‘काळे पाणी’
अंदमानला पोहोचल्यावर मी समुद्राचा पहिला फोटो माझ्या मुलीला पाठवला तेव्हा तिने विचारले,
“आई, या पाण्याच्या फोटोसाठी तू फिल्टर वापरले आहेस का ?” मी आश्चर्याने विचारले,
“अजिबात नाही पण असे तू का विचारत आहेस ?”
तर ती म्हणाली, “अगं इतके निळेशार, समुद्राचा तळ दिसणारे नितळ स्वच्छ पाणी आहे हे…! मग त्याला ‘काळे पाणी’ का म्हटले जायचे ?”
… आणि त्याला ‘काळे पाणी’ का म्हटले जायचे हे या लेखातून तिला दिलेल्या उत्तरादाखल आपल्यालाही निश्चितपणे थोडेफार जाणून घेता येईल, अशा विचाराने लिहिलेला हा लेख आहे.
सेल्युलर जेल, ज्याला ‘काळे पाणी’ म्हणूनही ओळखले जाते, हे अंदमान आणि निकोबार बेटांमधील कारागृह आहे. या कारागृहाचा वापर भारताच्या वसाहतवादी सरकारी गुन्हेगार आणि राजकीय कैद्यांना ठेवण्यासाठी केला गेला होता. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेक उल्लेखनीय स्वातंत्र्य सैनिकांना येथे तुरुंगात टाकण्यात आले. आता भारत सरकारने हे ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून खास जतन करून ठेवले आहे.
अंदमानातील दुर्गम बेट हे स्वातंत्र्य सैनिकांना शिक्षा करण्यासाठी योग्य ठिकाण मानले जात होते. त्यांना मुख्य भूमीपासून वेगळे केले गेले. मानसिक खच्चीकरण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला. तिथे त्यांचे शोषण केल्या गेले, अपमानजनक वागणूक दिल्या गेली. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात स्वातंत्र्य चळवळीने वेग घेतला होता. परिणामी, अंदमानात पाठवल्या जाणाऱ्या कैद्यांची संख्या वाढली आणि उच्च सुरक्षा तुरुंगाची गरज भासू लागली. ऑगस्ट १८८९ पासून चार्ल्स जेम्स लायल यांनी राज सरकारमध्ये गृहसचिव म्हणून काम केले आणि त्यांना पोर्ट ब्लेअर येथील दंडात्मक समझोत्याच्या चौकशीचे कामही त्यांना सोपवण्यात आले.
सेल्युलर जेल हे ‘स्टार फिश’च्या आकाराचे होते. सात लांबट इमारती मध्यावर जोडलेल्या होत्या. आता फक्त तीनच इमारती आहेत. एकूण ६९६ कोठड्या होत्या. प्रत्येक कोठडीचा आकार ४.५बाय २.७ मीटर (१४.८ फूट × ८.९ फूट) होता आणि त्या कोठडीत हवा येण्यासाठीचा झरोका ३ मीटर (९.८फूट) उंचीवर होता. ‘सेल्युलर जेल’ मधील प्रत्येक कोठडी अशी बनवल्या गेली आहे की कोणत्याही कैद्याला इतर कोणाशीही संवाद साधता येणार नाही. प्रत्येक कैद्याला दुसऱ्या इमारतीचा फक्त मागचा भाग दिसेल, कोणताही दुसरा कैदी दिसणार नाही यामुळे कैद्यांमध्ये संवाद होणे अशक्य होते. ते सर्व एकांतात होते. तुरुंगाच्या कोठडीचे कुलूप अशा प्रकारे तयार करण्यात आले होते की कैद्याचा हात कधीही कुलूपाच्या कुंडीपर्यंत पोहोचू शकणार नाही. कारागृहाचे रक्षक कैद्यांना कुलूप लावून कुलूपाची चावी कारागृहात फेकून देत असत. कैदी हात बाहेर काढायचा आणि दार उघडण्याचा प्रयत्न करायचा पण हात कधीच चावीपर्यंत पोचणार नाही याची त्यांना खात्री होती. अशीच त्याची योजना केलेली होती.
