Saturday, July 5, 2025
Homeलेखहृदयातील सुगंधी जखमा

हृदयातील सुगंधी जखमा

पोलिस विभागातून प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झालेले, कवी, गजलकार श्री यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे यांच्या पहिल्याच “ह्रदयातील सुगंधी जखमा” ह्या गझल संग्रहास मराठी साहित्य मंडळातर्फे राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य, समाज आणि विद्याभुषण पुरस्कार जाहिर झाला आहे. वर्धा येथे दि.२७ नोव्हे. २०२२ रोजी होणा-या साहित्य संमेलनात सदरचा पुरस्कार दिला जाणार आहे. श्री पगारे यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
या निमित्ताने त्यांच्या या पुस्तकावर बंगलोर येथील श्री प्रणव बनसोडे यांनी लिहिलेले परीक्षण पुढे देत आहे.
– संपादक

आमच्या गझल प्राविण्य परिवारातील हसते खेळते व्यक्तिमत्व म्हणजे यशवंत पगारे. त्यांच्याशी ओळख झाली आणि संवाद झाला तेव्हा कळाले कि खरेच, मैत्रीला वयाचे बंधन नसते. यशवंतकाका तसे माझ्या वडिलांपेक्षाही मोठेच आहेत पण तरीही अगदी माझ्या वयाचे होऊन माझ्याशी बोलण्याची त्यांची खुबी खरंच मनाला मोहून जाते, आपलंस करून जाते.

गझल प्रवासात ओळख झाली त्यामुळे साहजिकच तोच मुख्य विषय आमच्या संभाषणाचा राहिला. एकमेकांच्या गझलांवर मत नोंदवणे इथून सुरु झालेला प्रवास घट्ट होत गेला. काकांची विनोदबुद्धी म्हणजे त्यांच्या सगळ्या नात्यांवरची जरतारी झालरच म्हणावी लागेल. त्या कौशल्याने ते पुढच्याच्या काळजात शिरतात. ३५ वर्षे पोलीस दलात राहूनसुद्धा विनोदबुद्धी आणि काव्य त्यांच्याकडे आहे हे खरंच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे हे निश्चित.

यशवंत पगारे

काकांच्या शेरांवर आपण दिलेले शेरे अगदी सहजपणे स्वीकारणे हि त्यांची बाब मनाला फार स्पर्शून जाते. इथे त्यांचा मनाचा मोठेपणा जाणवतो. अनलज्वाला हे त्यांचे फेवरेट वृत्त आहे हे त्यांना ओळखणारा कुठलाही गझलप्रवासी जाणूनच असेल ह्यात दुमत नाही.

आपले विविधांगी खयाल, शब्दरचना, भाषेच्या व्याकरण व शुद्धलेखन ह्यात कुठेही न केलेली प्रतारणा ह्या काही त्यांच्या लिखाणाच्या जमेच्या बाजू आहेत. अश्याच मनाला वेड लावणाऱ्या गझल लिहिताना कळाले कि त्यांचा गझल संग्रह येत आहे. प्रकाशन सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण असताना सुद्धा जाणे झाले नाही ह्याची हुरहूर मनात आहेच. मात्र, संग्रह प्रकाशित झाल्यावर त्यांची स्वाक्षरी असलेली प्रत त्यांनी मला आवर्जून पाठवली. काही वेळा अगदी पुस्तकाचे शीर्षकच आपल्याला ते वाचनाच्या मोहात पाडते, “हृदयातील सुगंधी जखमा” हे त्याचेच ज्वलंत उदाहरण होय.

गझलप्रेमी म्हणून मी त्यातील एक एक शब्द, एक एक ओळ, खयाल, बांधणी हि अभ्यासपूर्वक वाचली आणि खरेच त्यानंतर काकांविषयी आणि त्यांच्या लेखणी विषयीचे असलेले प्रेम द्विगुणित झाले, वृद्धिंगत झाले. त्याच गझल संग्रहाबद्दल माझ्या भावना मांडायचा विचार मी केला. हा लहान तोंडी मोठा घास असला तरी अपेक्षा करतो काकांना आणि सर्वांना तो आवडेल.

