स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी स्वानुभवावर आधारित प्रेरणादायी मनोगत. नक्कीच वाचा…….
उदयजींचा फोन खणाणला. उदयजी म्हणजे माझे मित्र श्री.उदय आठल्ये, महाराष्ट्रातील पोलीस मित्र चळवळीतील एक अवलिया व्यक्तिमत्व. म्हणाले, लेख पाठवा. तुमचा स्पर्धा परीक्षेचा प्रवास हा हजारो स्पर्धा परीक्षार्थींना त्यांच्या प्रवासात मार्गदर्शक / प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या या आग्रहाला मलाही ‘नाही म्हणवले’ नाही. म्हणून त्यांच्या शब्दाखातर हा लेखन प्रपंच…

‘यश’ या शब्दाची व्याख्या ही सापेक्ष आहे. म्हणजे यश हे व्यक्तिगणिक बदलतं. परंतु प्रादेशिक, भाषिक, धार्मिक, आर्थिक इ. अशा विभिन्नतेने नटलेल्या वा सजलेल्या आपल्या समाजात, आपणही या समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून लोकसेवा करण्याची ओढ बऱ्यापैकी सर्व लोकांत असते. त्यातच ही सेवा करण्याची संधी आपल्याला प्रशासन वा प्रशासकीय घटक व्यवस्था देते.
सांविधानिक वा कायदेशीर प्राधिकारांचा वापर करून समाजातील मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करून त्याचे जीवनमान उंचावण्याची संधी ही प्रशासनात उपलब्ध असते. किंबहुना ‘कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे’ हा आपल्या राज्यव्यवस्थेचा घटनात्मक उद्देशच आहे. अशा व्यवस्थेचा भाग बनण्याची संधी सुदैवाने मलाही मिळाली.
माझा जन्म, बालपण व शालेय शिक्षणाचा प्रवास हा तत्कालीन नक्षलवादी चळवळींचा स्पर्श असलेल्या, अभयारण्य व तत्सम दाट अरण्याच्या आदिवासी बहुल व विदर्भ, मराठवाडा व तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे झाला. निजाम राजवटीची पार्श्वभूमी असलेल्या या तालुक्यात सुख सोयी तशा बेताच्याच होत्या. परंतु अशा भागामध्ये राहून सुद्धा शहरातील मुख्य प्रवाहाशी माझी नाळ कशी जोडली राहील याची पुरेपूर काळजी माझ्या आई वडिलांनी घेतली.
अशा मागास भागामध्येही आम्हा विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण व संस्कार मिळावेत यासाठी माझ्या सरस्वती विद्या मंदिर या शाळेने व तेथील शिक्षक वृंदांनी सर्व प्रकारचे परिश्रम घेतले. बाहेरील जगात उच्च शिक्षण घेण्यासाठी गणित व इंग्रजी विषयावर प्रभुत्व असणे गरजेचे आहे, हे ओळखून माझ्या शिक्षकांनी आमच्या शिक्षणासाठी विशेष कष्ट घेतले. माझे उच्च माध्यमिक शिक्षण योगेश्वरी महाविद्यालय, अंबेजोगाई येथे झाले. मराठवाडा मुक्तिसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या संस्थेत मी शिकलो, याचा मला अभिमान वाटतो.
माझे इंजिनीअरिंगचे शिक्षण महात्मा गांधी मिशनचे अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड येथे झाले. इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना मला तत्कालीन नांदेड जिल्हाधिकारी जी.श्रीकांत सर यांचेकडून स्पर्धा परीक्षेबाबत मोलाचा सल्ला मिळाला. त्यानुसार पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी प्लॅन बी तयार असावा याकरीता टाटा ऑटोकॉम सिस्टीम लिमिटेड या टाटा ग्रूपच्या नामांकित कंपनीत असिस्टंट मॅनेजर या पदावर रुजू झालो.
टाटा ग्रुपमध्ये काम करण्याचा हा अनुभव माझ्या आयुष्यातील उत्तम अनुभवांपैकी एक होता. येथील आचारसंहिता, काम करण्याची पद्धत, लोकांची मानसिकता, खेळीमेळीचे वातावरण, संघभावना, एकमेकांविषयी आदर इत्यादी बाबी वाखाणण्याजोग्या होत्या. अल्पावधीतच तेथे चांगल्या संधी मिळाल्या. मोठ-मोठ्या प्रकल्प / प्रोजेक्टचा भाग होता आले. वेळेचे महत्व, व्यवस्थात्मक कार्यपद्धती, नियोजन व त्याची अंमलबजावणी, डॅमेज कंट्रोल, मानवी संसाधने व त्यांचे व्यवस्थापन इत्यादी बाबत अनुभव मिळाला. पदोन्नतीच्या संधी आणि नावलौकिक मिळाला. आणि येथील अनुभवच माझ्या पुढील टप्प्यावरील निर्णयास कारणीभूत ठरला.
टाटा ग्रुपच्या कंपनीमध्ये काम करत असताना आलेला अनुभव व स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासनात अधिकारी व्हायचे स्वप्न यामुळे मी या कंपनी करिअर मध्ये भरारी घेत असतानाच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आपण एखाद्या खाजगी कंपनीत जर इतके चांगले काम करत असू तर आपण आपली कार्यक्षमता ओळखून हे कौशल्य मोठ्या सामाजिक व्यासपीठासाठी का वापरू नये ? हा विचार माझ्या मनात नेहमीच असायचा. या विचाराला कृतीमध्ये उतरविण्याचं बळ दिलं मला माझ्या आई-वडिलांनी. माझं तसं मध्यमवर्गीय कुटुंब. आई-वडीलांनी कष्टाने संसार उभा करत आम्हा दोघा भावंडांना इंजिनियर केले. या प्रवासात त्यांना प्रसंगी आर्थिक संघर्षही भरपूर करावा लागला.
वडिलांची नेहमीच इच्छा होती की, मी शासकीय अधिकारी व्हावं. त्यामुळे कंपनीत चांगला पगार असतांनाही वडिलांच्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर माझ्या कंपनीच्या राजीनाम्याच्या निर्णयाला वडिलांनी क्षणाचाही विचार न करता पाठिंबा दिला. आई व भावानेही पाठबळ दिले. टाटा कंपनीचा राजीनामा दिला व स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
ज्या आत्मविश्वासाने मी तयारी सुरू केली तेव्हा वाटले होते की, आपण एखाद्या वर्षातच हवी ती पोस्ट मिळवू. परंतु तसे काही घडले नाही. स्पर्धा परीक्षा विश्वातला प्रवास कठीण असतो. या प्रवासात उमेदवार आपली ऐन उमेदीची वर्ष खर्च करीत असतो. त्यामुळे आलेल्या अर्जाच्या एक आकडी टक्का असलेल्या वा त्यापेक्षा कमी प्रमाण असलेल्या निकालात काही शे उमेदवार निवडले जातात. त्यामुळे येथे अपयशाचा टक्का नेहमीच जास्त असतो. काही वाचकांना ही बाब नकारार्थी वाटेलही, परंतू हे स्पर्धा परीक्षेचे वास्तव आहे. त्यापासून मी ही दूर नव्हतो.
सुरुवातीला अपयश येत गेले. राज्यसेवा, त्यात आलेल्या अपयशानंतर यूपीएससीची तयारी, तिचे अटेंम्प्ट संपल्यानंतर पुन्हा राज्यसेवा अशी मालिका चालू होती. या साऱ्या कालावधीत कुटुंबावर आलेला आर्थिक भार, त्यामुळे खिशावरचा ताण या सर्वांचा अनुभव मीही घेतला.
खिसा रिकामा असेल तर बुद्धी चालणे कमी होते असे म्हणतात व येथेच स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा कस लागतो. स्पर्धा परीक्षा केवळ जीएस व सीसॅट च्या ज्ञानाची परिक्षा नाही तर ही परिक्षा आहे उमेदवाराच्या बौद्धिक व शारिरिक क्षमतेची, त्यांच्या आरोग्याची, त्याने ताणतणावाला सामोरे जाण्याची, त्याच्या आत्मविश्वासाची व शेवटी त्याच्या कुटुंबाची.
ऐन तारुण्य स्पर्धा परीक्षेत घालवणाऱ्या मुलाला पाहणारे त्याचे कुटुंब, त्याचे लग्न, नोकरी, सेटलमेंट याची चिंता त्या कुटुंबाला लागलेली असते. ‘कधी होणार तुमच्या मुलाचे सिलेक्शन ?’ हा प्रश्न प्रत्येक आई-वडिलांना या समाजात फेस करावा लागतो. परिणामी ‘आन्सर की’ आली का ? काय आला स्कोअर ? किती कटऑफ लागेल ? या सर्वांची कल्पना (व पुढे त्याची सवय होते) आई वडिलांना आलेली असते. त्यामुळेच ही परिक्षा कुटुंबाचीही असते.
माझे कुटुंबही या अग्निदिव्यातून पार झाले. या प्रवासात मला अपयश येत होते. मुख्य परीक्षा दिल्यावर मुलाखतीत पात्र न होणे, ती मुलाखत देऊन अंतिम निवड यादीत नाव नसणे हा अनुभव मी बऱ्याच वेळेस घेतला. प्रसंगी मध्यंतरी मी पुन्हा टाटा ग्रुपला खाजगी कंपनीत अर्ज केला व मुलाखत होऊन पुन्हा निवडलाही गेलो. परंतु या वेळेसही मला माझ्या आईवडिलांनी व भावाने (उदय नव्हाडे) कंपनीत रुजू होऊ दिले नाही. स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात आपला स्वतःवर विश्वास असतोच. परंतु आपल्या जवळच्या लोकांनी आपल्यावर मोक्याच्या क्षणी विश्वास दाखवणे आवश्यक असते. किंबहुना तीच वेळ तुमच्या प्रवासातील निर्णायक टप्पा असतो. माझ्या आयुष्यातही हा निर्णय टप्पा होता.
मी पुन्हा टाटा कंपनी जॉईन न करता राज्यसेवेची तयारी सुरू केली. परंतु पुन्हा एकदा अपयश आले. या टप्प्यावर मला आणखी एक निर्णायक वळण घ्यावे लागले, ते म्हणजे ‘माझे दोनाचे चार हात होणे’ !. रेणू माझ्या आयुष्यात आली. कुठलीही अट, अपेक्षा न ठेवता, रेणूने आपला जोडीदार निवडला व माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. मध्यंतरी एका खाजगी आयएएस ॲकॅडमी मध्ये फॅकल्टी म्हणून मी कामही पाहिले आणि पुढे 2018 च्या राज्यसेवेतून माझी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून निवड झाली.
या सर्व प्रवासात मला माझ्या सर्व मित्र परिवाराकडून मानसिक व आर्थिक पाठबळ मिळाले. या सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी हे यश संपादन करू शकलो.
शासनामध्ये रुजू झाल्यानंतर मसुरीच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेल्या सीपीटीपी प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण मिळवता आले. पायाभूत प्रशिक्षण, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथील प्रशिक्षण, आर्मी सर्व्हिसेस, एनडीआरएफ, न्यायालय, ग्रामीण व आदिवासी भागातील सलग्नता, महाराष्ट्र व दिल्ली दौरा इत्यादीमधून अल्पकालीन प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली.
हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर पुणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुजू झालो. आशिया खंडातील काही मोठ्या आरटीओ कार्यालयांपैकी एक अशा पुणे आरटीओ कार्यालयात मला काम करण्याची संधी करिअरच्या प्राथमिक टप्प्यातच मिळाली. स्पर्धा परीक्षेद्वारे निवड होणे हे खरे तर अंतिम यश नसून लोकसेवेची संधी उपलब्ध होण्याची पहिली पायरी असते. ती संधी मिळाल्याचे ते खरे तर अंतिम यश असते.
या कार्यालयात काम करीत असतानाही मला खूप चांगल्या संधी मिळाल्या. शासनास मोटार वाहन कर व दंड वसुलीद्वारे महसूल मिळवून देण्यासोबतच अनेक नावीन्यपूर्ण बाबी मला प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.अजित शिंदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.संजय ससाणे व श्री.संजीव भोर यांच्या मार्गदर्शनाखाली करता आल्या.
कोव्हीड-19 च्या आपत्ती काळात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी टँकर अधिग्रहण करून उपलब्ध करून देणे, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे इत्यादी कामे करता आली. परराज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी व परराज्यात ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी आलेल्या पहिल्या ऑक्सीजन एक्सप्रेसवरही ऑक्सिजन टँकर उपलब्ध करून देण्याचा भाग होता आले. त्या काळात निर्माण झालेली ऑक्सिजनची कमतरता व त्यात ट्रान्सपोर्टचा असलेल्या महत्त्वाचा रोल, त्या अनुषंगाने प्रशासनाच्या माध्यमातून सेवा देण्याची संधी मिळाली, याचा अभिमान वाटतो.
या सर्व घटनाक्रमात माझे वरिष्ठ डॉ.अजित शिंदे व श्री.संजय ससाणे खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. व त्याच सोबत माझे सहकारी मोटार वाहन निरिक्षक व इतर यांचे सहकार्यही कौतुकास्पद होते.
याव्यतिरिक्त काही नाविन्यपूर्ण उपक्रमाचा भागही होता आले. ज्यात महत्त्वाचा होता तो शालेय अभ्यासक्रमातून रस्ता सुरक्षा विषयक अभ्यासक्रम शिकवण्याचा उपक्रम. शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य विद्या परिषद व प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्यातील जवळपास दहा हजार शिक्षकांना शालेय अभ्यासक्रमातून रस्ता सुरक्षा अभ्यासक्रम शिकवण्याबाबत ऑनलाईन प्रशिक्षण देणाऱ्या समितीचा सदस्य होता आले. लॉकडाऊन कालावधीत हा उपक्रम राबवून वेळेचा सदुपयोग साधत रस्ता सुरक्षेच्या अंमलबजावणीतील एका ‘ई’ चा (एज्युकेशन) चा प्रभावी वापर करता आला.
इतरही अनेक उपक्रमाचा भाग होता आले जसे की, इंजिनीरिंग व मॅनेजमेंट महाविद्यालयांमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी घेणे, रोड सेफ्टी ऑडिट व ब्लॅक स्पॉट आयडेंटीफिकेशन, रस्ता सुरक्षा लघुचित्रपट स्पर्धा, विविध तपासणी विशेष मोहीमा राबवणे इत्यादी होय. या सर्व उपक्रमांचा नियोजन व अंमलबजावणीचा एक भाग म्हणून काम करता आल्याचा अभिमान वाटतो. या सर्व उपक्रमांमध्ये गुरुतुल्य श्री.संजय ससाणे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
मित्रांनो ,कोण्या एका साहित्यिक विद्वानाने म्हटले आहे की, Rome was not built in a day. “कुठलीही इमारत बांधण्यासाठी तिचा पायाही तेवढाच मजबूत लागतो.”स्पर्धापरिक्षेत यश संपादन करणे ही खरेतर तुमच्या पुढील करिअरच्या निर्माणाची पायाभरणी असते. हा पाया पक्का व मजबूत करण्यासाठी तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा व त्यातील अनेक गुणांचा कस लागत असतो.
आत्मविश्वास, तितिक्षा, सचोटी, चारित्र्य व प्रामाणिकपणा इत्यादी गुणांची परीक्षा व विकास या पायाभरणीत होत असतो. तुम्हाला या सर्व बाबींवर आपले शंभर टक्के प्रयत्न द्यायचे असतात. योग्य वेळेवर तुम्हाला यश नक्की मिळते आणि या यशाच्या प्रवासात आवर्जून सांगावीशी वाटते ती बाब म्हणजे ‘मोमेंट टू मोमेंट लिविंग’ म्हणजे प्रक्रिया एन्जॉय करणे. ‘ends’ आणि ‘means’ यामधले अंतर कमी करणे. वर्तमानात जगणे व प्रत्येक क्षण उत्कटतेने जगणे होय. हे जगणेच आपल्याला आयुष्याचे जगणे शिकवते.
परीक्षेत जरी अपयश आले तरी खचून न जाता प्लॅन बी शोधणे व त्यात करिअर करणे आवश्यक आहे. कोणतीही अभ्यासलेली, शिकलेली बाब कधीही वाया जात नसते, तर ती आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकासच करीत असते.
शेवटी शेक्सपियरच्या माझ्या आवडीच्या वाक्याने या लेखाला पूर्णविराम देतो…
‘Character is Destiny…!’
‘माणसाचा स्वभावच त्याचे दैव घडवतो…!’सर्वांना आपल्या स्वप्नमयी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा💐
– लेखन : पवन उमाकांत नव्हाडे
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

पवन नव्हाडे ह्यांचा स्पर्धा परीक्षेचा प्रवास खरोखरीच अनुकरणीय आहे. फार सुंदर शब्दात त्यानी त्या प्रवासाच वर्णन केलं आहे. अभिनंदन…
जिद्द व चिकाटीने आपले ध्येय गाठतां येते हे पवन नव्हाडे यांनी आपल्या कृतीतून दाखवले आहे. समाजातील सर्वांना हे एक खुप छान उदाहरण आहे. प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे.
लोकसेवेची संधी मिळण्यात खरे यश मानणार्या पवन नव्हाडे यांचा हा प्रेरणादायी प्रवास वाचनीय..
वाचताना भिंतीवरुन एकसारखा पडणारा आणि पुन्हा पुन्हा हार न मानता चढणार्या कोळ्याची आठवण झाली..जिद्द,चिकाटी आणि परिश्रम म्हणजेच अंतीम यश…हाच संदेश पवनजींच्या वाटचालीतून मिळतो..
पवनजी तुम्हाला खूप शुभेच्छा!!