कवितांजलीचं चौथ्या पर्वातील सातवं ऑनलाईन कविसंमेलन नुकतंच कवी डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या वर्षातील हे अखेरचे कविसंमेलन होते. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर, देवास, ब-हाणपूर, व महाराष्ट्रातील चंद्रपूर, पुणे, पालघर, ठाणे, भाईंदर, मुंबई व परिसरातील कवी सहभागी झाले होते.
त्यांनी मानव व भवतालविषयक भाव शब्दांकित केलेल्या काही कविता सादर केल्या. याप्रसंगी बोलताना “कवी भूतकाळात डोकावतो, वर्तमानातील भवताल न्याहळतो व भविष्याचा वेध आपल्या कवितेतून व्यक्त करतो. कवितेतून कवी जीवन शोधत असतो” असे डॉ. शिवणेकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले.
कवितांजली समूहातील अनेक कवींनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले तसेच 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आपल्या दर्जेदार कविता सादर करून आपल्या कवितेची झालेली निवड सार्थ ठरवून आपला ठसा उमटविला त्याबद्दल सर्व कवींचे अभिनंदन करून नूतन वर्षातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
आजच्या कविसंमेलनातील कवितांच्या विषयात विविधता होती. त्यामुळे प्रत्येक कविता लक्षवेधी ठरली. चिंता, व्याधी, आनंद, एकटेपणा, निसर्गाचे दान, निसर्गाचा कोप, पर्यावरणाचा -हास, मानवी आगतिकता असा मोठा आवाका असणा-या कविता सादर करण्यात आल्या.
विनोद, हास्य, व्यंग्य, निसर्गाचे देणे, निसर्गाची किमया, शाळा, विरह, व्यथा, अवेळी पावसाशी संवाद, मनाचे इशारे, केशरी सांज, बळीराजा व झळा, एकटेपण, गझलेचे गाव, हाक, अचंबित करणारा निसर्ग, सूर्याचे मोल, शब्दाची किंमत, व्हॉट्सअप ची जादू, प्राजक्त अशा विविध विषयांवरील मुक्तछंद व वृत्तबद्ध कविता तसेच दर्जेदार गझल सादर करण्यात आल्या. यापैकी काही वाचून तर काही कवींनी गाऊन कविता प्रभावीपणे सादर केल्या.
कोरोना काळातील कवींना लाभलेला ऑनलाईन सुखद सहवास कवितेतून आनंदपूर्वक व्यक्त झाला. पुढील नववर्षातील खुले कविसंमेलन 16 जानेवारी रोजी होईल असे घोषित करण्यात आले.
कवी व गझलकार विजय म्हामुणकर, वसुंधरा शिवणेकर आणि प्रसाद गाळवणकर यांनी नेटके आयोजन केले.
सहभागी कवी:
डाॅ.लक्ष्मण शिवणेकर, विजय म्हामुणकर, अनंत जोशी, ॲड. त्र्यंबक मोहिले,सीमंतिनी जोशी, पद्मा बांडे, मोहन ठेकेदार, नंदा बिरादार, विठ्ठल पाटील ,अनिता कामत, प्रदीप राजे, निशा वर्तक हरी धारकर, विद्या श्रॉफ, प्रदीप हेमके, अरुंधती वैद्य, भाग्यश्री कुलकर्णी, अशोक शहा, सरोज गाजरे, डॉ. मानसी राठी, इंद्रजीत पाटील, रजनी गुर्जर, किरण देशमुख, विशाल कुलकर्णी, पूनम गमरे, चंद्रशेखर धर्माधिकारी, वैजयंतीमाला मदने.
– टीम एनएसटी. 9869484800