७८ गझल, आयुष्यातील सगळ्या महत्वाच्या लोकांना लक्षात ठेवून पुस्तकाच्या सुरवातीला त्यांचे नामनिर्देशन करणे, आदरणीय गझलगुरू श्री प्रविण पुजारी सर, श्री दत्ता जाधव सर, श्री भागवत बनसोडे सर, डॉ जितेंद्र वड्डीकर सर, प्रा. ज्योती देसाई मॅडम, ह्यांचे शुभेच्छापत्र; गझलकारांचे मनोगत, आणि डॉ त्र्यंबक दुनबळे सर यांची प्रस्तावना हे सगळेच लिखाण नवोदित गझलकारांना शिकवून जाणारे आहे.

“जखम फुलांची” पासून चालू होणारी गझलमाला येणाऱ्या प्रत्येक शब्दासोबत, खयालांसोबत आपल्याला काव्यात आणि स्वतःत गुंतवत जाते.
“शुद्ध पंढरी” मध्ये समाजातील काही व्यंग ह्यावर लेखन भावून जाते.
“माय माझी चूल होती, बाप झाला लाकडे;
जीवनाच्या भाकरीला आसवांनी भाजले” हा शेर किंवा “ती माय आज माझ्या साऱ्या उरात झाली” काबील ए तारीफ तर आहेच पण सोबतच आईवडिलांचा त्याग त्यात दिसतो आणि गझलकारांना आपल्या पालकांविषयी असलेला आदर आणि त्यांच्या त्यागाची जाणीव दिसते.

“सर्व काही दान देतो माज माझा आगळा” किंवा
“आहे समोर माझ्या स्वप्ने उभी उद्याची;
रंगात रंग त्यांच्या भरणार आज आहे” तसेच
“हातात दोर माझ्या, गाठायचा किनारा” हे सांगत असताना स्वतःबद्दलचा आत्मविशास आणि संस्कार दिसून येतो. “गुन्हा असावा”, “बंड आसवांचे” ह्यामध्ये तसेच, “पुढे चालणे औषध आहे काळावरती” आणि “मीच वाकड्या दगडालाही घडवत आलो” ह्यामध्ये त्यांना आलेले जीवनातील कटू अनुभव पण त्यावर खुबीने केलेली मात दिसते. ह्या गझलेतील शेर म्हणजे तरुण पिढींना मार्गदर्शन ठरतात.

तसे तर मी प्रत्येक शेर वर काही ना काही लिहू शकेल इतक्या भन्नाट ह्या गझल आहेत.
“जीवन आहे”, “हवे आता” ह्यातील शेर छान वाटतात.
“कसे म्हणावे” हि गझल तर जणू काही माझ्या साठीच लिहिली आहे असे प्रत्येक वाचकाला वाटेल आणि हीच खऱ्या गझलकाराची मेख आहे.
“पैसा अडका सोडा म्हणता झोळी भरुनी गेला” ह्यात भोंदूगिरी कशी फोफावत चाललीय यावर भर दिला आहे.

हिंदी उला आणि मराठी सानी हा अनोखा दुग्धशर्करा योग “दोस्ती” ह्या गझलेत झळकतो.
“विकलो कधीच नाही”, “बोलू द्यावे”‘ “घरी आलो”, तसेच “जाग नाही” मध्ये “फुत्कार तुझे पुरे आता, माणूस आहे नाग नाही” ह्यात सनातनी साहित्याचा अभ्यास दिसून येतो.
अंतिम सत्यावर भाष्य करताना “मित्रा” ह्या गझलेत “मग लोकांना मरून पटवले मित्रा” इतका गूढार्थ ते प्रतीत करतात.
“मस्तवाल मी” मध्ये “परवा परवा” हा रदीफ घेऊन अगदी सौम्य शब्दात अहंकारी माणसाची प्रवृत्ती दाखवली.
“बात तहाची” मध्ये “राखेमध्ये दिसली नाही जात कुणाची” ह्यात ते समाजातील जाती व्यवस्थेवर हल्लाबोल करतात.
“येवो स्थिती कशी ही घेतो जगून मित्रा” ह्यात त्याच्या पक्क्या मनाची बाजू दिसते.
“कळ्या फुलांची, रात फुलांची, फुला फुलांचा माणूस व्हावा” ह्या रचनेमधून निसर्गाची उपमा घेत सत्य परिस्थितीवर लेखन केले आहे.

