दिवाळी आणि रांगोळी या घट्ट मैत्रिणी आहेत. रांगोळी शिवाय दिवाळी होऊच शकत नाही.
हल्लीच्या रांगोळ्या वेगळ्या, काळाप्रमाणे बदललेल्या.
वेळेअभावी, बाजारात मिळणाऱ्या ….रेडिमेड, वेगवेगळ्या आकर्षक माध्यमातल्या. फोल्डिंगच्या. कोणीतरी केलेल्या, पण आपले दार सजवणाऱ्या !
नाहीतर संस्कार भारती सारख्या! सुंदर रंगावर, पांढऱ्या जाडसर रांगोळीने गालिच्या सारख्या काढलेल्या!पटकन मनांत भरणाऱ्या!अर्थात पारंपारिक पध्दतीने काढलेल्या ठिपक्याच्या रांगोळ्या काही घरांच्या दारासमोर अजूनही दिसतात !
पण मी सांगणार आहे प्रदर्शनात काढल्या जाणाऱ्या रांगोळ्यांबद्दल! ज्या काही जणांनी कधी पाहिल्याही नसतील.
त्यासाठी मी १९७२ सालचा माझा अनुभव सांगणार आहे…
एकदा दिवाळीत, मुंबईत दादरला गेले होते. तिथे कित्ते भंडारी हॅाल जवळ पाटी दिसली “रंगावली प्रदर्शन…… रंगावलीकार – गुणवंत मांजरेकर…”२० पैसे तिकीट “.. हे ही नविन होते …
रांगोळी रस्त्यावर, अंगणात, गॅलरीत गेरूवर काढायची ! त्याला कसले पैसे ? कसले तिकीट ? असेच वाटले ..
आम्ही गॅलरीत, चाळीत, मजल्यावरच्या सगळ्या मुली मिळून रांगोळी काढत होतो. त्यावेळी जसं कोणाच्याही घरात, मनांत डोकावत असू, तसंच एकमेकींच्या रांगोळीतही हक्कानी डोकावतां यायचे, मदत करता यायची. तेव्हा आमची रांगोळी म्हणजे… ठिपक्यांची, नाहीतर गालिचा, सतरंजी, फुलं, मोर नाहीतर हंस ! त्या पलिकडे नाही.
पण इथली रांगोळी फारच वेगळी होती.
इथल्या हॅालच्या दरवाज्याला पडदा होता. आत गेले, तर क्षणभर काही दिसेचना … हॅालची इतर दारं, खिडक्या बंद होती !त्यांना जाड काळे पडदे लावून काळोख केला होता .. जरा पुढे गेल्यावर पाहिले….. आणि पहातच राहिले ! ही रांगोळी आहे ? काळ्या कारपेटवर हेमा मालिनी, इंदिरा गांधी, अमिताभ बच्चन, सुनिल गावस्कर, स्मिता पाटील ह्यांचे मोठे करून ठेवलेले चक्क फोटो वाटत होते..
प्रत्येक रांगोळीवर २ फुटावर, वायर सोडून, १ शेड लावून दिवा होता ! जरा जवळ गेल्यावर, ती रांगोळी आहे, आणि दिव्यामुळे चकाकते आहे, हे कळले. मी अक्षरश: भान हरपून पहात राहिले.
अशा २५ तरी रांगोळ्या होत्या.. मग स्टेजवर जायला लागले. तिथून खाली पाहिले तर एक मोठी रांगोळी… गुणवंत मांजरेकरांनी काढलेली… अतिशय देखणी .. अतिशय तरल रंग.. पातळ थर रांगोळीचा ! पेंटिंग किंवा फोटो असावा, अशा त्या रांगोळ्या वाटत होत्या…मी अशी रांगोळी कधीच पाहिली नव्हती ….. वेडी झाले … त्या रांगोळीने माझे आयुष्यच बदलून गेले.
ही रांगोळी काढायची पध्दतच वेगळी आहे.
