कवीवर्य मंगेश पाडगांवकर यांनी त्यांच्या आयुष्याची सुमारे ७० वर्षे मराठी साहित्य सृष्टीत कलाकृती निर्मितीत अर्पण केली.
अश्या कवीवर्य पाडगांवकर यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांना ही आदरांजली 🙏🏻
कवीवर्य पाडगांवकरांनी वयाच्या १४ व्या वर्षी कविता लिहायला सुरुवात केली. त्यांचे ४० हून अधिक प्रकाशित संग्रह आहेत. निसर्ग कविता, बाल कविता, सामाजिक-राजकीय समस्यांवर भाष्य करणाऱ्या कविता याशिवाय इंग्रजी आणि इतर भाषांमधून निबंध आणि भाषांतरे अशी त्यांची प्रकाशित साहित्य संपदा आहे. याशिवाय अनेक लेख, कथा संग्रह, ललित लेखन आहे.
‘ जिप्सी ‘, ‘ छोरी ‘, ‘ गझल ‘, ‘ भटके पक्षी ‘, ‘ सलाम ‘, ‘ राधा ‘, ‘ बोलगाणी ‘ इत्यादि काव्य संग्रह अतिशय प्रसिद्ध आहेत. याशिवाय ‘ धारानृत्य ‘, ‘ निंबोणीच्या झाडामागे ‘, ‘ शर्मिष्ठा ‘, ‘ उत्सव ‘, ‘ वात्रटिका ‘, ‘ भोलानाथ ‘, मीरा (मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद), ‘ विदुषक ‘, ‘ बबलगम ‘, ‘ तुझे गीत गाण्यासाठी ‘, ‘ चांदोमामा ‘, ‘ सुट्टी एक्के सुट्टी ‘, ‘ आता खेळा नाचा ‘, ‘ झुले बाई झुला ‘, ‘, नवा दिवस ‘, ‘, उदासबोध ‘, ‘, त्रिवेणी ‘, कबीर (कबीराच्या दोह्यांचा अनुवाद), ‘ गिरकी ‘, ‘ नाटक ‘, ‘ वादळ ‘ , इत्यादि इतर अनेक संग्रह आहेत. १९८० मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
‘ गायन ‘ ही एक कला म्हणून, शास्त्र म्हणून मला त्याचा परिचय होता. चौसष्ठ विद्या/कला आहेत, त्यात गायन ही एक कला आहे, सात सूर आहेत, तीन सप्तके आहेत आणि दिवसाच्या आणि रात्रीच्या प्रहरांप्रमाणे स्वतंत्र राग आहेत. हे सगळं मला थोडंफार अभ्यासक्रमातून आणि थोडंफार वाचनातून, श्रवणातून समजत गेलं. मात्र या सगळ्या पुस्तकी ज्ञानाला मागे पडणारं आणि ‘ गाणं ‘ म्हणजे नक्की काय ? हे शिकवणारं काव्य हाती आलं. हे काव्य होतं कवीवर्य मंगेश पाडगांवकर यांचं. ह्या कवितांनी मला गाणं म्हणजे एक ‘ वृत्ती ‘ आहे हे शिकवलं. गाण्यात, ‘ तंत्रशुद्धते ‘ हून मोलाची ‘ मंत्रमुग्धता ‘ असते, ती ह्या कवितांनी शिकवली आणि पर्यायाने जगण्याचं गाणं करीत असं मंत्रमुग्ध जगणं शिकवलं !
गाणं म्हणजे शास्त्र नाही. गाणं म्हणजे ‘ जाणणं ‘ आहे, गाणं म्हणजे ‘ म्हणणं ‘ आहे. गाणं म्हणजे ‘ बोलणं ‘ आहे आणि गाणं म्हणजे ‘ फुलणं ‘ आहे. अशी जगण्याचा आस्वाद घेणारी वृत्ती म्हणजे ‘ गाणं ‘ आहे आणि म्हणूनच ह्या अश्या वृत्तीतून जन्माला येते ती वाचकांना जाणणारी, त्यांचेच म्हणणे म्हणणारी, त्यांच्याशी बोलणारी आणि त्यांना फुलवणारी कविता !
‘ सांगा कसं जगायचं ?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा !…
पायात काटे रुतून बसतात
हे अगदी खरं असतं,
आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसतं ?
काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं
तुम्हीच ठरवा !
पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा !
सांगा कसं जगायचं ?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा ! ‘
असे गाणे गुणगुणत १० मार्च १९२९ रोजी कवी मंगेश पाडगांवकर या पृथ्वीवर अवतरले. कवीवर्यांना गाण्याची अर्थातच विलक्षण ओढ होती परंतु त्यांनी गाण्याची नक्की व्याख्या ओळखली होती.
‘ माझं ज्ञान दाखवावं, सभेत चारचौघात माझी कला सादर करावी आणि मी केलेली साधना फळास यावी ‘ म्हणून जे सादर केलं जातं ते ‘ गायन ‘ असतं. हे सगळं दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रयासाने साध्य होतं ह्यात शंका नाही, मात्र मग तो एक अधिकार होतो, कुणी गायन करावं ह्याचे नियम ठरू लागतात. हे असले गाणे कवी पाडगांवकरांना अभिप्रेत नव्हते किंबहुना मान्यच नव्हते.
‘ गाणं ‘ ह्या शब्दातून त्यांना सुचवायचे होते ते ‘ प्रत्येकाने आपला सूर ओळखावा, आपल्याला मिळालेले शब्द सुंदर मानावे आणि आपल्या कुवतीप्रमाणे आपल्याला आनंद मिळेल अशी रचना आपली आपण करावी आणि ती आनंदाने गुणगुणावी ‘ ही ‘ गाण्याची ‘ नव्हे ‘ जगण्याची ‘ खरी व्याख्या त्यांनी ओळखली, स्वतः जगली आणि ‘ आपल्या गाण्यात ‘ गुणगुणली. ह्या अश्या वृत्तीतूनच जन्माला येतं ‘ मनमोकळं गाणं ‘ अर्थात मनमोकळं जिणं !
‘ मन मोकळं अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !…
सूर तर आहेतच आपण फक्त झुलायचं !…
आपण असतो आपली धून,
गात रहा;
झुळझुळणाऱ्या झऱ्याला
मनापासून ताल द्या;…’
ह्या अश्या ओळी जगण्याच्या अश्या गाण्यातून निर्माण होतात ज्यात सूर, शब्द, ताल सारं एकरूप झालेलं असतं. कोमल, तीव्र असे भेदाभेद नसतात, काळ वेळेचं बंधन नसतं आणि अमानुषा खेरीज वर्ज्य असे इतर कोणतेही सूर नसतात.
‘ धो-धो पावसात जावं वाटलं,
खुशाल जावं !
धारा झेलीत न्हावं वाटलं,
खुशाल न्हावं !…
फुलपाखरं उडत असतात,
आपल्याच रंगात बुडत असतात !
त्यांच्यामागे जावं वाटलं,
खूशाल जावं !
गुंगत गुंगत गावं वाटलं,
खुशाल गावं !
धो धो धारात न्हात रहावं,
न्हात रहावं !
आपलं गाणं गात रहावं
गात रहावं ! ‘
त्यांच्या अनेक कवितांमध्ये असे गाण्याचे उल्लेख आढळतात. काही कवितांमधून आरोह, धृवपद, सम अश्या गाण्याच्या तांत्रिक घटकांचा रूपक म्हणून केलेला उल्लेखही आढळतो परंतू त्यात मुख्य भाव ‘ अतिशय सच्चे असे जे बोल मनात उमटतात, ते बोल त्या त्या व्यक्तीचे गाणे होतात ‘ हाच असतो.
जे गाण्याचं तेच फुलांचं, तेच झाडांचं, तेच पाखरांचं. सृष्टीतली ही चैतन्याने सळसळणारी रूपे. ‘ त्यांचे चैतन्य आपण घ्यावे, आपण फुलून यावे, आपण उडावे आणि आपण गावे ‘ इतका सुंदर आनंदाचा ठेवा देणारी कवी पाडगांवकर यांची कविता आहे. ते स्वतः आनंद पूजक आहेत आणि त्यांचे काव्य आनंददायी आहे. त्यांनी स्वतः देखील ‘ मी आनंदयात्री ‘ असे गाणे म्हटले आहे. जगण्याची नव्याने उर्मी देणारे हे काव्य आहे, जगायला उत्सुक असणारी ही कविता आहे.
कवीवर्य पाडगांवकर यांच्या कविता वरवर अगदी साध्या, सोप्या शब्दांच्या परंतू आनंदाचा महामंत्र देणाऱ्या असतात. ‘ गिरकी ‘ ही देखील ह्याच सारखी
‘ गर गर गिरकी ‘ म्हणत बालपणीच्या खेळाचे शब्द घेवून आलेली परंतू तत्वज्ञानाचा सारांश सांगणारी कविता !
‘ तत्वज्ञान ‘ हा शब्द आणि त्याचं ओझं ह्यावर विनोदी शैलीने आपल्या काव्यातून टीका करणारे पाडगांवकर त्या तत्वज्ञानातून ज्या परमानंदाची प्राप्ती करायची त्या परमानंदाच्या प्राप्तीचे अगदी सोपे मार्ग आपल्या कवितेतून सांगतात. जशी त्यांची ही कविता…
‘ अपुल्या हाती नसते काही
हे समजावे
कुणी दिले जर हात आपुले
हाती घ्यावे
कधीच नसतो मातीवरती
हक्क आपुला
पाण्याने जर लळा लाविला
रुजून यावे
भिरभिरणार्या फूलपाखरा
नसे नकाशा
विसावले जर, ओंजळीचे तर
फूल करावे
नको याचना जीव जडवुनी
बरसातीची
मेघच जर जाहले अनावर
भिजून घ्यावे
नकोच मनधरणी अर्थाची
नको आर्जवे
शब्दांनी जर मिठी घातली
गाणे गावे ‘
सामाजिक, राजकीय परिस्थतीवर टीका करणाऱ्या, उपहास शैलीने, विनोदी शैलीने त्यावर भाष्य करणाऱ्याही अनेक कविता आहेत. सामान्य मनुष्याच्या मनात रुजलेले किंवा रुजवले गेलेले भय आणि त्याची गुलामी पसंद वृत्ती ह्यावर भाष्य करणारी त्यांची ‘ सलाम ‘ नावाची कविता अतिशय प्रसिद्ध आहे. कोणत्या कविता खऱ्या कविता आहेत ह्यावर रचना करीत एक ‘ सल्ला ‘ नावाची अतिशय आगळी वेगळी कविता कवीराज करतात.
‘ सामाजिक, राजकीय जाणिवेच्या कविता
त्याच खऱ्या कविता : कारण त्या भिडतात
प्रत्यक्ष जीवनाच्या प्रखर वास्तवाला.
प्रणयाच्या, निसर्गाच्या जाणिवेच्या कविता
त्याच खऱ्या कविता : कारण त्या काळावर
मात करून उरतात: त्या नसतात
सामाजिक, राजकीय तात्पुरत्या महत्वाच्या….
वृद्ध कवी हसून त्याला शांतपणे म्हणाला:
” गेली वीस वर्षे मी कविता लिहिणं सोडलं आहे;
मी स्वीकारलेली हीच वाट सर्वश्रेष्ठ
हाच माझा तुझ्यासारख्या कवीला सल्ला आहे ! ”
कविता सध्या सोप्या शब्दांत खऱ्या पण कधी कधी त्यांचा आशय थंड पाणी कोणीतरी चेहऱ्यावर फेकून जागे करावे असा. कवीवर्यांची ‘ ऑमलेट ‘ नावाची एक कविता…
‘ कोंबडीच्या अंड्यामधून
बाहेर आले पिल्लू;
अगदी होते छोटे
आणि उंचीलाही टिल्लू !
कोंबडी म्हणाली, ” पिल्लूबाय,
सांग तुला हवे काय ?
किडे हवे तर किडे,
दाणे हवे तर दाणे;
आणून देईन तुला
हवे असेल ते खाणे ! ”
पिल्लू म्हणाले,
“आई,
दुसरे नको काही;
छोट्याश्या कपामध्ये चहा भरून दे,
मला एका अंड्याचे ऑमलेट करून दे ”
ह्यात केवळ एक विनोद आहे असं मला वाटतं नाही. ह्यात प्रतिबिंबित करायचा असावा पराकोटीचा अप्पलपोटेपणा, स्वार्थी आणि संधीसाधू वृत्ती. अश्या सोप्या शब्दांतल्या परंतू अतिशय सखोल आशय असणाऱ्या त्यांच्या अनेक कविता आहेत.
