महाराष्ट्र राज्यात सध्या ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना लागू असणाऱ्या शासनाच्या सर्व सवलती साठ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना लागू करण्यात याव्यात अशी मागणी निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी केली.
महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षपदी श्री अण्णासाहेब टेकाळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सानपाडा जेष्ठ नागरिक संघातर्फे, श्री देवेंद्र भुजबळ यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी श्री भुजबळ बोलत होते.
श्री भुजबळ पुढे म्हणाले की, “जेष्ठ नागरिक होण्यासाठी वयाची साठ वर्षे पूर्ण होण्याची अट आहे. तर मग जेष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती मिळण्यासाठी ६५ वर्षे वयाची अट आहे”, या विसंगती कडे त्यांनी लक्ष वेधले.
आपल्या सत्काराला उत्तर देताना श्री अण्णासाहेब टेकाळे यांनी श्री भुजबळ यांनी केलेल्या सूचनेचा संदर्भ देऊन सांगितले की, “६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना लागू असणाऱ्या शासनाच्या सर्व सवलती ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना लागू करण्यात याव्यात अशी मागणी सरकारकडे लवकरच करण्यात येईल. तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना सरकार कडून दरमहा मिळणारी १५०० रुपयांची पेन्शन ३ हजार रुपये करण्यात यावी, अशी ही मागणी सरकारकडे करण्यात येईल”. महाराष्ट्रात सध्या १ कोटी ४० लाख जेष्ठ नागरिक असून त्यापैकी ५३ % महिला आहेत तर ४७ % पुरुष आहेत.
एकून जेष्ठ नागरिकांपैकी ४० लाखाहून अधिक जेष्ठ नागरिक दारिद्य्र रेषेखाली असून त्याना सरकार तर्फे दिड हजार रुपये मिळतात, अशी माहिती देऊन श्री टेकाळे यांनी ‘सर्व ग्रामपंचायती आणि महानगर पालिकांनी शासनाच्या धोरणानुसार जेष्ठ नागरिकांसाठी धडाडीने विरंगुळा केंद्रे उभारावीत’ असे आवाहन करून राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३२ विरंगुळा केंद्रे नवी मुंबईत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
प्रारंभी सानपाडा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री मा ना कदम यांनी संघाच्या वाटचालीचा आढावा घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे जेष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये सानपाडा संघाच्या अकरा सदस्यांना पुरस्कार मिळाले या बद्दल आनंद व्यक्त करून सर्व सदस्यांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे उपाध्यक्ष श्री विठ्ठल गव्हाणे यांनी केले तर प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन सचिव श्री शरद पाटिल यांनी केले. यावेळी सानपाडा नागरिक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800