प्रदर्शनात ब्राऊन पेपर जमिनीवर चिकटवून त्यावर रांगोळी काढली जाते. हा पेपर पण अतिशय काळजी घेऊन चिकटवायचा. चारी बाजूने, १ इंच गम लावून, दोघांनी धरून, मध्ये अजिबात चूण येणार नाही ह्याची काळजी घेऊन लावावा लागे. मधे हवा पण रहाता कामा नये ह्याची विशेष काळजी घ्यावी लागायची. मग त्यावर पेन्सिलीने पूर्ण स्केच काढायचे.. अगदी बारीक तपशिलांसह. पूर्ण रांगोळी काढायला २०/२५ तास लागायचे, त्यातले ३/४ तास हे स्केच काढायला लागायचे.
या रांगोळीचे रंगही वेगळे असतात. त्यांना “लेक कलर्स” म्हणतात. खडे असतात, त्याची कुटून पावडर करायला लागते. रंग एकदम पक्का असतो. काळा रंग तर एकदा वापरला, तर हात साबणानीच धुवायला लागतो. त्याशिवाय जातच नाही हाताचा रंग ! आपले साधे रंग पांढरी रांगोळी घातली की फिके होतात, पण ह्या रंगांचे तसे होत नाही. चाळलेल्या रांगोळीत हे रंग हातांनी चांगले घासून एकत्र केले कि हवी ती रंगाची छटा मिळू शकते. गुणवंत मांजरेकर सरांकडे ४ महिने रांगोळी शिकायची संधी मला मिळाली.
तुम्ही कधी एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमात वादकाला तल्लीन होऊन वाद्य वाजवतांना, जवळून पाहिलंय? तबल्यावर वरचे, सतारी वरचे त्यांचे जलद गतीने फिरणारे हात, आणि चेहऱ्यावरचे समरसतेचे भाव…. बघत रहावे असे असतात ना ?
तसेच झाले माझे.. सर रांगोळी काढतांना बघून…खूप शिकायला मिळालं सरांकडून !
आमच्यापैकी सगळेच हौशी कलाकार होते. कोणीच चित्रकला शिकलेले नव्हते. पण पहिल्या दिवशी काढलेली रांगोळी, आणि शेवटच्या दिवशी काढलेले व्यक्ती चित्र, ह्यात जमिन आस्मानाइतका फरक होता. …इतरही रंगांची माध्यमं वापरून चित्र काढणे त्यामुळे सोपे गेले. आमचा ५/६ जणांचा छान ग्रूप जमला .. काही नुकतीच शाळा संपवून आलेली, काही कॉलेज ! बरीचशी दादरची होती, जवळपास रहाणारी ! आम्ही एकत्र येऊन खूप प्रदर्शनं भरवली. सांगायला अभिमान वाटतो की आमची ही मैत्री, ५० वर्ष झाली, तरी पण अजून टिकून आहे … रांगोळीने मला काय दिले ? तर..एक रंगीत आयुष्य दिले, तशी ही जिवाभावाची मैत्री दिली….
आम्ही क्लास मध्ये पहिल्या दिवशी रांगोळी काढायला घेतली आणि इतकं भारी वाटलं म्हणून सांगू ?…. रांगोळीचा स्पर्शच मस्त वाटला!एक ब्लॅक अॅंड व्हाईट देखावा, जुन्या मासिकातून शोधून आणला होता. आकाशातले ढग आणि पाणी जास्त होते .. चंद्र आणि प्रतिबिंब पण होते …प्रत्येक भागासाठी रांगोळी घालायची पध्दत वेगळी, रंग मिक्स करायचं टेक्निक वेगळं… ४ तास कसे गेले कळले नाही. बॅार्डर कशी काढायची ते कळले. पण रांगोळी पुरी झाली नाही.
जातांना पुठ्ठ्यावर काढलेली रांगोळी पुसून टाकायची आणि पुठ्ठा भिंतीला उभा करून ठेवायचा….सरांनी आधीच सांगितलं होतं… इतकं वाईट वाटलं ना पहिल्या दिवशी रांगोळी पुसतांना… आम्ही सगळेच हळहळतं होतो… पण काय करणार ? रांगोळीला हा क्षणभंगुरतेचा शापच आहे ना ! ती जास्त टिकत नाही, आणि इथे तर आम्हालाच दरवेळी पुसायची होती…….
नंतर आठवडाभर मी घरी प्रॅक्टीस केली. घरी जागा नव्हती. स्वयंपाकघरात, ओट्यापुढच्या छोट्या चौकोनात खडूनी स्केच काढायची, मग रांगोळी भरायची आणि नंतर घरी कोणी यायच्या आत पुसून टाकायची.
