Saturday, July 5, 2025
Homeलेखकुटुंब रंगलंय काव्यात - भाग - ८

कुटुंब रंगलंय काव्यात – भाग – ८

‘कोसबाड हिल’ हे ठाणे जिल्ह्यातील (आजचा पालघर जिल्हा) अतिशय निसर्गरम्य ठिकाण ! स्वातंत्र्य पूर्व काळात स्थापना केलेल्या “नूतन बालशिक्षण संघ” या संस्थेच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया रचणाऱ्या देशाच्या बालशिक्षण तज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक व त्यांना सावली सारखी साथ देणाऱ्या समाज सेविका पद्मश्री अनुताई वाघ यांचे कार्य सर्वश्रुत आहे.

आदिवासी व मागास समाजही पूर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये या भूमिकेतून त्यांनी डहाणू सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात मोठे योगदान दिले. अंगणवाडीच्या जनक ताराबाई मोडक यांनी अनुताईंच्या मदतीने कोसबाड टेकडीवरून शिक्षणाचे अनेक प्रयोग यशस्वी केले. “पद्मभूषण ताराबाई मोडक विद्यानगरी” मुळेच कोसबाड टेकडी नावारूपाला आली. त्यांच्या विद्यानगरीत शिशूवर्ग (आजची अंगणवाडी), बालवाडी, प्राथमिक शाळा आणि अध्यापिका विद्यालय (डी.एड्.कॉलेज) या संस्था ताराबाईंनी सुरू केल्या आहेत. त्यांनी सुरू केलेली ‘ग्राम बाल शिक्षा संघ’ ही संस्था ताराबाईंच्या पश्चात अनुताई वाघ चालवत होत्या.

‘आभाळ वाजलं, धडाड धुम।
वारा सुटला सू सू सुम्म।
वीज चमकली, चक चक चक।
जिकडे तिकडे लक लक लक।।’

ही कविता शिशूंसाठी लिहिणाऱ्या प्रसिद्ध समाज कार्यकर्त्या, पद्मश्री अनुताई वाघ संस्थेचं मुखपत्र ‘शिक्षण पत्रिका’ च्या संपादक म्हणून ही काम पहात होत्या.

नाशिकच्या बी.एड्. कॉलेजच्या प्राध्यापिका अनघा थत्ते यांनी अनुताई वाघ यांना दिलेलं पत्र घेऊन मी कोसबाड हिल वर पोहोचलो. स्वतः अनुताईंनी माझं स्वागत केलं. ताई वृद्धापकाळाकडे झुकलेल्या. डोळ्यावर जाड भिंगांचा चष्मा, त्यांना एका डोळ्यानं कमी दिसत होतं. त्यामुळं डोळ्यावरचा चष्मा कपाळावर ठेवून जाड भिंगाच्या सहाय्यानं त्यांनी थत्ते मॅडमचं पत्र वाचलं. मातृतुल्य व्यक्तिमत्त्व असणाऱ्या अनुताईंनी त्यांच्या संस्थेचा परिसर मला दाखवून दिला.

गुडघ्याच्या दुखण्यामुळे दोन मुलींच्या आधाराने माझ्या बरोबर चालणाऱ्या अनुताईंचा उत्साह पाहून मी थक्क झालो. त्यांच्याच सांगण्यावरून मी व्दितीय वर्ष डी. एड्. च्या वर्गावर एक तासही घेतला व गदिमांची एक कविता शिकवली.

दुसऱ्या दिवशी डी.एड्. च्या सर्व मुलींसाठी माझा कार्यक्रम करायचे ठरले. तिथल्याच एका शिक्षकांबरोबर माझी रहायची व्यवस्थाही झाली.
डी.एड्.कॉलेजचा माझा शैक्षणिक कार्यक्रम जबरदस्त झाला. त्यामुळे अनुताई मला म्हणाल्या,
“विश्वनाथ, तू आठवडाभर इथे रहायचं. आमच्या शिशूवर्गापासूनच्या सगळ्याच मुलांना, तुझ्याकडे असलेल्या सगळ्या कविता ऐकवायच्या, नंतर माझ्या कविता घेऊनच कोसबाड सोडायचं !” ताईंचा हा आग्रहाचा आदेश मी मोडू शकलो नाही, आठवडाभर कोसबाडला थांबलो.

