नमस्कार 🙏
“ओठावरलं गाणं” या सदरात रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत ! रेडिओ हे मनोरंजनाचं एकमेव साधन होतं त्यावेळेस कितीतरी छान छान गाण्यांनी आपलं आयुष्य समृद्ध केलं…. सुंदर केलं. मनात निर्माण झालेली प्रेमभावना ही असंच आयुष्य सुंदर करते …. रंगीन करते. आज आपण पहाणार आहोत प्रेमभावनेनं वेडं केलेल्या दोन जीवांचं एक सुंदर गाणं ज्याचे कवी आहेत मधुसूदन कालेलकर आणि गाण्याचे शब्द आहेत –

“सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला”
एकमेकांवरच्या नि:स्सिम प्रेमाची एकमेकांना खात्री पटली आहे पण “माझं तुझ्यावर प्रेम आहे” असं दोघांपैकी कोणीही कबूल करत नाहीये. ठराविक जागेवर दोघांनी एकमेकांना भेटणं, त्याला यायला उशीर झाला कि तिला वाटणारी अनामिक हुरहूर, तिला यायला उशीर झाला कि त्याला वाटणारी अस्वस्थता या सगळ्याचा अनुभव दोघांनाही वरचेवर येतो आहे. म्हणूनच तो माझ्या मनातली प्रेमभावना तुला कधी कळणार असं आडून आडून विचारतोय. तो काय विचारतोय हे तिलाही कळतंय पण तारुण्य सुलभ लज्जेमुळे त्याच्या प्रश्नाला उत्तर न देता “झाडावर उमलेल्या फुलाकडे तर पहा, त्याचा लाल रंग तुला दिसतोय ना, कि तुला समजत नाहीये ?” असा प्रश्न तिने त्याला विचारलाय.
गंधित नाजूक पानामधूनी सूर छेडीते अलगद कोणी
अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सुरातला
ती त्याला पुन्हा विचारते आपण दररोज ठराविक वेळेला या झाडाखाली भेटतो, कधी रात्रीच्या आकाशातल्या चांदण्या मोजतो. अशा वेळेला भोवतालचा निसर्ग देखील आपली किमया दाखवत असतो. या बागेतल्या झाडावरून सकाळी कोकिळ स्वर ऐकू येतात तर कधी पानांमधूनही सुरेल संगीत ऐकू येत असतं. कोकिळ पक्ष्याचं कूजन आणि पानांमधून ऐकू येणारं संगीत…ते धुंद करणारे सूर आपल्या प्रितीचं गुपीत उघड करत असतात….पण तुला त्यातला गर्भितार्थ कधी कळणार हा गहन प्रश्न आहे.
निळसर चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला
आपण काय विचारतोय हे कळूनही ती उलट प्रश्न विचारतेय म्हंटल्यावर “निशाण्यावर बाण बसल्याचं” त्याच्या लक्षात येतं. मग तो तिला विचारतो जलाशयाचं पाणी जरी संथ असलं तरीही त्याच्यावर उठणारे तरंग कशाचं लक्षण आहे हे तरी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहेस का तू कधी ? अगं वेडे उंच उडणाऱ्या कारंज्याचा, नाचणाऱ्या पाण्याचा छंद, ती ओढ काय असते, हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न तरी केला आहेस का? ते जर तू ओळखलंस तर तुला माझं प्रेम नक्कीच समजेल.
जुळता डोळे एकाएकी धीट पापणी झुकली खाली
खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला
इतकंच काय, कधीकधी तू माझ्याकडे जेंव्हा चोरून पहात असतेस ना तेंव्हाही तुझ्या डोळ्यात मला माझ्याविषयीचं प्रेम दिसून येतं तेंव्हाच मी ही तुझ्याकडे पहात रहातो. पण हे तुझ्या लक्षात येतं तेंव्हा माझ्याकडे इतका वेळ टक लावून धीटपणे पहात रहाणारी तुझी नजर एका क्षणात खाली वळते. हा चार डोळ्यांच्या नजरेचा खेळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून इतके दिवस अव्यक्त राहूनही व्यक्त होऊ पहाणारं आपलं प्रेम आहे. हे जेंव्हा तुला कळेल आणि तू आपल्या प्रेमाची कबुली देशील ना तो माझ्या आयुष्यातला भाग्यशाली दिवस असेल एवढं निश्चित !
“अपराध” चित्रपटासाठी मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेलं हे गाणं रमेश देव आणि सीमा यांच्यावर चित्रित झालेलं असून, संगीतकार एन दत्ता यांनी दिलेल्या सुमधुर चालीवर महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी या गाण्याचं सोनं केलं आहे जे आजही शंभर नंबरी आहे.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800