थोडी जमायला लागले… रांगोळी काढायला पण आणि पुसायला पण ! मग क्लासमध्ये रांगोळी पुसतांना वाईट वाटेनासे झाले.
त्या रांगोळीने मला एक वेगळाच दृष्टिकोन दिला. आपल्या जीवनाचा मी रांगोळीशी संबंध जोडायला शिकले. आपलं जीवन पण या रांगोळीसारखचं नाही का ?…. आपण या जगात येतो, तेव्हा आपली पाटी कोरी असते. आपण नविन नविन गोष्टी शिकतो. आणि आपल्या आवडीचे एकेक रंग त्यात भरत जाऊन .. आपल्या आयुष्याचे चित्र, स्वप्न रंगवत जातो. रांगोळी जशी पुसली जाते, तसे कधी कधी आपल्या आयुष्याचेही होते. अपयश, काही अडचणी, आजारपण, ह्यामुळे आपले आयुष्यही विस्कटते. पण निराश होऊन, कोमेजून न जाता, परत त्या अडचणींवर मात करत, नविन स्वप्न बघायला सुरवात होते…. नव्यानी रंगाची जमवाजमव कराविशी वाटते…..परत नव्यानी ! पुढच्या रविवारी रांगोळी काढाविशी वाटायची, तसेच !…. आपले आयुष्यही क्षण भंगुर आहे. उद्या काय होईल माहित नाही. कधी संपेल, माहित नाही. मग आत्ताचा, आलेला हा क्षण, रंगात बुडून, रंगीत, सुरेख करू या …… हे मला रांगोळीनी शिकवलं !
सर म्हणाले होते, ज्यांची रांगोळी चांगली येईल, त्यांना प्रदर्शनात रांगोळी काढायला घेणार ! … आणखी काय हवं होतं ? ..
मग घरी प्रॅक्टीस जोरात सुरू झाली. त्या वेळी घरच्या काहींच मत, ह्या रांगोळीबद्दल चांगलं नव्हतं…. उगीच गैरसमज ! चांगली घरंदाज लोकं “अशी” रांगोळी काढत नाहीत म्हणे ! “पाहिली का तुम्ही कधी कुठली रांगोळी मी शिकतेय ती ?”…. “नाही !”…… मग उगीचच नकार घंटा कशाला ? पण नविन स्वीकारणे काहींना जमत नाही.म्हणून असा विरोध असतो..
मी एक दिवस बोर्ड आणला आणि घरी त्यावर एक रांगोळी काढली … ती पाहून मग विरोध कमी झाला….
त्यावर्षी प्रदर्शनात, आमच्या ग्रूपमधल्या सर्वांनाच संधी मिळाली … त्याचा आनंदच वेगळा होता !
मराठी नट, शंकर घाणेकरांची, रांगोळी मी काढली. सरांनी एक दोन सुधारणा सांगितल्या.. पण रांगोळी चांगली आल्याचे समाधान मला मिळाले.
१९७३ साली मी दिवाळीत दादरला पहिली रांगोळी काढली. नंतर १९७४ मध्येही मांजरेकर सरांनी मला रांगोळी काढायला बोलावले. ते वर्ष रायगड किल्याला, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला, ३०० वर्ष झाली म्हणून सर्वत्र साजरे होत होते. सरांनीही रायगड हाच विषय घेऊन, रांगोळी प्रदर्शन भरवले होते.
त्यावेळी मी रायगडावरच्या गंगा सागर तलावाची आणि जगदिश मंदीराची रांगोळी काढली होती. किती छान रायगडावरचे फोटो होते. मला तोपर्यंत वाटायचं, रांगोळीला ठराविक विषयच हवेत. पण जसं चित्र काढतांना, काहीही विषय चालतो, तसंच रांगोळीलाही विषयाचे बंधन नाही. काहीही रांगोळीने काढू शकतो, हे तेव्हा कळले. मांजरेकर सरांनी तेव्हा राज्याभिषेकाची मोठी रांगोळी काढली होती. सर आणि इतर काही रांगोळी काढणारे ४ दिवस हॅालवरच रहात असत. सर्व दारं, खिडक्या बंद, लाईट्स, ह्यामुळे उकडहंडी व्हायची नुस्ती… त्यात मांडी घालून, इतके तास बसायचं ! पायाची वाट ! कंबर वाकून दुखायची ! ज्यांनी अशी रांगोळी काढली असेल त्यांनाच कळेल हे सर्व. पण हा त्रास रांगोळी काढतांना जाणवायचा नाही. रांगोळी काढतांना एक झपाटलेपण असायचे !
