Friday, October 18, 2024
Homeसेवाहृदया व पर्यावरण संशोधन संस्थेचा अतुलनिय कार्यारंभ

हृदया व पर्यावरण संशोधन संस्थेचा अतुलनिय कार्यारंभ

सकाळी उठल्यावर, कळस दर्शनासाठी मंदिराच्या छतावर गेलो. तिथे एक अद्वितीय दृश्य माझ्या समोर उभे होते—सुर्याची कोमल मुदुल पिवळसर किरणे अलगद हळूवार मंदिरावर पसरत होती आणि क्षणातच सूर्याच्या कोमल किरणांनी मंदिराच्या परिसरात एक सुंदर पिवळसर आभा पसरवली. आजुबाजूच्या वातावरणात पिवळसर किरणांचे प्रचंड वर्चस्व होते, जणू काही त्या दिवशी मंदिर सुवर्णमय झाले होते. त्या दृश्याने मला नशिराबादच्या सुवर्णनगरीच आहे असे जाणवले.

आसपास नजर फिरवली तर प्रत्येक घरावर तिरंगा फडकत होता आणि मंदिरावर भव्य भगवा ध्वज लहरत होता. वाकी नदीच्या निळसर जलात तसेच आजुबाजूच्या हिरवळीतून स्वातंत्र्याचा अनोखा आनंदोत्सव अनुभवायला मिळत होता. या वातावरणाने असे वाटत होते की नशिराबाद नाही, तर संपूर्ण भारताने ७८ व्या स्वातंत्र्याच्या उत्सवाची शाल अंगावर ओढली आहे. आनंदोत्सव सर्वत्र सजत आहे आणि प्रत्येक क्षण त्यात एक नवा रंग भरत आहे. त्याचा अभिमान प्रकट होत होता.

प्रत्येकाच्या मनाशी आनंदाचा पर्व हर घर तिरंगा उत्सव लहरत होता, लोक आनंदात स्वातंत्र्य उत्सव साजरा करत होते, आणि देशभक्तीच्या भावना उंचावलेल्या होत्या. तेवढ्यात माझ्या कानांत “वंदे मातरम्”, “जय हिंद”, “हम सब एक हैं !” यांचा आवाज आला. खाली बघितल्यावर शाळेतील लहान मुलांचे एकजुटीने हातात हात घेऊन सुसंगतपणे प्रभातफेरी करत असल्याचे पाहून मनाला खूप आनंद झाला. शिक्षकांच्या मार्गदर्शनात चाललेल्या त्या फेरीत एकजुटीचा आणि देशभक्तीचा सुंदर संदेश स्पष्टपणे दिसत होता.

सकाळी उठून मंदिराच्या छटावर गेल्यावर सूर्यमालेचे पिवळसर किरण आणि नशिराबादच्या सुवर्णनगरीचे दर्शन हे निसर्गाशी एक अनोखा संबंध व्यक्त करणारे आणि एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव देणारे होते. शाळेतील लहान मुलांचे हसरे, उत्साही आणि आनंदी चेहेरे हे नेहमीसाठी मनाला प्रसन्न करणारे होते. त्या सुंदर दृश्याने मनाला खूप आनंद झाला. महाराजांची दिव्यता आणि अध्यात्मिकता पूर्णपणे समाविष्ट असलेली त्यांचे समाधी स्थान निसर्गाशी एक अनोखा संबंध व्यक्त करते. त्या वातावरणामुळे मला प्रसन्नता अनुभवली आणि हृदयात “आनंदाची दोहे, आनंद तरंग” हे भजन गाण्याची भावना जागृत झाली आणि मी मनातल्या मनाने गाऊ लागलो.

नंतर, कार्यक्रमाच्या सेवेसाठी मंदिरात गेलो. तिथे मला अत्यंत शांतता अनुभवायला मिळाली. अतुलनीय मनोहरतेने सजवलेल्या मंदिरातील आंतरिक परिसर अत्यंत स्वच्छ आणि सुंदर होता. रंगीबेरंगी सांगोळी आणि फुलांच्या सजावटीने मंदिराची शोभा दुपटीने वाढली होती.

श्री जयंत पुजारी श्री झिपरू अण्णा महाराजांच्या अभिषेक करीत होते. श्री झिपरू अण्णा महाराजांच्या तेजस्वी रूपाचे दर्शन घेतल्यावर, मी त्या दिव्यतेला प्रणाम करून डोळे मिटून शांत बसलो. त्या ठिकाणी मला अत्यंत शांतता अनुभवायला मिळाली. आणि क्षणात मला असं भासलं की सर्व संत, महात्मे आणि सिद्धपुरुष यांचे सूक्ष्म रूप येथे उपस्थित आहेत आणि महाराजांचा दरबार भरलेला आहे. अचानक डोळे उघडल्यावर पाहिलं की, श्री झिपरूअण्णा महाराजां श्री जयंत पुजारीजींनी नारंगी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाची वस्त्रे घातली होती, तिरंग्याच्या रंगांच्या प्रमाणात सुंदर व मनमोहक रुद्राक्ष आणि मोत्यांची माला घातली होती. त्यांनी मंदिरातील तसेच,.श्री झिपरूअण्णा महाराजांची सजावट आणि तयारी अत्यंत उत्कृष्ट प्रकारे केली होती. त्यांच्या श्रद्धा, भक्ती, सेवा, आणि प्रेमातून त्यांचा निस्वार्थ भाव प्रकर्षाने जाणवला. मंदिरातील प्रत्येक कोपरा, सजावट, आणि तयारी यामध्ये त्यांच्या समर्पणाची आणि भक्तीची झलक स्पष्ट दिसत होती. त्यांनी केलेल्या कामात त्यांच्या अंत:करणातील भावनांची झलक दिसून येत होती. हळूहळू भक्तांची गर्दी वाढू लागली आणि पाहता पाहता हॉल पूर्ण भरला.

