शिक्षण महर्षी, भारताचे पहिले कृषि मंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने हा विशेष लेख….
आमच्या पिढीतील सगळे लोक हे मान्य करतील की शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव देशमुख यांच्यामुळे त्यांचे जीवन घडलेले आहे. बहुजन समाजातील मुले कुलगुरू, जिल्हाधिकारी, प्राध्यापक झालीत. शिकली सावरली ती केवळ पंजाबराव देशमुख यांच्यामुळे. त्यामुळे केवळ विदर्भाचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे भाग्यविधाते म्हणून डॉ पंजाबराव देशमुख यांचे नाव आदराने घेतले जाते व घेतले जाईल.
डॉ.पंजाबराव देशमुख यांनी कृषी क्षेत्रामध्ये जे कार्य केलेले आहे त्याला तर तोड नाही. त्यांचे हे कार्य संपूर्ण भारतामध्ये पसरलेले आहे. भारताचे पहिले कृषीमंत्री म्हणून त्यांनी कृषी विभागाला जी दृष्टी दिली ती अनन्यसाधारण आहे.
आज आपण पाहतो आहे की डाँ पंजाबराव देशमुख यांचे नाव कृषी क्षेत्रात केवळ महाराष्ट्रात प्रसिद्ध नाही तर संपूर्ण भारतामध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
मी जेव्हा मिशन आय ए एस च्या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये फिरतो तेव्हा मला या गोष्टीची प्रचिती येते.
डॉ. पंजाबराव देशमुख यांनी बहुजन समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. भरकटलेला बहुजन समाज शिक्षणासाठी पुढे यावा यासाठी त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्याचबरोबर श्री शिवाजी लोकसेवा देखील स्थापना केली. आज शिव संस्थेचा प्रचार आणि प्रसार फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे.
या संस्थेत जवळपास 500 महाविद्यालय, शाळा, वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेमार्फत अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम चालविण्यात येतात. आज लाखो विद्यार्थी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या या सर्व शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत.
डॉ.पंजाबराव देशमुख यांचे राहणीमान अतिशय साधे होते. आम्ही डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर “युगनिर्माता” नावाचे नाटक त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बसविले होते .त्यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जीवन चरित्राचा सखोल अभ्यास करण्याची संधी मला मिळाली. आणि त्यातून कळले की हा माणूस दूरदृष्टीचा होता. या दूरदृष्टीने बहुजन समाजाला तारले आहे.
मला त्यांच्या एक दोन आठवणी फारच स्मरणीय वाटतात. त्यामधली पहिली आठवण म्हणजे ते एकदा दिल्ली वरून नागपूरला आले आणि नागपूरहून निघाले. रात्र बरीच झाली होती. दिवस निघायला वेळ होता. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी विचार केला मी आता घरी जाणार, वेळी-अवेळी नोकर चाकरांना उठवणार, त्यांची झोपमोड करणार. यापेक्षा मी वाटेत झोप घेतलेली काय वाईट ? आजच्यासारखे तेव्हा विश्राम गृह नव्हते. पंजाबरावांनी ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला सांगितली आणि त्यांनी गाडीतच आराम केला.

एक वेळची गोष्ट आहे.
ते दौऱ्यानिमित्त विदर्भात आले होते. त्यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना त्यांना जाणवले की आपला बालमित्र बैलगाडी हाकत आहे. त्यांनी लगेच चालकाला सांगून आपली गाडी थांबवली. त्या मित्राकडे गेले. त्याच्याशी बोलले. विचारपूस केली आणि पुढे प्रस्थान केले. याला म्हणतात माणुसकी.
केंद्रीय मंत्री असलेल्या माणूस किती साधा राहतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कृषिमंत्री माननीय डॉ.पंजाबराव देशमुख. आज संपूर्ण भारतामध्ये त्यांचा जयंती उत्सव फार मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे. महाराष्ट्र शासनाने रितसर पत्रच काढलेले आहे. आपण एकच करू या. डॉ. पंजाबराव देशमुख यांचा वारसा पुढे नेऊ या.

– लेखन : प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक, मिशन आयएएस डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी अमरावती
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी लिहीलेल्या माननीय कृषीमंत्री पंजाबराव देशमुख यांच्या आठवणी वाचनीय..
कृषी क्षेत्रातलं त्यांचं कार्य तसेच शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे केलेलं
शिक्षणक्षेत्रातलं कार्य महान आहे!!