या आठ दिवसात अनुताईंना मी खूप जवळून अनुभवलं. शिक्षणाविषयी तळमळ, शिकविण्यासाठी चाललेली त्यांची धडपड, डोळ्यांना त्रास होत असूनही ‘शिक्षण पत्रिका’ च्या संपादनाचं काम आत्मविश्वासानं करणं हे सगळं थक्क करणारं तर होतच, शिवाय ते मला अनुकरणीय वाटलं. खूप शिकायला मिळालं. अनुताईंचा निरोप घेऊन कोसबाड सोडताना त्या मला म्हणाल्या, “विश्वनाथ, इथून नाशिकला जाताना वाडा, मोखाडा, जव्हार हे आमच्या ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तालुके तुला पहायला मिळतील. या निसर्गरम्य परिसरात राहणाऱ्या आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा चालविल्या जातात. तुझ्या शालेय कार्यक्रमासारखे कार्यक्रम या मुलांना कधीच अनुभवायला मिळत नाहीत. त्या मुलांसाठी तू कोणतेही मानधन न घेता तुझे कार्यक्रम सादर करावेस, असे मला वाटते.” “हे कार्यक्रम मी नक्की करेन, मला आशिर्वाद द्या !” असे म्हणून मी ताईंना नमस्कार केला व निरोप घेतला.

ताईंनी सांगितल्याप्रमाणे वाडा गावातील एका ज्युनियर कॉलेजच्या रानडे नावाच्या प्राचार्यांना मी जाऊन भेटलो. भंडारा (आजचा गोंदिया) जिल्ह्यातील आमगावच्या एका कॉलेजच्या प्राचार्य पदावरून निवृत्त झाल्यानंतर, विश्व हिंदू परिषदेच्या आदेशानुसार, वाडा गावातील ज्युनियर कॉलेजच्या उभारणी साठी रानडे सर वाड्याला आले होते. प्राचार्य पदावरून हे काम सर सेवा भावनेतूनच करीत होते, कोणत्याही मानधना शिवाय ! त्यांच्या कॉलेज वरील कार्यक्रम सुद्धा चांगलाच रंगला, त्या रात्री मी रानडे सरांच्या खोलीवर मुक्काम केला. सर कवितेचे मोठे रसिक असल्याने ती रात्र आम्ही कविता ऐकण्यात व ऐकवण्यात घालवली.

आणीबाणीच्या काळात रानडे सर नागपूर जेलमध्ये होते. तिथे गणेश चौधरी या कवी बरोबर सरांची मैत्री झाली. जळगाव जिल्ह्यातील एका शाळेत चौधरी शिक्षक होते. त्यांना आलेल्या वेडाच्या झटक्यात त्यांनी बायको-मुलांचा खून केला होता. म्हणून ते नागपूर जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. गणेश चांगले कवी होते. रानडे सरांनी त्यांच्या कांही कविता मला ऐकवल्या. पैकी… “डबक्यातल्या डुंबण्याला पोहणं कधी म्हणत नाहीत, आणि झोकून जे दिलं नाही, त्याला जीवन कधी म्हणत नाहीत.!” या ओळींचा परिणाम माझ्या मनावर झाल्याकारणाने “कवितेसाठी जीवन झोकून देऊन काम करण्यावर” मी अतिशय ठाम झालो.

वाडा, मोखाडा व जव्हार या तीनही तालुक्यातील प्रत्येक आदिवासी आश्रम शाळेला भेट देऊन मी माझे ओंकार काव्य दर्शन हे शालेय कार्यक्रम विना मानधन सादर केले. या सर्व शाळा विश्व हिंदू परिषद व आरएसएसच्या वतीने आजही चालविल्या जातात. सरतेशेवटी राजगुरू सरांच्या जव्हार येथील डी.एड्. काॅलेजच्या भावी शिक्षकांसाठी मी केलेला शालेय कार्यक्रम एवढा जबरदस्त झाला की राजगुरू सरांनी वर्गणी काढून मला मानधन दिले. त्या कार्यक्रमाने त्या परिसरातील आदिवासी आश्रम शाळांच्या कार्यक्रमांची सांगता करून मी नाशिकला परतलो.

प्रा विसूभाऊ बापट

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट (सादरकर्ते- कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. प्रा.विसुभाऊ बापट यांनी लिहिलेल्या कोसबाडच्या
    आठवणी वाचून डोळे पाणावले.अनुताईंच्या शब्दाला
    मान देऊन विसुभाऊ तेथे आठ दिवस थांबले व तिथल्या
    आदिवासी विद्यार्थ्यांना व डी.एड.च्या विद्यार्थ्यांना
    छान छान कवितांची मेजवानी दिली.कुटुंब रंगलं काव्यात
    या त्यांच्या कार्यक्रमाने प्रत्येक मराठी माणसाला वेड
    लावलय.माय मराठीच्या या अमृतपुत्रास माझा मानाचा मुजरा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments