मालेगाव शहराचे वैभव असलेल्या भुईकोट किल्ल्याची दुरावस्था होत आहे. राज्यभरातून किल्ला बघण्यासाठी विद्यार्थी आणि अभ्यासक शहरात येत असतात.
सद्य:स्थितीत या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात काकाणी विद्यालयाची शाळा भरत असून पुरातत्व विभागाने ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावरील अतिक्रमण हटवून त्याचे जतन करण्याची आवश्यकता आहे.
या किल्ल्याचे बांधकाम सन १७४० मध्ये पूर्ण झाले. पेशव्यांचे सरदार श्रीमंत नारो शंकर राजेबहादूर यांनी हा किल्ला मालेगावी मोसम नदीच्या पूर्वकिनाऱ्यावर बांधला. या किल्ल्याची रचना दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या धर्तीवर करण्यात आली आहे. नदीकिनाऱ्यावर असलेल्या काही मोजक्या किल्ल्यांपैकी मालेगावचा भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला महाराष्ट्रातला सर्वांत ‘तरुण’ किल्ला आहे.
किल्ल्याचे बांधकाम हे पेशवाईच्या काळात सन १७४० मध्ये झाले होते. त्यानंतर जेमतेम ७८ वर्षे हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात राहिला. हा किल्ला ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात १३ जून १८१८ रोजी घेतला. किल्ल्यात असलेल्या मराठा फौजेशी लढाई करूनच ब्रिटिशांना हा किल्ला घ्यावा लागला. आजही हा किल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे. असे असले तरी हा किल्ला अनेक दुर्गप्रेमींना आणि पर्यटकांना माहीतच नाही. या किल्ल्याचा उल्लेखही महाराष्ट्राच्या व भारताच्या पर्यटन नकाशात नाही.
दिमाखात उभ्या असलेला हा किल्ला शासकीय पातळीवर तसेच स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर उपेक्षितच आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मालेगावच्या या भुईकोट किल्ल्याचा ताबा केंद्र सरकारकडे गेला. किल्ल्यातले दगड, सागवानी लाकूड अनेकांनी काढून नेले. बरीच वर्षे किल्ल्यामध्ये मद्यपींचे आणि जुगार खेळणाऱ्यांचे अस्तित्व होते. केंद्र सरकारने सन १९६१ मध्ये हा किल्ला आणि किल्ल्याची संपूर्ण जागा एका विशेष सनदेद्वारे मालेगाव एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेला वापरण्यासाठी दिली. त्यानंतर सोसायटीने किल्ल्यात शाळेची भव्य व सुंदर वास्तू उभारली.
मालेगावचा भुईकोट किल्ला पुरातत्त्व खात्याच्या औरंगाबाद विभागाच्या अखत्यारीत येतो. या विभागातर्फे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला लागून असलेल्या भिंतीची डागडुजी काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. तसेच भिंतीतल्या कोनाड्यांचीही डागडुजी करण्यात आली होती.
किल्ल्याच्या भोवती चारही बाजूस मोठा खंदक आहे. हा खंदक सुमारे चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत मूळ स्थितीतच होता. आता किल्ल्याच्या पूर्व आणि दक्षिणेकडचा खंदक कचरा आणि राडारोड्यामुळे जवळपास पूर्ण भरला आहे. किल्ल्याच्या छत्र्यापायऱ्यांच्या सहाय्याने पहिल्या मजल्यावर आपण पोहोचतो. तेथे असणारे छत्र आता नाहीसे झाले असून केवळ खुणा दिसत आहेत. रंगमहालाच्या पश्चिमेकडील भिंतीत दोन सुंदर गच्च्या आहेत. तिसऱ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर सहा फूट रूंदीच्या रहदारीत प्रवेश करतो. तिथून भिंतीला लागून १४ पायऱ्या चढल्यानंतर छत्र्यांपर्यंत पोहोचता येते. ऊन, वारा, पावसामुळे छत्र्यांच्या दगडांची झीज झाली आहे. त्यामुळे या छत्र्या पडण्याचा धोका निर्माण आला आहे. या छत्र्या जर पडल्या तर किल्ल्याचे सौंदर्यच नष्ट होईल. पुरातत्व खात्याने या दोन छत्र्यांची डागडुजी तातडीने करणे गरजेचे आहे.
