Thursday, July 3, 2025
Homeलेखजीवन प्रवास - भाग - १८

जीवन प्रवास – भाग – १८

प्रवासाचा मध्यांतर
दगडाप्रमाणे कठीण जिद्द असेल तर, त्या दगडातून सुंदर मूर्ती तयार होते. असे लक्ष्य साधत, आयुष्यात आलेल्या चढ-उतारांतून व अनेक नाजूक अडचणीतून मार्ग काढत, आम्ही दोघांनी दृढ निश्चय करून, पुढे जाण्याचे ध्येय ढळू दिले नव्हते.

काळानुरूप आमच्या नात्याला प्रमोशन मिळाले होते. त्यापेक्षा सन २०१२ मध्ये, डबल प्रमोशन आम्हाला लाभले होते. आम्ही अतिशय आनंदित झालो होतो. नातीच्या आगमनाने, आम्ही आजी- आजोबा झालो होतो.

जीवनातील अपुरी राहिलेली इच्छा, मला आता खुणावू लागली होती. अखेर मनाचा हिय्या करत, मी त्या इच्छेला पूर्ती देण्याचे मनाशी पक्के केले होते. ऑफिसला निवेदन पत्र देऊन, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात, मी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. शनिवार व रविवार, दोन दिवस आदर्श कॉलेजमध्ये लेक्चर्स होत असत. डिग्रीचे पहिले वर्ष सुरू झाले होते. बर्‍याच वर्षाच्या अंतराने, पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली होती. तो आनंद माझ्यासाठी पराकोटीचा होता.

पदवीसाठी करावा लागणारा अभ्यास, नियमित करणे थोडे कठीणच होते. पण माझ्या ऑफिस मधून मला लाभलेले सहकार्य, फार मोलाचे होते. नोकरी व संसार या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ साधत, माझा शिक्षण प्रवास सुरळीत चालू होता. त्यावेळी माझ्या ऑफिस मधील, माझे अधिकारी जाधव सर व माझे पती महेंद्र, यांनी दिलेला तो पाठिंबा, साक्षात नव्या उमेदीची ताकद होती.

वयाच्या ऐकोणपन्नास वर्षात, माझ्यातील उमेद मला उत्कर्षाने, नव्या जीवनाची चाहूल देत होती. हे शिक्षण घेत असतानाच आदर्श कॉलेजमध्ये स्पर्धा होत असत. मीही त्या स्पर्धेत उत्साहाने भाग घेत असे. वकृत्व स्पर्धा, स्मरण स्पर्धा, लेखन स्पर्धा व रांगोळी स्पर्धेत बक्षिसेही मिळवली होती. मनातील स्पर्धक वृत्तीला, पुन्हा उभारी मिळाल्याने, लहानपणातील त्या स्पर्धा व मिळवलेल्या बक्षिसांची आठवण जागी झाली होती.

आदर्श कॉलेजमध्ये मिळालेली बक्षिसे

ह्याच दरम्यान आमच्या आयुष्यात एक मोठी घटना घडली होती. आमचे सोन्याचे दागिने, घरातून चोरीला गेले होते. त्यावेळी मला बसलेला तो धक्का, भयानक होता. मी अगदी सुन्न होऊन गेले होते. कशातच माझे मन लागत नव्हते. कष्टाच्या पैशातून मिळवलेल्या वस्तू गमावणे, काय असते ! याचा मला प्रत्यय आला होता. त्यावेळी मोलाचा संदेश, माझे ऑफीस अधिकारी, गुरुप्रमाणे असणारे जाधव सर, यांनी दिला होता. माझे चिंतामय मन व नैराश्य पाहून, ते म्हणाले होते,
“जे आपले असते, तेच आपल्या जवळ राहते. जे आपले नसते, ते कधीच आपल्या जवळ थांबत नाही. जे गेले, ते तुमचे नव्हते. असे समजून ते विसरून जा. पुढील ध्येयाकडे आता वळा.” मी हया गोष्टीवर खूप विचार केला होता. आणि हळूहळू, त्या एवढ्या मोठ्या संकटाला मागे टाकत मी पुढच्या विचारांकडे वळले होते.

त्यानंतर असाच मोठा धक्का आम्ही जवळून अनुभवला होता. क्लासमधील आठवी इयत्तेत शिकणारी, प्रिया ! सडपातळ बांधा, सरळ लांबसडक केस, गोरा वर्ण, खूपच अबोल, नेहमी चेहऱ्यावर भयाची छटा, प्रामाणिकपणे नेहमी अभ्यास करणारी ! अशी गोंडस प्रिया ! कधीही वाटले नव्हते की तिच्या बाबतीत असा वेदनादायी प्रसंग घडेल ! आई वडीलांची एकुलती एक मुलीचे दुःख, पाठीशी बांधून आयुष्याचा प्रवास त्यांना करावा लागेल ! देवाने असे का करावे ?

