आईचा हात धरून अगदी छोटा शशांक एकदा बाळ पाहायला गेला होता. बाळाचा पाळणा पाहून तो अगदी हरखून गेला होता. कुतूहलाने त्याने तो हलवून पाहिला. बाळ आईच्या मांडीवर होते. शशांकची आई हळूच त्याला म्हणाली.. ‘शोनू, बाळ पाळण्यात नसताना पाळणा हलवू नये..’ रिकामा पाळणा हे जणु खिन्नतेचे प्रतीक असावे. रिकामा पाळणा काय किंवा रिकामी कोणतीही गोष्ट उणीव दाखविते.
प्रसिद्ध चित्रकार श्री. वासुदेव कामत म्हणतात की, एखादी भिंत रिकामी ठेवण्यापेक्षा त्यावर एखादी फ्रेम लावली तर तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. प्रत्येक गोष्टीला तिची स्पेस हवी…
वय बदलते तसे या पाळण्याचे संदर्भ बदलत जातात. पाळणा ह्या शब्दाची जागा ‘झोका‘ हा शब्द घेते. पाळणा म्हणलं की फक्त आडवा, अगदी थोड्या जागेत मागे पुढे हलणारा, अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. अपवाद फक्त जत्रेतील पाळण्याचा.
तो मात्र गोल गोल फिरणारा..खालून वर.. वरून खाली..परंतु झोका म्हणलं किंवा झोपाळा म्हणलं की मागून पुढे.. पुढून मागे..किंवा एखाद्या मोठ्या घड्याळाचा लंबक काय.. डावीकडून उजवीकडे..
शेवटी हे कालचक्र आहे.दुःखामागून सुखं हे अविरतपणे चालू आहे. असं होत होतच वेळ, काल चक्र पुढे पुढे सरकत असते.
पण मग आता हळू हळू हे ‘झोका होणं ‘ थांबवायचं… झोका होऊ न देता आपण पतंग व्हायचं. तो फक्त उंचच उडला पाहिजे.तो काटला नाही जायला पाहिजे. वाऱ्याचीच सोबत घ्यायची आणि विहरायचं आहे.
पतंगाला उंच उडायला सक्षम हात हवेत. आपल्याला आवडणारी कित्ती कित्ती छान छान माणसे असतात. अगदी आपला जीव ओवाळून टाकावा अशी. त्यांचा आधार घ्यायचा आणि आपला रंग आपण शोधायचा. आपलं आकाश आपण शोधायचं.
श्रीमती शांता शेळके म्हणतात, त्याप्रमाणे आकाश आणि आभाळ यात फार फार फरक आहे. दोन्हीचे अर्थ खूप वेगवेगळे आहेत. आकाश ‘निरभ्रता’ दाखविते, तर ‘आभाळ’ आद्रता…दाटून आलेले ढग…
तर मला वाटते आपण आपले आभाळ नको व्हायला.. आपण ‘आकाश’ शोधूया. आपण शोधू या आपली निळाई…आपली निळाई.. आपली निळाई….

– लेखन : सौ. अनुराधा जोगदेव
-संपादन : अलका भुजबळ. 9869484800
मस्त