याशिवाय मला आवडणारी ‘शब्द ‘ नावाची कविता…
‘ शब्द जन्माला येतो
पाखरू जन्माला येतं तसा
अंड्यातून येतं पाखरू बाहेर
आपल्या असण्यात आकाश घेऊन :
त्याचं असणं आणि आकाश
यांच्यात उडणं हे नातं असतं
शब्दही जन्माला येतो
घेऊन आपल्या असण्यात
अनुभवांचं अमर्याद आकाश
त्यांचं असणं आणि आकाश
यांच्यात निर्मिती हे नातं असतं ! ‘
कवीवर्य पाडगांवकर यांची काव्य संपदा अफाट आहे. त्यात ह्या अश्या आनंदाचे दान देणाऱ्या कवितांबरोबरच काही अगदी अंतर्मुख करणाऱ्या, कवीच्या मनाचे हळवे कोपरे उलगडून दाखवणाऱ्याही कविता आहेत.
‘ चुकल्यावरीच रस्ते या भेटतात वाटा,
नसतो जिथे किनारा भिडती तिथेच लाटा;
शिवलेत ओठ माझे, काही नको विचारू,
बुडला कुणी तरीही सुख दुःख काय काठा !
थंडीत गोठलेली मी बाग पाहताना
आलीस तू फुलांचा मागावयास वाटा;
या आंधळेपणाचे आयुष्य नाव आहे,
अपुल्यावरील रेषा दिसतात का ललाटा ?
गेला गुलाब आता विसरून सर्व काही,
वस्तीस मात्र आहे हा काळजात काटा. ‘
किंवा ही दुसरी एक कविता…
‘ आगगाडीत बसून आपण जाताना
खिडकीतून दिसणाऱ्या शेताच्या बांधावर
उभी राहून हात हलवून दाखवणारी पोरं :
त्यांचं हात हलवणं स्वागताचं, निरोपाचं
एकाच वेळी; आगगाडी धडाडत आपल्या वेगात
बघता बघता पुढे जाते, आणि समोर
कोणीच दिसत नाही, नुसता अफाट माळ,
जो असतो म्हटलं तरी चालेल, नसतो म्हटलं
तरी चालेल, कसलंच नातं नसणारा!
मी हे तू भेटलीस त्याविषयी बोलत नाही :
त्याविषयी डोळे मिटून निशब्द होणं
हेच खरं हे मला शिकवायला
धडाडत जाणारी आगगाडी थोडीच हवी ? ‘
आज मला केवळ कवितांच्या ओळी लिहिल्या तरी चालणार आहे. कारण ही कविता कोणत्याही विश्लेषणांच्या टेकुवर उभी नाही. कवितेच्या रसग्रहणाच्या नावाने आपण पुष्कळ वेळा तिचे विश्लेषण/ विघटनच अधिक करत असतो. कित्येक वेळा आपले म्हणणे तिच्यावर लादत असतो. अश्याने कविता गुदमरते. कविता हे तिच्या रचनाकाराचे ‘ गाणे ‘ असते. तिचे स्वतःचे असे म्हणणे असते. पाडगावकरांची कविता स्वतःचे म्हणणे स्वतः खणखणीत आवाजात गाणारी आहे. तिला संदर्भ, स्पष्टीकरण, विश्लेषण कश्या कश्याची गरज नाही. खरोखर जिचा रस केवळ ग्रहण करावा अशी ही कविता आहे.
त्यांनी रचना केलेली अनेक गीतेही आहेत. ‘ अशी पाखरे येती ‘, ‘ असा बेभान हा वारा ‘, ‘ दिल्या घेतल्या वचनांची ‘, ‘ दिवस तुझे हे फुलायचे ‘, ‘ नीज माझ्या नंदलाला ‘, ‘ भातुकलीच्या खेळामधली ‘, ‘ माझे जीवनगाणे ‘, ‘ लाजून हासणे अन् ‘, ‘ सांग सांग भोलानाथ ‘, ‘ श्रावणात घन निळा ‘, ‘ या जन्मावर, या जगण्यावर ‘, ‘ शुक्र तारा मंदवारा ‘, प्रत्येक गीत वेगवेगळ्या रागाचे आणि रंगाचे!
