Saturday, July 5, 2025
Homeलेखलालबत्ती

लालबत्ती

असा भेटला परमेश्वर…
तिने रजियाचं नाव घेतल्यावर मी लगेच विचारलं, “क्या हूआ था ? कौनसी पुडीया दी थी उसे ?” तिला कसली तरी कबुली द्यायची होती माझ्या जवळ हे कळलं होतं मला.

आता तिचा गळा दाटून आला होता. ती म्हणाली, “वो रजिया को बूखार था, तब नानी ने कोई पुडिया दी थी उसे देने को. मैने सारी दे दी. फिर थोडी देर बाद रजिया को उचकीया आने लगी थी. और उसका बदन ठंडा पडने लगा. मै घबरा गई उसको नानी के पास ले गयी. नानी को अस्पताल ले जाने को कहा, तो मेरे पर चिल्लाने लगी. मुझे खोली मे वापस जाने को बोली. मैं भी चली आयी वापीस. दीदी, रजिया को साथ लाना चाहिए था ना ? मेरी गलती हैं. उसके बाद रजिया मर गयी और उसको नानी ने फरशी खोल कर दबा दिया ऐसा पता चला.”

अश्रू डोळ्यातच कोरडे करण्याची कला तिला अवगत होती. ती थांबली जरा वेळ. मग माझ्या डोळ्यात स्वतःचा पश्र्चाताप बघण्याचा प्रयत्न करू लागली. तिला अपराध्यासारखे वाटू नये म्हणून मी तिला म्हणाले, “आप अभी अष्पाक के लिये सोचो. उसे पढाई करने दो. उसकी जिंदगी अच्छी हो जाएगी”. तिने हो म्हणत कमरेला खोचलेली एक छोटी पिशवी काढली आणि त्यातून जुनी चांदीची महादेवाची मूर्ती मला दाखवत म्हणाली, “दीदी इधर सब लोग रखते है, ये मूर्ती तो मैने भी रखी थी. लेकीन अब पुरानी हो गयी है और वैसे भी मेरे लिये तो ये आंखे बंद करके ही तो बैठे हैं. शायद अष्पाक के ही काम आ जाये.” असं म्हणत ती हसली जरा आणि पुढे म्हणाली, “दीदी, इसको बेच के अष्पाक को इंग्लिश स्कूल मे भेज देने का सोचा हैं.” असं म्हणताना ती महादेवाची मूर्ती उजव्या हाताने कुरवाळत होती.

मी म्हणाले, “ये मूर्ती बेच पाओगी आप ?” तिने माझ्याकडे बघितलं आणि परत मूर्ती कडे बघून म्हणाली, “मेरे घर में मां एक देवी की मूर्ती की पूजा करती थी. दिया जलाकर जब मां साल मे कभी एक बार गुड का हलवा बनाती थी, उस दिन भगवान मिल जाते थे हमको. लेकीन जब से घर छुटा हैं, भगवान तो कभी मिले ही नहीं दीदी. शायद अष्पाक के बहाने ही मिल जाये.” डोक्यावर पदर घेऊन हे अध्यात्म जाणणारी ही आई खरं परमेश्वर रूप होती जणु.

आपल्या चांगल्या कृतीतून परमेश्वर चरणी आपली भक्ती अर्पण करणं, या पेक्षा आणखी जास्त कोणाला काय कळेल ईश्वर ?

एक गोष्ट इथे प्रकर्षाने जाणवली होती. ती म्हणजे, बाहेर समाजात, जगात जातीय भेदभाव, त्यावरून भांडणं या सगळ्या गोष्टी इथे तितक्या जाणवत नव्हत्या. कारण ही जागा वेगळ्या तत्वावर निर्माण झालेली होती आणि एक निराळी दुनिया इथे वसली होती. या रेड झोन मधील माता, इतर महिला, लहान मुलं, प्रत्येक व्यक्ती जी इथे गुरफटल्या गेली होती ती व्यक्ती, आपली मुळ ओळख, जन्म जात, स्वतःच खरं नाव, मूळ गाव, आई वडील, नाती गोती हे सगळं हरवून इथे एक वेगळीच आणि त्यांना दिली गेलेली ओळख घेऊन ते इथे जगत होते.

या एका बिहार मधील महादेवाला पूजणाऱ्या महिलेला अष्पाक सारख्या मुसलमान मुलाला सांभाळावं असं वाटलं होतं. तिने आठशे रुपये देऊन त्याला आपल्या सोबत आणलं. शाळेत घातलं आणि आता ती महादेवाची मूर्ती विकून या अष्पाकचं उत्तम शिक्षण करू इच्छिते. तिला वाटतं असं केल्याने कदाचित कुठला तरी देव खुश होईल. किती ही समज आणि इतक्या बिकट परिस्थितीत असताना ही काहीतरी चांगलं करण्याची धडपड !

खऱ्या अर्थाने आज तिला महादेवाचं दर्शन झालं असावं आणि त्या मुर्तीनेच तिला अष्पाकचं शिक्षण करण्याची प्रेरणा दिली असावी.

परमेश्वर किती व्यापक स्वरूपात आपल्यात सामावलेला असतो हे आज मी जाणलं होतं. महादेवाला मूर्ती रुपात कैद न करता त्याची अशी मनोभावे पूजा कोणी कधी केली नसावी. तिने ती चांदीची महादेवाची मूर्ती विकून अष्पाकचं शिक्षण करण्याच्या सुंदर संकल्प करून आपली निर्मळ भक्ती परमेश्वरा पर्यंत निश्चितपणे पोहोचवली होती.

मी पण तिला थांबवलं नाही. मूर्ती विकण्याची गरज नव्हती तशी. त्याची सोय करता आली असती. पण या आईला आज ज्या स्वरूपात परमेश्वर भेटले होते, तिचा तो आनंद मला हिरावून घ्यायचा नव्हता.

अष्पाकला जवळ करून ती आपल्या विस्कटलेल्या बालपणाची घडी बसवू बघत होती. आगीत होरपळलेल्या तिच्या आयुष्याला एक शीतल थेंब आताशी गवसला होता… असा !

डॉ राणी खेडीकर

– लेखन : डॉ. राणी दुष्यंत खेडीकर.
बाल मानस तज्ञ, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments