लालीवाल्या आईचं बाळ
मी खेळतेय आईच्या उदरात. भोवताली खूप उबदार आणि मखमली आवरण आहे. आई म्हणते “लवकर बाहेर ये, तुझं गोड गोजिरवाणं रूप बघायचं आहे, तुला कुशीत निजवायचं आहे, हाताने भरवायचं आहे.” मी देखील आतुर आहे, माझी आई वावरते त्या जगात यायला. आता आईच्या उदरातून मी हे जग बघतेय…
आज आईच्या हृदयाचे ठोके परत वाढले होते. त्या वस्तीतून जाताना आई अशी अस्वस्थ का होते ? का घाबरते ? माझ्या सारखीच, आईच्या उदरात खेळणारी इतर बाळेसुद्धा त्या वस्तीत आहेत. पण त्यांची आई अशी खूप लाली, पावडर लावून लहान लहान खोल्यांच्या दारा पुढे का उभी असते ? माहीत नाही मला. आणि ती बाळे आईच्या उदरात कधी कधी खूप रडत असतात. ती उपाशी असतील का ? की आई उन्हात उभी असते आणि कोणी कोणी काका वगैरे लोकं त्यांच्या आईला त्रास देतात म्हणून रडतात ? एकदा मी आईच्या उदरातून बघितलं, एक काका तर त्या लाली पावडर वाल्या आईचा हात ओढत होते आणि म्हणून बाळ आत उदरात खूप रडत होतं.
आई आणि मी नेहमीच डॉक्टर कडे जात असतो. आई सगळं पौष्टिक जेवण जेवते. मी आणि ती स्वस्थ रहावं म्हणून, औषध पण घेत असते रोज. पण या बाळांची आई घेत असेल का औषध ? आणि लाली पावडर वाली आई तर फक्त चहा, टोस्ट खाताना दिसते. जेवताना दिसत नाहीत.
मग बाळ काय खात असणार ? बाळ पोटात उपाशी असणार का ? बाळ जर पोटात उपाशी असलं तर त्याला अशक्तपणा येऊन ते जन्माला आल्यानंतर त्याच्यात काहीतरी कमतरता असू शकते असं डॉक्टर आईला नेहेमी सांगत असतात.
मी आता तीन महिन्याची झालेय. माझं बारसं पण झालं. आई बाबांनी माझं नाव रोशनी ठेवलंय. ते मला आपल्या जिवापेक्षा जास्त जपतात. माझे खूप लाड करतात. आणि आज मी पोलियो डोस घ्यायला डॉक्टरकडे जातेय. आम्ही परत त्या लाल दिव्याच्या वस्तीतून जातोय आणि आई नेहमीप्रमाणे झपाझप पाय टाकतेय. आणि अस्वस्थ पण होतेय.
ते बाळ पण माझ्या एवढंच झालंय आता. तिचे नाव बन्नो ठेवलंय तिच्या आईने. तिचे बाबा कुठे आहेत ? ते माहीत नाही. तिच्या घरी म्हणजे खोलीत फक्त तिची ताई आणि आई दोघीच असतात. बन्नो खोली बाहेरच्या ओसरी वर एकटीच पडलेली असते कितीदा. आता ती खोलीत असणार. तिला झोपायला झोळी पण नाही. मी तर आजीच्या लुगड्याच्या नरम झोळीत झोपते छान.
वस्तीत एक ताई येत असते ती बन्नोच्या आईला छान छान गोष्टी सांगत असते. तिने बन्नोच्या बहिणीला शाळेत पण टाकलं. ती ताई आता पण तिथेच होती-
सामान्य कुटुंबातील बालक आईच्या गर्भात असल्यापासून जे सुरक्षित वातावरण त्यांना मिळत ते या बालकांना कधीच मिळत नाही. ही बालके जगात येण्या पूर्वी पासूनच कुठलाही दोष नसताना त्यांना त्यांचे बाल हक्क मिळत नाही.अनौरस असण्याचा शिक्का तो जन्मापासून असतो, ते आव्हान तर पेलावाचं लागतं.
एकूण सगळी नकारात्मकता पदरात पडलेली असताना असा अवघड जीवन प्रवास ही नाजूक, निष्पाप बालके कसा यशस्वी करणार ?

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर.
बालमानस तज्ञ, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
