गुलाबी थंडी घेऊनि सांगाती,
जानेवारीचा महिना आला ॥ १
दोन दिवस आधीच घाईने,
फेब्रुवारी तो मावळला ॥ २
सप्तरंगांची फुहार उडवीत,
मार्च महिना उजाडला ॥ ३
रंगपंचमी निमित्त होई,
उधाण येई आनंदाला ॥
ग्रीष्म ऋतूची ओळख करवीत,
एप्रिलही की सुरू झाला ॥ ४
तप्त उन्हाचे चटके देऊन,
मे करी व्याकुळ धरणीला ॥५
रिमझिम, रिमझिम, किंचित बरसून,
जून जागवी भूमातेला ॥ ६
अधीर प्रियकरागत, संतत कोसळत,
पाऊस जुलैचा सुखवी वसुंधरेला ॥ ७
काय प्रीतीची वर्णू नव्हाळी ?
ऑगस्टाने किमया केली ॥ ८
नव्या नवरीगत लाजून धरती,
हिरवा शालू लेऊन बसली ॥ ९
‘राखी’ बांधण्या भाऊरायाला,
बहिण घरोघर अधीर झाली ॥ १०
सणासुदीचा सांगावा घेऊनि,
सज्ज होऊनि सप्टेंबर आला ॥ ११
सण गौर, गणपती समीप येई,
मखर, सजावट धांदल होई ॥ १२
साफ _ सफाईची गडबड होई,
गणपती बाप्पा मोरया ll १३
फेर धरुनि नाचू या,
दहा दिवस आनंदात डुंबले,
बाप्पांचे विसर्जन झाले ॥ १४
पण संस्कार नाही विसरले,
पितृपक्षी पितरांचे तर्पणही झाले ॥ १५
नवरात्रीची होई घाई,
व्याघ्रावर बसुनि भवानी येई ॥ १६
गरबा दांडिया झुंबड होई,
रावण दहन, सीमोल्लंघन करऊनि,
अंबा- माता परतुनि जाई ॥ १७
ऑक्टोबर म्हणे मी वर्षाचा राजा,
दिवाळी सण हक्काचा माझा
फराळ, कपडे, आतषबाजी,
झगमग रोषणाई ,
नातलगांची गर्दी होई ॥ १८
भाऊबीजेचा दिन वर्षाचा,
बंधु -भगिनी अतूट प्रेमाचा Il १९
नोव्हेंबर (मार्गशीर्ष) व्रतवैकल्याचा,
उपवास करावा गुरुवारचा,
मनन, चिंतन करण्याचा ll २०
सण, संस्कार, धर्म अनुसरले
विचार करा हो गरजूंचा,
हेच फलित मनन चिंतनाचे ॥ २१
डिसेंबरचा महिना उजाडला,
क्रिसमस तोंडावर आला,
सांताक्लॉज बनून आपण,
दान देऊया दोन्ही हाती Il २२
संदेश समजुनि क्रिसमसचा,
करु साजरा सण वर्षाचा ॥
३१ डिसेंबरचा दिन आला,
चला आतषबाजी पहायला ॥ २३
बारा महिने आले, गेले,
वर्ष संपले, वर्ष संपले Il
आभार मानुनि देवाचे 🙏
करु या स्वागत नववर्षाचे,
करु या स्वागत नववर्षाचे ॥ २४
– रचना : सुलभा गुप्ते. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
वर्ष संपले.खूप छान कविता.प्रत्येक महिना वैशिष्ट्या नुसार सुंदर रीतीने ,
आहे केला वर्णन .
गुप्ते मॅडम ची कविता आवडली.