नमस्कार, वाचक हो.
विविध उत्सवांमध्ये, प्रत्येक शुभ कार्यात मंदिरामध्ये यात्रेच्या वेळी काही पारंपरिक वाद्ये वाजविली जातात. एका सुरात, एका तालात आणि याचा वैशिष्ठ्यपूर्ण नाद आपसूकच ठेका धरायला लावतो, मंत्रमुग्ध करून सोडतो.
ही वाद्य म्हणजे पंच वाद्य – पाच विविध वाद्यानी मिळून बनलेले. ज्यामध्ये विशिष्ट पूर्ण अशी नाद निर्मिती केली जाते. तिमीला (Timila), मड्डलम (Maddalam), इलातालम (Ilathalam), इडक्का (Idakka) आणि
कोंबू (Kombu) अशी ही पाच विविध वाद्ये मिळून पंच वाद्य बनले जाते.
तिमीला हे एक पंचवाद्य मधील विशेष वाद्य आहे ज्याला दैवी वाद्य मानले जाते. खास फणसाच्या लाकडापासून हे वाद्य बनवले जाते, दोन्ही बाजूचे गोल ज्याच्यावर थाप मारली जाते ते जनावरांच्या चामडी पासून बनवले जातात.
इडक्का म्हणजे वेद आणि कलेचे प्रतीक. ज्याला पंच वाद्य मधील पवित्र वाद्य समजतात. इडक्का हे महत्वाचे वाद्य स्वतः नटराज म्हणजे शिवांनी निर्मिले आहे अशी मान्यता आहे.
जेव्हा इडक्काचा वापर नसेल तेव्हा हे वाद्य जमिनीवर ठेवत नाहीत तर वरती अडकवून ठेवतात. याला बांधलेल्या चौसष्ट दोऱ्या म्हणजे चौसष्ट कला आणि सहा छिद्रे म्हणजे सहा शास्त्रे असे समजले जाते.
मड्डलम हे थोडेफार आपल्या ढोल सारखे असते. जनावरांच्या चामडी पासून बनवलेले आणि याला बांधलेल्या दोऱ्याही चामड्यापासूनच बनवल्या जातात.
वाजवताना बोटांना इजा होऊ नये म्हणून बोटांवरती आवरण घातले जाते जेणेकरून सूज येऊ नये किंवा काही त्रास होऊ नये.कोंबू हे आपल्याकडील शिंग असते त्या सारखे असते. इंग्रजी c आकारासारखे असेलेले पंचवाद्य मधील कोंबू हे विशेष वाद्य.
कोंबू वाजवण्यासाठी ३,५,७ किंवा ९ जणांचे समूह केले जातात. हल्ली कास्य या धातूपासून कोंबू बनवले जाते. इतर वाद्याच्या ताला सुरानुसार एकत्र वाजवलेले कोंबूचे स्वर टाकतात.
इलातालम थोडक्यात आपला टाळ जो आपण भजन करताना वापरतो तो. धातूपासून बनवलेले हे इलातालाम. पंच वाद्यपैकी एक खास वाद्य.
पंच वाद्य वाजवताना इलातालमचा आवाज, त्याची स्पंदने, लय म्हणजे क्या बात हैं !!
पंच वाद्याचा अभ्यास करण्यासाठी, वाजवणे शिकवण्यासाठी काही संस्था कार्यरत आहेत ज्या पंच वाद्याचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवतात. नवीन पिढीसाठी संस्कार, संस्कृतीची देणगी पुढे देत असतात, जतन करत असतात असे म्हणायला हरकत नाही.
आजच्या भाषेत म्हणायचे झाले तर केरळमधील हे पंच वाद्य म्हणजे ऑर्केस्ट्राच.. जो
पाहताना ऐकताना वेड लावतो. प्रेक्षकांची दाद, पंच वाद्याचा नाद आणि वाजवणाऱ्यांचा उत्साह एकमेकांना परिपूर्ण करतात.

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील.
पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800