Saturday, July 5, 2025
Homeसंस्कृतीसमाज माध्यमं : दुधारी तलवार

समाज माध्यमं : दुधारी तलवार

“लोकांना कोणतीही गोष्ट सतत आणि उच्चारवात सांगितली की लोकांचा त्यावर विश्वास बसतो”

जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटणाऱ्या अडॉल्फ हिटलरचा प्रचार प्रमुख जोसेफ गोबेल्स याचे स्वानुभवावर आधारित वक्तव्य.

हिटलर जर्मनी चा चँसेलर असताना गोबेल्स याने आकाशवाणी, वर्तमानपत्रे, नाटक, चित्रपट, साहित्य, संगीत या सर्व माध्यमातून हिटलरबद्दल अनेक दंतकथा सतत पसरवून हिटलर हा सच्चा देशभक्त आणि जर्मनी चा तारणहार अशी प्रतिमा तयार केली आणि सर्व जर्मनवासियांचा पाठिंबा मिळवला. यानंतरचा जगाचा आणि जर्मनवासियांचा इतिहास सर्वश्रुत आहेच.

समाज माध्यमांचा करिष्मा
साधारणपणे पहिल्या महायुद्धानंतर सामाजिक माध्यमांचा सर्वच क्षेत्रात वरचष्मा दिसून येत आहे. आजच्या ‘टेक्नोसॅव्ही’ काळात तर या माध्यमांचा सुकाळ झाला आहे. मुद्रण माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे  याचबरोबर ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या माध्यमांवर अनेक क्षेत्रातील मान्यवर आणि सामान्य माणसे एकमेकांशी जोडली गेली आहेत.

भारतातील एक अत्यंत लोकप्रिय क्षेत्र म्हणजे मनोरंजन क्षेत्र. या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती या समाज माध्यमातुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधतात, आपल्या नवीन चित्रपटांची जाहिरात करतात, विविध विषयांवर आपली मते मांडतात. ‘सहस्त्रातील तारा‘ अमिताभ बच्चन पासून ते दैनंदिन मालिकांमध्ये काम करणाऱ्या अनेक  कलाकारांचा यात समावेश होतो. चाहत्यांशी सतत जोडलेले असणे ही या क्षेत्राची गरज आहे आणि ती विविध समाज माध्यमातून भागविली जाते.

अर्थात सामाजिक माध्यमे ही दुधारी तलवार आहे. ती जशी प्रतिमा संवर्धन करतात तस प्रतिमा हननही करतात. माल्कम एस यांच्यामते, “The media’s most powerful entity on earth. They have the power to make the innocent guilty and to make the guilty innocent and that’s the power. Because they control the minds of the masses”

आजच्या करोना साथीच्या काळात अनेक कलाकार सामाजिक माध्यमांच्या साह्याने या साथीच्या विरुद्ध जनजागृती करत असताना आमिर खान, फातिमा सना शेख, अमित सधं या सारख्या हिंदीतील तर सुबोध भावे या मराठी कलावंताने, समाज माध्यमांना राम राम ठोकला आहे किंवा या माध्यमांपासून काही काळ अंतर वाढवले आहे. जान्हवी कपूर, सारा अली खान, विकी कौशल या कलावंतांनी या माध्यमांवरील वावर खूपच कमी केला आहे.

अनेक जाहिरात संस्था आणि ब्रँड तज्ञांच्या मतांनुसार समाज  माध्यमांवर सतत येणाऱ्या करोनाच्या बातम्यांमुळे अनेकांची धास्ती वाढली आहे. त्याचबरोबर एखाद्या घटनेवरील व्यक्तीच्या वैयक्तिक मताचा आदर न करता त्याच्यावर टीकेची झोड उठविणे या गोष्टींचा प्रभाव या निर्णयावर असावा. हल्ली ‘करलो दुनिया मुठ्ठी मे’  अशी घोषणा देऊन स्मार्टफोन सामान्यातील सामान्य माणसाकडे आला आहे. साहजिकच समाज माध्यमांवरचा सर्वच थरातील लोकांचा वावर वाढला आहे. त्यामुळे ख्यातनाम व्यक्तींच्या कुठल्याही  मतप्रदर्शनावर, पेहरावावर त्यांच्या राजकीय मतांवर टीकेची झोड उठविणे (ट्रोल) या गोष्टीत वाढ झाली आहे.

काही वेळेला अतिशय  खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीकाटिप्पणी केली जाते. या माध्यमांवर आपली खरी ओळख लपवूनही आपण ते वापरू शकतो. त्यामुळे काही गंभीर टीकाटिप्पणी (ट्रोल) विरुद्ध पोलीस तपास वगैरे गोष्टी किचकट होतात. यातूनच समाज माध्यमांवर काही वेळेला झुंडशाहीचे वातावरण तयार होते.

आपल्या मराठी मध्ये  समाजात कंपू करून झुंडशाही करणाऱ्यांसाठी  ‘टोळभैरव’ अशी एक संकल्पना  वापरतात. त्यात थोडासा बदल करून समाज माध्यमांवर झुंडशाही  करणाऱ्यांना ‘आधुनिक ट्रोलभैरव’ म्हणण्याचा मोह होतो. सुबोध भावे यांच्या मते ‘ते असं कोणतंही माध्यम वापरू इच्छित नाहीत जे त्यांना सकारात्मक ऊर्जा देत नाही’. यातूनच या माध्यमातील नकारात्मक वातावरण अधोरेखित होते.

अर्थात या समाज माध्यमांच्या सध्याच्या नकारात्मक प्रतिमेला एक ‘रुपेरी किनार ‘ ही आहे.  सामान्य माणसांना भेडसावत असलेल्या कित्येक समस्यांची माहिती या माध्यमांमुळे मिळून स्थानिक प्रशासन आणि काही वेळेला तर माननीय कोर्टाने दखल घेतली आहे. नुकत्याच एका चिमुरडीच्या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी लागणारी सोळा कोटी रुपयांची टोलेजंग रक्कम तिच्या पालकांनी समाज माध्यमांवर केलेल्या आवाहनातून गोळा झाली.

या काळात अनेक कलाकार करोना विरुद्धच्या लढ्यात औषधे, ऑक्सिजन, रुग्णालय उपलब्धता यासाठी प्रयत्न करत असताना या कलाकारांच्या ठळक अनुपस्थितीमुळे त्यांची प्रतिमा हनन होऊन त्यांचे बाजारमूल्य कमी होण्याचा आणि  त्यामुळे मिळणाऱ्या मोठ्या ब्रँड्सच्या जाहिराती कमी होण्याची शक्यता अनेक जाहिरात गुरूंनी व्यक्त केली आहे.

मानसशास्त्र असे सांगते की, कोणत्याही सामाजिक कार्यक्रमांमधून माघार घेणे ही माणसाची आंतरिक भीती दर्शवते. कोणत्याही उदात्त कार्याशी जोडले जाण्यामुळे या ख्यातनाम व्यक्तींची नाळ सामान्य माणसांशी जोडली जाते आणि या व्यक्तींच्या  आयुष्यातील राग, लोभ, निराशा इत्यादी भावभावनांचा निचरा होण्यासही मदत होते. अर्थात प्रत्येक मान्यवर व्यक्तीचा कोणतेही समाजपयोगी काम करणे आणि सामान्य व्यक्तीशी जोडले जाण्याचे मार्ग वेगळे असतात.

कलाकार आपल्यासारखीच  भावभावना असणारी माणसे आहेत आणि  त्यांना वाटणारी धास्ती व्यक्त करण्याची ही त्यांची पद्धत असू शकते. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा आदर करणेच उचित ठरेल.

करोनानंतर जग खूप वेगळं असेल असं म्हटले जाते आणि त्याला सामाजिक माध्यमेही अपवाद नसतील. या माध्यमात मूलभूत बदल दिसू शकतात, कारण करोना साथीत माणूस आपल्या अस्तित्वाचीच लढाई लढतो आहे.

सामाजिक माध्यमांना ‘बाटलीत भरलेला राक्षस’ म्हटल्यास चूक होणार नाही. प्रत्येकाने याचा  वापर आपल्या सद्सद्विवेकबुद्धीनेच करायला हवा.

‘Don’t use social media
To impress people
Use it to impact people

आपल्याला काय वाटते ?

शिल्पा सरदेसाई

– लेखन : शिल्पा सरदेसाई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. Kharay ,aaj social media dware jati bhed,hatrate aani kattarta pasaravinyacha prayatna hotoy tarun pithila chukicha marg aani vichar dakhvila jatoy…he sujan nagrik,lekhak aani samajsudharkanni hanun padla pahije .

  2. उत्तम लेख..सुंदर वैचारिक टिपण.खरोखरच माध्यमे म्हणजे बाटलीतला राक्षस.त्याचा वापर सावधानतेनेच करावा.
    शिलापा सरदेसाईंनी अगदी नेमकं आणि उपयुक्त लिहीलं आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments