Tuesday, July 1, 2025
Homeसंस्कृतीहॅलोवीन…..

हॅलोवीन…..

हॅलोवीन हा दिवस अमेरिकेत नेहमी ३१ ॲाक्टोबरला साजरा केला जातो. पण पंधरा दिवस आधीच घराबाहेर डेकोरेशनला सुरवात होते आणि मार्केट मध्ये एक महिना आधीच विक्री सुरू होते. हे सर्व जवळून पहायला मिळतयं.

आपली नवरात्र, दसरा दिवाळीही याच वेळी. आपले तोरण, पूजा, लाईट, कंदील, रांगोळी .. ही सजावट एकीकडे… शुभ, प्रसन्न वातावरण निर्माण करणारी तर हॅलोवीन ची सजावट, भूत, थडगी, हाडाचे सापळे, कवट्या, जळमटं, कोळी, चेटकीण अशा आपण अशुभ समजणाऱ्या गोष्टींची.सर्व फारच विचित्र वाटतं !

मुळचा UK मध्ये साजरा करण्यात येत असलेला हा दिवस, १८०० सालानंतर, तिथली अनेक जणं अमेरिकेत गेल्यामुळे, तिथे साजरा होऊ लागला. आणि नंतर हळूहळू जगभर पसरू लागला.

ॲाक्टोबरच्या शेवटी ग्रीष्म ऋतु (summer season) संपून थंडी सुरू होते (winter). रात्री मोठ्या होतात. काळोख लवकर होतो. त्यावेळी, त्या दिवशी मृत आत्मे पृथ्वीवर परत येतात असा समज आहे. त्यांच्या साठी अन्न बाहेर ठेवले जाते. ते त्रास देऊ नयेत म्हणून सर्वत्र लाईट लावले जातात. घराबाहेर असं डेकोरेशन केलं जातं.

घरातली छोटी मोठी सर्व, चित्र विचित्र, भयानक, भिती वाटेल असे ड्रेसेस, मेकप, मुखवटे घालून ॲाफिस, शाळा, हॅास्पिटल .. सर्वत्र वावरतात. पार्ट्या करतात. मुलं trick or theat म्हणत शेजारी पाजारी हिंडतात.. पोतंभर चॅाकलेटं घेऊन घरी येतात..

आपल्या भारतातही पितृपक्षात मृत नातेवाईकाची आठवण काढत, त्यांच्या मोक्षासाठी काही विधी केले जातात. पान वाढून बाहेर ठेवले जाते. पश्चिम बंगालमध्ये भूत चतुर्दशी असते. ओरिसा मध्ये badabdua Daka रिवाज असतो.
मध्यप्रदेशात भूतांचा मेला असतो.

प्रत्येक जण आपापल्या श्रध्देप्रमाणे आपल्या मृत पूर्वजांचे आशिर्वाद मिळवणे, आठवण काढणे आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, ह्यासाठी प्रर्थना करणे ह्या हेतूने, हे सर्व करत असतो.

पण अमेरिकेत हेतू तसाच असला तरी त्याला उत्सवाचे, सामाजिकरित्या सर्व आनंदात, मजा करत साजरे करण्याचे स्वरूप आले आहे. जे कदाचित आता भारतातही कमर्शियल लोकांनी आपल्या लोकांच्याही गळी उतरवायला सुरवात केली आहे.

आपल्या इथे घराला दुष्ट प्रवृतींची नजर लागू नये म्हणून मिरच्या लिंबू लावतात, कोळसा लावतात, काही चित्र विचित्र चेहरेही लावतात.
पण घरासमोर थडगी, त्यातून डोकावणारे, हात पाय, काळ्या पिशव्यांतून गुंडाळलेली प्रेतं, खुर्च्यावर बसलेले हाडाचे सापळे, झाडाला लटकणारे काळ्या वेषातली भूत, चेटकीण ..घराला जळमटांनी वेढलेलं.. मोठाले कोळी…हे म्हणजे अति झालं ना?

आपल्या घरात कोळी दिसला की आपण त्याला बाहेर हाकलतो. स्प्रे मारून मारतो. जळमटं दिसलं तर लगेच केरसुणी घेऊन साफ करतो. पण याच कोळ्यांचं नशिब पहा.. हॅलोवीनला १०० पट मोठे बनून ते घरावर, झाडावर लटकत असतात.आणि जळमट सजावट बनून मिरवतात.

