपये पगार घेते मी…. लग्नाचे बाबतीत.. तु नको काळजी करू…. घाई तर बिलकुल नको…”
“अरे s हो .. बेटा पण.. तिशी ओलांडली.. कधी लग्न करणार..?”
“तो.. माझा प्रश्न आहे.. बघेन मी.. ठेवते.”
आता मला तुम्हीच सांगा.. असल्या मुलींचा.. अविवाहित महिलांचा आदर करावा का..?
ज्यांना स्वतःचा सुध्दा विचार नाही.. त्या तारुण्याचा.. ईश्वराने दिलेल्या देणगीचा सुध्दा विचार नाही…. हे सुध्दा कळत नाही की.. या तरुणपणाला काल मर्यादा आहेत. का त्या सुध्दा पैसा देऊन वाढवून मिळतात? नाही ना ! कुठे गेला तो आई वडिलांचा आदर.. मान मर्यादा.. ?यांनाही पायदळी तुडवणाऱ्या महिलांचा आदर करावा का ?
अजूनही वेळ गेलेली नाही. वेळीच सावध व्हा. भान ठेऊन मानाचं स्थान मिळवा.
राहिला प्रश्न हुंडा… हा प्रकार जवळ जवळ संपुष्टात आला आहे. कितीतरी मुले विवाहासाठी रखडले आहेत. दोन्ही कडचा खर्च करण्यास तयार आहेत. तर हुंडा कोण मागणार.. हुंडा नको फक्त मुलगी द्या. आता काही जण प्रतिष्ठे पोटी देतात तो भाग निराळा.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लेख सादर केला. आदर व हार्दिक शुभेच्छा हक्काने देत आहे.. पण.. वाचा.. विचार करा.. आणि आचरण करा.
क्षमस्व..
– लेखक: सुभाष कासार. नवी मुंबई.
११) कायद्याचे पालन कोण करतो ?
हुंड्यातून महिला मुक्त झाली आहे का?
८ मार्च जागतिक महिला दिना निमित्त वरील विषयावर मी माझ्या ऐकण्यात आलेले अनुभव सांगत आहे.
हुंडा प्रतिबंधक कायदा होऊन ६० वर्षे होऊन गेलीत . सरकारने हा कायदा करून फारच महत्वाचे पाऊल उचलले आहे.
पण खरोखर ह्या कायद्याचे पालन कोण आणि किती प्रमाणात करत आहे, ही विचार करण्या सारखी गोष्ट आहे.
अगदी कालच माझ्या कामवाल्या बाईचा फोन आला.
” मॅडम ! आनंदाची बातमी सांगते तुम्हाला . माझ्या मुलीचे लग्न करून दिले . ”
माझ्या चौकस स्वभावानुसार मी अनेक प्रश्न विचारले .
जुजबी प्रश्न :
१) काय करतो जावई , शिक्षण, वय, नोकरी , शेती, घरदार इ.इ.
कामवाली : “सगळं छान आहे मॅडम ! ”
पुढे तीच खूप अभिमानाने सांगू लागली ,
” अडीच लाख हुंडा दिला मॅडम, साडेतीन तोळे सोन्याचे दागिने . चांदीच्या वस्तू , १० भारीच्या साडया, १० सलवार सूट , संसाराच्या भांडीकुंडी, कपाट, बेड , टेबल खुर्च्या — — – ”
ती अभिमानाने सांगत होती . माझी तर छातीच दडपून गेली .
” अगं ! इतके सगळे , लग्नखर्च , जेवणावळी ! वर हुंडा कशाला ? ”
“काय करणार मॅडम ? आमच्यात द्यावेच लागते . मुलीचे लग्न म्हणजे हुंडा , खर्च आलाच . ९ ते १० लाख रुपये ” .
मला भोवळ यायची वेळ आली .
