१. महाराष्ट्राची शान
मराठमोळ्या मायभूमीचा मराठीच बाणा
महाराष्ट्राचा मानबिंदू तो शिवछत्रपती राणा
महाराष्ट्राचे रक्षण करण्या कितीक रणी झुंजले
ताना, येसा, प्रताप, बाजी पावन हो झाले
स्वातंत्र्याचा लढा लढविण्या वीर किती झाले
महाराष्ट्रातील खंदा वीर तो लोकमान्य पावले
बाळ गंगाधर टिळकांनी गाजवले मंडाले
क्रान्तीसूर्य ते सावरकरही अंदमानी झिजले
समाजसुधारक आगरकर नि महर्षि कर्वे,
स्त्री शिक्षण हे ध्येय साधण्या ज्योतीबा धावले
पहिलीच कन्यका भारतीय, परदेशी जाऊन शिकली
महाराष्ट्राची जोशी कुळातील कन्या डाॅक्टर झाली
महाराष्ट्रातील सुविद्य नेते संसदभुवनी गेले
आंबेडकरांचे नाव भारतीय घटनेत लिहिले गेले
महाराष्ट्राने भारतमातेस कितीक वीर दिधले
क्रीडा, शिक्षण, संस्कार, संस्कृती यांचे फुलले मळे
ज्ञानदेव, नाथ, तुका नि नामा समर्थ रामदास
अभंग, ओवी, दासबोधांतून सांगती
जीवनमूल्य अर्थ खास
घेऊन स्फुर्ती, होऊन प्रेरीत संतवीरांसह
राखू महाराष्ट्राचा मान
जात-पात, वाद-विवाद त्यागून
वाढवू महाराष्ट्राची शान
— रचना – स्वाती दामले. बदलापुर
२. श्रमिक तुमच्यासाठी !
मार्कस् बाबा परदेशी जन्मला
जगाच्या कानाकोपरा पेटवला
यंत्राने तोडला कामगाराचा हात
मालकाने दिली नाही साथ ||१||
गिरण्यांच्या धमन्यात लाल रंग पेटवला
श्रीमंतांच्या मुजोरीचा टाळेबंद मांडला
संपाचा उतारा देवून माणूस जगवला
तू कामगारांचा क्रांतिसूर्य झाला ||२||
काॅम्रेड तू मानवतेचा
धर्म दिला हातोडा हाती देवून
दिला अधिकारएक मे ला
कामगार स्वतंत्र केला
स्री पुरुष मानला समान ||३||
श्रीमंतांच्या अहंकाराला दिला तडा,
माणूस झालास
हक्क, अधिकार जगलास
जगी एक पक्ष झालास ||४||
— रचना : डॉ अंजली सामंत. डहाणू
३. व्यथा कामगाराच्या
काम मजुराचे तर
खूप कष्टाचे हाय
रात दिन राबूनही
मोबदला मिळत नाय
ऊन पावसात खपूनही
कुठे पोटभर मिळतं हाय
हक्काची भाषा केली तर
काम ही मिळत नाय
ठेकेदाराशी गोड बोलावं लागतं
ऊठ म्हणलं तर उठावं लागतं
बस म्हणलं तर बसावं लागतं
जिथं तिथं वशिला लागतं
रोज तरी कुठे काम हाय
आज हाय तर चार दिस नाय
पोरांना शाळेत तरी कुठं पाठवाव
खाजगी शाळात पाठवाया पैका नाय
सण होतं उसणं पासणं करून
माय बहिणीला कधी नव लुगडं नाय
बायकोची कधी हौस मौज नाय
कधी संपणार कामगाराच्या व्यथा
गरिबाला किंमत कुठं हाय
मूकपणे जीवन जगतोय आम्ही
कधी मिळणार कामगाराला न्याय
— रचना : अनिसा सिकंदर. दौंड, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800