असे त्यांच्या कवितांमध्येही वेगवेगळे रंग दिसतात. भय, शोक, क्रोध, मोह, स्नेह ह्या सगळ्या सगळ्याला मानवी जीवनाच्याच छटा ‘ जाणून ‘, त्यांना पवित्र ‘ म्हणून ‘, मानवाशी ‘ बोलणारी ‘ आणि मानवाला ‘ फुलवणारी ‘ कविता म्हणजे कवीवर्य पाडगांवकर यांची कविता !
मी मागच्या एका लेखात उल्लेख केला आहे की प्रत्येक कवी त्याच्या आयुष्यात एका अश्या कवितेचे सृजन करतो, की जी त्याच्याच कवितांचा आरसा असते. त्या एका कवितेत त्या कवीच्या काव्याच्या वृत्तीचे आणि प्रयोजनाचे लख्ख रूप दिसते.
ही पुढील कविता कवीवर्य पाडगांवकर यांच्या कवितेचे चित्र आहे…
‘ गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे
ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे
येता समोर दुःखे तो षड्ज झेलला मी
काट्यांवरी स्वरांची झुलती कमान आहे…
आयुष्य पेटतांना ओठांत सूर होता
हे सोसणे सूराला माझ्या प्रमाण आहे. ‘
कवीवर्य पाडगांवकर, आपण ३० डिसेंबर २०१५ ची सम साधून ह्या पृथ्वीवरचे आपले गाणे संपवले आणि अनंताचे गाणे सुरू केलेत. आपली प्रतिभा, आपण केलेले लेखन विशाल आहे. त्याचे कसे आणि कोणत्या शब्दांत वर्णन करायचे ते मला नेमेपणानं कधीच साधता येणार नाही. वरील लेखनातही अनेक चुका असतील, अनेक उल्लेख राहून गेले असतील. परंतू ज्या दोन गोष्टी आपल्या कवितेने शिकवल्या, मी आज केवळ त्याचेच पालन करते आहे. पहिली म्हणजे आपले सच्चे बोल मनमोकळे पणाने बोलावेत आणि दुसरी म्हणजे चुका झाल्या तरी त्यातून शिकावे. ह्यातूनच केलेला हा आजचा गाण्याचा प्रयत्न आपले चरणी अर्पण करते. आपल्याला माझा प्रणाम 🙏🏻
आपण म्हटले आहे…
‘ आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं
रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं
होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं,
कुठलंच पान कधी गाळायचं नसतं,
चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं,
कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं…’
आपल्या कवितांनी गुणगुणणं दिलं, गाणं दिलं, नव्याने जगणं दिलं. असाच रंग घेवून आलेली ह्या सरत्या वर्षाला, त्यात कळत नकळत झालेल्या चुकांना, शिकलेल्या धड्यांना इमानाने स्वीकारणारी आणि नव्या वर्षाचे, नव्या उद्याचे आणि नव्या आशेचे गाणे गाणारी माझी ही कविता. मी, हा सच्चेपणाने केलेला माझ्या गाण्याचा ‘ शुभारंभ ‘ आपल्या चरणी अर्पण करते.
शुभारंभ
आज मिटूया जरा पापण्या नवे घेऊन स्वप्न उद्याचे
समाप्त क्लेशकर सरून मिळो शुभारंभ ते ज्याचे त्याचे
नवीन आशा नवीन गाणी क्षितीज सोनेरी नभांगणी
नवी पडती पावले दोन्ही पुसूनी जुनी एक कहाणी
उदय उद्याचा किमयागारी करेल जादू ऐशी काही
मळभ ओसरून किल्मिषांचे उठतील नवे तरंग डोही
क्षण कालचे देऊन गेले पुंजी लढण्या नवी लढाई
पुकारले शापित काहींना होतील तरी ते वरदायी
जुन्या जखमा जुन्या जाणीवा दे पंखांना नवी उभारी
ओढ नवीन अथांग निळ्याची निघुया घेण्या नवी भरारी

– लेखन : डॉ. गौरी जोशी – कंसारा, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण लेख…
कवीवर्य मंगेश पाडगांवकरांच्या स्मृतीस सादर प्रणाम!!
खूप खूप आभार लीना ताई 🙏🏻
आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🎊
वाह्, डाॅ. गौरी, नेहमीप्रमाणे खुप खुप सुंदर. कित्येक वाक्य मनाला भिडली. तुमची कविता पण सार्थ अशी आहे. 👌👌👌
खूप सुंदर लेख. छान आढावा घेतला. हीच खरी आदरांजली.