सर्व भक्तांनी सुंदर आणि स्वच्छ कपडे घातले होते. त्यांच्या चेहऱ्यांवर स्मितहास्य आणि डोळ्यांत उत्सुकता स्पष्ट दिसत होती. सर्वजण आनंदी आणि खुश होते. श्री जयंत पुजाऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने श्री गुरुपूजा आणि मंत्रपूजनाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली.
श्री गुरुगीता पठण व मंत्रपूजा श्री जयंत पुजारीजींच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली.

ज्याची सर्वांना उत्कंठा लागून राहिली होती, तो क्षण अखेर जवळ आला — श्री झिपरूअण्णा महाराजांच्या दिव्य सिद्ध चित्र लोकापर्ण सोहळा. हा सोहळा हृदया आणि पर्यावरण संशोधन संस्था यांनी आयोजित केला होता. श्रीगुरु चरणी वंदन करून सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.

या खास कार्यक्रमाचे संचलन हृदया आणि पर्यावरण संशोधन संस्थाचे अध्यक्ष श्री अतुल सोनवणे आणि प. पु. श्री झिपरू अण्णा महाराज स्मारक समितीचे सदस्य, वकील श्री मोहन देशपांडे, यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडले. उत्साह व आनंदाचे वातावरण असलेल्या या दिवशी, कार्यक्रमाची सुरुवात “आनंदांची डोही आनंद तरंग” या भक्तिगीताने करण्यात आली. हे भजन आनंद आणि उत्साहाचे लहरी सादर करत असून, उपस्थितांचे मन आणि आत्मा यांना जोडणारे ठरले.

चितशक्ती विलास मधील बाबा मुक्तानंद व श्री झिपरूअण्णा महाराज यांच्या भेटीच्या अनोख्या प्रसंगाने सर्वच उपस्थितांना भावूक केले.
श्री अतुल सोनवणे यांनी या अद्भुत कथेचे वाचन केल्यावर, सगळेच त्या प्रसंगात रंगून गेले. अनेक व्यक्तींना श्री झिपरूअण्णा महाराजांच्या अद्वितीय आध्यात्मिक शक्तीचा अनुभव घेता आला. काहींच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तर काहीं भावूक होऊन रडले. अनेकांना अपार शांततेचा आणि अंतर गहन ध्यानाचा अनुभव आला. सर्वत्र आनंद आणि प्रेमाचा वर्षाव झाला होता. हे सर्व अनुभव सद्गुरू श्री झिपरूअण्णा महाराजांच्या अपार प्रेम, करुणा, आणि कृपेचा परिणाम होते. सर्वांनी मनःपूर्वक हा दिव्य अनुभव घेतला. श्री झिपरूअण्णा महाराजांना कोटी कोटी प्रणाम !

श्री अतुल सोनवणे यांनी आपल्या संस्थेची माहिती सादर केली आणि चित्र पूर्ण करण्यात मदत करणाऱ्या व्यक्तींचे हृदयापासून आभार मानले. पुढील संचलनासाठी प. पू. झिपरूअण्णा महाराज स्मारक समितीच्या वतीने वकील श्री मोहन देशपांडे साहेब याना आमंत्रित करण्यात आले. वकील साहेब यांनी सोहळ्याची महती सांगत, संस्थेबद्दलची माहिती दिली. मान्यवर आणि चित्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

उत्सुकतेने ज्याची सर्वजण वाट पाहत होते, तो सोहळा- श्री झिपरू अण्णा महाराजांच्या पवित्र चित्राचे लोकार्पण अखेर जवळ आला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, दीप प्रज्वलन ह्रदया आणि पर्यावरण संशोधन संस्थेचे संस्थापक श्री सुरेश सोनवणे व सौ उषा सोनवणे, सचिव निलेश चौधरी, चित्रकार श्री मनिष भागवत, श्री नथ्थुलाल धिमान साहेब , प. पु. श्री झिपरू अण्णा महाराज स्मारक समितिचे सचिव श्री विनायक वाणी, Pujari श्री जयंत गुरुजी, माजी सरपंच विकास पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंदा भाऊ रोटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तसेच अनावरणा साठी खालिल मान्यवर उपस्थित होती श्री अतुल सोनवणे, श्री मनीष धिमन, श्री जितेंद्र चौधरी सर, श्री अनिल जोषी, श्री सिताराम पाटील आणि प पु श्री झिपरू अण्णा महाराज स्मारक समिति चे सर्व सदस्य उपस्थित होते. मंत्रोच्चारांच्या समन्वयाने आणि शंख-संबळांच्या आवाजात मोठ्या दिमाखात श्री झिपरू अण्णा महाराजांच्या पवित्र चित्राचे अनावरण करुन लोकार्पण करण्यात आले. अनावरण होताच, उपस्थितांच्या चेहऱ्यांवर अद्भुत आश्चर्य आणि आनंदाची झळाळी दिसून आली. काहीजणांनी आश्चर्यचकित होऊन ओरडले, “अरे, हेच तर आपले झिपरू अण्णा महाराज आहेत ना !” काही भावूक होऊन रडू लागले, तर काही शांतपणे ध्यानात तल्लीन झाले. काहींना वाटलं, झिपरू अण्णा माझ्याशीच संवाद साधत आहेत. तर काहींच्या अंत:करणात जणू एक ज्योत पेटली आणि त्यांचे हृदय परमेश्वराशी एकरूप झाले असे त्यांना जाणवले. काहींनी शांतीने ध्यानाचा गहन अनुभव घेतला, तर काहींनी सांगितलं, “मी जिकडे पाहतोय, तिकडे महाराज माझ्याकडे पाहत आहेत.” असे वाटले की साक्षात देहधारी झिपरू अण्णा येथेच उपस्थित आहेत. चित्रकार श्री. मनीष भागवत यांच्या कलाकृती आणि मेहनतीसाठी हृदयातून कोटी कोटी वंदन !

चित्रकाराचे सर्वांकडून या कलाकृती बद्दल कौतुक, आभार आणि धन्यवादांचा वर्षाव होत होता. तसेच हृदया व पर्यावरण संशोधन संस्थेचा सुद्धा या उपक्रमाबद्दल विशेष कौतुक केले जात होते. पुढील वाटचालीसाठी सर्वत्र प्रेमाने शुभेच्छांचा वर्षाव होत होता. आनंदाच्या या काळात सर्वांनी आरती, दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेत, सोहळा उत्साहाने चालू ठेवला

श्री झिपरू अण्णा महाराजांचा हा ऐतिहासिक सोहळा केवळ नशिराबादमध्येच नाही, तर देश-विदेशातील विविध लोकांनी फेसबुक आणि अन्य ऑनलाईन माध्यमांद्वारे १००० हून अधिक लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन या सोहळ्याचा अनुभव घेतला.

चित्राच्या समोर उभे राहून अनेक भक्तांचे मन आनंद व शांतीने भरले. भक्तांच्या चेहऱ्यावर दिसणारे भाव, हेच दर्शवतात की श्री झिपरूअण्णा महाराजांच्या अध्यात्मिक ऊर्जा आणि आशीर्वादाने हा सोहळ अतुलनीय बनला. श्री झिपरूअण्णा महाराजांच्या चित्रातील जिवंतपणा आणि आध्यात्मिक उर्जा भक्तांच्या हृदयात घर करून गेली. चित्रकार श्री मनिष भागवत यांची कला कौशल्याची प्रशंसा करत अनेक भक्तांनी आभार व्यक्त केले. हा सोहळा नशिराबादच्या सर्वांसाठी एक विशेष उपहार ठरला, जिथे प्रत्येक भक्ताने महाराजांची दिव्यता आणि आध्यात्मिक शक्ती अनुभवली.

या कार्यारंभ सोहळ्यात भाग घेणाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियांद्वारे चित्रकार आणि संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. सोहळ्याची योजना व अंमलबजावणी उत्कृष्टपणे केली गेली आणि संपूर्ण वातावरण भक्तीमय आणि आनंददायी होते असे सांगितले.

या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी श्री झिपरू अण्णा महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि सर्व भक्तांच्या उत्साही सहभागाने आम्हाला एक सशक्त आणि शाश्वत भविष्याच्या दिशेने मार्गदर्शन मिळाले आहे. “वसुधैव कुटुंबकम” या विचारसरणीवर आधारित हृदय आणि पर्यावरण संशोधन संस्था मानवतेच्या आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी निरंतर कार्यरत राहील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.

आपण हृदया व पर्यावरण संशोधन संस्थेच्या कार्यात सहभागी होऊन एक सकारात्मक परिवर्तन घडवू शकता. आपल्या योगदानामुळे समाजात सुधारणा होईल आणि आपल्याला पुढील कार्यात प्रगती साधता येईल.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on चलो, अमरावती !
वर्षा महेंद्र भाबल on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सौ.मृदुलाराजे on विजयादशमी
सौ.मृदुलाराजे on चलो, अमरावती !
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था , महाराष्ट्र. on गुरूंच्या आठवणी
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” :  १०
डॉ. प्रशांत भुजबळ on अभिनव टपालदिन