आपल्या विलोभनीय अदाकारीने वर्षानुवर्षे रसिकांना खिळवून ठेवणाऱ्या अभिनेत्री मधु कांबीकर दुर्दैवाने गेली काही वर्षे अंथरुणावर खिळून आहेत. आज ,२९ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्या विषयीच्या हृद आठवणी जागवल्या आहेत , प्रा .डॉ .संतोष खेडलेकर यांनी.
आज मधुताईंचा वाढदिवस. कुणाही जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस म्हटले की मन आनंदाने भरून येते पण मागील काही वर्षांपासून मधुताईंचा वाढदिवस आला की मनात कालवाकालव होते …काही नाती अशी असतात कि जी रक्ताच्या नात्यांपेक्षाही अधिक जिव्हाळा निर्माण करतात … अशा नात्यांपैकी एक नाते म्हणजे माझ्या भगिनी मधुताई कांबीकर आणि माझे नाते. मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्वाचे नाव म्हणजे मधु कांबीकर. अगदी राजदत्त यांच्या शापित सारख्या चित्रपटांपासून ते तमाशावर आधारित एक होता विदुषक ते थेट दादा कोंडके यांच्या ‘ मला घेऊन चला ‘ सारख्या चित्रपटांमध्ये मधुताई चपखल बसायच्या हेच त्यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य. मागील १०-१५ वर्षात ताई सातत्याने संगमनेरला घरी यायच्या .. लक्ष्मीबाई कोल्हापूरकर प्रतिष्ठान म्हणजे ताईंच्या जिव्हाळ्याचा विषय, ताई प्रतिष्ठानच्या अध्यक्ष तर मी सदस्य प्रतिष्ठानचे इतर सदस्य वेळोवेळी बदलले जात होते मी मात्र कायम होतो. प्रतिष्ठानच्या कामाच्या निमित्ताने, कार्यक्रमांच्या निमित्ताने पुण्याला ताईंच्या घरी जाणे व्हायचे. बऱ्याचदा सोबत अनेक मित्र असायचे मुळात त्यांना मधुताईंना भेटण्याची, बघण्याची त्यांच्याशी बोलण्याची इच्छा असायची. माझ्यासोबत कितीही मित्रमंडळी असली तरी मधुताई सर्वाना घरीच जेवणाचा आग्रह करणार …यात सुनवाई शीतल यांची अगत्यशीलता महत्वाची असायची.
‘ सखी माझी लावणी’ हा मधु ताईंचा अतिशय गाजलेला कार्यक्रम. लावणीचा अस्सल बाज असलेला असा कार्यक्रम त्यापूर्वी कधी झाला नव्हता आणि पुढेही होणे शक्य वाटत नाही.पुढे काही कारणांनी हा कार्यक्रम बंद झाला.एकदा आमच्या लक्ष्मीबाई कोल्हापूरकर प्रतिष्ठानचा पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रम होता प्रमुख अतिथी म्हणून डॉ मोहन आगाशे येणार होते. मधु ताई आणि डॉ आगाशे यांनी एक होता विदुषक चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यात ताईंनी डॉ आगाशे यांच्यासमोर एक लावणी पेश केली होती. मी ताईंना आग्रह केला की तुम्ही बालगंधर्वला ही लावणी केलीच पाहिजे. ताई कार्यक्रमासाठी सहावार साडी नेसून आल्या होत्या लावणीसाठी अशी साडी अजिबात योग्य नसते पण माझ्या आग्रहाखातर ताईंनी त्या दिवशी अप्रतिम लावणी पेश केली.
काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ साहित्यिक बलुतंकार दया पवार यांच्या परिवाराच्या वतीने देण्यात येणारा दया पवार पुरस्कार जाहीर झाला योगायोग म्हणजे मधुताई आणि मला एकाच कार्यक्रमात पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकाच कार्यक्रमात बहिण भावांचा सन्मान होण्याचा मराठी कला क्षेत्रातला तो पहिलाच प्रसंग असावा.
एकदा लावणी सम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांच्या अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम होता. प्रमुख पाहुणे होते ज्येष्ठ कलारसिक आणि पुढे सिक्कीमचे राज्यपाल झालेले श्री. श्रीनिवास पाटील साहेब माझे जिवाभावाचे मित्र पानिपतकार विश्वास पाटील साहेब. या कार्यक्रमाला मधुताई, प्रसिद्ध ढोलकीपटू आमचे मित्र पांडुरंगदादा घोटकर हेही उपस्थित होते. गुलाबमावशी सत्काराला उत्तर द्यायला उभी राहिली आणि मावशीला माझ्यासह सर्वांनी लावणीचा आग्रह केला. मावशीनेही फारसे आढेवेढे न घेता लावणी सुरु केली. त्या दिवशी मधुताई सर्दीने बेजार झालेल्या होत्या पण खरा कलाकार त्याच्या जिव्हाळ्याचे काही सुरु झालं कि स्वस्थ बसू शकत नाही …. मधुताईंच तेच झालं.. आजारी असलेल्या मधुताई गुलाबमावशीच्या लावणीवर अदाकारी करू लागल्या … हे बघून आमचे पांडूरंग दादा स्वस्थ बसने शक्य नव्हते.. खर तर तिथे ढोलकी वगैरे काहीच नव्हत पण दादांची बोटे त्यांना चैन पडू देईना .. दादांनी तिथला एक फायबरचा टेबल घेतला तोच ढोलकी म्हणून वाजवायला सुरुवात केली आणि एक अनोखी जुगलबंदी सुरु झाली. भारतातला सर्वश्रेष्ठ ढोलकीपटू टेबल वाजवतोय, एक महान लावणी सम्राज्ञी लावणी गातेय आणि एक तितकीच श्रेष्ठ लावणी नृत्यांगना अदाकारी करतेय … मला वाटते हा क्षण अनुभवणारे आम्ही खरच भाग्यवान होतो.
अशा कितीतरी आठवणी आहेत मधुताई आणि माझ्या परिवारच्या. काही वर्षांपूर्वी मुंबईला एका कार्यक्रमात नृत्य करीत असतानाच मधुताई रंगमंचावर कोसळल्या. तेव्हापासून त्या कोमातच आहेत. कुणालाही ओळखत नाहीत … मी जेव्हा पुण्याला ताईंना भेटायला जातो तेव्हा मी त्यापूर्वी बघितलेली माझी सुंदर ताई… भरभरून गप्पा मारणारी ताई डोळ्यासमोर येते… अंथरुणावर असहायपणे पडून असलेल्या ताईंना बघताना मनाला असंख्य वेदना होतात. शून्यात डोळे लाऊन फक्त इकडे तिकडे बघणाऱ्या ताईंना त्यांच्या सूनबाई कानाजवळ जाऊन सांगतात, ‘बघितलं का ताई कोण आलाय ? संगमनेरहून खेडलेकर आलेत भेटायला… मग मी हळूच बोलायला सुरुवात करतो जुने कलाकार…लक्ष्मीबाई कोल्हापूरकर … 3 डिसेंबरचा दरवर्षीचा कार्यक्रम… राजदत्तजी … असं काही काही सांगायला सुरुवात करतो आणि हळूच ओळख पटते … मधुताई पूर्वीप्रमाणेच गोड हसतात…आणि माझा हात घट्ट धरतात … ओठ पुटपुटायला लागतात पण शब्द फुटत नाही … पण या हृदयीचे बोल त्या हृदयी थेट पोहचतात .. आम्ही मग डोळ्यांनीच खूप गप्पा मारतो …ताई हतबल असतात मनात कालवाकालव सुरू होते …मग मी फार वेळ नाही थांबू शकत तिथे ..नाही बघू शकत कधीकाळी माझ्या सदैव हसऱ्या मधुताईंना त्या अवस्थेत… आता पुण्याला जाणे होते पण मधु ताईंना अशा हतबल अवस्थेत बघवत नाही .. मनात कुठेतरी आशा आहे की ताई याही संकटातून, आजारपणातून बाहेर येतील. मला घरात येताच थोरल्या बहिणीच्या मायेने आलिंगन देणारी… जेवणाचा प्रेमळ आग्रह करणारी… खूप गप्पा मारणारी ताई भेटेल .. ताई लवकर बऱ्या व्हा याच आजच्या तुमच्या वाढदिवशी शुभेच्छा.