राज्याभिषेकात जवळ जवळ दिडशे व्यक्ती होत्या. त्यांचे भरजरी कपडे, दागिने, राज्य दरबार, सर्वच बारीक काम! किती पेशन्स हवेत ! सलाम कलाकारांना!ती रांगोळी काढतांना पहाणे, हाही एक आनंद होता.
त्यानंतरही मी काही प्रदर्शनात रांगोळ्या काढल्या. आमच्या घराजवळच्या हॉलमध्ये ६ वर्ष स्वतंत्र प्रदर्शन भरविलें.
८० साली आम्ही भारताबाहेर ॲफिसमधून बदली झाल्यामुळे गेलो. मला वाटले आता माझी रांगोळी संपली. पण मी रांगोळी घेऊन गेले होते. त्यामुळे कुवेत, दुबईलाही मी रांगोळी काढत राहिले. इतकच नव्हे तर तिथल्या महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात तिथे जाऊन रांगोळी काढायला वेळ नसायचा, तर घरी एका बोर्डवर रांगोळी काढून, त्याच्यावर दुसरा बोर्ड झाकण म्हणून ठेऊन, गाडीच्या डिकीत घालून घेऊन रांगोळी घेऊन जायचे. ही रांगोळी चिकटवलेली नसायची. हातांनी चिमटीतून सोडून घातलेली असायची. खूप काळजी घेऊन ती न्यावी लागायची. पुसली जाईल कि काय अशी कायम धास्ती असायची. पण एकदाही ती पुसली गेली नाही.
तिथे पांढरी रांगोळी संपल्यावर समुद्रावरची वाळू घेऊनही रांगोळी काढायचा प्रयत्न केला.
भारतात परत आल्यावर, मी थोडी लहान रांगोळी ,घरी काढून त्यावर काचेचे झाकण ठेऊन (फोटो फ्रेम सारखे) रिक्षातूनही नेऊ लागले. नंतर घरी घेऊन येऊन ती रांगोळी कपाटाखाली, किंवा कोचाखाली ६/६ महिने ठेवत असे. रंग जरा फिकट व्हायचे पण थोडे जास्त दिवस रांगोळी रहायची.
आधी आम्हाला प्रदर्शनासाठी शाळा किंवा एखाद्या हॅालची जागा फुकट किंवा थोडे भाडे देऊन मिळायची. पण नंतर सर्वच कमर्शियल झाल्यामुळे आम्हाला प्रदर्शनासाठी जागा मिळेनाशी झाली. त्यामुळे अशी प्रदर्शनं भरविणे हळू हळू कमी होत गेले. फार कमी ठिकाणी अशा रांगोळ्या आताही काढल्या जातात आणि प्रदर्शनं भरविली जातात. रांगोळीतून पैसे कधीच मिळत नाहीत. कारण विकण्यासारखे त्यात काहीच नसते. आम्ही हौसेखातर, आमच्याच पदरचे पैसे खर्च करून प्रदर्शन भरवली आहेत. रांगोळी ही नेहमीच एक उपेक्षित कला राहिली आहे. त्याचे मात्र वाईट वाटते. तसेच.. इतर आर्टिस्टना मान मिळतो, प्रसिध्दी मिळते, मानधन मिळते तसे ह्या रांगोळी कलाकारांना कधीच मिळत नाही. तरी रांगोळी काढणे रांगोळी कलाकार सोडत नाही.
रांगोळीची सर इतर पेंटिंग ला कशी येणार ? प्रत्येक माध्यमाचं एक वेगळं टेक्निक असतं ! वेगळा फिल असतो ! त्या माध्यमातला निर्मितीचा आनंद वेगळा असतो.
मला ही रांगोळी आवडते. रांगोळी सगळ्यात कठिण, आव्हान देणारी, चुकली तर सुधारायला चान्स कमी असणारी, आणि जमली तर पूर्ण समाधान देणारी, फोटोच्या रूपात आठवण म्हणून कायम जवळ रहाणारी माझी सखीच मी समजते.
— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800