Saturday, July 5, 2025
Homeसाहित्यअष्टपैलू ग. दि. मा.

अष्टपैलू ग. दि. मा.

“गीत रामायण” अजरामर करणारे ग. दि. माडगूळकर यांचा आज स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने त्यांचे हे स्मरण…

१ ऑक्टोबर १९१९ रोजी एक बाळ जन्मले. तो मुलगा आहे हे समजताच जमलेल्या सर्वाना खुप आनंद झाला कारण त्या बाईला या बाळाच्या आधी, दोन मुली झाल्या होत्या. त्यामुळे सर्वाना खुप आनंद झाला.

पण जन्मल्या नंतर ते बाळ रडले नाही अथवा हालचाल करत नाही असे दिसताच ते मृत झाले असावे असे सर्वाना वाटले आणि सर्वांना दुःख झाले. त्या बाळाला पुरण्याची तयारी सुरू झाली. इतक्यात सुईण म्हणाली, थांबा. तिने बाळाला मांडीवर घेतले व बेंबी जवळ चुलीलीतील विस्तव नेला. त्याचा शेक लागताच बाळ मोठ्याने रडायला लागले आणि सर्वाना खुप आनंद झाला. हे बाळ खुप नामवंत होईल व घराण्याचे नांव उज्वल करेल असे सर्व जण म्हणू लागले. त्यांचे भविष्य खरे ठरले. ते बाळ म्हणजेच गदिमा.

गदिमा यांचे शब्दांना कोडं पडाव असं व्यक्तिमत्व होते. त्यांनी शब्दांना एकत्र गुंफून आपल्या लेखणी व कर्तुत्वाने विविध क्षेत्रांत ठसा उमटवला.

“आधुनिक वाल्मिकी”
रामायणात वाल्मिकी यांनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे . गदिमा यांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबद्ध केली आहे. गीतरामायणाचे हिंदी , गुजराथी , कन्नड , बंगाली , आसामी , तेलगू , मल्याळी, संस्कृत , कोकणी अशा विविध भाषेत भाषांतर झाले. १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत पुणे आकाशवाणीने गीतरामायण प्रसारित केले.

गीतरामायणामुळे गदिमा यांना “महाकवी” तसेच “आधुनिक वाल्मिकी” म्हणून ओळखले जाऊ लागले.
त्यांनी श्रीकृष्ण चरित्रावर “गीतगोपाल” हे गीतरामायणाच्या तोडीसतोड गीत रचले .त्यांनी अनेक पोवाडे रचले आहेत .

साहित्यक्षेत्र
गदिमा यांचे अक्षर खूप छान होते .त्याकाळचे नामवंत साहित्यिक वि .स .खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करत असताना त्यांना लेखन , वाचन यांची आवड निर्माण झाली. खांडेकर यांच्या सहवासाने त्यांच्यातील साहित्यिक जागा झाला. कथा , कादंम्बरी , आत्मचरित्र , प्रवासवर्णन , बालवाड्मय , नाटक , या सर्व क्षेत्रांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांची ३७ पुस्तकं प्रकाशित झाली. त्यांनी १५७ पटकथा लिहिल्या. प्रत्येक चित्रपट कथा ही कादंबरीच असते. त्यांची जर पुस्तके काढली तर गदिमांच्या नावावर दोनशे पेक्षा जास्त साहित्यकृती जमा होतील.

चित्रपट सृष्टी
गदिमा यांना १९३८ साली “ब्रम्हचारी” या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. गदिमांनी चित्रपटगीते , चित्रपट कथा -संवाद लिहिले , सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. अनेक चित्रपटांत त्यांनी चरित्र अभिनेते म्हणून आपला ठसा उमटवला.
गदिमांनी १५८ मराठी चित्रपटांसाठी कथा लेखन केले. त्यांच्या कथेवर २५ हिंदी सिनेमांची निर्मिती झाली आहे. गदिमांनी सुमारे १४५ मराठी चित्रपटांसाठी सुमारे दोन हजार गीते लिहिली. ८० पटकथा , ४४ मराठी चित्रपटांचे संवादलेखन केले.२३ हिंदी पटकथा,  १० हिंदी चित्रपटकथा , ५ हिंदी चित्रपटांचे संवाद लेखन केले. सुमारे २४ मराठी व एका हिंदी चित्रपटांत अभिनय केला आहे .

मानसन्मान
चित्रपट क्षेत्रांतील विविध पुरस्कार तर गदिमांना लाभलेच , परंतु केंद्र सरकार व राज्य सरकारतर्फे त्यांच्या साहित्यकृतींना अनेक पुरस्कार लाभले .१९६९ साली केंद्रसरकारने त्यांना “पद्मश्री” पुरस्कार देऊन सन्मान केला. १९६२ ते १९७४ अशी बारा वर्ष ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य (आमदार) होते. १९७३ साली यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते .ग्वाल्हेर येथे झालेल्या अ. भा. मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.

गदिमा यांचे १४ डिसेंबर १९७७ रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले. आज जरी ते आपल्यात नसले तरी कीर्तीरुपाने ते अजरामर झाले आहेत. त्यांच्याबद्दल लिहायचे झाले तर शब्द अपुरे ठरतील –

‘ गदिमा ‘ तुमचे गुण वर्णाया
साज शब्दांचे सजले
मुखी तुमचे नाम घेता
कर माझे जुळले !

दिलीप गडकरी

– लेखन : दिलीप प्रभाकर गडकरी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. गदीमा..
    दिव्यत्वाचीच प्रचीती..
    त्यांच्या स्मृतीस आदरांजली..!!!

  2. खूप सुंदर लेखन

    कमीत कमी शब्दात गदिमांच्या
    कर्तृत्वाचा आलेख तुम्ही रेखाटला आहे

    गदिमा ना तुम्ही वाहिलेली आदरांजली
    मनात घर करून राहील

    अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments