Wednesday, December 31, 2025
Homeपर्यटन३ बहिणींची भेट : ३

३ बहिणींची भेट : ३

“गेंडा”

गेंडा या प्राण्याविषयी मला लहानपणापासूनच खूप आकर्षण वाटत आले आहे. कारण माणसाने वैयक्तिक आवड, सर्कस, धार्मिक कारणे, उद्याने अशा अनेक कारणांसाठी वाघ, सिंह, हत्ती, असे हिंस्त्र प्राणी पाळलेले दिसून येतात. तसा गेंडा हा कुणी पाळलेला दिसत नाही.

आपल्याला कित्येकदा हत्तीवर बसलेला माणूस (माहुत) भर बाजारातही दिसतो. पण गेंड्याचा अजस्त्र देह, चित्रविचित्र तोंड आणि त्याचा स्वतंत्र बाणा यामुळे तर या प्राण्याच्या जवळ जाण्याची, हात लावायची सुद्धा आपली हिंमत होत नाही.
अशा या गेंड्यासाठी जगभर प्रसिद्ध असलेले काझीरंगा अभयारण्य पाहण्याची माझी इच्छा आमच्या प्रवासाच्या दहाव्या दिवशी पूर्ण झाली. त्यानिमित्ताने हा वृत्तांत

गेंडा हा शाकाहारी भूचर सस्तन प्राणी आहे. खुरधारी वर्गातील हा प्राणी असून, याचा गण अयुग्मखुरी आहे. खुरधारी म्हणजे पायांना खुर असलेले प्राणी. तर अयुग्मखुरी म्हणजे ज्या प्राण्यांच्या पायाला विषम संख्येत खुर असतात ते प्राणी. अयुग्मखुरी गणात गेंडा हा खड्गाद्य कुळात मोडणारा एकमेव प्राणी आहे. या प्राण्याच्या पायाला तीन खुरे असतात. अयुग्मखुरी प्राण्यांना शिंगे नसतात. त्यानुसार गेंड्याचे शिंग हे खरे शिंग नसून तो एक केसांचा गुच्छ आहे, जो शिंगात रूपांतरीत झाला आहे.

गेंड्यांचे प्रकार :
जगात गेंड्यांचे ५  प्रकार आहेत. त्यातील २ प्रकार आफ्रिका खंडात आढळतात. एक काळा गेंडा आणि दुसरा पांढरा गेंडा. तर दक्षिण आशिया खंडात भारत, नेपाळ व दक्षिण-पूर्व आशियाई देशात ३ प्रकारचे गेंडे आढळतात.

गेंड्याच्या जाती :
आशिया खंडातील गेंड्याच्या तीन मुख्य जाती आहेत.
जावन गेंडा, जो इंडोनेशियाच्या जावा बेटावर आणि व्हियेतनाम देशात आढळतो,
दुसरा म्हणजे सुमात्रीयान गेंडा.
हा गेंडा इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आढळतो.
तिसरी जात म्हणजे भारतीय गेंडा किंवा एक शिंगी गेंडा
हा गेंडा भारतात आणि नेपाळ मध्ये आढळतो.
जावन गेंडा ही जात एकेकाळी उत्तर-पूर्व भारतापर्यत आढळत असे. पण आज ते नष्ट झाले आहेत.

भारतीय गेंडा :
एक शिंगी गेंडे अथवा भारतीय गेंडे भारतात आसाम, पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेश मध्ये आढळतात. तर काही प्रमाणात नेपाळमध्ये पण आढळतात.
भारतात आसाम मधील काझीरंगा येथे मोठ्या प्रमाणात भारतीय गेंडे आहेत.

काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्य :
एक शिंगी गेंड्यासाठी जगभर काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्य प्रसिद्ध आहे. हे अभयारण्य आसाम राज्यातील गोलाघाट, नागाव आणि सोनितपूर जिल्ह्यांमध्ये ब्रह्मपुत्रा नदी आणि कार्बी टेकड्यांमध्ये १०३० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. हे अभयारण्य घनदाट जंगल, उंच गवत, दलदल आणि उथळ तळी यांनी बनलेले आहे. या अभयारण्यातून दिफ्लू नदी वाहते. पुढे ती  ब्रह्मपुत्रा नदीला मिळते. 

