Tuesday, June 17, 2025
Homeसाहित्यहोळी, धुलीवंदन : काही कविता...

होळी, धुलीवंदन : काही कविता…

१. रंगवा रंगवा केशवा

रंगवा, रंगवा, मन माझे केशवा,
मी करते तव धावा,
चरणावरी हा भाव ठेवूनी,
भक्ती सुगंध जागवा…!!!

दिन येती दिन जाती पाही,
वर्षे जातील, अंतही येई,
काय खरोखर तव दर्शन सुख,
पालट मनी करवा….!!!

किती सुंदर हे विश्वची पाही,
आंत चेतना, जागृत होई,
सारे विश्व तव रंगी रंगले,
जाग येऊ दे जीवा…!!!

तु सोबत ती वाट मनोहर,
तु सोबत तो रस्ता सुंदर,
तु सोबत, सहवास खरोखर,
मनी वसंत फुलवा…!!!

आज दिवस हो रंगपंचमी,
तुज सम मी रंगले धामी,
सत्य विसरले भानच सारे,
रंगच चढला नवा…!!!

हेमंत भिडे

– रचना : हेमंत भिडे. जळगाव

२. … तो….

पसरला तर
गोड गुलाबी..लाजतो

बहकला तर
धम्मक पिवळा होतो

उडवला तर
सर्वत्र केशरी बहकतो

रागावला तर
कडक लालेलाल होतो.

उडाला तर
मंद आकाशी होतो

फिकट झाला
हलका करडा होतो..

उडाताना वर
आकाशी नीळसर होतो,

विखुरला तर
सरसकट राखाडी होतो..

खुलला तर
दूरवर हिरवाई पसरवतो,

उधळला तर
मोरपीसी रंग पसरवतो..

रंगच तो

माणसाचं आयुष्य
ता ना पि हि नी पा जा
इंद्रधनुष्य ने रंगवतो,

सुख दुःखाच्या भावना हलक्याच खुलवतो..

म्हणून रंगात.. रंगा
इतरांना ही रंगवा……

सुंदर रंगांनी आयुष्य उधळा रंगपंचमी..रंगीबेरंगी करा.🙏🏼

पूर्णिमा शेंडे.

– रचना : पूर्णिमा शेंडे. चेबूंर
#पूर्णिमानंद#

३. उधळू गुलाल

धुलीवंदनच्या रंगात
निघू या न्हाऊन
ताजेतवाने होऊ
गाणे आनंदाचे गाऊन

प्रेमळ शुभेच्छांचा
उधळू गुलाल
आपुलकीचा, मायेचा
बांधू भव्य महाल

रंगात रंगू
पूल नात्यांचा बांधू
माणसा माणसातल्या
राधे कृष्णाला वंदू

राजेंद्र वाणी

– रचना : राजेंद्र वाणी. दहिसर, मुंबई

४. रंग तरंग

कृष्ण नाम घेता रंगांचे उठती तरंग
राधा-कृष्ण गोपी भासती नृत्यात दंग।।ध्रु।।

काम धाम विसरुनी वाटे उत्साह उमंग
रंगांची उधळण करीत नाचे पांडुरंग
श्याम मुरारीचे जाणिवेने होती दंग।।1।।

षड्रिपु न राहे खेळता नवरस रंग
संगीत शब्द ताल बदलती अंतरंग
भेदा-भेद न उरे खेळता होळीचे रंग।।2।।

सण उत्सव प्रसंगापरी भरतो रंग
गणपती नवरात्री वारीत आनंद तरंग
अवघा बने एक रंग रंगी रंगे श्रीरंग।।3।।

अरुण गांगल

– रचना : अरुण गांगल. कर्जत- रायगड

५. रंगपंचमी

हनिमूनच्या रात्री शय्येवर पसरलेल्या
गुलाब पाकळ्या तू उधळल्यास माझ्यावर!

किती गडद रंग होता तो, सहवासाचा
जणू रंगपंचमी सुरू झाली, आयुष्याची!

मग प्रत्येक वर्षी रंगतच गेली रंगपंचमी…
कधी एकांतात, कधी कुटुंबात,
कधी मित्रपरिवाराबरोबर
(ती साजरी केल्याचे फोटो
जपले आहेत अल्बममध्ये,
रंगलेले चेहरे ओळखू यावेत म्हणून,
टॅग करून ठेवलेले!)

कधी आभाळाचा निळा, हिरवळीचा हिरवा,
तर कधी मखमली फुलांचे-फुलपाखरांचे…
इंद्रधनुषी छटांचे विविध रंग अनुभवले.
एका रंगाकडून दुसऱ्या रंगाकडे जाताना
खूप रंग ओलांडावे लागतात, शिकले मी.

ठिणगी पडताना दिसली नाही
आणि अचानक होळी पेटली.
त्याच्या ज्वाळा आभाळाला भिडल्या.
किती पिचकाऱ्या भरल्या, फुगे भरले
तरी विझू शकली नाही होळी!

इतका धूर झाला की सगळंच काळवडलं.
सगळे रंग एकत्र केले की
पांढरा रंग तयार होतो, हे शाळेत शिकलेलो.
परंतु वास्तवात मात्र काळा रंग तयार झाला.

नि अचानक संपली रंगपंचमी…
गुलाब पाकळ्यांची, रंगाची, आनंदाची,
प्रेमाची, स्वप्नांची आणि जगण्याचीही !

प्रतिभा सराफ

– रचना : प्रतिभा सराफ. मुंबई

६. रंग वसंताचे

रंग वसंताचे लेवुनी
सजली सृष्टी सारी
प्रेमाचा हा रंग लेवुनी
रंग उधळती सारी ॥१॥

रंग वसंताचा सजला
मितवाचा प्रेमरंग खुलला
रंग साजणीचा सजला
मिलनाचा गंध ही रुजला ॥२॥

सजली सारी सृष्टी आता
रंग वसंताचा बहरला
प्रेयसीच्या गालावरती आता
प्रियकराच्या इश्काचा रंग बहरला ॥३॥

चुंबनाचा रंगला वसंत
स्पर्शाचा हा गंधाळलेला बहर
बाहुत तुझ्या फुलला वसंत
प्रेमाचा रंग उधळतो बहर ॥४॥

सुरेल तुझी ती प्रित
गजर्‍यात तुझ्या बहरला वसंत
सुवास देती तुझी ही प्रित
अत्तरात तुझ्या गंधाळला वसंत ॥५॥

रंग भरती तु इश्कात
वसंताच्या रंगात न्हाऊन
मधुर प्रित तुझी इश्कात
गेलो प्रितीत तुझ्या न्हाऊन ॥६॥

किती तुझे हे बहाणे
मला भेटायचे करती गाणे
रंगला वसंत तुझे हे बहाणे
मी गातो आपल्या प्रेमाचे गाणे ॥७॥

तू माझी प्रित झाली
वसंतात रंगुन गीत झाली
तु माझी लय झाली
वसंतात रंगुन रात झाली ॥८॥

किती बोलु मी तुझ्याशी
सहवासाचा वसंत फुलला
प्रितीत बांधलो मी तुझ्याशी
छेडता तुला वसंत फुलला ॥९॥

मी तुझा असा मजनु
तू माझी रंगलेली वसंता
फुलला माझ्यातला मजनु
तु माझी रंगलेली वसंता ॥१०॥

पंकज काटकर

– रचना : पंकज काटकर. काटी, जि.उस्मानाबाद
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?