कृष्ण एक अगाध तत्वज्ञान !
अनेक जन्म घेऊनही आम्हाला नीटसे न समजलेले.. किंवा असे म्हणता येईल का की न समजल्यामुळे आपल्या सारख्या अज्ञानी जीवांना अनेक जन्म घ्यावे लागलेले एक तत्व …
हे कृष्णा,
तुझ्या जन्माचा सोहळा साजरा करताना …
तुझे ते दिव्य रूप एकदा डोळे भरून मनात साठवून घ्यायचे आहे
त्यामुळे तरी होईल का आमच्या मनातली मलिनता दूर ?
ही वेडी आशा आहे
हे कन्हैया,
तुझ्या बासरीची धून ऐकता ऐकता,
ती सहजच रोमारोमात भिनवून घ्यायची आहे
त्यामुळे तरी होईल का रे आमचे मन अगदी तिच्यासारखेच निर्मल, स्वच्छ, दोन्ही बाजूने मोकळे ?
हे श्रीरंगा, मधुसूदना,
तुझ्या मखमली मोरपिसातले रंग यावेळी आमच्या जीवनात आम्हाला उतरावयाचे आहेत
आणि आयुष्यातले सारे रंग भोगातून योग्याच्या वाटेवर न्यायचे आहेत
हे राधेया,
तू राधेला आणि समस्त स्त्रियांना दिलेला सन्मान आम्हाला जाणून घ्यायचा आहे
तुझे आणि तिचे निर्मल, शब्दातीत,क्षितिज छेदून गेलेले अमर्याद प्रेम उमजून घ्यायचे आहे
हे द्वारकाधीशा,
तुझ्या अथांग पसरलेल्या निळ्या रंगाप्रमाणे आम्हाला आमचे हृदय विशाल करून सर्व प्राणीमात्रांवर भरभरून प्रेम करायचे आहे
हे माधवा,
केवळ विपन्नावस्थेतच नाही, तर सुखाचे प्याले काठोकाठ भरलेले असतानाच क्षणोक्षणी तुझी आठवण ठेवून
आम्हाला तुझ्यात सामावून जायचे आहे.
आज आमची एव्हढी प्रार्थना ऐकशील का रे ?
हे कृष्णा, अहं, काम, क्रोध या विक्राळ जबड्यात सापडलेल्या आम्हाला वाचवशील ना रे ?
सांग ना रे. सांग ना रे.

– रचना : मोहना कारखानीस, सिंगापूर