Sunday, September 8, 2024
Homeपर्यटनमैत्रीतला प्राणवायू

मैत्रीतला प्राणवायू

“दिवस उगवल्यापासून ते दिवस मावळेपर्यंत घरातील कामे आवरतच नाहीत, कामे आवरण्याचा वेगच मंदावला बाई ! ऑफिस होतं तेव्हा किती पटापट कामं व्हायची अगदी ! काय गं, आपण सुस्तावलो की वयस्कर झालो !” असे संवाद फोनवरून एकमेकींशी होतच असतात. तेव्हा हा आळस नावाचा विळखा पळवून लावण्यास सरसावते, ती आमची सखी अलका !

नवीन ऊर्जा तना मनात निर्माण करण्यासाठी, फोनाफोनी करून, सर्व सख्यांसाठी सहलीचा बेत आखते ती अलकाच ! व्हाट्सअप ग्रुपवर मेसेज वर मेसेज पडू लागले. तर वैयक्तिक फोन करून, सहलीत समाविष्ट व्हा, असे सुचवत राहिलो. कौटुंबिक कारणांना एक दिवस बाजूला ठेवा, असे समजावून झाल्यावर, २२/२३ जणी नावांच्या यादीत पक्क्या झाल्या. मनाची उत्सुकता नि सुदृढ आरोग्याची साथ असेल तर स्वच्छंदी विहार करण्यास सर्वानाच आनंद वाटतो. वयाला विसरून बालमनावर, मोरपंखी हळुवार स्पर्श, सुस्त तना-मनास हलकं करतं. म्हणूनच आम्ही साऱ्याजणी २७/१० रोजी पिकनिक ला जायचा बेत नक्की केला. बस ठरवली. W’app ग्रुप वर सगळे मेसेज करून काय काय सोबत घ्यायचे. कोण कुठे उभे राहणार, बसचा रूट कसा असेल आणि अर्थातच वेळ याच्या सूचना परत परत अलका ने ग्रूपवर दिल्या. बस नं. बस चा फोटो. ड्रायव्हर चे आधार कार्ड, त्याचा फोटो आणि जी पहिली म्हणजे, ज्योती ला बस मध्ये चढताना, तिला फोन करू सगळ चेक करूनच बस बसण्याची मोलाची सूचनाही अलका ने तिला केली. कारण आम्ही सगळ्या साठी पार केलेल्या बायका (मुलीचं 😜). त्यामुळे जरा जपूनच, नीट विचारूनच ज्योतीला सर्वप्रथम बस ने पिकअप केले. तसे ग्रुप वर पटापट मेसेज येत होतेच. खरतर w’app मुळे आता फोन करण्या पेक्षा फास्ट कॉन्टॅक्ट होतं आणि ह्या सोशल मीडिया शिवाय जगणं इम्पॉसिबल झालंय. असो..

बस टप्प्याटप्याने निघताच ग्रुप वर मेसेज येत होते. सर्वांना त्यांच्या ठरलेल्या जागी 5 mnt अगोदरच येऊन उभ राहायच्या सुचना होत्या. शेवटचा पिकअप पंचमुखी मारुती, पनवेल येथे केला नि आम्ही, यादीप्रमाणे नावे मोजू लागलो. २३ जणींमधून चक्क १९ जणी गाडीत होत्या. आता आपला बजेट हलणार ! याची चाहूल लागली. अलकाला मी म्हणाले बघू ! होईल ! काय करणार ? अचानक एक दोघींची तब्ब्येत बिघडली. तर काहींना प्रयत्न करूनही कुटूंब समस्येतून बाहेर पडता आले नाही. असो, बाईचा जन्म हा असाच ! कशातून निवृत्ती न मिळणारा ! तरीही आमचा ग्रुप मोठ्या संख्येने सहलीची मजा घेत असतो. ताळमेळ बसवत, बस मध्ये गप्पा, गाणी, एकत्र भेटल्याचा आनंद घेत आम्ही “प्राची रिसॉर्ट” पिकनिक च्या ठिकाणी येऊन सुद्धा पोहचलो.

हिरव्यागार गर्द झाडांच्या कुशीत हे फार्म हाऊस आहे. अथांग पसरलेली लुसलुशीत गवती हिरवळ, पायांना गुदगुल्या करत होती. प्रवेशद्वारावर सुंदर नाजूक हिरव्या वेली कमानीत सजून, आमच्या स्वागतासाठी सज्ज होत्या. पाच-सहा पायऱ्या चढल्यावर, समोरच छोटा व मोठा स्विमिंग पूल दिसला. निळसर स्वच्छ पाणी शांतपणे आम्हाला न्याहाळत होते. कुतूहलाची बाब म्हणजे, लगेचच तेथील व्यवस्थापिकाने आमची नावे व वय लिहून घेतली. आमच्या हातात रिसॉर्टचा बँड बांधला. तेव्हा अगदी बालपणाची चाहूल लागली. सर्वांनी नाष्टा केला आणि स्विमिंग पुला कडे निघालो. स्विमिंग पुल मध्ये आम्ही काहीजणी उतरताच, नाही नाही म्हणता सगळ्याच स्विमिंग पूल मध्ये उतरल्या, पोहोता येत नसूनही पाण्यात उभ राहून डीजेच्या तालावर नि पाण्याच्या शॉवरमध्ये, सगळ्यांनी नाचण्याचा ठेका धरला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वहात होता. रोजच्या कामातुन वेळ काढून आल्याचा मनसोक्त आनंद होत होता. कमरेच्यावर असलेल्या पाण्यात सगळ्याजणी स्वतःला सावरत मजा घेत होत्या. वयाला विसरून लहानात लहान होऊन गेल्या होत्या.

