नमस्कार, वाचक हो.
प्रत्येक भागाची खाद्य संस्कृती आपल्याआपल्यातच एक विशेष असते, महत्वाची असते. तिचे वेगळेपणच तिचे अस्तित्व दाखवते ..
याप्रमाणेच आज आपण पुन्हा एकदा केरळच्या खाद्य संस्कृतीकडे वळत आहोत.
पर्यटनासाठी आल्यावर,
मागील भागात पाहिलेले काही पदार्थ सहजासहजी आपल्याला हॉटेल मध्ये मिळतात. तरीही शाकाहारी, मांसाहारी आणि नाश्त्याच्या पदार्थांशिवाय काही पदार्थ आपल्या पटकन लक्षात येत नाहीत. ते म्हणजे ताटाच्या बाजूला येणारे तोंडी लावण्याचे पदार्थ. चमचमीत, चटपटीत तर काही कुरकुरीत असणारेही. वासाने, चवीने आणि आवाजानेही आनंद द्विगुणित करणारे. जेवताना मज्जा आणणारे असे हे पदार्थ. त्यापैकी काही पदार्थांची आज आपण माहिती घेणार आहोत.
आंबट – गोड – तिखट अशी चटपटीत तोंडाला चव आणणारी इंजीपुळी – Inchi puzhi. आले, चिंच, गूळ घालून केलेली. जेवणात सद्यामध्ये हे तोंडी लावणे खासच असते.
आंब्याचे लोणचे, लिंबाचे लोणचे, आवळ्याचे लोणचे हे प्रकार आपल्याकडेही असतात पण विशेष लक्ष वेधून घेतो तो कन्नीमांगा – kannimanga.
सर्वार्थाने केरळचा हा विशेष लोणच्याचा प्रकार. अगदी कोवळे आंबे जे चिकाचे असतात अशा एक दीड इंचाच्या आंब्यापासून बनवलेले हे आंबट तिखट लोणचे. पण यात मसाला जरा पातळ स्वरूपात असतो हा.
इडली सांबार, इडली चटणी आपण नेहमी खातोच पण हीच इडली पावडर बरोबर सुद्धा खायला तुम्हाला आवडेल याची खात्री आहे. ती पावडर म्हणजे इडली पावडर – एक खास पदार्थ.
साधारण आपल्या मेतकूटच्या प्रकारात मोडणारी ही पावडर असते. लाल मिरच्या, कडीपत्ता, हिंग, काही डाळी, तांदूळ आणि इतर काही पदार्थ भाजून तयार केलेली पावडर. प्रत्येकाच्या कृतीत थोडाफार बदल राहतो. गरम गरम इडली, दोशा, उत्तपम बरोबर या पावडर मध्ये तेल, तूप घालून खाणे म्हणजे खाद्य प्रेमींसाठी पर्वणीच.
तांदूळ, लाल मिरच्या,मीठ, हिंग आणि तीळ यापासून बनवलेला aari kondattam -vattal म्हणजे आपल्याकडील खारवड्या सारखा असणारा उन्हाळी पदार्थ. जेवताना तळून खाताना त्याच्यातील तिखटपणा जाणवतोच जाणवतो.
जेवणाबरोबर किंवा दही भाताबरोबर दही घालून वाळवलेली तळलेली मिरची खाताना त्यातील तिखटपणाचा ठसका अगदी मस्तकापर्यंत पोहचतो. पण एक आगळा वेगळा आनंद देवून जातो.
Bird’s eye chili ( Kanthari chili ) दिसायला एकदम छोट्याशा पण तिखटाच्या बाबतीत म्हणाल तर हा हा करायला लावणाऱ्या अशा या नाजूक मिरच्या.
ज्यांना तिखट खायला आवडते त्यांनी एकदा तरी या पदार्थांची चव चाखायला पाहिजे.
मिरच्या विनिगर मध्ये बुडवून मीठ घालून याचे लोणचे करतात. याचे शरीरासाठी फायदेही खूप आहेत बर का!
असे अजूनही अनेक पदार्थ आहेत. आपण ठराविक पदार्थांचीच माहिती इथे घेतली आहे. प्रत्येक पदार्थाची एक विशिष्ट अशी चव असते, पौष्टिकता असते, खासीयत असते. भले मग एखादा पदार्थ आवडो वा ना आवडो तो पुढचा प्रश्न. तरी पण पदार्थ चवीने खावा. मनापासून आस्वाद घेत, दाद देत त्याचा उपभोग घ्यावा असे माझे तरी मत आहे.
तुम्हाला काय वाटते ?

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील.
पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800