या अभयारण्यात जगातील २/३ भारतीय गेंडे आढळतात. भारत सरकारने या  क्षेत्राला १९०९ साली “राखीव वन” म्हणून जाहीर केले. ते १९३७ साली  पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. १९५० साली या क्षेत्राला वन्य प्राणी अभयारण्य तर १९७४ साली राष्ट्रीय अभयारण्य म्हणून भारत सरकारने घोषित केले. तर १९८५ मध्ये युनेस्कोने या अभयारण्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला. 
२०२१ च्या गणनेनुसार या अभयारण्यात २४७९ गेंडे आहेत.

या अभयारण्यात गेंड्यांशिवाय, वाघ, हत्ती, जंगली पाण म्हैस, पूर्वेकडील दलदलीचे हरीण यांसारखे प्राणी आणि अनेक प्रकारचे पक्षी आहेत.
२००६ मध्ये याला वाघांचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. २०२४ च्या गणनेनुसार येथे १४८ वाघ आहेत. 

असे हे अभयारण्य पाहण्यासाठी आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळीच, या अभयारण्याजवळील एका खाजगी रिसॉर्ट मध्ये उतरलो होतो. जागोजागी लाकडांचा कल्पकतेने केलेला वापर, आकर्षक झाडे, फुले, स्वच्छ, सुंदर खोल्या आणि परिसर यांनी आमचे येथील २ दिवसांचे वास्तव्य सुखद केले.

काझीरंगा अभयारण्यात जाण्यासाठी, एका खुल्या जीप मध्ये ५ जण या प्रमाणे व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी आठ वाजता आम्ही निघालो आणि अर्ध्या तासात अभयारण्याच्या प्रवेश दारापाशी पोहोचलो. आपल्याजवळ प्लास्टिक, प्लास्टिकच्या पिशव्या, वस्तू तर नाही ना ? याची कडक झडती या ठिकाणी घेतल्या गेली. आमच्या टुर ऑपरेटर ने पूर्व सूचना देऊनही आमच्यातील काही जणांकडे कळत, नकळत काही पदार्थ असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळल्या. त्यात मी ही होतोच, तर त्या जप्त करण्यात आल्या. त्यामुळे या ठिकाणी बराच वेळ जातो.

प्रत्यक्ष अभयारण्य बघायला दोन तास लागले. गेल्या गेल्या काही जणांनी सेल्फी पॉईंटवर छायाचित्रे काढून घेतली. काही अंतरावर या अभयारण्याची माहिती देणारे फलक, इमारत, स्वच्छतागृह आहे.

अभयारण्यात फिरताना गेंडा दिसला की, वाहनचालक जीप थांबवत असे. बहुतेक गेंडे गवत खातानाच दिसत होते. काही गेंडे बिनधास्तपणे, त्यांच्या चालीने रस्ता देखील ओलांडत. त्यावेळी गेंड्याला जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्याच्या चेहरा तर मला बघवत नव्हता. आणि त्याची कातडी पाहिल्यावर लक्षात आले की, एखाद्या माणसाच्या बाबतीत, “त्या माणसाची गेंड्याची कातडी आहे” असा वाकप्रचार मराठीत का रूढ झाला ते !
तसेच हा गेंडा त्याच्या टक्कर देण्याविषयी सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यामुळे अशा या गेंड्याशी कोण टक्कर घेईल, म्हणा ! पण काही पक्षी मात्र या गेंड्याच्या पाठीवर मस्त बसलेले होते.

ते काय करत आहेत, काय खात आहेत आणि ते गेंड्याचे कसे मित्र आहेत, हे वाहन चालक सांगत होता पण त्याची हिंदी मिश्रित भाषा, शैली यामुळे फार काही कळत नव्हते.

गेंड्याशिवाय आम्हाला हत्ती आणि हरणे सुद्धा दिसली. पण सर्व एकेक करून दिसले. कळपाने कुणी आढळले नाही.

असा हा खरा गेंडा, घरी न्यायची हिंमत न झाल्याने रिसॉर्ट वर परत येताना मी आपला लाकडी गेंडाच घेऊन आलो…
क्रमशः

देवेंद्र भुजबळ

— संदर्भ : गुगल, अभयारण्यातील माहिती
— छायाचित्रण व लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”