सरदार सिंग आर्टिलरी, दिवाण सिंग कालेपानी, योगेंद्र शुक्ला, बटुकेश्वर दत्त, शादान चंद्र चटर्जी, सोहन सिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर, हरे कृष्ण कोनार, हेमचंद्र कानूनगो, सचिंद्र नाथ सन्याल, शिव वर्मा, अल्लामा फजल-ए-हक आणि खैराबादी दाऊद उपाधी असे असंख्य स्वातंत्र्यसैनिक तिथे होते.
सेल्युलर जेलमधील कैद्यांची परिस्थिती वारंवार बिकट होत होती. कैद्यांचा अतोनात छळ, सक्तीची मजुरी, खराब झालेले अन्न यामुळे अनेकांचा मृत्यू होत होता. सेल्युलर जेलमधील या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून, तुरुंगातील अन्नाचा सुमार दर्जा (म्हणजे निकृष्ट दर्जाचे अन्न ज्यात अळ्या, किडे, कचरा, खडे इ. असलेले अन्न तेही अपुरे) सुधारण्यात यावा यासाठी असंख्य कैद्यांनी उपोषण केले. म्हणजे त्यांनी अन्नत्याग केला तेव्हा त्यांना तुरुंग अधिकाऱ्यांनी त्यांना हातपाय बांधून बळजबरीने खायला घातले. अशा गोष्टींमुळे काही कैद्यांचा अन्ननलिकेला नुकसान पोहोचल्यामुळे आणि श्वासनलिकेत अन्न अडकून मृत्यू झाला. ब्रिटिशांच्या अत्याचाराच्या भीषण कहाण्या ऐकून अंगावर काटा आला. हे सगळं व्यवस्थित जाणून घेण्यासाठी गाईडची आवश्यकता आहे तिथे प्रत्येकासाठी गाईड उपलब्ध आहे फक्त आपण त्या गाईडचे ऐकण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे.
राजकीय कैदी आणि क्रांतिकारक एकमेकांपासून अलिप्त राहावेत अशी भारतातील ब्रिटिश सरकारची इच्छा असल्याने एकांतवासाची अंमलबजावणी करण्यात आली. सेल्युलर जेलमधील बहुतेक कैदी हे स्वातंत्र्य कार्यकर्ते होते. काही कैदीही होते. फजल-ए-हक खैराबादी, योगेंद्र शुक्ला, बटुकेश्वर दत्त, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर, सचिंद्र नाथ सन्याल, हरे कृष्ण कोनार, भाई परमानंद, सोहन सिंग, सुबोध रॉय आणि त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती. १९२१ च्या मलबार बंडात अटक झालेल्या अनेक मोपलांनाही सेल्युलर जेलमध्ये ठेवण्यात आले होते.अलीपूर खटल्यात (१९०८) अनेक क्रांतिकारकांवर खटला चालवला गेला, जसे की बाघा जतीनचा जिवंत सहकारी बरिंद्र कुमार घोष, १९२४ मध्ये त्याच्या रहस्यमय मृत्यूपूर्वी बंगालमधील बेरहामपूर तुरुंगात हलवण्यात आले.
पंजाब माउंटेड पोलिसांचा माजी अधिकारी शेर अली आफ्रिदी हा तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता, ज्याला खुनाच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगावा लागला होता. २ एप्रिल १८६७ रोजी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अपील दरम्यान ही शिक्षा कमी करून जन्मठेपेत आणण्यात आली आणि शिक्षा भोगण्यासाठी त्याला अंदमानला पाठवण्यात आले. मेयोचे सहावे अर्ल, १८६९ पासून भारताचे व्हाईसरॉय, फेब्रुवारी १८७२ मध्ये अंदमान आणि निकोबार बेटांना भेट देत होते तेव्हा आफ्रिदीने त्यांची हत्या केली. शेर अली आफ्रिदीला त्याच्या शिक्षेचा बदला म्हणून अधीक्षक आणि व्हाईसरॉयला ठार मारायचे होते, जे त्याला त्याच्या पात्रतेपेक्षा जास्त गंभीर वाटत होते. त्याने सांगितले की त्याने अल्लाहच्या सूचनेनुसार हत्या केली. त्यानंतर त्याला फाशी देण्यात आली. मार्च १८६८ मध्ये २३८ कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. एप्रिलपर्यंत ते सर्व पकडले गेले. एकाने आत्महत्या केली आणि उर्वरित अधीक्षक वॉकरने ८७ जणांना फाशी देण्याचे आदेश दिले. १९३३ मध्ये कैद्यांच्या उपोषणाने तुरुंग अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. तेहतीस कैदी उपचाराला विरोध करत उपोषणाला बसले. त्यांच्यामध्ये भगतसिंग (लाहोर कट खटला), मोहन किशोर नमादास (आर्म्स ऍक्ट प्रकरणात दोषी) आणि मोहित मोईत्रा (आर्म्स ऍक्ट प्रकरणात दोषी) यांचा सहकारी महावीर सिंग यांचा समावेश होता. जबरदस्तीने अन्न खाऊ घातल्यामुळे या तिघांचा मृत्यू झाला. अनेक प्रकारच्या वेदना देऊन जर या क्रांतिकारकांचा मृत्यू होत नसेल तर त्यांना फाशीची शिक्षाही दिली जायची. एकाच वेळेस तिघांना फाशी देण्याची सोय ब्रिटिशांनी केली होती. आजही ते ठिकाण पाहताना पापणीच्या कडा भिजल्या. फाशी दिल्यानंतर त्यांचा देह जिथे पडायचा ते ठिकाणही आम्हाला दाखवण्यात आले. या जेलमध्ये जागोजागी पाट्या /फलक लावलेले आहेत जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणाची व्यवस्थित माहिती मिळते.
काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांची भली मोठी यादी तुरुंगातल्या मधल्या स्तंभांवर लावलेली आहे. बंगाल, पंजाब महाराष्ट्र इत्यादी भागातून आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची यादी वाचताना गलबलून आले. ‘लाईट आणि साऊंड शो’ संपल्यावर मी फक्त नजर फिरवून सर्व पर्यटकांना पाहिले तेव्हा प्रत्येकाचे डोळे भिजलेले दिसून आले. हा शो हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांतून सादर केला जातो. हिंदीत अभिनेता ओम पुरी तर इंग्रजी शोमध्ये नासिरुद्दीन शहा यांचा भारदस्त आवाज आहे. सुन्न झालेल्या स्थितीत शांतपणे सर्वजण नतमस्तक होऊन तेथून बाहेर पडलो. ज्यांनी हा शो पाहिला त्यांना खरोखरी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची किंमत जाणवेल आणि धर्म- जात -पंथ इत्यादी भारतीयांना विभागणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या दऱ्या मिटून संपूर्ण भारत एकसंध होईल अशा भाबड्या समजुतीतून मी तिथून बाहेर पडले. सेल्युलर जेलच्या भिंती डोळ्यांनी पाहिल्या परंतु त्याच्या आतील चित्कार कानांना अजूनही ऐकू येत आहेत, असे भास होत होते. अजूनही सेल्युलर जेलच्या भिंतीवर हातापायात साखळ्या बांधून देशभक्त क्रांतीकारकांना घेऊन जात असतानाचा प्रसंग डोळ्यासमोरूनच हलत नाही.
आमच्या सोबत असणारे आमचे सहयोगी पर्यटक सावरकरांचे परमभक्त, महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक मा. देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेले ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता”‘ हे पुस्तक सेल्युलर जेलच्या प्रांगणातच माझ्या हाती दिले, त्या क्षणी मी भारावून गेले.
कोण होते ते स्वातंत्र्यसैनिक ? देशप्रेमाने झपाटलेले, देशासाठी सर्वस्व त्याग करणारे ज्यातील अनेकांची नावे काळाच्या ओघात पुसल्या गेली आहेत त्या सर्वांना माझा मनापासून दंडवत. जय हिंद !
संदर्भ- विकिपीडिया
क्रमशः
— लेखन : प्रतिभा सराफ. मुंबई.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खरंच खूपच छान ठिकाण आहे प्रतिभा अंदमानला जावसं वाटतं आहेत
खरंच खूपच छान ठिकाण आहे प्रतिभा अंदमानला जावसं वाटतं आहेत