किल्ल्यात रंगमहाल असून याची लांबी १०४ फूट आणि रूंदी ५९ फूट इतकी आहे. दक्षिणेकडील भिंतीत चुन्याच्या सहाय्याने बनविलेले मजबूत असे लहान आकाराचे कोंडवाडे आहेत. येथे असलेले दुमजली छत आज कोसळले असून तेथे फक्त खुणा शिल्लक आहेत. त्याठिकाणी पत्र्याचा शेड बनविण्यात आला आहे. या रंगमहालाच्या प्रवेशद्वाराच्या दगडांची झीज झाली आहे . ती थांबवण्यासाठी दगडांवर काही रासायनिक लेपन क्रिया करणे अत्यावश्यक झाले आहे.
किल्ल्याच्या आतील मुख्य इमारत पूर्व, पश्चिम ३८५ फुट आणि उत्तर-दक्षिण २८१ फूट लांब आहे. भिंतीला मजबूत करण्यासाठी ठिकठिकाणी ९ बुरूज बांधण्यात आले आहे. प्रत्येक बुरूजाचा व्यास २७ फूट ४ इंच आहे. भिंतीची उंची ६० फूट आणि जाडी ६ फुटीची आहे. तटांना लागून सुमारे दहा फुटांची पायवाट बनविली आहे. त्यामुळे या भागाची जाडी १६ फूट होते. याच पायवाटेतून सैनिक बंदूक आणि तोफांच्या सहाय्याने शत्रूंच्या हल्ल्याचा प्रत्त्युत्तर देत होते. तोफा चालविण्यासाठी खिडक्या बनविल्या आहेत. भुयारी मार्ग किल्ल्यावर जाण्यासाठी भिंतीत अनेक ठिकाणी मार्ग आहेत. हे सर्व मार्ग दगडाने बांधण्यात आले आहेत. यात ३५ ते ४० जिने आहेत. नारोशंकर यांनी ते बनविल्याची शक्यता आहे. आज त्याचे अवशेष मात्र आढळून येत नाहीत. खंदक किल्ल्याच्या मधल्या भिंतीला लागून चारही बाजूने खंदके बांधली आहेत. जमिनी खालच्या मजबूत दगडांना कापून ते तयार करण्यात आले आहेत. खंदकाची रूंदी २५ फूट आणि खोली २५ फूट तर काही ठिकाणी ३० फूट आहे. दगड आणि चुन्याच्या पाच-पाच फुटांच्या थरांमुळे ३५ फूट खोदलेला खंदक २५ फूट शिल्लक राहतो.
मालेगाव शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा हा भुईकोट किल्ला टिकला पाहिजे. हा किल्ला एक चांगले पर्यटनस्थळ होऊ शकतो. पुरातत्व खात्याने किल्ल्याची चांगली डागडुजी केली आणि मालेगाव महानगरपालिकेने किल्ल्यालगतच्या परिसराचे सौंदर्यीकरण केले तर किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या नक्कीच वाढू शकते. त्यातून अनेकांना रोजगार मिळू शकतो.
मग येणार ना,
मालेगावचा किल्ला पहायला ?
– लेखन : समीना शफीक शेख
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
खुप छान सविस्तर वर्णन केलय समिना शेख यांनी. किल्ल्याची आताची अवस्था वाचून वाईट वाटले. महाराष्ट्र सरकार यांत लक्ष घालेल व योग्य ती दुरूस्ति करून किल्ला परत दिमाखात उभा राहिल अशी आशा करते.