” मग ! मुलाच्या लग्नात भरपाई केली कां ? ”
” नाही नाही मॅडम ! आम्ही हुंडा घेतला नाही . भावाचीच मुलगी सून करून आणली . भाऊ परिस्थितीने गरीब आहे . ”
तात्पर्य काय तर गरीब वर्गात हुंडा प्रकरण चालूच आहे . पैसे किंवा सोने किंवा मोटर सायकल इ. ची मागणी असतेच .
नुकतेच एक छान उदाहरण वाचले . ऐन लग्न लागण्या च्या वेळी ” नवरदेवाने ” मोटर सायकलची मागणी केली अन्यथा लग्नास तयार नाही . ”
ती बाणेदार वधू, मुंडावळ्या फेकून बोहल्यावरून खाली उतरली . ” मीच अशा मुलाशी लग्नाला तयार नाही . ”
त्याच मांडवात दुसरा तरुण विनाअट लग्नास तयार असलेला पुढे आला व त्यांचे लग्न पार पडले .
बहुतांश मोलकरणींच्या तोंडून पहिल्या प्रकारची उदाहरणे ऐकू येतात .
२ ) हुंडाबळी : लग्नाचे वेळी मागणी करायची नाही व नंतर माहेरून ” हे आण ! ते आण ! ” मागण्या सुरु होतात . नाहीतर मुलीला सोडून देण्याच्या धमक्या , मारहाण ! बिचारे आईवडील नाचक्की होण्याच्या भीतीने जमेल तेवढया मागण्या पूर्ण करतात . मुलीचे थोडक्यात लग्न झाल्याच्या आनंदावर केव्हाच विरजण पडलेले असते.
अगदी माझ्या शेजारच्याच बंगल्यात
राहणाऱ्या मोलकरणीच्या मुलीने तर आईवडलांची अगतिकता बघून आत्महत्या केली . ( आत्महत्या केली की सासरच्यांनी जाळून मारले ह्यावर अळीमिळी गुपचिळी ) वर मुलीचे चरित्र चांगले नव्हते हा आरोप ठेवला .
मन विदीर्ण झाले .
वरील दोन्ही उदाहरणे सत्य आहेत.
अशा अनेक घटना नित्य घडत असतात आपण वर्तमान पत्रात वाचतो, दूरदर्शनवर बघतो .
मध्यम वर्गीयांची कुतरओढ सांगायलाच नको.
श्रीमंतांचे वैभव प्रदर्शन वेगळेच !
मुलीच्या भारंभार हि -यांचे , सोन्याचे दागिने , महाग गाड्या इ.
वरवरून काही दिलेले दिसले नाही तरी ‘ आतून निरनिराळ्या नावांनी देणे चालूच असते . ‘ – हुंड्याचा वेगळा प्रकार !
विषयाच्या ओघात सांगायला अभिमान वाटतो की माझ्या कुटुंबात आजी, आई, काका , आत्या व मी स्वतः – सर्वांची लग्ने हुंडा किवा सोनेचांदी न घेता झाली .
मुख्य कारण सर्वांची प्रागतिक विचार सरणी, मुलगा – मुलगी समानता आणि शिक्षण .
माझ्या लग्नात तर,
“आम्ही काही घेणार नाही” अशी सासऱ्यांनी अटच घातली होती .
असो. मुद्दा असा की
आज महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी रोवलेली शिक्षणाची मुहूर्तमेढ किती दूरदर्शी होती हे लक्षात येते .
“मुलगी शिकली , राष्ट्राची प्रगती झाली ” .
दुसऱ्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे मुलींनी शिक्षण घेऊन स्वतःच्या अंगी निर्भीडपणा, बाणेदारपणा बाळगला पाहिजे . स्वकर्तृत्वावर स्वतःच्या पायांवर उभे राहण्याचा आत्मविश्वास मुलींच्या ठायी जागृत राहिला पाहिजे . ”
” हुंडा मागणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही ” असे तिने ठासून सांगितले तरच हुंडा विरोधी कायदा यशस्वी होईल .
आजच्या महिला दिनी सांगावेसे वाटते ,
मुलींनो शिक्षण सर्वात महत्वाचे . जिजाऊ बना , झाशीची राणी , अहिल्या बाई , आनंदी जोशी, इंदिरा गांधी बना . उद्योजिका बना , शास्त्रज्ञ , अंतराळवीर, वैमानिक बना . कोणतेही क्षेत्र असो .
शिक्षणाचा मजबूत पाया, आत्मविश्वास , धडाडी, कर्तृत्व हीच तुमची शक्ती . यशाची खात्री .
हुंडा हा शब्दच शब्दकोषातून नष्ट करणे मुलींनो तुमच्या हाती आहे.
महिला दिनाच्या शुभेच्छा💐
– लेखिका : सुलभा गुप्ते. सिडनी, ऑस्ट्रेलिया
१२) हुंडा : एक अनिष्ट प्रथा
फार पूर्वी काळापासून म्हणजे आपल्या आजोबा पणजोबापासून ”हुंडा’ ही अनिष्ट प्रथा रुढ झाली होती.
लग्नाचा सिझन सुरू झाला की ‘हुंडा’ ही दोन अक्षरे मुलीच्या आईवडीलांपुढे नाचू लागत त्याकाळी माणसांची आर्थिक परिस्थिती मध्यम होती हातातोंडाची गाठ पडायची नाही शेती हातानेच करावी लागायची उत्पन्न कमी असायचे गरीबीचे प्रमाण जास्त होते.
याचे कारण म्हणजे संतती प्रतिबंधक कायदा नसल्याने भरमसाठ वाढलेली लोकसंख्या. पुर्वी एकत्र कुटुंब पद्धती मुळे खाती तोंड जास्त असायची त्यात भर म्हणून मुलींची घरात संख्या जास्त असली की आईवडीलांना टेन्शन यायचे मुली खपवायच्या कशा म्हणजे त्यांचे एकाचे दोन हात झाले की जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखे वाटायचे त्याकाळी मुलगी परक्याचे धन आणि मुलगा वंशाचा दिवा वाटायचा. मुलगी झाली की अपशकुन मग त्या आईचा छळ व्हायचा. मुलीला मुलापेक्षा वेगळी वागणूक दिली जायची .तिला घरच सर्व कामे करावी लागत शाळेच तर नाव नाही मुलगी शिकुन काय करणार आहे
दुसऱ्याच्याच घरी जाणार तिच चुल आणि मुल एवढच काम समजल जायच.
त्यामुळेच तीच शिक्षण अर्धवट राहियच. वडील चालून येणाऱ्या स्थळाला नाही म्हणायचे नाहीत मग मुलीच वय कमी असले तरी तिच लग्न व्हायच लग्नात मुलाकडची जो हुंडा मागतील तो लगेच दिला जायचा मग घर गहाण टाक, तर जमीन गहाण, तर कधी सावकाराकडून कर्ज घेऊन मुलीला लग्नात हुंडा’ दिला जायचा तरीही काही दिवसांनी सासरी पैशासाठी छळ व्हायचा मग मुलीला कधी उपाशी तर कधी मारहाण केली जायची कधी राँकेल अंगावर टाकून पेटवल जायच तर कधी मुलगीच जाचाला कंटाळून विहीर जवळ करायची.
पण हुंडाबळीच प्रमाण कमी होत नव्हत. मुलीचे वडील बिचारे कर्ज काढून मुलीचे सुखासाठी धडपडायचे. पण पैसा जाऊन मुलगीही हाती लागायची नाही.