आपण हाडाचा सापळा, भूत पिशाच्च हे बोलणंही अशुभ मानतो तर सजावट म्हणून घरासमोर मांडणे ही कल्पनाच आपल्याला विचित्र वाटते. पण जे अशुभ तेच इथे प्रतिक म्हणून मांडलेले असते.
Jack- o- lantern, कोरिव काम केलेले मोठे भोपळे,प्लॅस्टिकचे भोपळे हे ही असतात डेकोरेशन साठी Uk मध्ये भोपळे नसायचे. तिथे Turnip ची खूप लागवड होत असे या काळात. त्यातल्या जून Turnip मध्ये कोरिव काम करून दिवे लावले जात. त्याचीही एक गोष्ट Irish लोकांत प्रसिध्द होती.. Stingy jack ज्याला मेल्यानंतर स्वर्गात आणि नरकातही जागा मिळत नाही आणि त्याला कोळसा घेऊन पृथ्वीवर पाठवले जाते तो हिंडत असतो म्हणे…

अमेरिकेत ह्या सिझन मध्ये भोपळ्याची भरपूर लागवड असते. ते कोरिव काम करायला सोपे असतात. ॲारेंज रंगामुळे आत लाईट लावल्यावर दिसतातही छान आणि ते पुनर्जन्म, निर्मिती, पिकं, ह्यांचे प्रतिक असते. म्हणून त्याचा वापर हॅलोवीन मध्ये व्हायला लागला.

काही वेळा हॅलोवीन ला घरगुती पार्टीतही, काही तरी थीम ठरवून, न लाजता, तशी वेशभूषा करून, छोटे -मोठे सर्व आनंदात नाचत गात असतात. कामाच्या ठिकाणीही बॅास आणि इतर कर्मचारी, एका लेव्हलवर येऊन मैत्रीच्या नात्यानी ते दिवस साजरे करतात.

आपण अशा गोष्टी करत नाही. तरूण मंडळी कदाचित करत असतील. पण आपण आधीच्या पिढीतले, नाही करत. आपण एक मुखवटा घालून वावरतो. घरात अनोळखी लोकांत तो मुखवटा फेकून, लहान मुलांसारखे आपण कधीच बागडत नाही, नाचत नाही. तिथले वागतात ते चांगलं कि वाईट माहीत नाही..पण आपण असं बिन्धास, मोकळेपणानी वागत नाही. म्हणून आपल्याला ते पचत नाही, रूचत नाही.

अमेरिकेत प्रत्येक समारंभात एक फोटो बूथ असतो . इथल्या प्रत्येक मॅालमध्ये हॅलोवीनच्या थीमवर जागोजागी फोटो बूथ, भोपळे मांडलेले असतात. कवटी हातात घेऊन किंवा हाडाच्या सापळ्यांचे हात गळ्यात लटकवलेले ….. असे फोटो काढायचा ….ही गोष्ट काय आवडते कोणास ठाऊक ! शाळेत हा आठवडा ह्याच थीमवर कपडे घाला असे सुचवतात.किती मार्केटिंग करतात प्रत्येक गोष्टींचे…

किती पैशाची उलाढाल अमेरिकेत होत असते ह्या काळात? माणशी १०० /१५० डॅालर सहज खर्च होतो. ड्रेसेस खूप महाग असतात . ते फक्त एकदाच घातले जातात. मुलं तर दरवर्षी नविन ड्रेस घेतात.५०/१५० डॅालर प्रत्येकी!…चॅाकलेट्स.. मोठे पॅकेट .. मुलं २/३ शे चॅाकलेटं गोळा करतात. इतकी खातात थोडीच ? थोड्या दिवसांनी टाकून दिली जातात. 3.1billion डॅालर्स ची विक्री होते चॅाकलेटची . म्हणजे विचार करा.

एक billion म्हणजे १,०००,०००,००० रूपये. आणि ड्रेसेसची विक्री १०.४ billions. आकडे आणि ह्या सर्वच माहितीने चक्रवायला होतयं ना ? पण इथे रहाणारी आपली लोकंही एन्जॅाय करतात. काय करणार ? “जसा देश तसा वेष” ही म्हण ते सोईस्करपणे अंगिकारतात….

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अष्टपैलू सुचिता पाटील