Saturday, July 5, 2025
Homeबातम्याऐंशिव्या वर्षी स्फुरलं "साहित्य शिल्प"

ऐंशिव्या वर्षी स्फुरलं “साहित्य शिल्प”

साने गुरुजी यांनी “श्यामची आई” हे पुस्तक लिहिले व त्यांच्या आईची कीर्ती जगभर झाली. त्यानंतर अनेक साहित्यिकांनी आपल्या आईचे कौतुक करणारी पुस्तके प्रकाशित केली. ती माझ्या वाचनात आली तेव्हा माझ्या मनात आले की कोणालाही, आपल्या वडिलांबद्दल लिहावे असे कां वाटत नाही ? त्यातच “सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख” असे समर्थांनी म्हटल्याचे माझ्या वाचनात आले. त्यामुळे की काय कोणी आपल्या वडिलांवर पुस्तक लिहीत नसावे असे वाटत असतानाच “व.पु. सांगे वडिलांची कीर्ती” हे ज्येष्ठ साहित्यिक व .पु .काळे यांचे पुस्तक वाचनात आले. तसेच अर्थतज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांचे “मी आणि माझा बाप” हे पुस्तक वाचले. त्यानंतर र .वा. दिघे यांच्या बद्दलचे “साहित्य शिल्प” हे पुस्तक वाचनात आले.

र .वा. दिघे यांचे शब्दरूपी “साहित्य शिल्प” निर्माण करणारे खरे शिल्पकार दुसरे तिसरे कोणी नसून र .वा. दिघे यांचे चिरंजीव श्री.वामन रघुनाथ दिघे हे आहेत.   व.पु.काळे व श्री.नरेंद्र जाधव यांना लेखनाचा दांडगा अनुभव होता परंतु वामन दिघे यांचे यापूर्वी एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही. सध्या त्यांचे वय अवघे ऐंशी वर्षे आहे.

वामन दिघे यांनी वडिलांची साहित्य क्षेत्रांतील वाटचाल जवळून पाहिली आहे. त्यांना मिळालेले मान सन्मान तसेच त्यांचा झालेला अपमान याचे ते साक्षीदार आहेत. त्यांना वडिलांच्या बद्दल जबरदस्त अभिमान आहे. त्यांची हस्तलिखिते तसेच, कार्यक्रमाचे फोटो, त्यांना मिळालेले पुरस्कार व त्यासंदर्भातील पत्रव्यवहार त्यांनी जपून ठेवला आहे. या पुस्तकांत त्यांनी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

काही साहित्यिकांची जिवंतपणी फारशी दखल घेतली जात नाही, परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांचा उदो उदो केला जातो. परंतु याबाबतीत र .वा. दिघे अपवाद ठरले आहेत. शासनाने अथवा साहित्य संस्था यांनी र .वा. दिघे यांची फारशी दाखल घेतली नाही याबद्दल वामन दिघे यांना खंत वाटते. पुढील पिढीला र .वा. दिघे यांच्या बद्दल खरी खरी व खात्री पूर्वक माहिती मिळावी यासाठी वामन दिघे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले
आहे.

१२० पानी पुस्तकात वामन दिघे यांनी स्वतःच्या शब्दांत र .वा. दिघे यांच्या साहित्य कारकिर्दीची माहिती दिली आहे. त्यांचे अप्रकाशित साहित्य, दुर्मिळ फोटो यांचा समावेश केला आहे. र .वा. दिघे यांच्या कन्या सौ.उर्मिला अवसरीकर तसेच स्नुषा ऊज्वला दिघे यांचे लेख तर आहेतच, परंतु ४ जुलै १९८० रोजी र. वा. दिघे यांचे निधन झाल्यानंतर तसेच जन्म शताब्दी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित अनेक मान्यवरांनी विविध वृत्तपत्रात लिहिलेले लेख पुनः मुद्रित केले आहेत. त्याचप्रमाणे श्री गंगाधर गाडगीळ, श्री आनंद यादव, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, श्री मधुकर भावे, श्री बाबा कदम डॉ .माधव पोतदार इत्यादी साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंतांनी र .वा. दिघे यांच्या साहित्यावर दिलेल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यामुळे ह्या पुस्तकाचा दर्जा अधिक उंचावला आहे.

एके ठिकाणी मी एक वाक्य वाचले होते की “गवयाचे लहान मूल ताला सुरातच रडते” वामन दिघे यांचे हे पहिले पुस्तक प्रकाशित होत असले तरी त्यांची तसेच त्यांच्या भगिनी सौ .उर्मिला अवसरीकर यांची लेखनशैली पाहिल्या नंतर हे सिध्द होते की, साहित्यिकांच्या मुलाने आणि मुलीने चार ओळी जरी लिहिल्या तरी त्या दर्जेदार असतात.

वामन दिघे यांनी पुस्तकाची मांडणी आकर्षक तर केली आहेच परंतु लेखन करतांना शब्दांचा फापटपसारा न मांडता शब्दांचे भान ठेऊन लेख लिहिले आहेत ते पाहून कवी सुधीर मोघे यांच्या कवितेची आठवण येते. ते म्हणतात …

शब्दांत निखारा फुलतो, शब्दांत फुलही हळवे
शब्दांना खेळवितांना, शब्दांचे भान हवे ।

वयाच्या ऐंशिव्या वर्षी पहिले पुस्तक प्रकाशित करून साहित्य दरबारात प्रवेश करणाऱ्या र .वा. दिघे यांच्या सुपुत्राला खुप खुप शुभेच्छा. ह्या पुस्तकाची किंमत अवघी दोनशे रुपए आहे. वाचकांनी वामन दिघे यांच्या मो .नं. ९४०४५८५४९९ वर संपर्क करून पुस्तक खरेदी करावे, ही अपेक्षा.

दिलीप गडकरी

– लेखन : दिलीप प्रभाकर गडकरी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. थोडेफार लिहिणाऱ्या सर्व “लेखूकूंना” प्रेरणा देणारा लेख. धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments