Wednesday, March 12, 2025
Homeलेखव्हॅलेंटाईन डे स्पेशल

व्हॅलेंटाईन डे स्पेशल

“प्रेमा तुझा रंग….. ?”

प्रेमाचे प्रकार अनेक. प्रत्येक प्रकाराचे रंगही अनेक. आयुष्यात प्रेमाची सुरुवात ही मातृप्रेमाने होते. त्यानंतर पितृप्रेम. त्यानंतर भ्रातृ व भगिनी प्रेम. अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रेमाच्या विविध प्रकारांची आपल्याशी गाठ पडते.
प्रेमा तुझा रंग कसा हे नाव प्रा. वसंत कानेटकर यांच्या एका सुंदर नाटकाचे. प्रेमाच्या अर्थात मी वर्णन केलेल्या प्रेम प्रकारां व्यतिरिक्त, स्त्री-पुरुषांच्या तारुण्यापासून निर्माण झालेल्या प्रेमाच्या विविध रंगांच्या छटा त्यामध्ये खूप सुंदर तऱ्हेने दाखवल्या आहेत.  प्रेम हे  विरोधाभासातूनही निर्माण होऊ शकते. आयुष्यात प्रेमाची जपणूक करताना  विविध प्रकारे अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते.
आपण याच प्रकारच्या प्रेमाबाबत विचार करूया.
प्रेमाचे विविध रंग, त्याच्या विविध छटा आपणाला लहानपणापासूनच श्रीकृष्णाच्या चरित्र प्रसंगातूनच ओळख देऊन जातात. राधा, रुक्मिणी, सत्यभामा, द्रौपदी, मीरा ! 
किती वेगवेगळे रंग!
राधा, मनामनांच्या एकरुपतेमधून शारिरीक ही म्हणता येणार नाही आणि अशारिरीकही म्हणता येणार नाही असे अनोखे प्रेम. मानसिक एकतानता, त्यातून निर्माण झालेले अद्वैत व अद्भुत प्रेमरंग. या प्रेमाला काय नाव द्यावे हे कुणाला समजणारच नाही किंवा कोणतेही नावच देता येणार नाही. पण एक अनोखी सुंदर आणि भावनिक रंगछटा या प्रेमातून व्यक्त होत असते. भावुकतेची उधळण भावनांची जपणूक या सर्वातून निर्माण झालेल्या या विविध रंग छटा !  श्रीकृष्णाच्या बालपणीच्या या अगम्य अद्भुत प्रेमलीलांना कृष्णचरित्रात एक अक्षय अढळ स्थान प्राप्त झाले आहे.

प्रथमदर्शना पासूनच समर्पण भावनेतून निर्माण झालेले अलौकिक प्रेम. प्रथम दर्शनानंतर दुसऱ्या कोणाचाच विचार मनात येऊ शकणार नाही एवढे उत्कट प्रेम ! ही एक अद्भुत रंगछटा रुक्मिणीच्या प्रेमातून दिसते.
प्रेम आणि क्रोध हे एकमेकांच्या विरोधी आहेत का पूरक आहेत याचा संभ्रम पडावा कृतककोपापासून ते क्रोधागाराच्या भितीपलीकडे घेऊन जाणारे, पण प्रेमच ! सत्यभामेच्या या प्रेमाला काय नाव द्यावे ?  एक अनोखा रंग हे चरित्र उधळून जाते.
एखाद्या स्त्रीला भगिनी मानून एक उच्च कोटीचा भगिनी प्रेमाचा उदात्त अनुभव देणारा, कृष्ण द्रौपदीच्या अद्वितीय प्रेमाचा एक अभिनव रंग !
मीरेचे भक्तिमय पण कालातीत असे प्रेम ! शारिरीक आकर्षणापलीकडचे स्वप्निल भावनेतून निर्माण झालेले अगम्य, अनाकलनीय असे भक्तीरसपूर्ण पण कालमर्यादांना भेदणारे प्रेम !
एका श्रीकृष्णाच्या चरित्रातच स्त्री-पुरुष प्रेमाच्या किती विविध रंगछटा पहावयास मिळतात हे एक अद्भुतच.

आपल्याला असे वाटेल की अशा रंगांचे प्रेम अलीकडे कुठे बघायला मिळेल ? एकाच व्यक्तीच्या जीवनात  एवढ्या विविध प्रेम रंगांची उतरण सापडणे अवघड आहे.  परंतु विविध व्यक्तींच्या जीवनात यापैकी काही रंगांची उधळण अवश्य दिसून येईल.
पाहताक्षणी प्रेम ही माझ्या तरुणपणात मला भाकड कथा वाटत असे. परंतु माझाच एक अत्यंत जवळचा मित्र त्याच्या आयुष्यात हे घडले, प्रत्यक्ष ! त्याला मी साक्षीदार आहे. त्यांचे लग्नही झाले. पळून जाऊन नाही. आई-वडिलांच्या संमतीने रीतसर. पन्नास वर्षाचा संसारही झाला. त्या अत्यंत उत्कट आणि सुंदर प्रेमाशी माझा परिचय ही झाला.

अमृता प्रीतम यांचे चरित्र वाचताना एका आगळ्यावेगळ्या आणि उत्कट प्रेमाचा एक नवीन अनुभव वाचायला मिळाला. अमृता व साहिर लुधियानवी. हा त्यांच्या चरित्रातील एक उतारा वाचा.
‘अमृता लाहोरला होत्या तेंव्हा साहिर त्यांना भेटायला त्यांच्या घरी यायचे. घरी आले की या दोघांच्या मनसोक्त गप्पा व्हायच्या. गप्पा मारता मारता साहिर सिगारेटी फस्त करत राहायचे. अमृता मात्र साहिरनी सोडलेल्या धुम्रवलयात आपली स्वप्ने पाहायच्या. साहिर तिथून गेल्यावर त्यांनी पिऊन टाकलेल्या सिगारेटची थोटके त्या गोळा करायच्या, अन हळूहळू त्यांना पुन्हा शिलगावून ओठी लावायच्या ! त्या आपल्या ओठांवर साहिरना अनुभवायच्या ! या नादात अमृतांना सिगारेटचे व्यसन जडले. अमृता साहिरला कधीच विसरू शकल्या नाहीत.’
त्यांचे हे प्रेम शारीरिक पातळीवर कधीच गेले नाही. हा किती अनोखा प्रेमरंग !  अशा तऱ्हेचे उत्कट प्रेम कधी ऐकले नव्हते. बहुधा असे प्रेम हे फक्त अमृता प्रीतम यांचे  एकमेवाद्वितीयच.
त्यांचे संपूर्ण चरित्र हे विविध प्रेमांचा एक अद्वितीय आणि अतिंद्रीय अनुभव देऊन जाते.

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि गोपाळराव जोशी यांचे विरोधाभासात्मक प्रेम. चिडचिडेपणा, क्रोध, धाक ही प्रेमाची अंगे असू शकतात ? परंतु यातून ही  एक विरोधाभासात्मक प्रेमाचे उदाहरण आपणाला दिसते. त्यांच्या चरित्रातून आपल्याला जाणवते. प्रेमाच्या विरोधी अर्थातून प्रेमाचे विविध पैलू आणि प्रेमरंग आपल्याला  अनुभवायला मिळतात.
भगिनी निवेदिता यांच्या चरित्रातून आपणाला भगिनी प्रेमाचे एक अलौकिक दर्शन घडते. साता समुद्रा पार असलेली एक मुलगी एका अनोख्या देशात येते. एका तेजस्वी वाणीने आणि समृद्ध ज्ञानाने प्रभावित होऊन एका परधर्माच्या धर्मकार्यात स्वतःला झोकून देते.  स्वामी विवेकानंदांची ही मानस भगिनीं, त्यांच्या कार्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करते. हे अद्भुत भगिनी प्रेम एकमेवाद्वितीयच.

बाबा आमटे आणि साधनाताई यांचे प्रेम ही सुद्धा मला नतमस्तक करणारी भावोत्कट प्रेमाची कहाणी, साधनाताईंच्या चरित्रात आपल्याला वाचायला मिळते. बाबांच्या कार्यात आपले आयुष्य झोकून देणाऱ्या परंतु वेळप्रसंगी बाबांच्या वैचारिक भूमिकेला विरोधही करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमाची आपणास ओळख होते. बाबा नास्तिक तर साधनाताई देवपूजक. बाबांनी साधनाताईंना त्यांच्या देवधर्मासाठी विरोध केला नाही, पण सहकार्य ही केले नाही. कुष्ठरोग्यांची लग्ने लावण्याबाबत बाबांचा विरोध मोडून काढून साधनाताईंनी त्यांच्या आयुष्यात विविध रंग भरले. प्रेमाच्या समर्पणातून सुद्धा स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्व घडवता येते आणि प्रेमातून फुलवता येते हा प्रेमाचा कुठला रंग म्हणावा ?

या सगळ्या प्रेमाच्या रंगांची उधळण पहात असताना वेगवेगळ्या रंगछटांचे एक इंद्रधनुष्य आपण पाहत असतो या सगळ्या पार्श्वभूमीवर अलीकडे या रंगांतून आयुष्य फुलवण्याला नवी पिढी पारखी होत आहे काय, असे वाटू लागते. या सर्व प्रेमाच्या रंगावरून समर्पणाच्या भावनेतूनही स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवता येते हे वारंवार सिद्ध होत असते, समर्पणाची भावना नसली तरी किमान समन्वयाची भावना ठेवून  तडजोडीने आपले आयुष्य रंगीत करता येते याची जाणीव नवीन पिढीतील अनेकांना का असू नये ?

या सर्व प्रेम रंगातून आणखीही एक रंग त्याबाबत जास्त विवेचन न करता व नामोल्लेख न करता त्या प्रेमाचा उल्लेख करावासा वाटतो.  सामाजिक नीती मूल्यांना तडा देत, स्वतःच्या जीवनात प्रेम रंगाची उधळण करणारी काही उदाहरणे आहेत. समाजाने त्यांना बदनाम केले असेल, बहिष्कृतही केले असेल किंवा त्यांची निंदानालस्ती ही केली असेल. त्यांचे बद्दल अनेक गैरसमज पसरवले असतील. त्यांच्याशी समाज फटकूनही वाढला असेल. परंतु त्यांनी स्वतःचे आयुष्य त्यागाने प्रेमाने आणि समन्वयाने वेगळ्या तऱ्हेने रंगीत बनवले. परंतु हे रंग त्यांच्या आयुष्यापुरतेच मर्यादित राहिले.  समाजात मात्र त्यांच्या प्रेम रंगांची एक ग्रे शेड ज्याला म्हणतो तो फक्त एक पारवा रंगच दिसून आला आहे. हा सुद्धा एक प्रेमाचा रंगच नव्हे काय ?

व्यक्ती स्वातंत्र्याचा हट्टाग्रह न धरता समन्वयाने आणि एकमेकांना पूरक भूमिका घेत भले भांडण होत असेल, भले अबोला होत असेल, भले चिडचिड होत असेल, काहीही असो. परंतु प्रेमाच्या भावनेने एकमेकांना धरून ठेवण्यातच रंगांची उधळण होत असते हे नवीन पिढीतील मुलांना समजावून सांगण्याची खरोखरच गरज आहे असे वाटते. त्यासाठी मी एक विशेष मंगलाष्टक बनवले होते.  सावधानता ही लग्नातच अधोरेखित का केली जाते हे समजले पाहिजे.

शुभमंगल सावधान………

शुभमंगल जरी आज होतसे, जीवनी सावधचित्त असावे
शुभमंगल या दिनी म्हणूनी, सारे म्हणती सावधान,
शुभमंगल सावधान………

मुखी कुणाच्या वह्नी येता, दुज्या मुखाने पाणी व्हावे
मी मी तू तू कुणी बोलता, दुज्या मुखाने मौनी व्हावे
एक मुखाने मौनी होता, दुज्या मुखाने प्रेमी व्हावे
दिनी आजच्या शुभमंगल पण, जीवनी सावधचित्त असावे
शुभमंगल जरी आज होतसे, जीवनी सावधचित्त असावे
शुभमंगल या दिनी म्हणूनी, सारे म्हणती सावधान,
शुभमंगल सावधान………

कुणी कुणाला काय बोलले,
भांडण मिटता विसरुन जावे
मोठ्यांचे कटुबोल कोणते,
मनात कधीही नच ठेवावे

मनास होता जखम कोणती,
प्रेम दुज्याचे औषध व्हावे
दिनी आजच्या शुभमंगल पण,
जीवनभर ते प्रेम जपावे

शुभमंगल जरी आज होतसे,
जीवनी सावधचित्त असावे
शुभमंगल या दिनी म्हणूनी,
सारे म्हणती सावधान,
शुभमंगल सावधान………

एका क्षणी भाळलात तरीही,
जीवनभर तुम्ही सांभाळावे
क्षण एक पुरे तो तुटण्यासाठी,
जीवनभर जे जुळवून घ्यावे

म्हणून सांभाळावे क्षण क्षण,
कायम सावधचित्त असावे
आज भरून घ्या आशिर्वचने,
जीवन सारे मंगल व्हावे

शुभमंगल जरी आज होतसे,
जीवनी सावधचित्त असावे
शुभमंगल या दिनी म्हणूनी,
सारे म्हणती सावधान,
शुभमंगल सावधान………

सहजीवनाच्या सुरुवातीलाच पुढे येणाऱ्या अनेक अडचणीच्या प्रसंगी समन्वयाची भूमिका घेऊन आयुष्य प्रेममय केल्यास रंगांची उधळण होत राहील. अर्थात हे सर्व तात्विक विवेचन ही वाटेल परंतु आमच्या पिढीच्या सर्वसामान्यांच्या जीवनातही विविध अडचणीचे संघर्षाचे प्रसंग येऊनही आज आमचे सहजीवन यशस्वी झाले असे लोक म्हणतात. परंतु प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव घेताना काय घडत होते हे सुद्धा माझ्या एका कवितेत सांगितले आहे.
*हे आम्हा सर्वसाधारण सामान्यांचे प्रेमाचे रंग.*

काय म्हणावे याला
त्याला आणि तिला
जीवन असह्य होत गेले
पण सहन करत राहिले
त्यालाच जग प्रेम म्हणत राहिले

तो आणि ती
भांड भांड भांडले
थोबाडावे वाटले
पण मन आवरत राहिले
त्यालाच जग प्रेम म्हणत राहिले

त्याला आणि तिला
वेगळे व्हावे वाटले
घटस्फोट घेण्यासाठी
वकील नाही गाठले
त्यालाच जग प्रेम म्हणत राहिले

त्याला आणि तिला
नको संसार वाटले
लेक सून मुलगा जावई
सारे गोत जमले
त्यालाच जग प्रेम म्हणत राहिले

चव्वेचाळीस वर्षे
आमचे तसेच घडले
आम्हालाही तेच मग
प्रेम म्हणावे वाटले
यशस्वी संसार जग म्हणत राहिले

एकटे नको जगणे
असे आता वाटते
तुझ्या आधी मीं
असे व्हावे वाटते
वेगळे काय यात जग म्हणत राहिले

कुणास ठाऊक याला
प्रेम म्हणतात का
आय लव्ह यू
कधीच नाही म्हटले
किती प्रेमळ जोडपे जग म्हणत राहिले

सुनील देशपांडे

— लेखन : सुनील देशपांडे.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अत्यंत उत्कृष्ट लेखन… प्रेमाच्या विविध छटा सुंदर उदाहरणे देऊन रंगवल्या आहेत. खूप खूप धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम