“तलाव, धबधबे, गुंफा”
३ बहिणींची भेट या लेखमालेत आतापर्यंत आपण प्रत्येक स्थळ, त्याचे महात्म्य या विषयी स्वतंत्रपणे जाणून घेतले आहे. पण बाकीची बरीच स्थळे, म्हणजे धावती भेट या स्वरूपाची असल्याने ती सर्व या पुढील काही भागात एकत्र देत आहे.
मुळात म्हणजे मुंबईहून विमानाने गुवाहाटी येथे जाण्यासाठी ३ तास लागतात. तर गुवाहाटी येथून रस्ता मार्गे शिलाँग येथे जायला पाचसहा तास लागतात.त्यामुळे मुंबई ते शिलाँग अशी थेट विमानसेवा जेव्हा सुरू होईल, तेव्हा या भागातील पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढण्यास नक्कीच फार मोठी मदत होईल. अर्थात सध्या अशी सुविधा का नाही ? आणि ती उपलब्ध होण्यासाठी कुणी, काय केले पाहिजे, हे या क्षेत्रातील तज्ञ सांगू शकतील. तर अशा प्रकारे पहिला दिवस हा संपूर्णपणे प्रवासात गेला.
शिलाँग :
शिलाँग ही मेघालय राज्याची राजधानी असून आजच्या घडीला हे शहर प्रमुख आर्थिक, सांस्कृतिक व वाणिज्य केंद्र आहे. इंग्लिश ही येथील प्रमुख भाषा असून खासी व गारी ह्या दोन स्थानिक भाषांना राजकीय दर्जा देण्यात आला आहे. येथील भाषा डोंगराळ असून, हवामान सौम्य असते.

उमियाम तलाव :
उमियाम तलाव म्हणजे शिलाँग जवळ तयार करण्यात आलेले एक कृत्रिम जलाशय आहे. हे जलाशय उमियाम नदीला बांध घालून १९६० च्या दशकात तयार करण्यात आले आहे. मेघालयातील हा पहिला जलविद्युत प्रकल्प असून, याला ‘बारापानी तलाव’ म्हणूनही ओळखले जाते. हा तलाव शिलाँगपासून १५ किलोमीटर उत्तरेस असून सुमारे २५० चौ. किमी. परिसरात पसरलेला आहे.

नोहकालिकाई धबधबा :
मेघालयातील चेरापुंजी जवळ असलेला नोहकालिकाई हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा ३३५ मीटर (१,१०० फूट) उंचीवरून हिरव्यागार तलावात पडत असतो. याला “सात नद्यांचा धबधबा” असेही म्हणतात.

अरवाह गुंफा :
अरवाह गुंफा या चेरापुंजीजवळ आहेत. या गुंफा नैसर्गिक कमानदार रचना आणि कोरीव कामांसाठी प्रसिद्ध आहेत. पण आत उंची जास्त नसल्याने खूप वाकून जावे लागते. तसेच तळ भाग हा खूप ओबड धोबड असल्याने खूप तोल सांभाळत आत पर्यंत जावे लागते. आतील भागात दिवसासुद्धा अंधार असल्याने अधून मधून मोबाईल मधील टॉर्च हातात घेऊन चालावे लागते.

मावस्माई गुहा :
चेरापुंजीजवळच्या मावस्माई गुहा या चुनखडीचे थर आणि नैसर्गिकरित्या तयार झालेल्या भूमिगत रचनांसाठी प्रसिद्ध आहेत. या गुहा १२० मीटर लांब असून स्थानिक भाषेत या गुहेला ‘क्रेम मावसमाई’ (Krem Mawsmai) असे म्हणतात.

सेव्हन सिस्टर्स फॉल्स :
मेघालय राज्यातील हा एक प्रसिद्ध धबधबा आहे. हा धबधबा शिलाँग पासून जवळ असलेल्या पूर्वेकडील खासी डोंगरामध्ये आहे. याला नौहसंगिथियांग फॉल्स (Nohsngithiang Falls) असेही म्हणतात. हा धबधबा सात वेगवेगळ्या प्रवाहांमध्ये विभागलेला असल्याने याला सेव्हन सिस्टर्स फॉल्स हे नाव मिळाले आहे.


हा धबधबा १,०४० फूट (सुमारे ३१७ मीटर) उंच असून, सात प्रवाहांच्या रूपाने क्लिफवरून खाली कोसळतो. पर्यटक येथे थांबून कोसळता धबधबा पाहण्याचा आनंद घेत असतात. तसेच छायाचित्रेही मोठ्या प्रमाणात काढून घेत असतात. अर्थात त्यात सेल्फी सुद्धा आल्याच !
क्रमशः

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