३१ डिसेंबरला, गेट-टुगेदरचा कार्यक्रम क्लासमध्ये झाला होता. आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ जानेवारीला, ही घटना घडली होती. तिच्या मृत्यूचा उलगडा एका विचित्र प्रकारातून समोर आला होता. तिच्या वर्गातील तिची खास मैत्रीण, स्नेहा हुशार मुलगी होती. तर प्रिया अभ्यास करूनही, तिच्या लक्षात राहत नसे. हा तिचा कमजोर घटक होता. त्यामुळे तिला कमी टक्के मिळत असत. दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या. तिच्या जाण्याने स्नेहा तर खूप कावरीबावरी झाली होती.

त्यावेळी चाचणी परीक्षा चालू झाली होती. सकाळी आठचा पेपर होता. त्या दिवशी स्नेहा विचित्र संभ्रमात भासत होती. वर्गात ती सर्वांना, रोजच्या पेक्षा वेगळी जाणवली होती. बिनचूक पेपर लिहिणारी मुलगी, त्या दिवशी कसाबसा पेपर लिहून, वेगळ्याच तंद्रीत घरी परतली होती. घरी कुणाशी बोलली नव्हती, की जेवली नव्हती. जसजशी दुपार होत गेली, तशी ती काहीतरी विचित्र, एकटीच बोलू लागली होती. तिने प्रियाच्या आई-वडिलांना व तिच्या भावाला (महेश) बोलावण्यास सांगितले होते. नंतर सरांनाही बोलवायला लावले होते. मी ऑफिसमध्ये असल्याने, पुढे घडलेला प्रकार, मी पाहू शकले नव्हते. पण माझ्या पतींनी (सरांनी) हा प्रसंग मला सांगितला तेव्हा, माझ्या अंगावर शहारे (भीतीने) आले होते.

स्नेहाच्या अंगात प्रिया आली होती. ती प्रियाच्या आई- बाबांच्या कुशीत डोके ठेवून खूप रडली होती. छोट्या भावाला (महेश) प्रेमाने गोंजारले होते. सरांना म्हणाली होती, “सर, मी खूप अभ्यास करेन.” आईच्या हातून जेवण भरवून घेतले होते.

स्नेहा प्रियाच्या भाऊ महेश सोबत

एव्हाना एका मांत्रिकाला पाचारण करून, घरी आणले होते. अंगारा फुंकत त्याने, शांतपणे तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली होती. “तू कोण आहेस ? तुला काय सांगायचे आहे ? ते पटकन सांगून टाक. जिच्या अंगात तू शिरली आहेस, तिचे शरीर सोड.”
तिने रडत रडत सांगावयास सुरुवात केली होती.
“मी प्रिया आहे. मला, तुम्हाला सगळ्यांना एकदा भेटायचे होते, म्हणून मी आले आहे. मी माळ्यावर खेळत होते. खेळता-खेळता माझ्या ओढणीचा फास, माझ्या गळ्याला बसला आणि मी…….,” “मला खूप शिकायचे होते, मला खूप काही करायचे होते. सर, मी खूप अभ्यास करेन.” असे बोलत, ती खूप रडू लागली होती.

तो दिवस अमावस्येचा दिवस होता. मांत्रिकाचा आदेश, तिला स्नेहाच्या शरीरातून बाहेर जाण्यास सांगत होता. तिने मान्य केले व म्हणाली, “आता मी पुन्हा नाही येणार. मी कुणालाही त्रास नाही देणार, मी आता जाते.” असे म्हणताच, स्नेहाच्या अंगातून एखादी वीज बाहेर पडावी तसे, तिचे शरीर थरथरत जमिनीवर निपचित पडले होते.

थोड्या वेळानंतर, ती शुद्धीवर येताच तिने सर्वांना पाहून विचारले, “काय झाले ? तुम्ही सगळे इथे का आला आहात ? असे अनेक प्रश्न, ती स्वतःच्या आईला वारंवार विचारत होती. विश्वास ठेवावा की नाही ! पण सरांनी प्रत्यक्ष अनुभवलेला हा प्रसंग, आयुष्यातील एकमेव न विसरणारा प्रसंग होता.

प्रियाच्या निधनानंतर आमच्या क्लासमध्ये, मुलांना तिचे अदृश्य स्पर्श जाणवले होते. एकदा तर, मला चक्क कोणीतरी धक्का मारून गेल्याचा भास झाला होता. प्रियाच्या अचानक जाण्याने, आम्हाला व तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. प्रियाचा तो चेहरा आजही आमच्या डोळ्यासमोर येतो. आणि त्या दुःखद घटनेची आठवण करून जातो. प्रिया, ‘तुझ्या बरोबरीचे विद्यार्थी भेटतात, तेव्हा तुझी खूप आठवण येते. आम्ही तुला सगळे खूप मिस करतो ! प्रिया तुला, सोनाली क्लासकडून, 🙏भावपूर्ण श्रद्धांजली

प्रिया

आम्ही सन २०१३ मध्ये क्लास बंद करण्याचा निश्चय केला. एव्हाना, आमच्या क्लासची पंचवीस वर्षे पूर्ण झाली होती. सन २००५ मधे आम्ही, नवी मुंबई-जुईनगर येथे नवीन घर घेतले होते. शाळेच्या सुट्ट्या म्हणजेच दरवर्षी मे महिन्यात, पंधरा-वीस दिवस, तेथे जावून राहत असू. मोठ्या घराचे कुतूहल, माझ्या मुलींना आनंद मिळवून देत असे.

अश्या प्रसंगानंतर व जीवनात होणाऱ्या, काही गैरसोयीचा विचार करून, आम्ही नवीमुंबई-जुईनगरला, स्थायिक होण्याचा निर्णय पक्का केला होता. आमच्या विभागातील शेजारी, स्नेही यांना, आमच्या जाण्याची बातमी कळताच, सगळे फार निराश झाले होते.

आमच्या आयुष्य कसोटीची पहिली सुरुवात ह्याच वडाळयातून झाली होती, आमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, अनेक चांगले-वाईट अनुभव इथेच आम्ही घेतले होते. शेजाऱ्यांचे व आमचे सौख्याचे नाते इथेच गुंफले होते. विभागातील अनेक अडचणींना मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात, एकजीव होवून, अनेक कार्ये आम्ही इथेच केली होती. आमच्या जीवनाच्या उन्नतीला इथेच आरंभ झाला होता. माणुसकीची आणि विश्वासाची उंच इमारत इथेच आम्ही उभी केली होती. आमच्या जीवन प्रवासाची प्रत्येक पायरी चढताना, येथील प्रत्येकाचा प्रेमळ सहवास इथेच आम्हाला लाभला होता. जीवन प्रवासातील प्रत्येक पैलू जगण्यास, आम्ही इथेच शिकलो होतो. सर्वांनी भरभरून दिलेल्या प्रेमाच्या अथांग सागरात इथेच आम्ही आनंदाने डुंबलो होतो. आयुष्यातील उत्तुंग शिखरावरील अनेक स्वप्ने, पुर्ण होताना इथेच आम्ही पाहिली होती.

अशा हया, माणुसकीच्या अफाट गर्दीतून बाहेर पडण्यास मन धजावत नव्हते. ज्या घरात आमच्या संसाराची फुलवात प्रज्वलित झाली होती, त्या घराला सोडून जाणे, मनवळणी पडत नव्हते. जीवन प्रवासाचा आरंभ मागे टाकत, आता मध्यांतर आला होता.

आठवणींचा परिपाठ सोडताना, हृदयी वेदना होत होत्या. मला सदैव तारणारा माझा बाप्पा, म्हणजे आमची शक्ती होती. ही शक्ती उराशी कवटाळून, वडाळा परिवाराचा निरोप घेतला होता. आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो होतो.

वर्षा भाबल.

– लेखन – सौ.वर्षा महेंद्र भाबल.
– संपादन – अलका भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. प्रियाचा किस्सा वाचून अंगावर शहारा आला..
    अंधश्रद्धेचा भाग सोडला तर असे अनुभव जीवनात येतात.
    मृत्युनंतर अस्तित्व आहे का हा संशोधनात्मक विषय आहे..

  2. रहस्यमय (प्रिया चे जाऊन येणे, परत जाणे).
    वडाळा विभागात तुमची आठवण सर्वजण काढतात, अगदी कौतुकाने आम्ही सांगतो आमचे सर आणि मॅडम आहेत ते…माझे सर येऊन जरी गेले तरी वडाळ्यात, तरी मित्र आवर्जून सांगतात की तुझे सर दिसले होते. आमच्या सर्व विद्यार्थ्यांचे खरोखर अहोभाग्य की आम्ही तुमच्याकडून घडलो गेलो, अजूनही तुमच्याकडून आम्हांला मार्गदर्शन तर मिळतेच, पण तुमच्या सहवासातून मायेची ऊब अजूनही प्रकर्षाने जाणवते. तुम्ही वडाळ्यात नसलात तरी आमच्या हृदयात मात्र कायमचे वसले आहात… आमचे…माझे सर आणि मॅडम

  3. प्रकाश गायकवाड, अमोल साळुंखे, विकी शिंदे, तेजस पाटील, प्रकाश गायकवाड, अमोल साळुंखे, विकी शिंदे, तेजस पाटील,

    अचूक विश्लेषण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments