Home साहित्य 📘पुस्तक परीक्षण : आयुष्याचे धडे गिरवतांना

📘पुस्तक परीक्षण : आयुष्याचे धडे गिरवतांना

1

सुधामूर्तींची ओळख सर्वांनाच आहे. इन्फोसिस फौंडेशनच्या त्या चेअरमन असून इंग्रजी आणि कन्नड या दोन्ही भाषेत त्यांनी विपुल लेखन केलं आहे. त्यांची मन थक्क करणारी स्मरणशक्ती आणि साध्या, सहजसुंदर लेखनशैलीने माझ्या मनाचा ठाव घेतला. विशेष म्हणजे त्यांच्या सर्व पुस्तकाचा प्रमुख भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. २००६ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. इतरही अनेक साहित्य पुरस्कार त्यांच्या साहित्याला मिळालेले आहेत.

सुधा मूर्तींच्या ‘अस्तित्व’ या पुस्तकाबरोबरच ‘आयुष्याचे धडे गिरवतांना’ या २०१६ मधील सहाव्या आवृत्तीचे पुस्तक मी नुकतेच खरेदी केले आणि वाचले. त्यातून अनेक धडे मला प्राप्त झाले. अर्थात हे धडे आपल्या सर्वांनाच लागू होतील असे आहेत.

सुधाजींना जीवन प्रवासात भेटलेल्या विविध व्यक्तींच्या स्वभावामुळे त्यांना वेगवेगळे धडे मिळाले.
मुळात सुधाजींनी हे प्रारंभीच स्पष्ट केलं आहे की, “हे पुस्तक तुमच्या, माझ्या विषयीचे आहे. जीवन नावाच्या या विलक्षण चमत्क्रुतीपूर्ण आणि गुंतागुंतीच्या गोष्टी विषयी आहे. आपल्या सर्वांच्या नशिबात जे काही लिहिलेलं असतं, त्याला तर आपल्याला सामोरं जावचं लागतं.हा आयुष्याचा प्रवास करावाच लागतो.या प्रवासात आपल्याला नानाविध प्रकारच्या व्यक्तिरेखा भेटतात. काही चमत्कारिक, तर काही मन थक्क करुन सोडणाऱ्या, आनंद देणाऱ्या.या व्यक्ती आपल्याला खुप काही शिकवून जातात. आपल्यात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणून आपल्याला संपन्न, समृद्ध आणि परिपक्व बनवतात” या पुस्तकात आपणास अशा अनेक लोकविलक्षण व्यक्ती भेटतात.

या कथासंग्रहात सुधा मूर्ति यांनी या चांगल्या, वाईट आणि सुखकारक, दुःखकारक अनुभवांना अप्रतिम कथारूप दिले आहे. संपूर्ण कथांचा आशय विस्तार भयामुळे शक्य नसले तरी यात एक लोकविलक्षण स्री भेटेल, जिनं आपल्या दोन मुलांना दोन वेगवेगळ्या धर्मानुसार वाढवलं. त्या गोष्टींचा मुलांवर झालेला परिणाम ओघवता सांगितला आहे. एका लहानशा मुलीची कथा यात आहे, जिचं एका रात्रीच्या ट्रेनच्या प्रवासाने अवघं जीवन बदलून जातं.

यात एक माणूस आहे ज्याच्याकडे सर्व काही आहे, धनदौलत, मानमरातब, यश, कीर्ती आणि तरीही तो दुःखी आहे. अशा माणसाची आणि एका कथेतील एक माणूस, ज्याच्या तोंडाची टकळी सतत चालू असते त्याची कथा सांगितली आहे.

‘गुणसूत्रे’ या कथेतील हरीची गोष्ट अप्रतिम आहे. त्यात घडलेल्या प्रसंगावरून सुधाजींना एकच गोष्ट कळून चुकली की माणसाला त्याच्या गुणसूत्रांमधून त्याच्या पूर्वजांची अनुवंशिक दुखणी तेवढी मिळतात पण प्रामाणिकपणा, सचोटी असे गुण अनुवंशिकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अजिबात जात नाही हेंच खरं असल्याचे त्या सांगतात.

‘श्राद्ध’ नावाच्या कथेतील अनुभव खुप काही सांगून जातो. अशा जवळपास २३ कथा या संग्रहात आहेत. सुधा मूर्तींच्या आयुष्यात घडलेल्या या सर्व सत्यघटना
आहेत. एक बुध्दिमान, संवेदनशील लेखिका आणि समाजसेविका या नात्यानं त्यांच चित्रण फारच सुंदर रितीने त्यांनी केलं आहे.

या कथा जशा सुधा मूर्तींच्या आहेत तशा त्या तुमच्या-आमच्या आहेत. सहज सोप्या कथन शैलीतून उलगडत जाणाऱ्या या विलक्षण चमत्काराने भरलेल्या, गुंतागुंतीच्या जीवनाविषयीच्या कथा वाचकांना अंतर्मुख करतात, ‘आयुष्याचे धडे’ देतात. त्या संपूर्ण वाचल्याच पाहिजेत आणि त्यानुसार आचरण केले पाहिजे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

सुधाकर तोरणे

– लेखन : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

1 COMMENT

  1. आयुष्याचे धडे गिरवताना हा तोरणे यांचा लेख वाचनीय आहे.
    सुधा मूर्ती यांची अनेक पुस्तके वाचली. त्या जशा संवेदनशील मनाच्या समाजसेविका आहेत तशाच उत्तम लेखिकाही आहेत. योग्य शब्दांच्या वापरातून त्या संपूर्ण प्रसंग पुढे उभा करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version