“माणुसकीवर बलात्कार”, “गाव गुन्ह्याचे”, “स्वार्थी बाजार” ह्यात समाजातील विदारक दशा अशी व्यक्त केली आहे कि जणू वाचकाच्या काळजात धस्स होईल.
“वेताळ टाळले मी”, तसेच ‘मी’ मध्ये “डोळे सताड उघडे ठेवून धावतो मी, “इतिहास खोडणारा आहे असा ससा मी” ह्यात सुंदर खयाल आपल्याला शक्ती देऊन जातात.
“तू”‘ “ती” , “हिरवळीत ये”, “अंधार तुझ्या जाण्याचा”, “अर्थी तिची” ह्या गझल कॉलेज कुमार लोकांसाठी अगदी क्या केहणे असे भाव ओततात.

“गुलजार पाहिजे”, “गाव माझे” मध्ये शहर आणि गावातला हृदयद्रावक बदल मांडला आहे.
“जगण्याचा बाजार”, “अंदाज आंधळ्यांचा”, “तलवार हो आता”, “तणाव”, “होणार घात आहे”, “आरसा”, “पाखरे”, “मरण माझे”, “डाव कुणाचा” ह्या गझलांविषयी कायच लिहावे, मला वाटते त्या गझलांची अनुभूती स्वतः वाचूनच घावी, तरच त्या रचनेंचा आनंद घेता येईल.
“फकीर झालो” मध्ये संत साहित्याची झालर खुबीने उठते.
“मुडद्यांची वस्ती” मध्ये “माणुसकीच्या शोधासाठी दुरून आलो” तसेच “हरवत होतो मलाच माझा कळून आलो” ह्यात समाजापासून कुठलीही अपेक्षा न करता स्वबळावर जगणे दाखवून दिले.
“लेकराची झोळी” मध्ये “पदर फाडला बाळासाठी झोळी केली” हे म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात ना “पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हि साहे” ह्याची अनुभूती येते.

आणि शेवटी भैरवीचा सूर लावत “घरटे बांधत गेलो” मध्ये “पीठ जरासे मीठ जरासे होते गाठी” “आनंदाने एक भाकरी रांधत गेलो” असे लिहीत प्राप्त परिस्थितीला संधी मानून त्याचे सोने कसे करावे हि खुबी दाखवली आहे.

यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे ह्यांचा “हृदययातील सुगंधी जखमा” हा खरंच एक अलौकिक उपलब्धी असणारा गुणसंपन्न असा सगळे नवरस (श्रुंगार, हास्य, करुणा, वीर, बीभत्स, भयानक, अद्भुत, रुद्र, शांत) मांडणारा अगदी सुलभ, सोप्या शब्दांनी वाचकांच्या मनात घर करणाऱ्या अप्रतिम गझलांचा खजिनाच होय.

ज्यांना तांत्रिक दृष्ट्या गझल कळत नाही त्यांना सुद्धा सहज उलगडेल असा हा संग्रह प्रत्येकाच्या संग्रही असावा असेच मी म्हणेल. यशवंत काकांचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. ते आम्हाला असेच सदैव प्रेम आणि प्रेरणा देत राहतील ह्याची खात्री आहे. त्यांना असंख्य शुभेच्छा देतो.
लिहीत असताना काही चूक झाली असल्यास ती पूर्ण चूक माझी आहे तर ती मोठ्या मनाने परत करा हि विनंती. धन्यवाद.

प्रणव बनसोडे

– लेखन : प्रणव बनसोडे. बंगलोर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments