महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील माझे सहकारी, हितचिंतक श्री निरंजन राऊत यांचा काल रात्री मला फोन आला आणि त्यांनी आठवण करून दिली की, सर ,उद्या ३१ ऑक्टोबर आहे. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन आहे, तर या विषयावर आपण काही तरी लिहा. मी त्यांनाच लिहायची विनंती केल्यावर ते म्हणाले, खरं तर मला लिहिण्याची इच्छा आहे पण तब्येत साथ देत नाही, म्हणून तुम्हीच लिहा. हवं तर माझ्याकडे त्यावेळी लोकराज्य मासिकाचा विशेषांक आहे, तो मी पाठवू शकतो.
राऊत साहेबांचे मन मला मोडवेना आणि इतक्या थोर व्यक्तींविषयी इतकं साहित्य उपलब्ध असतं की, आपण नवीन काय लिहिणार ? असा प्रश्न पडतो. तसा तो मलाही पडला आणि एकदम आठवला ३१ ऑक्टोबर १९८४ चा दिवस, आणि त्या दिवशी माझ्या जीवनात घडलेल्या घटना.
त्यावेळी मी पुणे येथील केसरी वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम करत होतो. ३१ ऑक्टोबर च्या आदल्या दिवशी मला साप्ताहिक सुट्टी असल्याने मी एम एस ई बी मध्ये काम करणारे आणि फुरसुंगी पॉवरहाऊस च्या कवार्टरमध्ये राहणारे माझे वडील बंधू राजेंद्र यांच्याकडे गेलो होतो. दुसऱ्या दिवशी माझी दुपारी दोन ची पाळी होती म्हणून त्या अंदाजाने जेवण करून निघालो. बस स्टॉप वर आल्यावर मला थोड्याच वेळात पीएमटी ची बस मिळाली. त्या बसने मी पुलगेट पर्यंत गेलो. तिथे उतरून बघतो तर काय, सगळीकडे शुक शुकाट होता. बस, गाड्या, दुचाकी, नेहमीची वर्दळ असे काहीच नव्हते. नेमके काय झाले आहे, तेच कळत नव्हते. थोड्या वेळात पोलिसांची एक जीप गाडी आली. ती मी हात दाखवून थांबवली आणि माझे केसरी चे ओळखपत्र दाखवून काय झाले आहे ? अशी विचारणा केली. त्यावेळी पुण्यात केसरी आणि सकाळ ही दोनच प्रमुख वृत्तपत्रे होती. त्यामुळे त्यांचा दबदबा ही खूप होता. माझे ओळखपत्र पाहून जीप गाडीतील पोलीस अधिकाऱ्याने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची दिल्लीत हत्या झाली असून त्यामुळे सगळीकडे बंद चे वातावरण आहे, असे सांगितले. त्याच क्षणी आता ऑफिसमध्ये जाऊन खूप काम करावे लागेल आणि आपण कसंही करून ऑफिस मध्ये पोहोचले पाहिजे, हे माझ्या लक्षात आले. दरम्यान ती जीप गाडी निघून गेली होती.
पूलगेट ते नारायण पेठ हे अंतर चालून जाण्याइतपत जवळ नव्हते, त्यात अशा भीषण वातावरणात एकट्याने पायी जाणे म्हणजे जीवाला धोका ठरू शकतो ही गोष्ट माझ्या लक्षात आली. काही वेळाने पुणे शहराकडे जाणारी दुसरी एक पोलिस जीप आली. ती मी हात दाखवून थांबवली. गाडी थांबताच परत मी माझे केसरीचे ओळखपत्र दाखवून, कसं ही करून मला ऑफिसमध्ये लगेच पोहोचणे गरजेचे आहे असे सांगितले. गाडीतील पोलीस अधिकारी ही भले इसम होते. त्यांनीही लगेच सरकून मला त्यांच्या शेजारी बसवून घेतले . गाडीत मागे तीनचार पोलीस होतेच. सर्व रस्ते निर्मनुष्य होते. सर्व दुकाने बंद दिसत होती. दहा पंधरा मिनिटात आम्ही केसरी च्या ऑफिसमध्ये पोहोचलो.
पहिल्या मजल्यावर असलेल्या आमच्या ऑफिसमध्ये जाऊन बघतो तर, केसरी चे संपादक, श्री चंद्रकांत घोरपडे साहेब; सह संपादक श्री एकनाथ बागुल साहेब; वृत्त संपादक श्री अरविंद गोखले; आमचे संपादकीय सहकारी श्री संजय दिनकर; विद्याविलास पाठक; वि द कुलकर्णी यांची बैठकच चालू होती. केसरी चा खास अंक काढायचे ठरत होते. कुणी कुणी काय करायचे हे सांगण्यात येत होते. मी पोहचताच माझ्यावर ग्रंथालयात जाऊन सर्व संदर्भ साहित्य जमा करून इंदिरा गांधी यांचा तारीखवाऱ जीवनपट लिहीण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. सर्व जण झटपट कामाला लागले. कुणी लेख लिहू लागले, कुणी काही मान्यवर व्यक्तींच्या फोन वरून प्रतिक्रिया घेऊ लागले, घोरपडे साहेबानी थोड्याच वेळात अग्रलेख लिहून दिला आणि अशा प्रकारे अक्षरशः दोनतीन तासात केसरी चा खास अंक तयार करण्यात आला.
खास अंक तयार झाल्यावर दुसऱ्या दिवशीचा प्रमुख अंक पूरवण्यांसह तयार करण्याच्या मागे आम्ही लागलो. ठिकठिकाणचे वार्ताहर त्यांच्या त्यांच्या गावातील बातम्या फोन वर सांगत होते. त्या लिहून घ्याव्या लागत होत्या. युएनआय, पीटीआय या टेलीप्रिंटर वर देशभरातील बातम्या इंग्रजीत येत होत्या, त्यातील वरिष्ठांनी निवडून दिलेल्या बातम्या आम्हाला मराठीत अनुवादित कराव्या लागल्या. अशा प्रकारे रात्री एक पर्यंत सर्व अंक तयार होऊन तो छपाईला गेला. त्यानंतर नेहमीच्या सवयीने मी आणि वरिष्ठ उपसंपादक श्री संजय दिनकर (आता ते हयात नाहीत, पण उत्कृष्ट चित्रपट परीक्षक आणि मिश्किल स्वभावाचे म्हणून ते ओळखले जात) यांनी भल्या मोठ्या एडिटिंग टेबल पेपर टाकून त्यावर अंग टाकून झोपी गेलो.
त्या दिवशीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी आणि दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आज मी श्री अरविंद गोखले साहेबांना (पुढे ते केसरी चे संपादक झाले) फोन करून हा लेख वाचण्यासाठी पाठविला असता, त्यांनी कळविले की,
“केसरी ची खास आवृत्ती आणि दुसर्या दिवशीचा अंक घेण्यासाठी विक्रेत्यांची रांग लागली होती !”
केसरी चे ते दोन्ही अंक मी खूप वर्षे जपून ठेवले होते. पण माझ्या सारख्या सारख्या होणाऱ्या स्थित्यंतरामुळे अनेक कागदपत्रे, अंक, पुस्तके कुठे राहिली, कुठे गेली, कुणास ठाऊक ! पण आजही ते अंक, ती वेळ, ते काम डोळ्यासमोर येते, हे मात्र खरे. असो. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांना विनम्र अभिवादन.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
स्व. इंदिरा गांधींचे आकस्मिक निधन हे भारतीय मनाला धक्का देणारे होते.एक ज्येष्ठ पत्रकार आणि संवेदनशील लेखक भुजबळ सरांनी भावपूर्ण शब्दांत त्यांच्या आठवणी लिहून इंदिराजींना दिलेली उचित श्रध्दांजली आहे.
स्व. इंदिरा गांधी या भारताच्या क्षितिजावरील अढळ तारा.त्यांचे आकस्मिक निधन ही भारतीय समाजमनाला लागलेला मोठा धक्का होता.एक ज्येष्ठ पत्रकार आणि संवेदनशील लेखक भुजबळ सरांनी परिमाणकारकपणे त्यावर लिहिलेला लेख ही अर्थपूर्ण श्रध्दांजली आहे.