नांदेड येथे आठवडाभरापासून सुरु असलेल्या श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या प्रकाशपर्वला समर्पित अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटच्या अंतिम सामन्यात पंजाब पोलीस संघाने प्रथम विजेता पद पटकावलं. ऑरेंज सीटी नागपुर संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. तर तिसऱ्या स्थानावर एमपीटी मुंबई संघ राहिला आहे.
येथील खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम मैदानावर दि. 20 डिसेम्बर पासून हॉकी स्पर्धा सुरु होती. शनिवार दि. 27 डिसेम्बर रोजी सकाळी खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात पंजाब पोलिस आणि ऑरेंज सीटी नागपुर संघाने संघर्षपूर्ण खेळाचे प्रदर्शन घडवले. हा सामना पाहण्यासाठी भारतीय हॉकी संघाचा माजी खेळाडू ओलिंपियन सरदार हरपाल सिंघ नामधारी आवर्जूनपणे उपस्थित होता. या सामन्यात पंजाब पोलीस संघाने नागपुर संघाचा 3 विरुद्ध 1 गोल अंतराने पराभव केला. पंजाब पोलीस संघाचा खेळाडू पवनदीपसिंघ याने पहिल्या सत्रात 14 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नर मध्ये गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर एकाच मिनिटाच्या अंतराने करणबीरसिंघ याने मैदानी गोल करत आघाडी निर्माण केली. दुसऱ्या, तिसऱ्या सत्रात संघर्षपूर्ण खेळ झाला पण गोल होऊ शकले नाही. नागपुर संघाने चौथ्या सत्रात 47 व्या मिनिटाला वेगवान हॉकीचे प्रदर्शन सुरु करत सुरेख मैदानी गोल केले. हा गोल सैफ खान याने केला. खेळाच्या 56 व्या मिनिटाला पुन्हा पंजाब पोलीस संघाला एक पेनल्टी कॉर्नर मिळाले. या संधिचा लाभ उचलत सिमरनजीतसिंघ याने गोल करत विजेतापदावर शिक्कामोर्तब केले.

तिसऱ्या स्थानासाठी खेळण्यात आलेल्या सामन्यात एमपीटी मुंबई संघाने 2 विरुद्ध 0 गोल अंतराने बीएसएफ जालंधर संघाचा पराभव केला. मुंबई संघाच्या हरिरामा एल.एस. याने खेळाच्या 23 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मध्ये पहिला गोल केला. तर 43 व्या मिनिटाला वेंकटेश देवकर याने मैदानी गोल करण्यात यश मिळाले. जालंधर संघाला आज गोल करता आले नाही.

स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेता ठरलेल्या संघांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आले. प्रथम पारितोषिक ट्रॉफी आणि एक लाख रूपये रोख, द्वितीय पारितोषिक ट्रॉफी आणी रोख 51 हजार रूपये. तिसरे पारितोषिक 11 हजार रूपये रोख आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय हॉकी संघाचे माजी सदस्य, ओल्यम्पीयन खेळाडू हरपालसिंघ नामधारी, कॉन्ट्रेक्टर सरदार दीपसिंघ फौजी, जीवीसी ग्रुपचे प्रमुख श्री गंगाप्रसाद तोषनीवाल, धर्मबाद येथील व्यवसायी श्री सुबोधकांत काकानी, गुरुद्वारा बोर्डाचे सरदार गुरबचनसिंघ प्राचार्य, सहायक अधीक्षक बलविंदरसिंघ फौजी, हॉकी कमिटीचे प्रमुख सरदार गुरमीतसिंघ नवाब (डिंपल), धीरज यादव, सुमित मुथा, हॉकी कमेटीचे पदाधिकारी जितेंदरसिंघ खैरा, हरविंदरसिंघ कपूर, संदीपसिंघ अख़बार वाले, हरप्रीतसिंघ लांगरी, महेंद्रसिंघ लांगरी, जसपाल सिंघ काहलो, महेंद्रसिंघ गाड़ीवाले, अमरदीपसिंघ महाजन, विजय कुमार नन्दे व सर्व कमिटी सदस्य, मान्यवर, खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेसाठी सरदार जुझारसिंघ सिलेंदार, सरदार नरिंदरसिंघ, सरदार खेमसिंघ पुजारी आणि इतरांनी सहकार्य केले.

हरपालसिंघ नामधारी :
भारतीय हॉकी संघाचा माजी ओल्याम्पीयन खेळाडू सरदार हरपालसिंघ नामधारी म्हणाले की, नांदेड शहरात मागील 52 वर्षांपासून हॉकीचे जागर सुरु असून येथे होतकरू खेळाडू निर्माण होण्यास पोषक वातावरण आहे. खरं तर या नामवंत स्पर्धा एसो टर्पवर झाल्या पाहिजे असे माझे मत आहे. पुढच्या वर्षी येथे राष्ट्रीय आणि अंतर्राष्ट्रीय खेळाडू येऊन खेळावेत यासाठी माझे प्रयत्न असतील. स्थानिक स्तरावर आणखीन प्रयत्न व्हयाला हवेत.
दीपसिंघ फौजी :
श्री गुरु गोबिंदसिंघजी हॉकी स्पर्धा देशभरात नवलौकिक मिळवत आहे. या ठिकाणी राष्ट्रीय, अंतर्राष्ट्रीय स्तराचे खेळाडू खेळत आहेत. या स्पर्धा चांगल्यास्तरावर होण्याकरिता सर्व घटकांनी सहकार्य करायला हवे असे मत आजचे प्रमुख पाहुणे सरदार दीपसिंघ फौजी यांनी मांडले.
गंगाप्रसाद तोषनीवाल :
जीवीसी ग्रुप समुहाचे प्रमुख श्री गंगाप्रसाद तोषनीवाल या वेळी म्हणाले, नांदेड सारख्या पवित्र पावन शहरात मागील 52 वर्षांपासून श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट स्पर्धा होत आहे ही अभिमानची गोष्ट आहे. डिंपलसिंघ नवाब आणि त्यांचे सहकारी उत्कृष्ट आयोजन करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नाने नांदेड येथे चांगले खेळाडू निर्माण होऊन नांदेडचे नावलौकिक व्हावे अशी माझी शुभेच्छा आहे.
— लेखन : रविन्द्रसिंघ मोदी. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
