हिंदू धर्मातील अनेक सणांपैकी होळी हा सण आनंदाचा आणि चैतन्याचा मानला जातो.
महाराष्ट्रात फाल्गुनी पोर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत दोन ते पाच दिवस होळी साजरी करण्याची प्रथा आहे. आणि विशेष म्हणजे या सणाला जोडूनच रंगपंचमी येत असल्याने शहरामध्ये होळी पासूनच रंग खेळण्यास सुरुवात होते.
संध्याकाळी गोवरे, लाकडे गोळा करून ती पेटवली जाते. व सणाला पुरणपोळी चा नैवेद्य दाखवला जातो.
पौराणिक कथेनुसार अयोध्याचा राम सीतेबरोबर वनवासात असताना लंकेचा राजा रावण याची नजर सीतेवर पडते आणि तो तीला पळवून घेऊन जातो.रावण अहंकारी, दुष्ट, लालची परस्त्रीची अभिलाषा करणारा होता. म्हणून काही ठिकाणी रावणाची प्रतीकृती तयार करुन ती जाळण्यात येते. म्हणजेच माणसांच्या अंगी असलेल्या या वाईट गुणांचाही होळीच्या या पवित्र अग्नीत नाश व्हावा व एकमेकांबद्दल चांगले विचार निर्माण व्हावे हा एक उद्देश असतो.
“जाळूनी अहंकाराला
जपूया प्रेमबंधाला”
विष्णुचा भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी होलीका या राक्षसणीने प्रल्हादाला मारण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्नीत प्रवेश केला कारण तिला वर होता अग्नी तीला कधी जाळू शकणार नाही, पण ती पापी होती. म्हणून ती अग्नीत जळून गेली अन प्रल्हाद वाचला.
याचा अर्थ चांगल्याचा वाईटावर विजय मिळवणे होय.
महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी करण्याची प्रथा आहे या सणाला पारंपारिक नृत्यही केले जाते. काही ठिकाणी झाडे लावून वृक्षसंवर्धन केले जाते. तर काही ठिकाणी दशावतारी नाटकाचा प्रयोग करतात.
पण या सर्वांचा अर्थ एकच असतो. आपल्यातील जे काही दोष असतील, राग, लोभ, द्वेष, मत्सर हा त्या होळीमधे जळून नष्ट व्हावा. एकमेकांविषयी आदरभाव , प्रेम, माया वाढीस लागावी, माणुस जरी दिसायला इथून तिथून एकच असला तरी त्याचे आचार, विचार, संस्कार वेगवेगळे आहेत.
आजकालच्या माणसांमधे स्पर्धा वाढलीय .आपल्या पुढे जाणाऱ्यांचे पाय ओढायचे, त्याला पाण्यात पहायचे, त्याचे वाईट कसे होईल याकडे मानवी प्रवृत्ती ओढली जातेय. परंतू आपले व इतरांचेही भले व्हावे हा चांगला विचार मनात असावा. इतरांना मदत करावी. स्वार्थीपणा नष्ट व्हावा.तरच मानवाचे आयुष्य कुठेतरी सार्थकी लागेल.
या निमित्ताने माझी एक कविता सादर करते…
होळी
रंग स्नेहाचा
रंग प्रेमाचा
रंग त्यागाचा
रंग होळीचा…
रंगात रंगुनी सारे
दंग होऊनी जाऊ
भेदभाव हे सारे
मिटवून आज टाकू….
होळीचा सण हा
ना जाणी जात -पात
आहेत एक सारे
ऐक्याची सांगतो बात….
रंगांची करुन उधळण
मैत्री अन नात्यात
ठेऊनी मान मनात
भरुया गोडवा प्रेमात…..
सर्व भेदभाव मिटवून आनंदाने होळी साजरी करु….
– लेखन: सौ सीमा तवटे. वडूज
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
💦 सीमाताई यानी.. होळी सण याविषयी छान माहिती दिली. कवितेची फारच सुंदर रचना केली.
Best of luck to next presentation..🎉