याला कारणीभूत शिक्षण नसल्यामुळे अडाणी आईबापांना कुठे दादही मागता येत नसे. पण हे पुर्वी च्या काळी पण यात हळू हळू काळानूसार बदल होत गेला. आधुनिक विचारसरणी आली ,शासनाने संततीनियमनचा कायदा लागु केला. त्यामुळे कुटुंबातील लोकसंख्या कमी झाली शिक्षणाचे महत्व लोकांना समजू लागले लोक स्व:ता शिकू लागले मुलामुलींना शिकवु लागले. उद्योगधंदे वाढीस लागले. १९६० साली हुंडाबंदी कायदा लागू झाला. काही प्रमाणात हुंडाबंदी झालीही. तरी पण आतल्या बाजूने पैशाने लालची लोक हुंडा घेतच राहिले.
आता तर मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात काम करू लागल्या.
त्यामुळे हुंडा द्यायचाही नाही आणि घ्यायचाही नाही अशी मुलामलींची धारणा होऊ लागली. त्यात हुंडा घेणाराही व हुंडा देणाराही तितकाच अपराधी व कायद्याच्या भीतीने हुंडापद्धत बंद झाली.
पण त्या ठिकाणी हुंडाच्या एवजी नवीन शब्द तयार या माणसांनीच केला तो म्हणजे ‘वरदक्षिणा’ माणुस बुद्धीमान प्राणी आहे तो कशाचा शोध लावेल ते सांगता येत नाही
खर म्हणजे मुले मुली शिकुन मोठ्या नाव कमवू लागल्या त्यात मोठा हातभार आहे तो म्हणजे समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मुळेच आज अख्खी पिढी घडली त्यांचे किती उपकार आहेत आपल्या वर पण आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत गेले लोकांचे विचार बदलत गेले घरी सर्व प्रकारच्या सुविधा आल्या. कुटुंबातील एक तरी सदस्य शिकून नोकरीस लागला. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आले. शेतीचे उत्पादन वाढले लोकांच्या अपेक्षा वाढल्या
आता लोक वरदक्षिणा च्या नावाखाली लग्नात वारेमाप खर्च करु लागली. याचा अर्थ हुंडा’बंदी खऱ्या अर्थाने झालीय का हो? नाही ना?
माझ्या मते तर अजिबात नाही. शेजारच्या लग्नात मुलीला चार चाकी गाडी दिली तर दुसरा लगेच जावयाला लगेच नवीन घर घेऊन देतोय. मुलांचे पाहीजे तसे लाड झाल्याने त्यांना उलट अभिमान वाटतो माझ्या सासर्याने मला लग्नात गाडी, बंगला दिला.
पण हे खरच किती चुकीचे आहे. ते दोघे जर नोकरी करत असतील तर त्यांच्या मनगटात धमक आहे ना? गाडी. बंगला घ्यायची म्हणजे पालकच याला जबाबदार आहेत त्यांना ते पंगु बनवत आहेत. काही जणांची परीस्थिती नसली तरी इतरांचे पाहून तो बँकेच कर्ज काढतो प्रसंगी घर गहाण टाकतो, पण मुलीचे लग्न धुमधडाक्यात लावतो. आणि आयुष्यभर कर्ज फेडत बसतो. त्यापेक्षा त्यांना शब्दांचा आधार द्या मार्गदर्शन करा बघा कसा संसार करतात ते
आणि मोठ्या घरात मुलगी पैसे खर्च करून दिली जाते. वैचारिक मतभेद झाले की लगेच ही मुल टोकाची भूमिका घेऊन संसार मोडतात. त्यांना आईवडीलांनी काय केलय याच्याशी देणघेण नसत.
म्हणुन अजुन तरी जागे होऊन उघड्या डोळ्याने जगाकडे पहा ही वरदक्षिणा प्रथा बंद करा मुलांच्यावर चांगले संस्कार करा एखाद्या गरीबाच्या लग्नात जेवण खाण्याचा खर्च करा तेवढेच पुण्य पदरात पडेल एवढच या लेखाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सांगणे आहे ही देणघेण पद्धत बंद करा मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करा…
– लेखन : सौ सीमा सोमनाथ मंगरुळे-तवटे. वडूज
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800