सूर्याची किरणे डोक्यावर आली होती. पाण्यातून बाहेर पडत, अंगाला उन्हाचा गरमपणा शेकोटी सारखा वाटत होता. त्यातच फोटो साठी भरपूर पोझेस मिळाले. मनसोक्त गप्पा नि झोपाळ्यावर झोके घेत, जेवणाची वेळ येऊन ठेपली. जेवण तयार होते. सर्वांना सडसडून भूक लागल्याची जाणीव झाली होती. सगळ्यांनी तेथील आचारी दादांचे कौतुक करत, चविष्ट जेवणाचा सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला.

आता आम्ही खेळांच्या स्पर्धांना सुरुवात केली होती. समोरच मोठा हिरवळ लॉन होता. त्यासमोर मोठा स्टेज होता. आम्ही ती जागा निवडली नि खेळ सुरू केले. पहिला खेळ म्हणजे, दोघींच्या पाठीच्यामध्ये फुगा ठेवून चार राऊंड पूर्ण पार करणे, यातून आपण आपल्या पार्टनर ला सांभाळून घेत फुगा फुटणार नाहीं आणि दोघांमधुन सटकणार नाहीं, असा हा खेळ ! प्रत्येक जोडीला टाळ्या वाजवून, बाकी साऱ्या प्रोत्साहन देत होत्या. या खेळात अंतिम फेरीत जाणाऱ्या जोडीला, चार राउंड ही स्पर्धा खेळावी लागली होती. यामध्ये विजेती जोडी ठरली, प्रभा-वर्षा. दुसरा खेळ रंगला तो, बादलीत चेंडू टाकणे ! प्रत्येकीला सहा चेंडू टाकायचे होते. या खेळाची विजेती ठरली, वर्षा. पुढचा खेळ होता, पाच रंगांची नावे एका मिनिटात जोडणे. मिनिट काट्यावर अलकाने धरलेला जोश, स्पर्धेला रोमांचित करून टाकत होता. यामध्ये विजेती ठरली, दीपा. शेवटचा खेळ होता, पिंग-पँग-पाँग, तिघींचा गट करून हा खेळ खेळलो. यात शुभाने पर्यवेक्षक म्हणून उत्तम कामगिरी केली. या खेळात तिघींचा गट बाद होत होता. अखेर विजेता गट ठरला, विद्या-अनिता-वर्षा. सगळ्या जणींनी वय विसरून, खेळाचा आस्वाद घेतला. खेळांच्या धमालीत, सूर्य मावळतीला आला, ते कळलेच नाही. चहासोबत कांदाभजी, बटाटाभजी असा चविष्ट नाष्टा करून, परत फिरण्याची वेळ झाली. अचानक काहीजणी न आल्यामुळे आमचे बजेट थोडे कोलमडले होते. पण राहिलेल्या छोट्या बचतीतून आम्ही ते सावरून घेतल. तसेच विजेत्यांना बक्षीस दिले जाईल ! हा आनंद अधिकचा पदरी मिळाला.

सर्व मैत्रिणी ताज्या टवटवीत दिसत होत्या. चेहऱ्यावर हास्य खुलले तर होतेच, पण छान छान ड्रेस बदलून, लहान लहान अगदी डॉलीगर्ल झाल्या होत्या. कोण म्हणतं, आम्ही साठीच्या झालो आहोत ! एकमेकींबरोबर, सेल्फी तसेच वेगवेगळ्या ठिकाणी फोटो काढले जात होते. हीच आठवणीची शिदोरी घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो. बस मध्ये गप्पांना उत आला होता, आजचा दिवस खुप मजेत कसा घालवला आणि परत एकदा लवकरच एक रात्र रहायची पिकनिक काढू या असा सुर प्रत्येकीचा होता. आपल्या ठिकाणी उतरताना, प्रत्येकीचे पाय जड झाले होते. बाय बाय करताना डोळ्यात परत लवकरच भेटू असे आश्वासन होते. मैत्रीचा थोडासा प्राणवायू, आमच्यात खूपशी ऊर्जा आणि निखळ हास्याची पुंजी देऊन जातो हेच खरे. निघताना ड्रायव्हर चे आभार मानून आम्ही घरी परतलो.
अशी ही आमची पिकनिक साठाउत्तरी सफळ संपूर्ण 🤝🤝🤝

वर्षा भाबल.

— लेखन – सौ. वर्षा म. भाबल.

— संपादन – अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments